यूरोप : ऑस्ट्रेलिया वगळता जगातील सर्वांत लहान आकाराचे खंड. क्षेत्रफळ १,०५,२२,६०० चौ. किमी. लोकसंख्या ४,८२० लक्ष (१९७९ अंदाज). जगाच्या एकूण भूक्षेत्रापैकी केवळ ७.७% भूक्षेत्र यूरोप खंडाने व्यापले असून, जगाच्या लोकसंख्येपैकी ११% लोकसंख्या या खंडात आहे. यूरोप खंडाच्या उत्तरेस आर्क्टिक महासागर, पश्चिमेस अटलांटिक महासागर, दक्षिणेस भूमध्य समुद्र, काळा समुद्र व कॉकेशस पर्वत असून, पूर्वेकडील सीमा रशियातील उरल पर्वत, उरल नदी व कॅस्पियन समुद्र ह्यांनी सीमित केलेली आहे. नॉर्वेमधील सर्वांत उत्तरेकडील उत्तर भूशिर (अक्षांश ७१° १०’ २०” उत्तर) हा मुख्य खंडाचा सर्वांत उत्तरेकडील बिंदू, तर स्पेनमधील दक्षिणेकडील तरीफा भूशिर (अक्षांश ३६° ०१’ उ.) हा सर्वांत दक्षिणेकडील बिंदू आहे. पोर्तुगालमधील रोका भूशिर (रेखांश ९° ३०’ पश्चिम) हा यूरोपच्या मुख्य भूमीवरील सर्वांत पश्चिमेकडील भाग आहे. यूरोप खंडात समाविष्ट होणारी बेटे मात्र या सीमांच्याही बाहेर असलेली आढळतात. स्वालबार बेटे तर ८०° उ. अक्षांशाच्याही उत्तरेकडे आहेत. ग्रीसच्या दक्षिण टोकापासून ते नॉर्वेच्या उत्तर टोकापर्यंतचे अंतर ३,९०० किमी. असून पोर्तुगालच्या नैर्ऋत्य टोकापासून उरल पर्वताच्या दक्षिण टोकापर्यंतची खंडाची लांबी ५,३०० किमी. आहे.

अल्बेनिया, अँडोरा, आइसलँड, आयर्लंड, ऑस्ट्रिया, इटली, ग्रीस, ग्रेट ब्रिटन, चेकोस्लोव्हाकिया, डेन्मार्क, तुर्कस्तान (काही भाग), नॉर्वे, नेदर्लंड्‌स, पश्चिम जर्मनी, पूर्व जर्मनी, पोर्तुगाल, पोलंड, फिनलंड, फ्रान्स, बल्गेरिया, बेल्जियम, मॉल्टा, मोनाको, लक्सेंबर्ग, लिख्टेनश्टाइन, यूगोस्लाव्हिया, रूमानिया, व्हॅटिकन सिटी, सान मारीनो, रशिया (यूरोपीय भाग), स्वित्झर्लंड, स्वीडन, स्पेन, हंगेरी या देशांचा समावेश यूरोप खंडात होतो. रशिया हे राष्ट्र यूरोप व आशिया अशा दोन्ही खंडांत पसरलेले आहे. तसेच तुर्कस्तानचाही काही भाग या खंडात व बाकीचा आशियामध्ये आहे. याशिवाय उत्तरेकडील, पश्चिमेकडील व दक्षिणेकडील महासागरी व सागरी प्रदेशांतील असंख्य बेटांचाही या खंडात समावेश होतो. उत्तरेकडील आर्क्टिक महासागरातील व्हाइगाच, नॉव्हाया झीमल्या, कॉलगूयफ, स्वालबार बेटे, दक्षिणेकडील भूमध्य समुद्रातील इजीअन बेटे, क्रीट, आयोनियन बेटे, सिसिली, सार्डिनिया, कॉर्सिका व बॅलीॲरिक बेटे आणि पश्चिमेकडील अटलांटिक महासागरातील ब्रिटिश बेटे, शेटलंड, ऑर्कनी, आउटर हेब्रिडीझ, फेअरो, लोफोतेन बेटे व बाल्टिक समुद्रातील आव्हेनान्मा, सारेमा, हीऊमा, गॉटलंड, ओलांद, बॉर्नहॉल्म, झीलंड, फ्यून, फाल्स्टर, लॉलान, ऱ्यूगन इ. बेटांचा समावेश यूरोप खंडात करण्यात येतो.

त्रिखंडात्मक पृथ्वी अशी तत्कालीन जगाची ग्रीक कल्पना इ. स. पू. पाचव्या शतकापासूनच रूढ होती व त्यापैकी एक खंड म्हणून यूरोप ओळखले जात असे. ‘टी इन ओ’ या मध्ययुगीन नकाशात यूरोप, लिबिया, आशिया या तीन खंडांचा अंतर्भाव आढळतो. त्यात भूविस्ताराच्या दृष्टीने यूरोप आणि लिबिया मिळून पृथ्वीचा अर्धा भूभाग व आशिया खंडाने उर्वरित अर्धा भूभाग व्यापलेला असून भूमध्य समुद्राने हे दोन भाग वेगळे दर्शविले होते.

मावळतीचा प्रदेश किंवा पश्चिम प्रदेश या अर्थाच्या ‘एरिब’ या सेमिटिक शब्दापासून यूरोप हा शब्द आला असावा, असे मानले जाते. अलीकडे यूरोप हा शब्द विस्तृत दर्शनी प्रदेश (खंड) या अर्थाच्या मूळ ग्रीक शब्दावरून आला असावा, असे मानले जाते. अर्थातच इजीअन समुद्राच्या छोट्या परिसरात राहणाऱ्या प्राचीन ग्रीक समाजाच्या उत्तरेकडे जो विस्तृत भूप्रदेश होता, त्याची ही संज्ञा निदर्शक आहे.

यूरोप व आशिया ही दोन खंडे कोणत्याही जलाशयांनी एकमेकांपासून अलग झालेली नसल्याने काही भूगोलज्ञ यूरोप – आशिया यांचे मिळून ‘यूरेशिया’ असे एकच खंड मानतात. काही भूगोलज्ञ तर आफ्रिका, आशिया व यूरोप यांचे मिळून ‘युफ्रेशिया’ असे एकच खंड मानतात. कारण सुएझ कालवा खोदण्यापूर्वी आफ्रिका व आशिया ही खंडे एकमेकांना जोडलेलीच होती. भौगोलिक वा लोकसंख्येच्या दृष्टीनेही यूरोप खंडाची भूगी स्पष्टपणे वेगळी दाखविता येत नाही. भौगोलिक दृष्ट्या यूरोपची भूमी म्हणजे विस्तृत अशा यूरेशियन भूमीच्या द्वीपकल्पांपैकी एक विस्तृत द्वीपकल्प आहे, असे मानले जाते. याच्या पश्चिमेकडील व उत्तरेकडील सीमा अटलांटिक महासागर, नॉर्वेजियन व बॅरेंट्स समुद्र यांनी सीमित केलेल्या स्पष्टपणे दिसतात. दक्षिणेकडील सीमाही भूमध्य समुद्राने निश्चित केलेली आहे. मात्र तेथील पर्वतीय प्रदेशाने अलग केलेल्या भूमध्य सागरी यूरोपीय भूमीच्या हवामानाचे व भूपृष्ठरचनेचे उत्तर आफ्रिका आणि मध्यपूर्वेतील देशांमधील हवामान व भूपृष्ठरचनेशी साम्य आढळते. यूरोप व आशिया यांना अलग करणाऱ्या तुर्कस्तानच्या उदाहरणावरून हे स्पष्ट दिसते. तुर्कस्तानच्या यूरोपीय आणि आशियाई भागांतील किनारी प्रदेशात प्राकृतिक दृष्ट्या साम्य आढळते. यूरोपची पूर्वेकडील उरल पर्वत व कॉकेशस पर्वतांची मानलेली सीमा मात्र खूपच संदिग्ध आहे. ही सीमारेषा केवळ सोव्हिएट रशियातूनच गेलेली असून, तिच्यामुळे यूरोप – आशिया यांच्यामधील भौगोलिक वेगळेपणा निर्माण झालेला आढळत नाही. सोव्हिएट रशियाही आपल्या यूरोपीय व आशियाई भूप्रदेशांत फरक मानीत नाही. त्यामुळे काही वेळा राजकीय व आर्थिक दृष्ट्या विचार करताना सोव्हिएट युनियन व तुर्कस्तान यांच्या पश्चिमेकडील भूमीला यूरोप म्हणून ओळखले जाते. प्राकृतिक दृष्ट्या जगातील सर्वांत मोठ्या भूखंडाचा वायव्येकडील भूप्रदेश म्हणजे ‘यूरोपीय भूमी’ होय. आफ्रिका व आशिया हे या भूखंडाचे इतर भाग होत. भूमध्य समुद्रामुळे आफ्रिका व यूरोप ही खंडे एकमेकांपासून वेगळी झाली असली, तरी भूमध्य समुद्रातील जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीमध्ये ही दोन खंडे एकमेकांपासून केवळ १३ किमी. अंतरावर आहेत. या खंडाच्या विस्ताराबाबत अशी संदिग्धता असली, तरी पूर्वापार परंपरेनुसार भूमध्य समुद्र, काळा समुद्र, कॉकेशस पर्वत, कॅस्पियन समुद्र, उरल नदी, उरल पर्वत, बॅरेंट्‌स समुद्र, नॉर्वेजियन समुद्र व उत्तर अटलांटिक महासागर यांनी सीमित केलेल्या भूखंडालाच यूरोप खंड म्हणून ओळखले जाते. दुसऱ्या महायुद्धानंतर यूरोप खंडातील पूर्वेकडील देशांनी साम्यवादी शासनव्यवस्थेची स्थापना केली. त्यावरून साम्यवादी व बिगरसाम्यवादी राष्ट्रांची भूमी अशा दोन गटांत हे खंड विभागले गेलेले आहे. पश्चिमेकडील बिगरसाम्यवादी राष्ट्रांचा ‘पश्चिम यूरोप’ म्हणून, तर पूर्वेकडील साम्यवादी राष्ट्रांचा प्रदेश ‘पूर्व यूरोप’ म्हणून ओळखला जातो.

उरल पर्वत (६०° उ. अक्षांश) ते पोर्तुगालचे सॅओं व्हीसेंती भूशिर असा जर यूरोप खंडाचा ईशान्य – आग्नेय आस धरला, तर या आसापासून दोन्ही बाजूंना अनेक द्वीपकल्पे विस्तारलेली आढळतात. यांपैकी उत्तरेकडील स्कँडिनेव्हियन व जटलंड द्वीपकल्पे आणि दक्षिणेकडील बाल्कन व इटालियन ही द्वीपकल्पे महत्त्वाची आहेत. यांशिवाय कोला, क्रिमियन व आयबेरियन (स्पेन व पोर्तुगाल) ही या खंडातील प्रमुख द्वीपकल्पे आहेत.

भूवैज्ञानिक इतिहास : भूवैज्ञानिक दृष्ट्या यूरोप हे तुलनेने अलीकडच्या काळात निर्माण झालेले खंड आहे. संशोधनावरून असे आढळून आले आहे की, या खंडाच्या निर्मितीची प्रक्रिया सु. ५७ कोटी वर्षांपूर्वी सुरू झालेली असावी. तथापि काही भागांत त्यापूर्वीचेही खडक आढळतात. कँब्रियन – पूर्व, पुराजीव, मध्यजीव महाकल्प व तृतीय आणि चतुर्थ कल्पांचा समावेश होणारा नवजीव महाकल्प या वेगवेगळ्या महाकल्पांमध्ये येथील कवचांमध्ये वेगवेगळ्या घटना घडत गेल्याचे आढळून येते.

यूरोप खंडाच्या उत्तर भागातील फेनोस्कँडीयन (बाल्टिक) ढालक्षेत्रात आणि पूर्वेकडील रशियन मंच प्रदेशात अतिप्राचीन खडक असून ते दोन्ही प्रदेश कँब्रियन – पूर्वकालीन आहेत. बाल्टिक ढालप्रदेशात दक्षिण नॉर्वे, स्वीडन व फिनलंडच्या बहुतांश भागाचा, तर रशियन मंच प्रदेशात यूरोपियन रशियाच्या बहुतांश भागाचा समावेश होतो. या भागातील खडक सु. ३०० कोटी वर्षांपूर्वीचे असावेत. उत्तर अमेरिका खंडातील लॉरेंशियन ढालक्षेत्राचे साम्य आढळते. वायव्य स्कॉटलंड हेसुद्धा एक प्राचीन आणि स्थिर असे ढालक्षेत्र असून त्यातही कँब्रियन – पूर्वकालीन खडक आहेत. या सर्व विभागांत प्राचीन पूर्णस्फटित, रूपांतरित खडक आढळतात. यूरोपच्या भूवैज्ञानिक इतिहासात घडलेल्या तीन मुख्य गिरिजनक हालचालींच्या वेळी हा विभाग म्हणजे एक भक्कम प्रतिरोधक व स्थिर भाग ठरला गेला. खनिजसंपत्तीच्या दृष्टीने हा भाग समृद्ध असून त्यात लोहखनिज अधिक महत्त्वाचे आहे.

यूरोपमध्ये प्रमुख तीन गिरिजनक हालचाली घडून आल्या, त्यांनुसार तेथे कॅलिडोनियन, हर्सिनियन आणि अल्पाइन अशा तीन पर्वतसंहती आढळतात. सुमारे ३४.५ कोटी वर्षांपूर्वीच्या डेव्होनियन कालखंडाच्या शेवटी झालेल्या पहिल्या मोठ्या गिरिजनक हालचालींतून कॅलिडोनियन पर्वतसंहतीची निर्मिती झाली. सांप्रतच्या यूरोपीय भूमीपैकी पश्मिच नॉर्वे, उत्तर व मध्य ब्रिटन आणि आयर्लंडच्या बहुतांश भागात ही पर्वतसंहती आढळते. मात्र सध्याच्या पर्वतश्रेण्या ह्या मूळ कॅलिडोनियन पर्वतश्रेण्यांचे अवशिष्ट भाग नसून कॅलिडोनियनोत्तर कालखंडात झालेल्या भूहालचालींच्या वेळी कॅलिडोनियन पर्वतश्रेण्यांच्या तळभागांचा उंचावलेला भाग आहे. साधारण याच कालखंडांदरम्यानचे पुराजीवकालीन खडक फेनोस्कँडीयन किंवा बाल्टिक ढालक्षेत्राच्या पूर्वेकडील भागात आढळत असून कॅलिडोनियन भूहालचालींच्या वेळी त्यांत फारसे बदल घडून आले नाहीत. रशियाच्या मंचाच्या भागात हे खडक असून त्यांचा विस्तार पूर्वेकडे झालेला दिसतो. याच्यावरच नंतरच्या मध्यजीव कालखंडातील खडकरचना आढळते. पूर्वेकडे उरल प्रदेशात हे खडक पृष्ठभागावर उघडे झालेले दिसतात.

