कॉमोरो बेटे : हिंदी महासागरातील फ्रेंचांच्या आधिपत्याखालील ज्वालामुखी द्वीपसमूह. क्षेत्रफळ २,२४४ चौ. किमी. लोकसंख्या २,८०,००० (१९७० अंदाज). मॅलॅगॅसीच्या वायव्येस ३२० किमी. वर मोझॅंबीकच्या ईशान्येस ११ ते १३ द. आणि ४३ ते ४५ ३०´ पू. यांदरम्यान ही बेटे आहेत. मायोत (क्षेत्रफळ ३७४ चौ. किमी. लोकसंख्या ४८,०००), आंझवाँ (४२४—८०,०००), ग्रँड कॉमोरो (१,१४८—१,३२,०००) व मोएली (२९०—१२,०००) ही मोठी आणि इतर खूपशी लहान बेटे या द्वीपसमूहात मोडतात. ग्रँड कॉमोरोवर कारताला हा २,४०० मी. उंचीचा जागृत ज्वालामुखी आहे. ही बेटे डोंगराळ व जंगलयुक्त असली, तरी काही प्रदेश अतिशय सुपीक आहे. उष्ण कटिबंधात असूनही महासागरामध्येच असल्याने येथील हवामान सह्य झाले आहे. खोबरे, व्हॅनिला, सीसल, इमारती लाकूड, कॉफी, कोको, लवंगा तसेच चमेली, जाई, गवती चहा, इलांग इत्यादींची सुगंधी तेले यांची कॉमोरोमधून निर्यात होते. साखर, मद्य, लाकूडकाम व मच्छीमारी हे येथील प्रमुख उद्योग असून लोक प्रामुख्याने मुस्लिम आहेत. ते अरबी व स्वाहिली भाषा बोलतात. ग्रँड कॉमोरोवरील मोरोनी (लोकसंख्या १५,०००) हे राजधानीचे शहर आहे. १९७२ मध्ये प्राथमिक शाळांत १६,६६० आणि माध्यमिक शाळांत १,४६६ विद्यार्थी होते. १९७१ मध्ये २८३.४ कोटी सी.एफ्‌.ए. फ्रँक आयात व १५७.२ कोटी सी. एफ्. ए. फ्रँक निर्यात झाली. १९६८ मध्ये ५२,००० गुरे, ८४,००० शेळ्या व ५,६०० मेंढ्या होत्या. १९६९ मध्ये १०,२०० रेडिओ, ७०० किमी. सडका व १,९३० मोटारी होत्या. मोरोनी येथे विमानतळ आहे.

दुसऱ्या शतकापासून ही बेटे ज्ञात असावीत. अरब व्यापारी व चाच्यांचे हे कित्येक शतके प्रमुख केंद्र होते. १८४३ मध्ये मायोतवर फ्रेंचांनी प्रथम ताबा मिळविला. १९४६ नंतर कॉमोरोस स्वायत्तता देण्यात आली. १९५८ मध्ये येथील प्रादेशिक विधिमंडळाने फ्रान्सच्या संघराज्यातच राहण्याचा निर्णय घेतला. सार्वत्रिक, प्रौढ मतदारांनी निवडलेल्या ३१ सभासदांचे येथील विधिमंडळ असून त्याला जबाबदार असणारे मंत्रिमंडळ येथील कारभार पाहते. राष्ट्रीय संसदेवर येथून दोन प्रतिनिधी निवडले जातात तसेच सीनेटवर एक व आर्थिक-सामाजिक मंडळावर एक प्रतिनिधी निवडला जातो.

 

शाह, र. रू.