ब्रेग्रेंट्स : पश्चिम ऑस्ट्रियाच्या फोरार्लबेर्ख राज्याची राजधानी. लोकसंख्या २४,६२४ (१९८१). कॉन्स्टन्स सरोवराच्या पूर्व किनाऱ्यावरील हे बंदर इन्सब्रुकच्या पश्चिम वायव्येस १२६ किमी. वर फांडर पर्वतपायथ्याशी वसलेले आहे. सुती आणि रेशमी कापड, रसायने, पादत्राणे, विजेची उपकरणे, साखर, डबाबंद खाद्यपदार्थ इ. विविध उत्पादने येथे होत असून जवळच्या मोठ्या जलविद्युत् केंद्रातून त्यासाठी वीजपुरवठा होतो. येथील संग्रहालयात केल्टिक व रोमन काळांतील मौल्यवान वस्तू आहेत. याला सहाव्या शतकापासूनचा इतिहास असून अनेक प्राचीन वास्तू, विशेषतः चर्च वास्तू, येथे आढळतात. शहराजवळच दाट वन असून ते विलोभनीय सृष्टिसौंदर्याने परिपूर्ण आहे. फांडर पर्वत शिखरापर्यंत जाणारा झुलता लोहमार्ग व उन्हाळी व हिवाळी क्रीडाप्रकारांच्या सोयी यांमुळे ब्रेगेंट्स हौशी प्रवाशांचे मोठे आकर्षण बनले आहे.

ओक, द. ह.