कार्‌बॉनिफेरस कल्पाच्या शेवटी व पर्मियन कल्पात म्हणजे सु. २८ कोटी वर्षांपूर्वी झालेल्या गिरिजनक हालचालींतून हर्सिनियन पर्वतसंहितीची निर्मिती झाली. यावेळी दक्षिणेकडून उत्तरेकडे दाब निर्माण झाला होता. यानंतरच्या काळातही गाळाच्या खडकांच्या थरांना वळया पडल्या. या घडीच्या हर्सिनियन पर्वतसंहतीचा विस्तार पोर्तुगाल व दक्षिण आयर्लंडपासून पोलंडपर्यंत आढळतो. बहुतेक पर्वतीय प्रदेशांचे खनन कार्यामुळे मूळ स्वरूप बदलले गेले आणि अलीकडे नव्याने गाळांचे थर साचून निर्माण झालेल्या यूरोपियन मध्यवर्ती मैदानी प्रदेशाखाली हा भाग गाडला गेला. मात्र त्यातील काही भाग नंतरच्या काळात उंचावले जाऊन त्यामुळे यूरोपमधील उन्नतभूमीचे प्रदेश निर्माण झाले. दक्षिण आयर्लंडमधील उन्नतभूमीचे प्रदेश व कमी उंचीचे पर्वतभाग, नैर्ऋत्य इंग्लंडमधील कॉर्नवॉल, पश्चिम फ्रान्समधील ब्रिटनी, स्पेनमधील आयबेरियन मेसेटा, फ्रान्समधील मासीफ सेंट्रल व व्होझ, फ्रान्स व बेल्जियममधील आर्देन, जर्मनीतील ब्लॅक फॉरेस्ट, मध्य जर्मनीतील उन्नतभूमीचे प्रदेश आणि चेकोस्लोव्हाकियातील बोहीमिया हे सर्व हर्सिनियन संहतीमधील उंचावलेले भाग आहेत. यूरोपमधील महत्त्वाची कोळसा क्षेत्रे हर्सिनियन पर्वतश्रेण्यांच्या उत्तर भागात म्हणजेच उत्तर फ्रान्सपासून बेल्जियम – जर्मनी – पोलंडपर्यंत आढळतात. तिसऱ्या गिरिजनक हालचालींच्या वेळी हर्सिनियन पर्वतश्रेण्यांना अनेक ठिकाणी तडे गेले, विभंग झाले किंवा त्या उंचावल्या गेल्या. या प्रदेशात विशेषतः फ्रान्सच्या मासीफ सेंट्रल भागात, ज्वालामुखी क्रियेची चिन्हे दिसतात.

तिसरी आणि अगदी अलीकडील गिरिजनक हालचाल मध्यजीव महाकल्पाच्या उत्तरार्धात (तृतीय कल्पाच्या पूर्वार्धात) घडून आली. सु. ६·५ कोटी वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या हालचालींपासून निर्माण झालेल्या पर्वतांना अल्पाइन पर्वतसंहती असे म्हणतात. या हालचालींत ट्रायासिक, ज्युरासिक व क्रिटेशसकालीन गाळाच्या खडकांच्या थरांना वळया पडल्या, तर काही ठिकाणी खोलवर असलेले पूर्ण स्फटिकी व रूपांतरित खडक भूपृष्ठावर उघडे पडले. अशी ही गुंतागुंतीची पर्वतसंहती यूरोपच्या सर्व दक्षिण भागात म्हणजेच दक्षिण स्पेनपासून काळ्या समुद्रापर्यंत पसरलेली आढळते. हीमध्ये स्पेनमधील सिएरा नेव्हाडा व पिरेनीज, इटलीमधील ॲपेनाइन, मध्य यूरोपातील आल्प्स व कार्पेथियन, बाल्कन द्वीपकल्पावरील दिनारिक, पिंडस व बाल्कन या उत्तुंग पर्वतरांगांचा समावेश होतो. या पर्वतश्रेण्यांदरम्यान अनेक खोलगट भाग आहेत. त्यांपैकी काही मैदानी प्रदेश म्हणून महत्त्वाचे आहेत. स्पेनमधील एब्रो खोरे, इटलीतील पो खोरे, रूमानियातील ग्रेट हंगेरियन मैदान किंवा ऑल्फल्ड व वालेकीया हे त्यांपैकी काही प्रमुख मैदानी भाग आहेत. आशियात काही खोलगट भागांवर सध्या समुद्र आहेत. उदा., भूमध्य समुद्राचे टिरीनियन, एड्रिॲटिक, इजीअन व काळा समुद्र हे उपविभाग अल्पाइन काळात विस्तृत प्रमाणात दाब व ताण निर्माण होऊन पूर्वीच्या कॅलिडोनियन व हर्सिनियनकालीन पर्वतांतील काही प्रदेश उंचावले गेले. भूकंप, जागृत ज्वालामुखी (उदा., व्हीस्यूव्हियस, एटना आणि स्ट्राँबोली), विस्तृत प्रमाणात आढळणारे उष्ण पाण्याचे झरे व आइसलँडमधील ज्वालामुखीक्रियेचे विविध आविष्कार यांवरून यूरोपमधील अनेक ठिकाणचे भूपृष्ठ अजूनही अस्थिर असल्याचे दिसते.

सुमारे १० ते २० लक्ष वर्षांपूर्वी सुरू होऊन दहा हजार वर्षांपूर्वीपर्यंत टिकलेल्या हिमयुगात किंवा प्लाइस्टोसीन कल्पामध्ये संपूर्ण यूरोप खंड हिमाच्छादनाखाली होते. या काळातील हिमरेषेच्या पश्चिमेकडील व दक्षिणेकडील मर्यादा पुढीलप्रमाणे होत्या : नॉर्वेच्या पश्चिमेकडून, स्कॉटलंडच्या उत्तरेकडून, आयर्लंडच्या पश्चिमेकडून व दक्षिणेकडून, ब्रिटनमधील सध्याच्या टेम्स नदीप्रवाहाला अनुसरून गेलेली ही हिमरेषा यूरोपच्या मुख्य भूमीवर मध्य नेदर्लंडसमधून जर्मनीच्या मध्यवर्ती उच्चभूमी प्रदेशाच्या उत्तरेकडून, बोहीमियन गिरिपिंडाच्या सभोवतालून, कार्पेथियनच्या उत्तरेकडून पुढे रशियातील डॉन नदीपर्यंत व तेथून उत्तरेस उरलच्या मध्य भागापर्यंत गेलेली होती.

यूरोपचा उत्तर भाग जेव्हा हिमाच्छादित होता, तेव्हा या हिमस्तरांमुळे मृदा व खडकांचे तुकडे दक्षिणेकडे वाहून आणले गेले. तसेच हिमयुगपूर्वकालीन दऱ्या अधिक रुंद व खोल बनल्या. हिमस्तरांमुळे साचलेल्या या गाळाच्या थरांना मध्य व उत्तर यूरोपमधील स्थानिक भूगोलाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. उत्तर यूरोपमध्येही हिमस्तरांमुळे धोंडे – माती, वाळू इत्यादींचे थर साचले असून हमॅक टेकड्या, हिमोढ, वाळूच्या टेकड्या, सरोवरे ही हिमाच्छादित क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण भूमिरूपे आहेत. हिमक्षेत्रातील हिमानी क्रियेने साचलेले हे वेगवेगळे घटक वेगवेगळ्या प्रवाहांमुळे व वाऱ्यांमुळे आणखी दक्षिणेकडे वाहून आणले गेले. मध्य आणि दक्षिण यूरोपातील लोएसचे थर हेसुद्धा मुळात हिमानी जलोढातूनच निर्माण झालेले असावेत, असे मानले जाते. हिमयुगकालीन हिम नंतरच्या काळात वितळले गेल्यामुळे सागरांची पातळी जवळजवळ ६० मीटरांनी वाढली. उत्तर समुद्राची निर्मिती यातूनच झाली. पूर्वीच्या बाल्टिक सरोवराचे रूपांतर समुद्रात होऊन पूर्वीच्याच एका नदीमार्गाला अनुसरून तो उत्तर समुद्राशी जोडला गेला. त्याच वेळी येथील, विशेषतः स्कँडिनेव्हिया व फिनलंडच्या भूमीवरील, हिमस्तरांचे आच्छादन कमी झाल्याने त्या प्रदेशांवर असलेले वजन घटले आणि त्यामुळे भूकवचाचे संतुलन राखण्यासाठी या भूभागाची उंची वाढू लागली. हिमयुग संपले, तरी हिमयुगकालीन हवामान व हिमनद्यांमुळे निर्माण झालेली भूमिरूपे (उदा., यू आकाराच्या दऱ्या, सरोवरे, कंगोरेदार शिखरे, सर्क, हिमोढ इ.) यूरोपमधील उंच पर्वतश्रेण्यांमध्ये तसेच उत्तर यूरोपमध्ये अजूनही आढळून येतात.

भूवर्णन : प्राकृतिक दृष्ट्या यूरोप खंडाचे मुख्य चार विभाग पडतात : (१) वायव्येकडील पर्वतीय प्रदेश, (२) यूरोपियन मैदानी प्रदेश (ग्रेट यूरोपियन प्लेन), (३) मध्यवर्ती उच्चभूमीचा प्रदेश व (४) दक्षिणेकडील अल्पाइन पर्वतरांगांचा प्रदेश.

(१) वायव्येकडील पर्वतीय प्रदेश : वायव्य फ्रान्स, आयर्लंड, उत्तर ग्रेट ब्रिटन, आइसलँड, नॉर्वे, स्वीडन, उत्तर फिनलंड व यूरोपीय रशियाचा वायव्य भाग यांचा समावेश या विभागात होतो. यातील बहुतेक प्रदेश पर्वतांनी वेढलेला असून तेथील खडकरचना ही पृथ्वीवरील सर्वांत प्राचीन खडकरचना म्हणून ओळखली जाते. तीत खनिज संपत्तीचे भरपूर साठे आढळतात. अनेक वर्षांपासून या प्रदेशाची झीज होत असूनही त्यांत काही उंच शिखरे आढळतात. त्यांपैकी नॉर्वेमधील ग्लिटरटिम (२,४७० मी.) हे या विभागातील सर्वोच्च शिखर आहे. तीव्र पर्वत उतार व मृदेचा पातळ थर यांमुळे कृषिदृष्ट्या हा भाग विशेष महत्त्वाचा नाही. या विभागात भरपूर पर्जन्यमान असल्याने तेथील नद्यांचे पाणी व पाण्यापासून तयार केलेली वीज तेथील औद्योगिक शहरांना मोठ्या प्रमाणात पुरविली जाते. उन्हाळ्यातील चराऊ कुरणे म्हणून हा पर्वतीय भाग प्रसिद्ध आहे. या प्रदेशाचे वायव्य किनारे फ्योर्ड प्रकारचे आहेत. सागरआधारित व्यवसायांस (उदा., मत्स्योद्योग, मीठ उद्योग, शंख – शिंपले – रत्ने काढण्याचा उद्योग, जहाज – वाहतूक इ.) तो भाग अनुकूल आहे. नॉर्वेचा किनारा तर खूपच दंतुर आहे. या भागात लोकसंख्येची घनता फारच कमी (दर चौ. किमी.स १० लोक) आहे.

(२) यूरोपियन मैदानी प्रदेश : यूरोपची निम्म्यापेक्षा अधिक भूमी या प्रदेशात मोडते. रशियाचा बहुतांश भाग, रशियापासून पश्चिमेकडे फ्रान्सपर्यंतचा मैदानी प्रदेश तसेच इंग्लंडच्या आग्नेय भागाचा यात समावेश होतो. रशियाचा तर उत्तरेस आर्क्टिक महासागरापासून दक्षिणेस कॉकेशस पर्वतापर्यंतचा २,४१० किमी. लांबीचा प्रदेश किंवा उत्तरेस बाल्टिक – व्हाइट समुद्रापासून दक्षिणेस काळा – ॲझॉव्हकॅस्पियन समुद्रांपर्यंतचा प्रदेश या मैदानात येतो. पूर्वेकडे या प्रदेशाची रुंदी अधिक आहे. पश्चिमेकडे रशियाचा प. भाग, पोलंड व जर्मनीत या मैदानी प्रदेशाचा दक्षिणोत्तर विस्तार फारच कमी झाला आहे. फ्रान्सच्या पश्चिम भागात या मैदानाची रुंदी पुन्हा वाढलेली आढळते. बेल्जियममध्ये रुंदी सर्वांत कमी (८० किमी.) आहे. यूरोपियन मैदानी प्रदेश मुख्यतः सपाट असून त्यावर काही ठिकाणी टेकड्या आढळतात. जगातील सर्वाधिक सुपीक जमिनीचा प्रदेश म्हणून हा ओळखला जातो. या मैदानाचा पश्चिमेकडील भाग म्हणजे जगातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला भाग आहे. मात्र रशियाच्या बहुतांश मैदानी प्रदेशात लोकसंख्येची घनता कमीच आहे (दर चौ. किमी.स ४८). रशियातील मैदानी प्रदेशाची सस.पासूनची सरासरी उंची सु. १८० मी. असून इतरत्र ती १५० मी.पेक्षा कमी आहे. उत्तरेकडील मैदानी प्रदेश हिमनद्यांच्या संचयनापासून तयार झाल्याचे तेथील भूविशेषांवरून स्पष्ट दिसते. पूर्व ब्रिटन ते युक्रेन यांदरम्यानची मध्य यूरोपियन उच्चभूमी व कार्पेथियन पर्वत यांच्या उत्तरेकडील पायथ्याशी लोएस प्रकारची मैदाने आढळतात.

