फेअरबँक्स : अमेरिकेच्या अलास्का राज्यातील शहर. लोकसंख्या ५१,५०० (१९७६). हे अँकरेज शहराच्या उत्तरेस ४०० किमी., उत्तर ध्रुववृत्ताच्या दक्षिणेस १६० किमी. टॅनना नदीच्या चीन उपनदीवर वसले आहे. अलास्काचे व्यापारी दळणवळणाचे केंद्र म्हणून हे प्रसिद्ध आहे. त्याच्या परिसरातच सोन्याच्या खाणींचा शोध लागल्यावर १९०२ मध्ये ते वसविण्यात आले आणि इंडियाना राज्याचा सीनेटर व अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष चार्ल्झ वॉरेन फेअरबँक्स (१८५२-१९१८) याचे नाव त्यास देण्यात आले. येथील सोन्याच्या खाणींमुळे आणि नंतर दुसऱ्या महायुद्धात उत्तरेकडील संरक्षण केंद्र म्हणून त्याचा झपाट्याने विकास झाला. चांदी व कोळसा यांच्याही येथे खाणी आहेत. खाणकाम, रसायने, लाकूडतोड इ. उद्योग विकसित अवस्थेत आहेत. शहराजवळ १९४३ पासून सैनिकी विमानतळ असून वायुसेनेतर्फे तेथे क्षेपणास्त्रादिकांच्या चाचण्या घेतल्या जातात. येथे अलास्का विद्यापीठ (१९१७), कृषी महाविद्यालय, खनिकर्म विद्यालय इ. शैक्षणिक संस्था आहेत. अलास्कातील सर्वांत जुने ग्रंथालय येथे आहे. येथील प्रतिवर्षीची ‘यूकॉन’ नावाची बोटींची शर्यंत, कुत्र्यांच्या गाड्यांच्या बर्फांवरील शर्यती, ‘गोल्डन डेज’ नामक उत्सव इ. उल्लेखनीय आहेत.

लिमये, दि. ह.