364

कोलोरॅडो नदी : अमेरिकेच्या नैर्ऋत्य भागातील प्रमुख नदी. लांबी, २,७०० किमी. जलवाहनक्षेत्र ६,३४,४०० चौ. किमी, त्यापैकी ५,२०० चौ.किमी. मेक्सिकोत. ही नदी अमेरिकेच्या कोलोरॅडो संस्थानात रॉकी पर्वताच्या काँटिनेंटल डिव्हाइड या ३,००० मी. उंचीच्या भरपूर हिमवृष्टीच्या प्रदेशात उगम पावून पश्चिमेकडे वाहते. ग्रँड जंक्शनजवळ तिला गनिसन ही उपनदी मिळाल्यावर ती उटा संस्थानात शिरून नैर्ऋत्येकडे वाहते. तिला वायोमिंगच्या हिमवृष्टीच्या प्रदेशात उगम पावून उटामध्ये दक्षिणेकडे अनेक कॅन्यनमधून वाट काढीत आलेली ग्रीन नदी मिळते. डर्टी डेव्हिल, एस्कालँते इ. अनेक नद्या उजवीकडून व डोलोरस, सॅन वॉन, लिटल कोलोरॅडो इ. डावीकडून मिळतात. हा सर्व प्रदेश डोंगराळ, उजाड, उंच सुळके व नैसर्गिक पूल आणि अनेक कॅन्यन यांनी भरलेला आहे.ॲरिझोना राज्यात शिरल्यावर कोलोरॅडोला पारिआ नदी मिळते, तेथील मार्बल कॅन्यनपासून ग्रँड वॉश नदीमुखापर्यंत सलग ३५० किमी. लांब, १,५४० मी. ते २,४४० मी. खोल, माथ्याशी ८ ते २४ किमी. रुंद आणि अनेकरंगी प्राचीन खडकांचे जीवाश्मयुक्त थर असलेली सुप्रसिद्ध ग्रँड कॅन्यन आहे. ओरिझोनाच्या वायव्य भागातून वळणे घेत घेत खोल कॅन्यनमधून आलेल्या त्या कोलोरॅडोवर ३६ उ. येथे ब्लॅक कॅन्यनच्या मुखाशी हूव्हर हे १२१·६ मी. उंच ५,४४० मी. लांब काँक्रीटचे जगप्रसिद्ध धरण बांधले आहे. त्याचा मीड हा जगातील सर्वांत मोठा मानवनिर्मित जलाशय १९० किमी. लांब १८० मी. खोल व ८८० किमी. लांबीच्या किनाऱ्याचा आहे. तेथे १३·५ लक्ष किवॉ. वीज तयार होते. तिच्यावर चालणाऱ्या पंपांनी ॲरिझोना, कॅलिफोर्निया व कोलोरॅडो या राज्यांतील रुक्ष मरुभूमीला पाणी पुरवून तिचे स्वरूप पार बदलून टाकले आहे. यांनतर कोलोरॅडो दक्षिणवाहिनी होऊन ॲरिझोना-नेव्हाडा आणि ॲरिझोना–कॅलिफोर्निया यांच्या सीमांवरून वाहते. बिल विल्यम्स नदी मिळते तेथे बांधलेल्या पार्कर धरणाचे पाणी लॉस अँजेल्स, सॅन डिएगो व इतर वीस गावांस पुरविले जाते. नंतर यूमा येथे तिला गिला ही मोठी उपनदी मिळते. त्याच्याआधी तिच्यावर बांधलेल्या इंपीरिअल व लागूना या धरणांचे पाणी ऑल अमेरिकन कॉलव्याने इंपीरिअल व्हॅली व कॉचिला व्हॅली यांना पुरविले असून तेथे लिंबू जातीची फळे, खजूर, लेट्यूस वगैरेंचे मोठे उत्पन्न काढतात. अमेरिका आणि मेक्सिको यांच्या सीमेवरून २७ किमी. वाहिल्यावर कोलोरॅडो १३० किमी. मेक्सिकोतून वाहत जाऊन कॅलिफोर्नियाच्या आखाताला मिळते. यूमा येथे कोलोरॅडोचा त्रिभुज प्रदेश सुरू होतो. पूर्वी कॅलिफोर्नियाच्या आखाताचा शिरांभाग येथे होता. परंतु प्रदेश गाळाने भरून येऊन सॉल्टन सिंक हा द्रोणीप्रदेश अलग झाला. तो समुद्रसपाटीखाली ८० मी. आहे. १९०५ साली पुराचे पाणी या कोरड्या भागात शिरून सॉल्टन सी हा जलाशय तयार झाला. इंपीरिअल व्हॅली आणि कॉचिला व्हॅली हा या द्रोणीचाच भाग होय. बांध घालून तो पुरापासून वाचविण्यास दोन वर्षे लागली. भरपूर पाणी, धरणांसाठी योग्य जागा, ओलिताला उपयुक्त जमीन व उत्पादित विजेचा भरपूर उपयोग या दृष्टींनी कोलोरॅडो लक्षणीय नदी आहे. या नदीसंहतीत पन्नासहून अधिक उपनद्या समाविष्ट असल्या, तरी या क्षेत्रात लोकवस्ती विरळच आहे.ॲरिझोनातील फीनिक्स हेच काय ते नाव घेण्यायोगे मोठे शहर आहे.ॲरिझोना, कॅलिफोर्निया, कोलोरॅडो, नेव्हाडा, न्यू मेक्सिको, उटा आणि वायोमिंग या सात संबंधित राज्यात कोलोरॅडोच्या पाण्याच्या वापराबद्दल १९२२ मध्ये करार झाला आहे.

कोलोरॅडोच्या खोऱ्यात दोनशे वर्षांपूर्वी प्यूएब्लो इंडियन राहत असत. त्यांची कड्याकपारीतील निवासस्थाने, भिंतीवरील चित्रे, ओलीत पद्धतीचे अवशेष हेच फक्त शिल्लक आहेत. सध्या या खोऱ्यात अनेक इंडियन जमाती राखीव भागात राहत आहेत.

ऊल्योआ व कॉरोनाडा यांनी कोलोरॅडोच्या मुखप्रदेशाचा शोध १५३९ ते १५४१ मध्ये लावला. एर्नांदो द अलार्‌कॉन या मुखातून गिला नदीपर्यंत गेला. गर्सिआ कार्देनास याने ग्रँड कन्यनचा शोध लावला. अठराव्या शतकाच्या मध्यास तोमास याने या नदीला तांबडी किंवा रंग गेलेली या अर्थी कोलोरॅडो हे नाव दिले. त्यापूर्वी तिला ग्रँड नदी म्हणत असत. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास वाफोरातून कोलोरॅडोच्या खालच्या भागाचे समन्वेषण झाले. १८६८–६९ व १८७०–७१ मध्ये मेजर पॉवेल याने छोट्या नावेतून द्रुतवाहांवरून आणि ग्रँड कॅन्यनमधून मोठा धोक्याचा प्रवास केला. १९०१ मध्ये कोलोरॅडोचे पाणी इंपीरिअल व्हॅलीत ओलीतासाठी वापरले गेले. १९२३ मध्ये अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण खात्याने कोलोरॅडोची संपूर्ण पाहणी करून नकाशे तयार केले.

कुमठेकर, ज. ब.