(३) मध्यवर्ती उच्चभूमी व पठारी प्रदेश : यूरोपच्या मध्यवर्ती भागात (यूरोपीय रशिया वगळता) कमी उंचीचे पर्वतीय प्रदेश व उंच पठारी प्रदेश आढळतात. त्यांची उंची ३०० ते १,८०० मी.च्या दरम्यान आहे. गोलाकार टेकड्या, तीव्र उतार, दऱ्या, खंड (गॅप), हॉर्स्ट इ. विविध भूमिस्वरूपे येथे पहावयास मिळतात. पोर्तुगाल व स्पेनमधील मेसेटा (मध्यवर्ती पठार), फ्रान्समधील मासीफ सेंट्रल (मध्यवर्ती उच्चभूमी), मध्य जर्मनी व पश्चिम चेकोस्लोव्हाकियामधील पठारे व कमी उंचीचे पर्वत, स्कॉटलंडच्या दक्षिण भागातील उच्चभूमीचे प्रदेश हे या प्राकृतिक विभागातील प्रमुख उच्चभूमीचे पठारी प्रदेश आहेत. यांतील काही भाग वनाच्छादित आहेत. बरीचशी भूमी खडकाळ आणि नापीक मृदेची आहे. या भागात ज्वालामुखी प्रकारच्या खडकांचे थर आढळतात. त्यांतील नद्यांची खोरी मात्र सुपीक असून ती शेतीच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. या मध्यवर्ती उच्चभूमीच्या काही भागात, विशेषतः जर्मनी व चेकोस्लोव्हाकिया ह्या देशांत, खनिजांचे भरपूर साठे आहेत. पठारी भागांतून अनेक नद्या उगम पावत असून ते भाग पशुपालनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. स्पेन व फ्रान्समधील या उच्चभूमीच्या प्रदेशात लोकसंख्येची घनता दर चौ. किमी.स ४८ असून जर्मनी व चेकोस्लोव्हाकियात ती दोन ते चार पटींनी अधिक आहे.

(४) दक्षिणेकडील अल्पाइन पर्वतरांगांचा प्रदेश : यूरोपच्या द. भागात पश्चिमेस स्पेनपासून ते पूर्वेस कॅस्पियन समुद्रापर्यंतच्या प्रदेशात अनेक पर्वतश्रेण्या आढळतात. स्पेनमधील सिएरा नेव्हाडा स्पेन व फ्रान्स यांच्या सरहद्दीदरम्यानची पिरेनीज पर्वतरांग आग्नेय फ्रान्स, उत्तर इटली, स्वित्झर्लंड, दक्षिण जर्मनी, ऑस्ट्रिया व उत्तर यूगोस्लाव्हिया या प्रदेशात विस्तारलेला आल्प्स पर्वत, इटलीमधील ॲपेनीज यूगोस्लाव्हिया व ग्रीसमधील दिनारिक आल्प्स, बल्गेरियातील बाल्कन पर्वत, मध्य चेकोस्लोव्हिया, दक्षिण पोलंड, पश्चिम रशिया व रूमानिया या देशांत पसरलेला कार्पेथियन पर्वत, पूर्वेकडील कॉकेशस पर्वत इ. अल्पाइन पर्वतश्रेण्यांचा समावेश या प्राकृतिक विभागात होतो. यूरोपमधील अत्युच्च व निसर्गसुंदर अशी शिखरे या प्रदेशात पहावयास मिळतात. कॉकेशस पर्वतातील मौंट एलब्रुस उंची (५,६३३ मी.) हे यातील सवोच्च शिखर आहे. या विभागात स्विस आल्प्ससारखे अनेक प्रदेश सुटीतील सहलीची ठिकाणे म्हणून प्रसिद्ध आहेत. येथील कमी उंचीच्या पर्वतांचे उतार, सपाटीचे प्रदेश, रुंद खोरी शेतीच्या दृष्टीने उपयुक्त आहेत. अधिक उंचीच्या पर्वत उतारांवर दाट अरण्ये आहेत. त्यांच्यापेक्षा अधिक उंचीचे प्रदेश चराऊ कुरणे म्हणून महत्त्वाचे आहेत. या विभागातील लोकसंख्येची घनता दर चौ. किमी.स १० ते ९७ अशी प्रदेशानुसार कमीअधिक प्रमाणात आढळते. पर्वतश्रेण्यांप्रमाणेच येथे अनेक द्वीपकल्पे आणि समुद्रात अनेक बेटे आढळतात.

मृदा : यूरोपमधील भूगर्भरचना व भूपृष्ठावरील प्राकृतिक रचना यांमधील मृदाप्रकारांत बरीच गुंतागुंत आढळत असली, तरी रशियाच्या मैदानी भागात मात्र मृदाप्रकारांचे वेगवेगळे पट्टे स्पष्टपणे दिसतात. टंड्रा प्रकारची आम्ल, पाणबोदाड व नापीक जमीन सोव्हिएट रशियाच्या उत्तर भाग, फिनलंड व नॉर्वे – स्वीडनचा उंच भाग यांमध्ये आढळते. या मृदापट्‌ट्याच्या दक्षिणेकडील बोथनिया आखात प्रदेश, स्वीडन व रशियातील अपर व्होल्गा नदीच्या उत्तरेकडील भागात पॉडझॉल प्रकारची मृदा आढळते. या पट्‌ट्यात मुख्यतः सूचिपर्णी वृक्षांची अरण्ये आहेत. शेतीच्या दृष्टीने ही निरुपयोगी मृदा आहे. दक्षिण भागात मध्य रशियापासून पश्चिमेस ब्रिटिश बेटांपर्यंत तसेच मध्य स्वीडन, द. नॉर्वे व फिनलंडपासून दक्षिणेस पिरेनीज आल्प्स व बाल्कन पर्वतापर्यंतच्या विस्तृत प्रदेशात पॉडझॉल व तपकिरी मृदा आढळते. या भागात मिश्र अरण्ये आहेत. यात सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण अधिक असते. सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण, जलधारण क्षमता, खोली, क्षारांचे प्रमाण, आम्लता इत्यादींनुसार या मृदांचा वेगवेगळ्या पिकांसाठी उपयोग केला जातो. यूरोपियन रशियाच्या आग्नेय भागात, प्रामुख्याने युक्रेनमध्ये, सुपीक चेर्नोसेम मृदा आहे. यांशिवाय यूरोपमध्ये चेस्टनट, करडी मृदा, टेरा रोझा, पीट व बॉग, गाळाची सुपीक जमीन, पर्वतीय मृदा असे वेगवेगळे मृदाप्रकार आढळतात.

खनिजे : यूरोपमध्ये आर्थिक दृष्ट्या उपयुक्त अशा विविध खनिजांचे साठे आहेत. त्यांपैकी काहींचा उपयोग ब्राँझयुगापासून केला जात आहे. बाकीच्या खनिजांचे औद्योगिक क्रांतीपासून मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जात आहे. यूरोपमध्ये लोह खनिज, दगडी कोळसा व बॉक्साइट यांचे विपुल साठे आहेत. लोह खनिजासाठी फ्रान्स, रशिया व स्वीडन कोळसा उत्पादनासाठी चेकोस्लोव्हाकिया, पूर्व व पश्चिम जर्मनी, ग्रेट ब्रिटन, पोलंड, रशिया हे देश बॉक्साइट उत्पादनासाठी फ्रान्स, ग्रीस, हंगेरी, रशिया व यूगोस्लाव्हिया युरेनियमसाठी फ्रान्स व सोव्हिएट रशिया, तर नैसर्गिक वायू उत्पादनासाठी ग्रेट ब्रिटन, नेदर्लंड्स, नॉर्वे, रूमानिया, अल्बेनिया, रशिया व पश्चिम जर्मनी हे देश महत्त्वाचे आहेत. यांशिवाय क्रोमाइट, तांबे, मँगॅनीज, जस्त, निकेल, पारा, शिसे, खनिज तेल, टिटॅनियम, प्लॅटिनम, पोटॅश, चांदी यांचेही साठे यूरोपमध्ये आहेत.

नद्या, सरोवरे व समुद्र : यूरोपमधील अनेक नद्या वाहतूक, जलसिंचन व जलविद्युत्‌शक्तिनिर्मिती यांसाठी विशेष उपयुक्त ठरतात. या खंडामधील बहुतांश नद्या कॅलिडोनियन, हर्सिनियन व अल्पाइन काळांत निर्माण झालेल्या व भरपूर वृष्टीच्या पर्वतीय प्रदेशातून वाहणाऱ्या आहेत. पश्चिम यूरोपमधील नद्यांचे प्रवाहमान व पाण्याचे प्रमाण हिवाळ्यात जास्त, तर उन्हाळ्यात कमी असते. पर्वतीय प्रदेशातील व खंडांतर्गत हवामान प्रदेशातील नद्यांना वसंत ऋतूत व उन्हाळ्याच्या सुरुवातीला बर्फ वितळल्याने भरपूर पाणी असते. भूमध्य सागरी प्रदेशातील, विशेषतः ग्रीसच्या द्वीपकल्पावरील, काही नद्या तुरळक पर्जन्य, बाष्पीभवन व सच्छिद्र चुनखडकयुक्त पात्र यांमुळे उन्हाळ्यात कोरड्या पडत असल्याचे दिसते. रशियामधून वाहणारी व दक्षिणेकडे कॅस्पियन समुद्राला येऊन मिळणारी व्होल्गा ही यूरोपमधील सर्वांत लांब नदी (३,५३१ किमी.) आहे. कालव्यांद्वारे ही नदी आर्क्टिक महासागर, बाल्टिक समुद्र व डॉन नदीला जोडण्यात आलेली आहे. डॉन ही रशियातील दुसरी महत्त्वाची नदी रुंद पात्रातून ॲझॉव्ह समुद्रमार्गे काळ्या समुद्राला जाऊन मिळते. आल्प्स पर्वतात उगम पावून पश्चिम जर्मनी व नेदर्लंड्समधून वाहत जाऊन उत्तर समुद्राला मिळणारी ऱ्हाईन नदी (लांबी १,१०० किमी.) ही बिगररशियन यूरोपमधील अंतर्गत जलवाहतुकीच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व असलेली नदी आहे. डॅन्यूब ही यूरोपमधील दुसऱ्या क्रमांकाची लांब नदी (२,८६० किमी.) असून ती पश्चिम जर्मनी, ऑस्ट्रिया, चेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, यूगोस्लाव्हिया, बल्गेरिया व रूमानिया अशा सात देशांतून वाहत जाऊन काळ्या समुद्राला मिळते. पूर्व यूरोपच्या नैर्ऋत्येकडील प्रदेशात जलवाहतुकीच्या दृष्टीने विशेष महत्त्वपूर्ण स्थान असलेली ही नदी आहे. याशिवाय रशियातील नीपर, नीस्तर, नेमन, उत्तर द्वीना, पश्चिम द्वीना, व पेचोरा पोलंडमधील ओडर व व्हिश्चला चेकोस्लोव्हाकिया, पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनीतील एल्ब नदी इटलीमधील पो नदी फ्रान्समधील गारॉन, ल्वार, ऱ्होन व सेन स्पेनमधील एब्रो, स्पेन व पोर्तुगाल हद्दीवरील टेगस, ग्वाद्याना व डोरू आणि इंग्लंडमधील टेम्स या यूरोप खंडातील विशेष महत्त्वाच्या नद्या आहेत.

कस्पियन समुद्र हे जगातील सर्वांत मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर (क्षेत्रफळ ३,९८,८२१ चौ. किमी.) यूरोपीय रशियाच्या आग्नेय कोपऱ्यात असून त्याचा काही भाग आशिया खंडात येतो. याला समुद्र म्हणून संबोधले जात असले, तरी वस्तुतः ते सरोवरच आहे. कारण ते चोहोबाजूंनी जमिनीने वेढलेले आहे. याचा उत्तर किनारा सस.पासून ३८ मी. खोल असून तो यूरोपमधील सर्वांत कमी उंचीचा प्रदेश आहे. यूरोपमधील गोड्या पाण्याच्या सरोवराखालील एकूण क्षेत्रफळ १,३७,००० चौ. किमी. असून ते उत्तर अमेरिकेतील मिशिगन व सुपीरिअर सरोवरांच्या एकत्रित क्षेत्रफळापेक्षाही कमी आहे. म्हणजेच यूरोपच्या एकूण भूमीपैकी दोन टक्क्यांपेक्षाही कमी भूमी सरोवरांखाली आहे. स्कँडिनेव्हिया व उत्तर रशियामध्ये हजारो सरोवरांची निर्मिती झालेली आढळते. वायव्य रशियातील लॅडोगा हे यूरोपमधील सर्वांत मोठे (क्षेत्रफळ १७,७०३ चौ. किमी.) गोड्या पाण्याचे सरोवर आहे. या सरोवराच्या पूर्वेस ओनेगा हे दुसऱ्या क्रमांकाचे सरोवर (९,८८० चौ. किमी.) आहे. ही दोन्ही सरोवरे बाल्टिक समुद्र व श्वेत समुद्र यांदरम्यानच्या भागात आहेत. फिनलंडमध्ये सु. ६०,००० सरोवरे असून त्या देशाला ‘हजारो सरोवरांची भूमी’ (लँड ऑफ थाउजन्ड लेक्स) असे संबोधले जाते. फिनलंडमधील सरोवरांनी देशाच्या क्षेत्रफळाच्या एक – पंचमांश क्षेत्र व्यापले आहे. स्कॉटलंड, आयर्लंड व स्वीडन यांमध्येही सरोवरांची संख्या खूप आहे. इंग्लंडमधील लेक डिस्ट्रिक्ट हे लघुक्षेत्राचे परंतु अप्रतिम निसर्गसौंदर्य लाभलेले सरोवर आहे. मध्य इटलीमध्ये ज्वालामुखी सरोवरे, तर बाल्टिक व भूमध्य सागर किनाऱ्यावर खाजणसदृश सरोवरे आढळतात. आल्प्स पर्वत प्रदेशातही अनेक सरोवरे पहावयास मिळतात. स्वित्झर्लंडमधील जिनीव्हा, नशाटेल, ल्यूसर्न व झुरिक ही सरोवरे पश्चिम जर्मनी, ऑस्ट्रिया व स्वित्झर्लंड यांदरम्यानचे कॉन्स्टन्स सरोवर, स्वित्झर्लंड व इटली यांदरम्यानची माद्‌जोरे आणि लूगानो ही सरोवरे, तर इटलीमधील कोमो व गार्दा ही सरोवरे उल्लेखनीय आहेत.

इतर कोणत्याही खंडापेक्षा यूरोपचा समुद्रकिनारा खूपच अनियमित, दंतुर व विखंडित स्वरूपाचा आहे. लहानमोठ्या द्वीपकल्पांच्या मालिकांमुळे समुद्रकिनाऱ्याला असे अनियमित स्वरूप प्राप्त झालेले दिसते. नॉर्वे व स्वीडन यांचे स्कँडिनेव्हियन द्वीपकल्प, डेन्मार्कचे जटलंड द्वीपकल्प. पोर्तुगाल व स्पेनचे आयबेरियन द्वीपकल्प, इटलीचे ॲपेनाइन द्वीपकल्प आणि अल्बेनिया, बल्गेरिया, ग्रीस, यूगोस्लाव्हिया व तुर्कस्तान (काही भाग) या देशांचा समावेश असणारे बाल्कन द्वीपकल्प ही या खंडातील प्रमुख द्वीपकल्पे आहेत. वेगवेगळ्या द्वीपकल्पांच्या दरम्यानच्या भागात समुद्र, उपसागर व आखाते आहेत. या अनियमित समुद्रकिनाऱ्याची एकूण लांबी ६०,९५७ किमी. असून ती पृथ्वीच्या विषुववृत्तीय परिघाच्या लांबीच्या दीडपटीपेक्षा अधिक आहे. दंतुर समुद्रकिनाऱ्यामुळे यूरोपला अनेक उत्कृष्ट नैसर्गिक बंदरे लाभली असून, काही देशांत त्यामुळे मासेमारी व जहाजबांधणी उद्योगांचा विकास झालेला आहे. खंडाच्या दक्षिणेस भूमध्य समुद्र असून द्वीपकल्पे आणि बेटे यांनी विभागलेल्या त्याच्या वेगवेगळ्या भागांना वेगवेगळी नावे आहेत. यांतील कॉर्सिका, सार्डिनिया, सिसिली व इटली यांदरम्यानचा विभाग टिरीनियन समुद्र या नावाने इटली व यूगोस्लाव्हिया यांदरम्यानच्या समुद्र भागाला एड्रिॲटिक समुद्र या नावाने इटली व ग्रीस यांदरम्यानच्या सागरभागाला आयोनियन समुद्र या नावाने, तर ग्रीस व तुर्कस्तान यांदरम्यानचा सागरविभाग इजीअन समुद्र या नावाने ओळखला जातो. हे सर्व भूमध्य समुद्राचेच उपभाग आहेत. दार्दानेल्स सामुद्रधुनी, मार्मारा समुद्र व बॉस्पोरस सामुद्रधुनी यांद्वारे भूमध्य समुद्राला काळा समुद्र जोडला गेला आहे, तर जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीने भूमध्य समुद्र अटलांटिकला जोडला गेला आहे. खंडाच्या वायव्य भागात जमिनीमध्ये घुसलेला बाल्टिक समुद्र असून, अटलांटिकमधून सोव्हिएट रशियाकडे जाणारा हा प्रमुख जलमार्ग आहे. काही ठिकाणी या समुद्राची खोली १८० मी. पेक्षा अधिक आढळते. बॉथनियाचे आखात, फिनलंडचे आखात व रिगा आखात ही बाल्टिक समुद्राची प्रमुख आखाते आहेत. स्कॅगरॅक समुद्र, कॅटेगॅट समुद्र व अरुंद खाडीमुळे बाल्टिक समुद्र उत्तर समुद्राशी जोडला गेला आहे. पोर्तुगाल आणि स्पेन यांच्या उत्तरेस बिस्केचा उपसागर आहे. यूरोपच्या उत्तरेस श्वेत समुद्र व बॅरेंट्स समुद्र, वायव्येस नॉर्वेजियन समुद्र, यूरोपची मुख्य भूमी व ब्रिटिश बेटे यांदरम्यान उत्तर समुद्र, तर ग्रेट ब्रिटन व आयर्लंड यांदरम्यान आयरिश समुद्र आहे. उत्तर समुद्र व अटलांटिक महासागर यांदरम्यान म्हणजेच इंग्लंड यूरोपची मुख्य भूमी यांदरम्यान इंग्लिश खाडी आहे.

हवामान : यूरोपच्या वेगवेगळ्या प्रदेशातील हवामानात भिन्नता आढळत असली, तरी खंडाचा बहुतांश भाग सौम्य हवामानाचा आहे. याच अक्षवृत्तीय पट्‌ट्यात असलेल्या आशिया आणि उत्तर अमेरिकेपेक्षा यूरोपमधील हवामान सौम्य असलेले आढळते. अटलांटिक महासागरावरून यूरोपच्या भूमीकडे वाहत येणाऱ्या वाऱ्यांमुळे येथील हवामान सौम्य बनलेले आहे कारण यूरोपच्या पश्चिम किनाऱ्याजवळून वाहणाऱ्या उष्ण गल्फ प्रवाहामुळे हे वारे उबदार बनतात. या वाऱ्यांच्या वाहण्याच्या मार्गात त्यांना अडवू शकणारे विशेष पर्वतीय प्रदेश नाहीत. त्यामुळे अटलांटिक किनाऱ्यापासून ४८० किमी. पर्यंत येणाऱ्या यूरोपच्या बहुतांश भूमीवरील (रशिया वगळता) हवामानावर या वाऱ्यांचा परिणाम झालेला दिसतो. या उष्ण गल्फ प्रवाहाचा व जोरदार पश्चिम वाऱ्यांचा परिणाम नॉर्वेच्या किनाऱ्यावर तर विशेष जाणवतो. नॉर्वेचा बहुतांश किनारा आर्क्टिक प्रदेशात मोडत असून हिवाळ्यात तो भाग बर्फाच्छादित असतो असे असूनही उष्ण गल्फ प्रवाह व त्यावरून वाहत येणारे पश्चिमी वारे या दोन्ही घटकांच्या परिणामाने नॉर्वेच्या किनाऱ्यावरील सर्व बंदरे (आर्क्टिक भागासह) हिवाळ्यातही गोठलेली न राहता वाहतुकीस खुली राहतात.

सामान्यपणे दक्षिण यूरोपपेक्षा उत्तर यूरोपमधील हिवाळे दीर्घकालीन व थंड, तर उन्हाळे अल्पकालीन व शीत असतात. तसेच पश्चिम यूरोपपेक्षा पूर्व यूरोपमधील हिवाळे दीर्घकालीन व थंड, तर उन्हाळे अल्पकालीन व उष्ण असतात. स्कॉटलंडमधील ग्लासगो येथील जानेवारीचे सरासरी तापमान ३° से. असते, तर त्याच अक्षवृत्तावरील अंतर्भागातील मॉस्को येथील जानेवारीचे सरासरी तपमान मात्र – १०° से. असते.

यूरोपच्या बहुतांश भागातील वार्षिक सरासरी वृष्टिमान ५० ते १५० सेंमी. आहे. सर्वाधिक म्हणजे २०० सेंमी. पेक्षा जास्त वृष्टी पर्वतीय प्रदेशाच्या पश्चिम भागात येणाऱ्या पश्चिम ग्रेट ब्रिटन, पश्चिम नॉर्वे व पश्चिम यूगोस्लाव्हिया या प्रदेशांत होते. सर्वांत कमी वृष्टी (५० सेंमी. पेक्षा कमी) (१) उंच पर्वतरांगांच्या पूर्वेस, (२) अटलांटिक महासागरापासूनचा अगदी अंतर्गत भाग व (३) आर्क्टिक महासागराचा किनारी प्रदेश अशा तीन प्रदेशांत होते. यात स्पेनचा मध्य व आग्नेय भाग, यूरोपियन रशियाचा आग्नेय व उत्तर भाग आणि उत्तर स्कँडिनेव्हिया या प्रदेशांचा समावेश होतो.

हवामानानुसार यूरोपचे मुख्य चार विभाग पाडता येतात.

(१) सागरी हवामान विभाग : स्वालबार, आइसलँड, फेअरो, ब्रिटिश बेटे, नॉर्वे, दक्षिण स्वीडन, पश्चिम फ्रान्स, उत्तर जर्मनी, वायव्य स्पेन या भागांत या प्रकारचे हवामान आढळते. येथील हवामानावर अटलांटिक वायुराशींचा परिणाम झालेला दिसतो. अक्षांश व उंचीनुसार येथील उन्हाळे उबदार ते उष्ण असतात. वर्षभर पुरेशी वृष्टी होते, तर जास्त उंचीच्या भागात ती भरपूर होते. शरद ऋतूत किंवा हिवाळ्याच्या पूर्वार्धात सर्वाधिक वृष्टी होत असते. उन्हाळ्यातील व हिवाळ्यातील तपमानांत खूपच तफावत आढळते.

(२) मध्य यूरोपियन संक्रमणात्मक हवामान विभाग : मध्य स्वीडन, दक्षिण फिनलंड, नॉर्वेमधील ऑस्लो खोरे, पूर्व फ्रान्स, नैर्ऋत्य जर्मनी आणि मध्य व आग्नेय यूरोपचा बहुतांश भाग या हवामान विभागात मोडतो. सागरी व खंडांतर्गत अशा दोन्ही वायुराशींचा प्रभाव येथे आढळतो. उत्तरेकडील आणि पश्चिमेकडील सागरी हवामान प्रदेश, पूर्वेकडील विस्तृत खंडांतर्गत हवामान विभाग आणि दक्षिणेकडील भूमध्यसागरी हवामान विभाग यांदरम्यानच्या मध्य यूरोपमध्ये हा संक्रमणात्मक हवामान विभाग येतो. येथील हिवाळे थंड, तर उन्हाळे (मुख्यतः सखल भागातील) उबदार असतात. प्रदेशानुसार वृष्टी बेताची ते भरपूर होत असून उन्हाळ्यात ती सर्वाधिक होते. पर्वतीय प्रदेशात २०० सेंमी. पेक्षा अधिक पर्जन्यवृष्टी होत असून तेथे हिमवृष्टीही होत असते. उंच शिखरे तर नेहमीच बर्फाच्छादित असतात. ड्यॅन्यूब प्रदेशात माफक पर्जन्यवृष्टी होते. बूडापेस्ट येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६१ सेंमी. आहे. दिनारिक आल्प्स पर्वत प्रदेशात हिवाळ्यात तीव्र चक्रवात निर्माण होत असून उन्हाळ्यात पर्जन्यवृष्टी होते. पश्चिमेकडून पूर्वेकडे वार्षिक तपमान कक्षा वाढत जाते.

(३) खंडांतर्गत हवामान विभाग : यूरोपच्या बहुतांश भागांत या प्रकारचे हवामान असून त्यात यूरोपियन सोव्हिएट रशिया (बाल्टिक प्रदेश वगळता), फिनलंडचा बहुतांश भाग व उत्तर स्वीडनचा समावेश होतो. पश्चिम यूरोपपेक्षा ईशान्य भागातील हिवाळे दीर्घकालीन आणि बरेच थंड असतात, तर आग्नेय भागात उन्हाळे अधिक उष्ण असतात. तपमान कक्षा जास्त आढळते. सर्वाधिक पर्जन्यवृष्टी उन्हाळ्यात होत असली, तरी पश्चिम यूरोपपेक्षा ती कमीच असते. मॉस्को येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६३.५ सेंमी. असून, रशियन मैदानाच्या उत्तर व आग्नेय भागांत सरासरी पर्जन्यमान २५ सेंमी. ते ५० सेंमी. च्या दरम्यान असते. दक्षिण भागात पर्जन्यमान फारच कमी असून, तेथे अवर्षणाची परिस्थिती आढळते.

(४) भूमध्य सागरी हवामान : दक्षिण यूरोपच्या किनारी प्रदेशात समशीतोष्ण कटिबंधीय भूमध्य सागरी प्रकारचे हवामान आढळते. येथील हिवाळे सौम्य व आर्द्र, तर उन्हाळे उष्ण व कोरडे असतात. उन्हाळ्यात आकाश निरभ्र असते. मात्र हवामानात प्रादेशिक भिन्नता आढळते. पश्चिम भागात सागरी वायुराशींचा प्रभाव अधिक पडतो. पर्जन्यवृष्टी पश्चिमी वाऱ्यांपासून होत असून वातविमुख बाजूवर पावसाचे मान कमी झालेले दिसते. रोम येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६६ सेंमी. असून अथेन्स येथे ते केवळ ४० सेंमी. आहे.

(५) वनस्पती व प्राणी : पूर्वी यूरोपमध्ये विस्तृत अरण्यमय प्रदेश होते परंतु शेती, मानवी वसाहती आणि वेगवेगळ्या लाकूड उद्योगासाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड केल्याने अरण्यांखालील क्षेत्र कमी झालेले आहे. मध्य व दक्षिण यूरोपमध्ये अशी जंगलतोड मोठ्या प्रमाणावर झाली असली, तरी उत्तर यूरोपमध्ये अद्याप विस्तृत जंगलमय प्रदेश आहेत. खंडाच्या उत्तर भागात विस्तृत अशी सदाहरित सूचिपर्णी अरण्ये असून त्यांत फर, बर्च, पाइन व स्प्रूस हे वनस्पती प्रकार अधिक आहेत. इमारती व कागद उद्योगांसाठी या अरण्यांतून मोठ्या प्रमाणावर लाकडाचा पुरवठा होतो. जंगल संवर्धनाच्या दृष्टीने यूरोपियन शासनांनी निर्बंधात्मक अटी घालून दिल्या आहेत. बिगर – रशियन यूरोपच्या मध्य व दक्षिण भागांत रुंदपर्णी पानझडी वृक्षांची अरणे आढळतात. त्यांत ॲश, बीच, बर्च, एल्म, मॅपल व ओक हे वनस्पती प्रकार महत्त्वाचे आहेत. याच प्रदेशात रुंदपर्णी व सूचिपर्णी या अरण्यांचे मिश्रणही आढळते. तसेच येथील पर्वतीय प्रदेशांत अधिक उंचीच्या भागात सूचिपर्णी वृक्षांची अरण्ये आहेत. भूमध्य सागराच्या किनारी प्रदेशात प्रामुख्याने रुंदपर्णी सदाहरित वृक्षांची अरण्ये असून कॉर्क व ऑलिव्ह ह्या त्यांतील प्रमुख वनस्पती होत.

यूरोपमध्ये स्टेप व प्रेअरी असे दोन प्रकारचे गवताळ प्रदेश आढळतात. यूरोपीय रशियाच्या आग्नेय भागात स्टेप प्रकारचा गवताळ प्रदेश आहे. हा प्रदेश कोरडा असून केवळ कमी उंचीचे गवत आढळते. याउलट प्रेअरी प्रकारचा गवताळ प्रदेश सुपीक जमिनीचा असून तेथील गवत स्टेप प्रदेशापेक्षा अधिक उंचीचे असते. या प्रेअरी प्रकारच्या गवताळ प्रदेशाचा विस्तार यूरोपियन मैदानी प्रदेशात असून त्यात प्रामुख्याने पश्चिमेकडील मैदानी प्रदेश व यूरोपियन रशियाचा मध्यवर्ती भाग येतो. शेतजमीन व चराऊ कुरणे अशा दोन्ही प्रकारे या गवताळ प्रदेशाचा वापर केला जातो.

टंड्रा प्रदेश व उंच पर्वतीय प्रदेशातील हवामान अतिथंड असल्यामुळे तो संपूर्ण भाग वृक्षरहित ओसाड असाच आहे. आर्क्टिक महासागर किनाऱ्याचा बहुतांश भाग अशा प्रकारचा आहे. वर्षातील बहुतांश काळ हा प्रदेश बर्फाच्छादित असतो. अल्पकालीन व साधारण उबदार उन्हाळ्यात या प्रदेशातील बर्फाचा वरचा ३० ते ६१ सेंमी. जाडीचा थर वितळून तेथे लहानलहान दलदलीचे प्रदेश व डबकी तयार होतात. उन्हाळ्यात शेवाळ, छोटीछोटी झुडपे, दगडफूल व विविधरंगी शोभायमान फुलझाडे अशा लहानलहान अल्पजीवी वनस्पती वाढतात. उंच पर्वतांच्या वरच्या भागात हीच परिस्थिती आढळते. या दोन्ही प्रदेशांतील काही भागांचा गुरे चारण्यासाठी उपयोग केला जातो.

राष्ट्रीय उद्याने, प्राणिसंग्रहालये, प्राण्यांचे रक्षित भाग व मानवी वसाहतीपासून दूरच्या प्रदेशात वन्य प्राणिजीवन आढळते. यूरोपमध्ये व प्रामुख्याने रशिया व उत्तर स्कँडिनेव्हिया यांमध्ये तपकिरी अस्वलांची संख्या खूप आहे. कोल्हे व लांगडे सर्वत्र आढळतात. नैर्ऋत्य यूरोपमधील उंच पर्वतरांगांमध्ये शॅमॉय व आयबेक्स ह्या शेळीसारख्या प्राण्यांची संख्या अधिक आहे.

भूमध्य समुद्र ते आर्क्टिक महासागर यांदरम्यानच्या वेगवेगळ्या प्रदेशांत एल्क, रेनडियर व विविध जातींची हरणे पहावयास मिळतात. आर्क्टिक, अटलांटिक व भूमध्य समुद्र यांच्या किनाऱ्यांपासून दूरच्या भागात सील सापडतात. यांशिवाय सामान्यपणे बिजू, ससा, हेज्‌हॉग, लेमिंग्ज, मोल, ऑटर, खार, रानडुक्कर हे प्राणी आढळतात. गरुड, बहिरी ससाणा, फिंच, चिमणी, बुलबुल पक्षी, घुबड, डोमकावळा, कोकिळ, सारिका, करकोचा, कबुतर इ. पक्ष्यांच्या प्रमुख जाती यूरोपमध्ये आढळतात.

अटलांटिक किनारा तसेच बाल्टिक, काळा समुद्र, कॅस्पियन, भूमध्य समुद्र व उत्तर समुद्र यांमध्ये अनेक जातींचे मासे मोठ्या प्रमाणावर सापडतात. त्यांपैकी अँकोव्ही, कॉड, फ्लाउंडर, हेरिंग, तलवार मासा, सॅमन, सार्डीन, स्टर्जन, ट्राउट व ट्यूना ह्या महत्त्वाच्या जाती आहेत. स्टर्जन माशांच्या अंड्यांचा उपयोग कॅव्हिआर हे मिष्टान्न तयार करण्यासाठी केला जातो.

भौगोलिक विभाग : यूरोप हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत लहान खंड असले, तरी येथे प्राकृतिक व सांस्कृतिक दृष्ट्या खूपच भिन्नता आढळते. भौगोलिक दृष्ट्या यूरोपचे मुख्य सात भौगोलिक विभाग पडतात.

(१) भूमध्य सागरी दक्षिण विभाग : या विभागात ग्रीस, इटली, स्पेन व पोर्तुगाल अशा मुख्य चार देशांचा व तुर्कस्तानच्या काही भागाचा समावेश होतो. भूस्वरूपदृष्ट्या या भागात खडबडीत अल्पाइन पर्वतश्रेण्या असून त्यांत ३,००० मी. पेक्षा अधिक उंचीची शिखरे आहेत. मैदानी प्रदेश त्या मानाने कमी आहेत. उत्तर इटलीमधील पो खोऱ्यात त्यांतल्यात्यांत विस्तृत मैदानी प्रदेश आहेत. हा भौगोलिक विभाग म्हणजे पश्चिम यूरोपीय सौम्य व आर्द्र हवामान विभाग आणि उत्तर आफ्रिकेचा उष्ण व कोरडे हवामान विभाग यांच्यातील संक्रमण प्रदेश आहे.(या विभागात उपोष्ण कटिबंधीय कोरडे हवामान असून येथील सर्व देश कृषिप्रधान आहेत). हिवाळ्यात अझोर्स जास्त भार प्रदेश दक्षिणेकडे सरकल्याने वर्षातील बहुतेक पाऊस याच काळात पडून जातो, तर उन्हाळ्यात हा भारपट्टा उत्तरेकडे सरकल्याने उन्हाळा कोरडा जातो. स्वच्छ व भरपूर सूर्यप्रकाश, सुंदर पुळणी, इतिहासप्रसिद्ध वास्तू, निसर्गरम्य परिसर यांमुळे या विभागात पर्यटन व्यवसायाचा विशेष विकास झालेला दिसतो. तुलनेने कमी सुपीक अशा जांभ्या मृदेखालील क्षेत्र अधिक आहे. नद्यांच्या खोऱ्यातील गाळाची मृदा व ज्वालामुखी मृदा या सुपीक मृदा आहेत. आर्थिक दृष्ट्या उपयुक्त खनिजांचे साठे या विभागात मर्यादित प्रमाणात आहेत. स्पेनमध्ये कोळसा व लोह इटलीत खनिज तेल व नैसर्गिक वायू, ग्रीसमध्ये बॉक्साइट, तर पोर्तुगालमध्ये टंगस्टन ही मुख्य खनिजे आहेत. नैसर्गिक साधनसंपत्तीच्या तुलनेने लोकसंख्या अधिक असल्याने दरडोई उत्पन्न इतर यूरोपीय राष्ट्रांपेक्षा येथे कमी आहे.

(२) पश्चिम किनारी प्रदेश : या विभागात पश्चिमेकडील अटलांटिक किनाऱ्यावरील बेल्जियम, फ्रान्स व नेदर्लंड्स या तीन देशांचा समावेश होत असून, ही राष्ट्रे म्हणजे यूरोपची अटलांटिककडील प्रवेशद्वारेच आहेत. त्यामुळे आर्थिक व राजकीय दृष्ट्या त्यांचे स्थान मोक्याचे आहे. भूस्वरूपदृष्ट्या या विभागात खूपच भिन्नता आढळते. माँ ब्लां हे आल्प्समधील सर्वोच्च शिखर फ्रान्समध्ये आहे, तर नेदर्लंड्‌सचा बराचसा भाग सस.पेक्षाही कमी उंचीचा आहे. या विभागात हिवाळे सौम्य व सर्वसाधारणपणे हिमरहित, तर हिवाळे शीतल व अभ्राच्छादित असतात. पर्जन्यवृष्टी वर्षभर होत असली, तरी शरदऋतूच्या पूर्वार्धात वृष्टिमान थोडे अधिक असते. सर्वत्र रुंदपर्णी पानझडी अरण्ये असली, तरी पाइन वृक्षांचे विस्तृत पट्टेही पहावयास मिळतात. या विभागात करड्या तपकिरी पॉडझॉल मृदेखालील क्षेत्र अधिक आहे. कोळसा, लोह खनिज, पोटॅश, बॉक्साइट, खनिज तेल व नैसर्गिक वायू या आर्थिक दृष्ट्या महत्त्वाच्या खनिजांचे या विभागात आधिक्य आहे. शेती, उद्योग व व्यापार यांत हा विभाग अग्रेसर आहे. लोकसंख्येच्या घनतेबाबत मात्र भिन्नता आढळते. फ्रान्स विस्ताराने मोठा असला, तरी तेथे लोकसंख्येची घनता कमी आहे, तर नेदर्लंड्‌स व बेल्जियम या आकाराने लहान असलेल्या देशांत ती जास्त आहे.

(३) द्वीपीय प्रदेश : यामध्ये ब्रिटन व आयर्लंड बेटांचा म्हणजेच ग्रेट ब्रिटन व आयर्लंड या देशांचा समावेश होतो. या दोन्ही बेटांमध्ये स्थान, हवामान, वनस्पती व मृदा यांबाबतीत साम्य असले, तरी तलशिला भिन्न असल्यामुळे खनिज साठ्यांच्या बाबतीत भिन्नता आढळते. आयर्लंड बेटावर कोळशाच्या साठ्यांचा अभाव आहे, तर ब्रिटनमध्ये कोळशाचे विपुल साठे आहेत. आयर्लंडवर मुख्य व्यवसाय शेती असून लोकसंख्या तुलनेने विरळ आहे. याउलट ब्रिटनमध्ये औद्योगिक प्रगती प्रचंड प्रमाणात झालेली असून लोकसंख्याही खूप दाट आहे. या भौगोलिक प्रदेशामध्ये सागरी हवामान असून वर्षभर सर्व ऋतूंत पुरेशी वृष्टी होते. दोन्ही बेटांवर स्थानिक रुंदपर्णी पानझडी वृक्षांची अरण्ये आढळतात. मात्र त्यांतील बरीचशी अरण्ये शेती, जहाजबांधणी, लाकूड व लोणारी कोळसा यांसाठी तोडली गेली आहेत. येथे करडी – तपकिरी पॉडझॉल मृदा आढळते.

(४) जर्मनीचा अंतरक प्रदेश : या विभागात पूर्व व पश्चिम जर्मनी, ऑस्ट्रिया व स्वित्झर्लंड या देशांचा समावेश होत असून या भागात जर्मन भाषेचे प्रभुत्व आढळते. या देशांचे स्थान खंडाच्या मध्यवर्ती असून त्यांचा सांस्कृतिक वारसा सारखाच आहे मात्र भूस्वरूपांमध्ये बरीच भिन्नता आढळते. पूर्व जर्मनीचा बहुतांश भाग मैदानी स्वरूपाचा आहे, तर स्वित्झर्लंड व ऑस्ट्रिया यांत आल्प्स पर्वतरांगा आहेत. ऑस्ट्रियातील डॅन्यूब खोरे मैदानी स्वरूपाचे आहे. पश्चिम जर्मनीत मात्र यूरोपातील उत्तर मैदानी, मध्यवर्ती उच्चभूमी व अल्पाइन पर्वतप्रदेशांचा विस्तार आढळतो. पश्चिमेकडील सागरसान्निध्याच्या भागात सौम्य व बर्फरहित हिवाळे असतात, तर पूर्वेकडे व अधिक उंचीच्या प्रदेशात हवामान थंड असून तेथे बर्फवृष्टी होत असते. त्यामुळेच पूर्व जर्मनी, स्वित्झर्लंड व ऑस्ट्रिया या देशांत हिवाळे कडक असतात. पूर्वेकडील खंडीय भागातील उन्हाळे उबदार असतात, तर दक्षिणेकडील उंचीच्या प्रदेशांत ते अधिक शीत असतात. अशा संपूर्ण भौगोलिक प्रदेशातील ऱ्हाईन खचदरी व व्हिएन्ना खोरे हे अधिक उबदार भाग आहेत. या प्रदेशातील वनस्पती व मृदा यांमध्ये भिन्नता आढळते. उबदार हवामानाच्या सखल प्रदेशात रुंदपर्णी पानझडी अरण्ये, व थंड हवामानाच्या उच्चभूमीच्या प्रदेशात सूचिपर्णी अरण्ये आढळतात. येथून लाकडाचे व्यापारी तत्त्वावर उत्पादन घेतले जाते. ऱ्हाईन व व्हिएन्ना ही सुपीक मृदेची खोरी आहेत. कोळश्याच्या साठ्यांसाठी हा विभाग जगप्रसिद्ध असून खनिज तेल व नैसर्गिक वायूचेही साठे आहेत. सर्वत्र सखोल शेती केली जाते. अर्थव्यवसाय मुख्यतः उद्योग व व्यापाराधिष्ठित असून स्वित्झर्लंड व ऑस्ट्रियात पर्यटन हा उत्पन्नाचा मुख्य आधार आहे.

(५) पूर्व यूरोपीय विभाग : यामध्ये अल्बेनिया, बल्गेरिया, चेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, पोलंड, रूमानिया व यूगोस्लाव्हिया या साम्यवादी देशांचा समावेश होतो. येथे सांस्कृतिक भिन्नता आढळते. पूर्व यूरोपमधून गेलेले मैदानी प्रदेशाचे दोन पट्टे आढळतात. उत्तरेकडील, विशेषतः पोलंडमधील, सखल प्रदेश व दक्षिणेकडील हंगेरी, यूगोस्लाव्हिया व रुमानियामधील डॅन्यूब खोरे या दोन सखल प्रदेशांच्या दरम्यान कार्पेथियन, ट्रान्सिल्व्हेनियन आल्प्स यांसारखे पर्वतीय तसेच पठारी प्रदेश आहेत. डॅन्यूब खोऱ्याच्या दक्षिणेलाही यूगोस्लाव्हिया, अल्बेनिया व बल्गेरिया या देशांतून दिनारिक आल्प्स, बाल्कन, रॉडॉपी पर्वतश्रेण्या गेलेल्या आहेत.

या पूर्व यूरोपीय भौगोलिक विभागातील हवामान खंडीय प्रकारचे असून हिवाळे थंड व हिममय आणि उन्हाळे उबदार व आर्द्र असतात. सर्व ऋतूंत वृष्टी होत असली, तरी हंगेरी – रूमानियाच्या मैदानी प्रदेशात वनस्पतींच्या वाढीच्या दृष्टीने पुरेशी वृष्टी होत नाही. त्यामुळे या विभागांच्या पश्चिम भागात स्टेप वनस्पती आढळतात. बाकीच्या प्रदेशात रुंदपर्णी पानझडी अरण्ये व अधिक उंचीवर सूचिपर्णी अरण्ये आढळतात. डॅन्यूब खोऱ्यात चेर्नोसेम मृदा, चेकोस्लोव्हाकियात करडी – तपकिरी पॉडझॉल मृदा, तर बाल्कन विभागात राखाडी करडी पॉडझॉल मृदा आढळते. हवामान व मृदा यांतील भिन्नतेनुसार कृषिव्यवसायात भिन्नता आढळते. शेतीमध्ये अधिक लोक गुंतले असले, तरी दुसऱ्या महायुद्धापासून औद्योगिकीकरणावरही या राष्ट्रांनी भर दिलेला आहे. कोळसा, लोह खनिज, खनिज तेल, बॉक्साइट इ. महत्त्वाच्या खनिजांच्या साठ्यांमुळे युद्धोत्तर काळात या राष्ट्रांनी उल्लेखनीय प्रगती केलेली आहे.

(६) उत्तर सरहद्द विभाग : सांस्कृतिक व ऐतिहासिक साम्य असलेल्या ह्या सहाव्या भौगोलिक विभागात नॉर्वे, स्वीडन, फिनलंड, डेन्मार्क व आइसलँड या पाच देशांचा समावेश होतो. मानवी वस्तीचा ध्रुवाकडील अगदी उत्तरेकडील हा भौगोलिक विभाग असून तेथे लोकसंख्याही विरळ आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती अपुरी असली, तरी इतर यूरोपीय राष्ट्रांप्रमाणे आपले राहणीमान टिकविण्याचा हे देश आटोकाट प्रयत्न करीत असल्याचे आढळते. भौगोलिक परिस्थितीच्या (विशेषतः भूपृष्ठरचना व हवामान) प्रतिकूलतेमुळे नॉर्वेची तीन – चतुर्थांश व आइसलँडची सात – अष्टमांश भूमी अनुत्पादक बनली आहे. त्यामुळे येथे वनस्पतींची व पिकांची वाढ योग्य प्रकारे होऊ शकत नाही. नॉर्वेचा एक – चतुर्थांश भाग, स्वीडनचा निम्म्यापेक्षा अधिक प्रदेश, तर फिनलंडचा तीन – चतुर्थांश प्रदेश अरण्यांखाली आहे. डेन्मार्कची तीन – चतुर्थांश भूमी पिकांखाली किंवा कुरणांखाली आहे त्यामुळे येथील पशुपालन व दुग्धोत्पादन व्यवसाय मोठा आहे. स्वीडनमध्येच फक्त लोह खनिजांचे भरपूर साठे आहेत. इतर देशांत मात्र आर्थिक दृष्ट्या महत्त्वाची खनिजे सापडत नाहीत. कोळसा, खनिज तेल व नैसर्गिक वायू यांच्या अभावामुळे शक्तिसाधन म्हणून जलविद्युत्‌ शक्तीचा अधिकाधिक उपयोग केला जातो. हवामान व जमीन यांच्या प्रतिकूलतेमुळे शेती व्यवसाय मर्यादित प्रमाणात चालतो. नॉर्वे, स्वीडन व फिनलंड यांच्या अर्थव्यवस्थांत अरण्योद्योगाला विशेष महत्त्वाचे स्थान आहे, तर मासेमारी हा नॉर्वे व आइसलँड यांमधील प्रमुख व्यवसाय आहे. औद्योगिकीकरणाला या विभागात थोडी उशिराच सुरुवात झालेली दिसते.

यूरोपियन रशिया : यूरोपच्या ह्या सातव्या भौगोलिक प्रदेशात रशियाच्या यूरोपीय भागाचा समावेश होतो. सोव्हिएट रशियाचा हा औद्योगिक दृष्ट्या विकसित आणि दाट लोकवस्तीचा प्रदेश आहे. जगातील ही एक बलाढ्य औद्योगिक आणि लष्करी शक्ती आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने इतर सहा भौगोलिक विभागांपेक्षा हा विभाग मोठा असून त्यामानाने लोकसंख्या मात्र कमी आहे. या भौगोलिक विभागात उत्तरेकडे व पूर्वेकडे तपमान कमी होत जाते, तर वृष्टिमान दक्षिणेकडे व पूर्वेकडे कमी होत जाते. त्यानुसार आर्क्टिक महासागर व कॅस्पियन समुद्र यांदरम्यान वनस्पती प्रकारांचे प्रमुख सात पट्टे आढळतात : उत्तरेकडून दक्षिणेकडे अनुक्रमे टंड्रा, तैगा (सूचिपर्णी अरण्ये), मिश्र अरण्ये, पानझडी अरण्ये, स्टेप, अर्ध – वाळवंटी आणि वाळवंटी वनस्पती, हे ते सात पट्टे होत. यांशिवाय दक्षिणेकडील भागात भूमध्य सागरी प्रकारच्या वनस्पती आहेत. वनस्पतींप्रमाणेच येथे टंड्रा, पॉडझॉल, करडी – तपकिरी पॉडझॉल, चेर्नोसेम, तपकिरी स्टेप, करडी वाळवंटी व जांभी असे मृदाप्रकार आढळतात. डोनेट्‌स खोऱ्यातील कोळसा क्षेत्र, क्रिव्हाइ रोग येथील लोह खनिज क्षेत्र व व्होल्गा – उरल यांदरम्यानचे खनिज तेल साठे ही प्रमुख खनिजे असून त्यांशिवाय मँगॅनीज, निकेल, बॉक्साइट, तांबे ही यूरोपीय रशियातील प्रमुख खनिज उत्पादने आहेत. यांशिवाय युक्रेनचे समृद्ध कृषिक्षेत्र, उत्तरेकडील विस्तीर्ण अरण्ये, व्होल्गा व नीपरवरील जलविद्युत्‌निर्मिती, वाहतुकीच्या मार्गांचा विकास यांमुळे आधुनिक सोव्हिएट रशियातील हे प्रसिद्ध औद्योगिक केंद्र बनले आहे.

लेखक : चौधरी, वसंत

इतिहास : प्रागैतिहासिक कालखंड (सु. ५,००,००० ते ५,००० वर्षे). यूरोपच्या या आद्य कालखंडाची विभागणी पुराणाश्मयुग, आंतराश्मयुग आणि नवाश्मयुग अशा तीन युगांमध्ये केली जाते. पुराणाश्मयुगाच्या प्रारंभापासून मानवसदृश प्राणी किंवा आदिमानव, तर या युगाच्या अखेरीपासून ज्याला मानवशास्त्रज्ञ होमो सेपियन म्हणजे पूर्णार्थाने मानव म्हणतात, असा मानव यूरोपात वावरत होता. गवे, अस्वले, रानबैल, गेंडे, भीमगज यांसारख्या प्राण्यांच्या सान्निध्यात राहणाऱ्या मानवाने त्या काळात प्रामुख्याने दगडी शस्त्रांचा आणि हत्यारांचा वापर केला. या दगडी आयुधांच्या गुणवत्तेच्या निकषावरच मुख्यतः प्रागैतिहासिक काळाची विभागणी केली जाते. पुराणाश्मयुगापासून नवाश्मयुगापर्यंतच्या प्रदीर्घ कालखंडात मानवाची प्रगती संथगतीने होत राहिली. पुराणाश्मयुगात मानव शिकारी आणि मच्छीमार होता. आंतराश्मयुगात तृणभक्षक प्राणी माणसाळविण्यास प्रारंभ झाला. त्यातून पशुपालन हा महत्त्वाचा व्यवसाय बनला. नवाश्मयुगात शेतीची कला मानावाने आत्मसात केली. त्यामुळे मानवी जीवनाला स्थैर्य प्राप्त झाले. नैसर्गिक गुहा हे मानवाचे पहिले घर होते, तर नवाश्मयुगातील मानव दगड, माती, लाकूड यांपासून झोपडीवजा घरे बांधू लागला होता. स्वित्झर्लंडमध्ये आणि नंतर अन्य काही यूरोपीय प्रदेशांत मानवाने बांधलेल्या गर्तावास (तळातल्या घरांचे) अवशेष सापडले आहेत. वस्त्रविहीन अवस्थेत अवतरलेल्या मानवाने प्रथम प्राण्यांची कातडी व झाडपाल्याची वस्त्रे वापरण्यास सुरुवात केली, तर नवाश्मयुगात तो सुती कपडे तयार करू लागला. रानटी अवस्थेतच मानवाला अग्नीचे रहस्य उमजले आणि नवाश्मयुगातील चाकाच्या शोधाने तर सर्वांगीण मानवी प्रगतीला चालना मिळाली. मानवाने प्रथम छोट्या प्रमाणावरील कुटुंबजीवन जगायला सुरुवात केली. पुढे समूहजीवनाचा घेर वाढत गेला आणि राज्यसंस्थेसारखी नियंत्रक व्यवस्था नवाश्मयुगाच्या अखेरीस उगम पावली. निसर्गाविषयीची उत्सुकता, भीती आणि कृतज्ञता या भावनांमधून मानवाचे धर्मजीवन सुरू झाले असावे. निसर्गपूजा व जादूटोण्याला त्यामध्ये स्थान होते. काही अंत्यविधी व अंत्यसंस्कार यांवरून पारलौकिक जीवनाविषयीच्या कल्पनाही स्पष्ट होतात. शेतीच्या प्रारंभानंतर आदिमातेच्या पूजेची चाल स्थिरावली. नवाश्मयुगात इंग्लंडमधील स्टोनहेंजसारखी पूजास्थाने निर्माण होऊ लागली. मानवाचे कलाजीवन प्रागैतिहासिक काळातच फुलून आले. पुराणाश्मयुगातील विशेषतः फ्रान्स व स्पेनमधील अनुक्रमे लॅस्को व अल्तामिरा येथील गुहाचित्रे विशेष प्रसिद्ध आहेत. इ. स. पू. ३००० च्या सुमारास नवाश्मयुगाचा अस्त झाला व प्राचीन संस्कृतींचे वैभवशाली युग सुरू झाले. [⟶ आदिमकला प्रागैतिहासिक कला].

इजीअन संस्कृती : जगातील सर्वांत प्राचीन संस्कृती यूरोपबाहेर ईजिप्त, मेसोपोटेमिया व भारत या देशांमध्ये उदयास आल्या. यूरोपात मात्र ब्राँझयुगात संस्कृतीचा उदय झाला. यूरोपीय भूमीवर सुसंस्कृत समाज स्थिरावले ते प्रथम  ⇨ क्रीट व नंतर ⇨ ग्रीसमध्ये इ. स. पू. ३००० ते ११०० या कालखंडात यूबीआ, मिटिलीनी, थेसॉस, सॅमोथ्रेस, सिक्लाडीझ, सेमॉस, क्रीट इ. बेटांवर सुसंस्कृत समाजजीवन नांदत होते. ही इजीअन किंवा हेलाडिक संस्कृती म्हणून प्रसिद्ध असून मिनोअन (क्रीटन) आणि मायसीनीअन असे तिचे दोन प्रमुख कालखंड मानले जातात. ग्रीसच्या आग्नेयीस सु. १३० किमी. वर असणारे क्रीट हे यूरोपातील संस्कृतीचे पहिले महत्त्वाचे केंद्र. नॉसस हे राजधानीचे शहर भव्य राजप्रासाद, प्रेक्षागृहे आणि हवेल्यांनी नटलेले होते. यूरोप, आशिया व आफ्रिका या त्रिखंडांना जवळ असल्याने क्रीट महत्त्वाचे व्यापारी केंद्र बनले. भव्य इमारती, उत्कृष्ट भित्तिचित्रे, प्रगल्भ कुंभारकाम, ब्राँझ व लोखंडाचे धातुकाम, लेखन कलेचा विकास, व्यापारी प्रगती, सुखवस्तू समाजजीवन ही इजीअन संस्कृतीची काही ठळक वैशिष्ट्ये होती. ग्रीक संस्कृतीवर तिचा ठसा उमटलेला आहे [⟶ इजीअन संस्कृति].

ग्रीक संस्कृती : ग्रीस हा प्राचीन पौर्वात्य व आधुनिक यूरोपीय संस्कृतींना जोडणारा दुवा आहे. यूरोपीय विचारविश्व, कलाविश्व व संस्थाजीवनाला ग्रीक कल्पना आणि मूल्यांचा आधार आहे. मुख्यतः इ. स. पू. दुसऱ्या सहस्रकात इंडो – युरोपीय लोकांच्या टोळ्या ग्रीक भूमीत येऊन स्थिरावू लागल्या. त्यांतील डोरियन टोळ्यांनी इजीअन संस्कृतीचा नाश केला प्रामुख्याने ॲकियन – डोरियन हा मिश्र समाज ग्रीक या नावाने ओळखला जातो. इ. स. पू. ८०० च्या सुमारास या समाजाच्या नागर संस्कृतीचा उदय झाला. ग्रीक नगरराज्यांना एका अर्थाने तेथील निसर्गाने जन्म दिला. किनाऱ्याभोवती पसरलेले बेटांचे मोहोळ आणि डोंगरदऱ्यांनी विभक्त झालेला ग्रीसचा मुख्य भूभाग यांमुळे त्या त्या नगरराज्यांपुरते लोकजीवन बंदिस्त झाले. एकीकडे धान्योत्पादनातले दारिद्र्य, पण दुसरीकडे मोठा दंतुर किनारा अशा नैसर्गिक परिस्थितीत ग्रीक वसाहतवाद आणि व्यापाराचे रहस्य दडलेले आहे. स्वयंपूर्ण आणि स्वयंशासित अशा ग्रीक नगरराज्यांपैकी ⇨ अथेन्स, ⇨ स्पार्टा, ⇨ थीब्ज, ⇨ कॉरिंथ ही प्रमुख राज्ये, नगरराज्यांवर तीव्र निष्ठा, पण समग्र ग्रीक ऐक्यविचाराचा मात्र अभाव हे ग्रीक लोकमानसाचे वैशिष्ट्य होते. वास्तविक सर्व ग्रीक लोक समान वांशिक, भाषिक व धार्मिक धाग्यांनी एकत्र बांधलेले होते. काळाच्या ओघात ऐक्यभावना वृद्धिंगत करणारे ⇨ ऑलिंपिक क्रीडा सामन्यांसारखे सांस्कृतिक दुवेही निर्माण झाले. परंतु नगरराज्यांमधील स्पर्धा सतत धुमसतच राहिली. काही अपवाद वगळता नगरराज्यांची राजकीय वाटचाल समांतर मार्गाने झाली. राजेशाही, उमरावशाही, हुकूमशाही, अल्पजनसत्ता आणि लोकशाही असा विकासक्रम तीमधून दिसतो. लोकशाही ही ग्रीसची महत्त्वाची देणगी खरी, पण तिचे स्वरूप बरेचसे अल्पजनसत्ताक होते. सर्व नागरिकांना नगर – प्रशासनात वाटा देणारी प्रत्यक्ष लोकशाही ग्रीसमध्ये असली, तरी नागरिकत्वाचा परिघ बराच संकुचित होता आणि गुलामगिरी दृढमूल झालेली होती. नगरराज्यांच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना म्हणजे ग्रीस – इराण युद्ध (इ. स. पू. ४९० – ४७९). इराणसारख्या समान शत्रुविरुद्ध एकत्र आलेली नगरराज्ये त्याच्या पराभवानंतर आपापसांत लढू लागली. अथेन्स आणि स्पार्टा ही त्यांतील प्रमुख प्रतिस्पर्धी राज्ये होत. केवळ ग्रीसवरील वर्चस्वासाठी ही सत्तास्पर्धा नसून दोन भिन्न जीवनमार्गांचा तो संघर्ष होता. स्पार्टा हे मूलतः परंपरानिष्ठ लष्करवादी राज्य, तर अथेन्स हे विकसनमार्गी लोकशाहीवादी राज्य होते. इ. स. पू. पाचव्या शतकाच्या उत्तरार्धातील त्यांच्या संघर्षात अथेन्सचा पाडाव झाला. तरी अथेन्सची सांस्कृतिक कामगिरी मात्र चिरस्थायी ठरली. शक्ती व बुद्धी या दोहोंची उपासना करुन अथेन्सने संस्कृतीची सर्व दालने समृद्ध केली. पेरिक्लोझचे युग (इ. स. पू. ४६१ – ४२९) हे तर ग्रीसचे सुवर्णयुग मानले जाते. अर्थात अथेन्सचे वैभव इजीअन आणि भूमध्य किनाऱ्यावरील दुर्बल जनसमूहांच्या आर्थिक शोषणावर आधारलेले होते. अथेन्सच्या पाडावानंतरचे स्पार्टाचे वर्चस्व अल्पजीवी ठरले व नगरराज्यांच्या कलहाचा फायदा मॅसिडोनियन राज्यकर्त्यांनी उठवला. फिलिप या मॅसिडोनियन राजाने ग्रीसवर प्रस्थापित केलेले वर्चस्व (इ. स. पू. ३३८) त्याचा पुत्र  ⇨ अलेक्झांडर द ग्रेट याने दृढ केले.

 

अलेक्झांडर (कार. इ. स. पू. ३३६ – ३२३) हा श्रेष्ठ पण वादग्रस्त इतिहास पुरुष होता. जग जिंकण्याच्या महत्त्वाकांक्षेने व्यापक युद्धमोहीम हाती घेऊन त्याने ईजिप्तमधील नाईल नदीपासून भारतातील सिंधू नदीपर्यत विशाल साम्राज्य निर्माण केले. तो एक श्रेष्ठ सेनानी असला, तरी कुशल प्रशासक वा मुत्सद्दी मात्र नव्हता. त्यामुळे त्याच्या मृत्यूनंतर साम्राज्याचे विभाजन झाले. पुढे रोमन लोकांनी ग्रीस जिंकून घेतला (इ. स. पू. १४६). अलेक्झांडरमुळे पौर्वात्य संस्कृतींशी ग्रीक संस्कृतीचा मिलाफ घडून त्यातून ⇨ ग्रीकांश संस्कृती निर्माण झाली.

ग्रीक – ग्रीकांश सांस्कृतिक ठेवा फार मोलाचा आहे. तत्त्वज्ञानाचे सोफिस्ट, सिनिक, स्टोइक, एपिक्यूरियन असे संप्रदाय आणि सॉक्रेटीस प्लेटो – ॲरिस्टॉटल ही तत्त्वज्ञांची त्रिमूर्ती प्रसिद्ध आहे. सत्य, शिव आणि सौदर्य या तत्त्वांना महत्त्व, मानव्याची प्रतिष्ठा, ऐहिक आणि विवेकनिष्ठ दृष्टिकोण ही ग्रीक विचारविश्वाची वैशिष्ट्ये होती. ⇨होमरची महाकाव्ये, सायमॉनिडीझ पिंडर व सॅफो यांची भावकाव्ये, एस्किलस, सॉफेक्लीझ आणि युरिपिडीझच्या शोकात्मिका, ॲरिस्टोफोनीस व मिनँडर ह्यांच्या सुखात्मिका इ. साहित्यकृतींनी ग्रीक वाड्मय समृद्ध केले. ⇨ हीरॉडोटस हा इतिहासलेखनाचा जनक आणि ⇨ थ्यूसिडिडीझ, ⇨ झेनोफन, ⇨पॉलिबिअस असे काही इतिहासकारही प्रसिद्ध आहेत. मानवतावाद, ऐहिक दृष्टी, वस्तुनिष्ठता, प्रमाणबद्धता, सुसंवाद आणि पौरुष व सौंदर्याचे समर्थ चित्रण ही ग्रीक कला – स्थापत्याची उल्लेखनीय वैशिष्ट्ये होती. डोरिक, आयोनिक आणि कॉरिंथियन या स्तंभरचनाशैली प्रसिद्ध आहेत. मायरन आणि फिडीअसचे मूर्तिकाम, पोलिग्ननेटसची चित्रकला, चित्रकलेतील बहिःसंक्षेपणाच्या तत्त्वाचा शोध, उत्कृष्ट कलशचित्रण ही कलासृष्टीतील प्रगतीची काही ठळक उदाहरणे. भूमितीत पायाभूत कामगिरी करणारे थेल्स, पायथॅगोरस आणि युक्लिड अष्टपैलू शास्त्रज्ञ ॲरिस्टॉटल हिपॉक्राटीझ हा ग्रीक वैद्यशास्त्राचा जनक ॲनॅक्सिमँडर अह तत्त्वज्ञ विशिष्ट घनतेचा सिद्धांत मांडणारा आर्किमिडीज इ. शास्त्रज्ञांमुळे ग्रीसने विज्ञानक्षेत्रातही प्रगतीचा मोठा पल्ला गाठला होता. [⟶  अभिजाततावाद ग्रीक कला ग्रीक संस्कृति].

रोमन संस्कृती : एकीकडे ग्रीक साम्राज्याचा अस्त सुरु झाला, तेव्हा दुसरीकडे इटलीतील टायबर नदीच्या काठावरचे रोम शहर विकासाची स्वप्ने पहात होते. बीजातून महावृक्षाने आकार घ्यावा, तसे रोमनगरीच्या छोट्या राज्याचे विशाल साम्राज्यात रूपांतर झाले. ग्रीस आणि रोमच्या अभिजात संस्कृतीच्या पायावर पुढे आधुनिक यूरोपीय संस्कृतीची इमारत उभी राहिली.

इटलीतील समाजात भिन्नवंशीय लोकांचे मिश्रण होते. इ. स. पू. पहिल्या सहस्त्रकात इटलीच्या काही भागांत नांदणाऱ्या ⇨ इट्रुस्कन संस्कृतीने ग्रीक आणि विशेषतः पौर्वात्य परंपरांचा वारसा रोमला दिला. ग्रीक संस्कृतीचा रोमनांवर विलक्षण प्रभाव पडला. रोमन लोक ग्रीकाइतके प्रभावशाली नसले, तरी ते पराक्रमी आणि व्यवहारी होते. ग्रीक परंपरा आत्मसात करुन आणि तीत आपली भर टाकून भावी जगासाठी संस्कृतीचे फार मोठे संचित त्यांनी निर्माण केले. विशाल साम्राज्याची सर्वगामी संघटना, तिला आधारभूत ठरणारी कायदे पद्धती आणि लॅटिनसारखी समृद्ध भाषा ही रोमन संस्कृतीची जगाला देणगी होय.

रोमच्या स्थापनेबाबत संदिग्धता आहे. रोमन इतिहासाच्या पहिल्या पर्वात इट्रुस्कन राजांचा अंमल होता. इ. स. पू. ५०९ च्या सुमारास त्याचे उच्चाटन होऊन रोमचे रिपब्लिक स्थापन झाले. आजच्या अर्थाने ते प्रजासत्ताक नसून विविध राज्यपद्धतींची व्यावहारिक सरमिसळ होती.

ग्रीक काय किंवा रोमन काय, या दोन्ही संस्कृती आणि त्यांतील उल्लेखनीय भाग हा अखेर उच्चभ्रू परिघातील लोकांसाठी होता सामान्य कष्टकऱ्यांसाठी नव्हता. रोममध्ये पॅट्रिशियन हा वरिष्ठ तर प्लेबियन हा कनिष्ठ वर्ग होता. प्लेबियन वर्गाची व्याप्ती वाढू लागली, काही स्तरांना संपन्नता प्राप्त होऊ लागली आणि जागृतीला चालना मिळू लागली. परिणामतः त्या वर्गाने संघर्ष करुन काही हक्क मिळवले. एखाद्या नगरराज्याप्रमाणे असणारे रोम काळाच्या ओघात विस्तारु लागले आणि इ. स. पू. २६५ पर्यंत संपूर्ण इटली त्याच्या अंमलाखाली आला. या सुमारास उत्तर आफ्रिकेतील ⇨कार्थेजच्या रुपाने रोमला एक जबरदस्त प्रतिस्पर्धी निर्माण झाला. आरमारी श्रेष्ठत्व आणि व्यापारी समृद्धीमुळे कार्थेज समर्थ सत्ता बनली होती. इ. स. पू. २६४ ते १४६ या काळात रोम – कार्थेजचा संघर्ष भडकला आणि त्यात कार्थेजचा पाडाव झाला. ईजिप्त, मेसोपोटेमिया आणि ग्रीस ही प्राचीन संस्कृतीची महत्त्वाची केंद्रे रोमच्या आधिपत्याखाली आली. इ. स. च्या प्रारंभी पूर्वेला मेसोपोटेमियापासून पश्चिमेला स्पेनपर्यंत, तर उत्तरेला ब्रिटनपासून दक्षिणेला सहारापर्यंत हे अवाढव्य साम्राज्य पसरले होते. तत्कालीन सुसंस्कृत जगतातील प्रचंड भूभाग एका छत्राखाली आणून रोमने एका अर्थी विश्वराज्याची कल्पना प्रत्यक्षात राबविली.

जसजसा साम्राज्यविस्तार होऊ लागला, तसतसा गणराज्य व्यवस्थेचा संकोच होत गेला. चर्चा व निवडणुकांऐवजी कटकारस्थाने व हिंसाचार यांचे राजकारण सुरु झाले. प्रचलित राज्यघटनेतील दोष, सत्ताभिलाषा आणि लष्करशाही यांमुळे राजकारणाला व्यक्तिकेंद्री वळण लागले. त्याचेच फलित म्हणजे ⇨ ज्युलिअस सीझर (कार. इ. स. पू. ४९ – ४४) व रोमचा खऱ्या अर्थाने पहिला सम्राट ऑगस्टस (कार. इ. स. पू. २७ – इ. स. १४) यांचा उदय. सु. दोन शतके शांतता, सुबत्ता आणि प्रगतीचे युग टिकून राहिले. रोमचा व्यापार भारतापर्यंत येऊन पोहोचला. या युगानंतर विविध कारणांमुळे रोमन साम्राज्याचा ऱ्हास सुरु झाला. पाश्च्चात्य आणि पौर्वात्य (बायझंटिन) असे त्याचे विभाजन झाले. त्याआधी सम्राट कॉन्स्टंटीनने कॉन्स्टंटिनोपल ही नवी राजधानी वसवली होती (इ. स. ३३०). रोमनांनी प्रथम ख्रिस्ती धर्माला विरोध केला असला, तरी पुढे खुद्द कॉन्स्टंटीननेच त्याची दीक्षा घेतली. ख्रिस्ती धर्मप्रसार हे यूरोपातले एक व्यापक आणि मूलगामी स्थित्यंतर ठरले. रानटी टोळ्यांच्या आक्रमणामुळे दुर्बळ बनत चाललेले रोमन साम्राज्य इ. स. ४७६ मध्ये नष्ट झाले.

संस्कृतीच्या बहुतेक सर्व क्षेत्रांत रोमवर ग्रीक प्रभाव होता मात्र ग्रीक वैभवात रोमनांनी आपलीही भर टाकली. ⇨ व्हर्जिल, ⇨ सिसरो, ⇨ सेनेका यांचे साहित्य किंवा ज्युलिअस सीझर, ⇨ लिव्ही, ⇨ टॅसिटस यांचे इतिहासलेखन याची साक्ष देते. रोमनांचा दृष्टिकोन व्यावहारिक असल्याने इमारती, पूल, हमरस्ते, जलनलिका, ⇨ रोमन स्नानगृहे अशी बांधकामे मोठ्या प्रमाणात झाली. घुमट आणि कमानींचा वापर हे रोमन स्थापत्याचे वैशिष्ट्य होते. रोमनांची वैज्ञानिक प्रतिभा मात्र काहीशी क्षीणच होती. रोमची सुसूत्र कायदेपद्धती आणि नैसर्गिक कायद्यांची संकल्पना यांची भावी काळात यूरोपने स्वीकार केल्याने आजही कायद्याच्या क्षेत्रावर त्यांचा प्रभाव आहे. [⟶  रोमन कला नैसर्गिक कायदा रोमन विधि रोमन संस्कृति].

मध्ययुग : सर्वसाधारणपणे पश्चिम रोमन साम्राज्याच्या पतनापासून कॉन्स्टँटिनोपलच्या पाडावापर्यंतचा काळ (इ.स. ४७६ – १४५३) मध्ययुग म्हणून ओळखला जातो. पुष्कळदा मध्ययुगाची कालमर्यादा फ्रेंच राज्यक्रांतीपर्यंतही (१७८९) ताणली जाते. अराजक आणि अधोगतीमुळे मध्ययुगाचे वर्णन तमोयुग असे करतात पण बहुधा या तमोमयतेचे वर्णन अतिरंजित असते. खरे तर. इ. स. सु. ८०० पर्यंतच्या काळालाच तमोयुग म्हणता येईल. त्यानंतरची प्रगती खचितच उपेक्षणीय नव्हती.

रानटी टोळ्यांच्या आक्रमक धाडींनी रोमन साम्राज्य नष्ट केले. त्यानंतर सु. तीन शतके अँगल्स, सॅक्सन, ज्यूट, ऑस्ट्रोगॉथ, व्हिसीगॉथ, फ्रँक, हूण इ. टोळ्यांचे वर्चस्व यूरोपच्या विविध भागांत प्रस्थापित झाले. इ. स. नवव्या शतकात मूर, मॅग्यार, हंगेरियन, व्हायकिंग (नॉर्स) इ. रानटी टोळ्यांची आक्रमणे सुरु झाली. काळाच्या ओघात बहुतेक सर्व आक्रमण सुसंस्कृत होत गेले परंतु ही प्रक्रिया घडेपर्यंत मध्ययुगीन यूरोपच्या इतिहासाला अराजकाने ग्रासले होते. या कालखंडात ⇨ शार्लमेन (कार. ७६८–८१४), ऑटो (कार. ९३६–९७३) अशा काही राज्यकर्त्यांची कर्तबगारी उठून दिसते.

पश्चिम रोमन साम्राज्याचा डोलारा कोसळल्यानंतर कॉन्स्टँटिनोपलच्या पूर्व रोमन (बायझंटिन) साम्राज्याने ग्रीक – रोमन परंपरा काही प्रमाणात पुढे चालवल्या आणि त्यांना पौर्वात्य परंपरांची जोड दिली. बायझंटिन सम्राट ⇨जस्टिनियनची (कार. ५२७ – ५६५) कायदेसंहिता ही एक बहुमोल देणगी. या साम्राज्याचे अस्तित्व १४५३ पर्यंत टिकले. परंतु पश्चिम रोमन साम्राज्याची प्रतिष्ठा त्याला लाभू शकली नाही. [⟶  बायझंटिन कला बायझंटिन सम्राज्य.]

मध्ययुगाच्या आरंभकाळात लोकजीवनाला थोडेफार स्थैर्य देणाऱ्या दोन प्रबळ संस्था म्हणजे सरंजामशाही व ख्रिस्ती धर्मसंस्था. गोंधळातून स्थैर्य शोधण्याचे बहुव्यापी प्रयत्न आणि रोमन – जर्मन प्रथांचा प्रभाव यातून ⇨ सरंजामशाही साकारली. ती जमीनवाटपावर आधारलेली राजकीय, सामाजिक व आर्थिक अशा विविध स्वरुपाची श्रेणीबद्ध समाजव्यवस्था होती. संरक्षण व सेवाचाकरीच्या अटींची करारबद्धता, सत्तेचे विकेंद्रीकरण आणि स्वामीसेवक संबंधांतील हक्क कर्तव्याचा व आर्थिक अवलंबनाची साखळीप्रक्रिया ही तिची काही वैशिष्ट्ये होती. सरंजामशाही म्हणजे वरिष्ठांना अधिक लाभ व कमी कर्तव्ये, तर कनिष्ठांना अधिक तोशीस व कमी हक्क अशी विषमताप्रधान व शोषक व्यवस्था होती. प्रामुख्याने राजा, वरिष्ठ उमराव, कनिष्ठ उमराव, शिलेदार, शेतकरी कुळे आणि भूदास अशी सरंजामी उतरंड होती. काही धर्मगुरुंना राजांनी सरंजाम दिल्याने तेही सरंजामशाही परिघात सामावले. सरंजामशाहीने जरी काही तात्कालिक समस्या सोडवल्या, तरी एकंदरीत ती जाचक ठरु लागली. विविध घटकांमुळे व नवविचारांमुळे मध्ययुगाच्या उत्तरार्धात सरंजामशाही खिळखिळी होत गेली.

दुसरी प्रभावी संस्था म्हणजे ख्रिस्ती धर्मसंस्था (चर्च). मध्ययुगाच्या आरंभी कॉन्स्टँटिनोपलचे सनातनी ग्रीक चर्च आणि रोमचे विश्चव्यापी उदारमतवादी लॅटिन चर्च असे दोन प्रमुख गट पडले. राज्यसंस्थेच्या दुर्बळतेमुळे धर्मसंस्थेचे महत्त्व वाढून सत्ता, संपत्ती व सन्मान असा तिहेरी लाभ तिला होत गेला. धर्मसंघटनात्मक कार्यासह शैक्षणिक – सांस्कृतिक कार्यही तिने केले. त्यात विविध मठांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. धर्मसंस्थेतील ऐहिक आकांक्षा आणि दुराचार यांविरुद्ध हळूहळू प्रतिक्रिया उमटू लागल्या.

रोमन साम्राज्याच्या पतनानंतरची पोकळी भरुन काढण्यासाठी चर्चच्या नेतृत्वाखाली ख्रिस्ती विश्वराज्याची निर्मिती करण्याचे प्रयत्न होऊ लागले. त्यातून ⇨पवित्र रोमन साम्राज्याची स्थापना (इ. स. ८००) झाली. पण त्याला भक्कम व्यावहारिक आशय प्राप्त झाला नाही. धर्मगुरुंना सरंजाम मिळू लागल्याने धर्मसंस्था आणि राज्यसंस्था यांच्यातील संबंध गुंतागुतीचे बनले. या दोन संस्थांच्या संदिग्ध अधिकारकक्षा विविध बाबतीत वादग्रस्त व विरोधजनक ठरल्या. त्यामुळे यांतील संघर्ष अपरिहार्य ठरला. पोपचा राजकीय हस्तक्षेप राज्यकर्त्यांना नापसंत होता. साधारणपणे अकराव्या ते चौदाव्या शतकापर्यंत चाललेल्या चर्च – राज्य संघर्षात अखेर राज्यकर्त्याची सरशी झाली. त्यामुळे चर्चप्रणीत विश्वराज्याची कल्पना साकार झाली नाहीच, पण प्रादेशिक राज्यांची कल्पना लोकमानसात रुजली. या सुमारास सरंजामशाहीचे पाशही सैल होऊ लागले होते. राज्यकर्त्यांचे सरंजामदारांवरील परावलंबन घटत होते. गढी किंवा वाडीपुरत्या संकुचित विचाराऐवजी राष्ट्राचा विचार करण्याची प्रवृत्ती वाढू लागली. प्रादेशिक भाषा बहरु लागल्या. राष्ट्रीय सैन्य सरंजामी सैन्याची जागा घेऊ लागले. नजराण्याऐवजी राष्ट्रीय करपद्धतीचे जाळे पसरु लागले. कृषिप्रधान ग्राम – संस्कृतीपुढे व्यापारी नागर – संस्कृतीचे आव्हान उभे राहिले. या सर्व पार्श्वभूमीवर विविध राष्ट्र – राज्ये उदयाला आली. मध्ययुगाच्या अखेरपर्यंत इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन, पोलंड, ऑस्ट्रिया, हंगेरी, रशिया अशी राष्ट्र – राज्ये स्थिरप्रद झाली. इटली आणि जर्मनीला मात्र त्यासाठी एकोणिसाव्या शतकापर्यंत थांबावे लागले.

राष्ट्र-राज्यांमध्ये अनियंत्रित राजेशाही उदयाला आली. राजा हा लोकांच्या राष्ट्रीय आकांक्षाचा प्रतिनिधी ठरला.‘मी म्हणजेच राज्य’ हे फ्रान्सच्या ⇨ चौदाव्या लूईचे उदगार, तत्कालीन राजकीय विचारप्रणालीचे निदर्शक आहेत.अनियंत्रित असली, तरी आरंभी ती प्रबुद्ध हुकूमशाही ठरली. व्यापार – उद्योग, रोख चलन आणि पतपेढ्यांच्या विकासातून उदयाला आलेल्या नव्या मध्यमवर्गाचा राजाला पाठिंबा असे. राजाश्रयामुळे विविध क्षेत्रांत प्रगतीला हातभार लागला. या युगातील जागृतीमुळेच पुढे राजेशाहीलाही आव्हान देण्यात आले. [⟶ मध्ययुग].

मध्ययुगातली एक महत्त्वाची घडामोड म्हणजे आपली पवित्र भूमी परत मिळवण्यासाठी ख्रिस्ती धर्मीयांनी मुस्लिमांशी केलेली ⇨ धर्मयुद्धे (१०९६ – १२९१). यूरोपातील ख्रिस्ती जगाच्या दक्षिणेकडे स्पेनमधील मूर राज्यापासून आशियातील सेल्जुक तुर्कांच्या राज्यापर्यंत जो अर्धचंद्राकृती इस्लामी विळखा बसला होता, तो तोडण्याची धडपड धर्मयुद्धांपासून सुरु झाली. एका अर्थाने ही युद्धे म्हणजे मध्ययुगीन साम्राज्यवादाचा आविष्कार होता. धर्मयुद्धे असली, तरी विविध हेतूंनी त्यामध्ये लोक सहभागी झाले. धर्मयुद्धांमुळे पौर्वात्य जगताशी संपर्क वाढून यूरोपीय विचारविश्वाचा विस्तार होण्यास हातभार लागला.

मध्ययुगातील सर्वांगीण सांस्कृतिक विकास सुरु झाला. तो प्रामुख्याने प्रबोधनयुगात झाला पण त्यापूर्वीही काही प्रगती होत होती. अरबांच्या संपर्कामुळे विविध समृद्ध परंपरा यूरोपने आत्मसात केल्या. शार्लमेनसारखे राज्यकर्ते, विविध मठ आणि ऑक्सफर्ड, केंब्रिज, पॅरिस अशा नवोदित विद्यापीठांनी विद्याप्रसाराला चालना दिली. विविध कलापरंपरांचा समन्वय होऊ लागला. इ. स. दहाव्या शतकात संगीतातील स्वरलेखन सुरु झाले. ⇨ रोमनेस्क वास्तुकला व ⇨ गॉथिक कलांचा विकास मध्ययुगातच झाला.

प्रबोधन काळ व धर्मसुधारणेचे आंदोलन : मध्ययुगाच्या उत्तरकालात यूरोपातील परिस्थितीत परिवर्तन होऊ लागले. सरंजामशाही आणि धर्मसंस्थेच्या अनिष्ट वर्चस्वाला आळा घालण्याची प्रक्रिया सुरु झाली. व्यापारी मध्यमवर्ग, राष्ट्र – राज्ये व अनियंत्रित राजेशाही यांसारख्या घटकांचा उदय यूरोपीय जीवनाला नवी दिशा देऊ लागला. ⇨ रॉजर बेकन (१२१४ – १२९४) आणि अन्य काही विचारवंतानी अंधश्रद्धांवर टीकास्त्र सोडून बुद्धिवाद व प्रयोगशीलतेला महत्त्व दिले. हळूहळू मध्ययुगीन स्थितिशीलता ओसरु लागली आणि नवजागृती व नवनिर्मितीसाठी आवश्यक असणारी चैतन्यशील मोकळीक वाढू लागली. या पार्श्वभूमीवर प्रबोधन, भौगोलिक संशोधन व धर्मसुधारणा आंदोलन या चळवळींनी क्रांतिकारक बदल घडवून आणून आधुनिक युगाचा पाया घातला. या तीन घडामोडी सर्वसाधारणपणे पुरोगामी आणि परस्परपूरक होत्या. त्यांमध्ये संपूर्ण एकवाक्यता होती असे मानणे विपर्यस्त ठरेल पण त्यांच्या संयोगातून चौफेर विकासाचे आणि मानवी प्रतिभा व प्रज्ञा यांच्या बहुरंगी आविष्काराचे आधुनिक युग अवतरले हे निश्चित.

मध्ययुग आणि आधुनिक युग याच्या सीमेवर जे वैचारिक परिवर्तन आणि विविधांगी प्रगती घडून आली, तिला साकल्याने प्रबोधन म्हणता येईल. काळाच्या ओघात उत्क्रांत होत गेलेली ती व्यापक प्रागतिक चळवळ होती. स्थूलमानाने चौदावे ते सोळावे शतक हा प्रामुख्याने प्रबोधनकाळ मानला जातो. प्रबोधन हे वैभवशाली ग्रीक – रोमन परंपरांचे पुनरुज्जीवन होते. पण ते निव्वळ यांत्रिक पुनरुज्जीवन नसून त्याला नव्या ज्ञानाची व प्रगतीची भरीव जोड होती. प्रबोधन ही एका अर्थाने मध्ययुगीन संस्कृतिविरुद्ध प्रतिक्रिया असून तिने यूरोपीय समाजजीवनाला गतिशीलता प्राप्त करुन दिली. भूतकाळाबद्दलचे कुतूहल व त्याचा नव्या भूमिकेतून अभ्यास, जुन्या परंपरांना नवा उजाळा, वर्तमानाबद्दलचा विश्वास, आशावादी ऐहिक दृष्टी, चिकित्सक बुद्धिवादी विचार, शास्त्रीय पद्धतीचा अवलंब, निसर्गवाद अशी प्रबोधनाची काही ठळक वैशिष्ट्ये सांगता येतील. नव्या मूल्यरचनेत मध्ययुगीन ख्रिस्ती मूल्यांऐवजी प्राचीन ग्रीक मूल्यांना प्राधान्य मिळाले. ⇨ मानवतावाद हे प्रबोधनाचे मूलतत्त्व. मनुष्य जन्मतःच पापी आहे, अशी विचारसरणी मागे पडून मनुष्यत्वाला प्रतिष्ठा प्राप्त झाली.

प्रबोधनकालीन कला व विज्ञान या दोहोंचे अधिष्ठान म्हणजे निसर्गातील सत्य, सौंदर्य व नियमबद्धता यांच्या तादात्म्याची उत्कट संवेदना. त्यामुळे विज्ञान व कला यांच्या तत्त्वप्रणाली समान मार्गाने प्रवास करू लागल्या. मावनी प्रतिभा, प्रज्ञा आणि कृतींवरची मध्ययुगीन बंधने दूर सारून प्रबोधनाच्या प्रतिनिधींनी जोमदार नवनिर्मिती घडवून आणली. जनसामान्यांना पारख्या झालेल्या लॅटिन भाषेची मक्तेदारी कमी होऊन प्रादेशिक भाषांमध्ये साहित्यनिर्मिती होऊ लागली. साहित्याला अधिकलौकिक वळण लागले. लोकभाषांचा विकास, मुद्रणकलेचा प्रसार, निसर्गनिष्ठ मानवतावादी दृष्टिकोण, इहवादी विचारसरणी इत्यादींमुळे साहित्यातील आशय आणि अभिव्यक्तीतनवता आली. इटलीतील ⇨ पीत्रार्क (१३०४–७४) व ⇨ जोव्हान्नीबोकाचीओ, पोर्तुगालमधील कामाँइश, स्पेनमधील सरव्हँटीझ, फ्रान्समधील ⇨ माँतेन व ⇨ फ्रांस्वाराब्ले, इंग्लंडमधील ⇨ जेफ्रीचॉसर, ⇨ एडमंडस्पेन्सर, ⇨ क्रिस्टोफरमार्लो, ⇨ विल्यमशेक्सपिअर (१५६४–१६१६), ⇨ बेनजॉन्सन व ⇨ जॉनमिल्टन हे प्रबोधनकालीन साहित्यसमृद्ध करणारे काही निवडक प्रतिनिधी.

प्रबोधनकालीन वास्तुकला ग्रीकपद्धतीच्या स्तंभावली, रोमनपद्धतीच्या कमानी, पौर्वात्यपद्धतीचे घुमट, मुस्लिमपद्धतीची सजावट अशा विविध घटकांच्या मिलाफातून आकाराला आली. या काळातील चर्च वास्तुकला उल्लेखनीय होती. ब्रूनेल्लेस्की, ब्रामांते, लिओनार्दोदाव्हींची, मायकेल अ‍ँजेलो यांच्या प्रतिभेच्या परिसस्पर्शाने वास्तुकलेचे नवयुग सुरू झाले. प्रबोधनकाळात चित्रकलेवरील धार्मिक बंधने सैल झाली. मानवतावाद, बुद्धिवाद आणि वास्तववादाने कलावंतांना प्रभावित केले. शरीरशास्त्राच्या अभ्यासाने चित्रकृतींना प्रमाणबद्धता व सौंदर्यप्राप्त झाले. कलावंताला बौद्धिकदृष्ट्या कमी लेखण्याची प्रवृत्ती कमी होऊनत् याला प्रतिष्ठा लाभली. वैज्ञानिक प्रगतीबरोबर चित्रकलेला समृद्ध करणारी माध्यमे वाढू  लागली. तैलरंगाचा वापर, चित्रफलकावरील चित्रकाम, भिंतीवरील रंगचित्रे, त्रिमितीय परिणाम आणि छायाप्रकाशाचे भान, चित्रसंघटनेविषयी पदसंहितेची संकल्पना, उत्कृष्ट निसर्गचित्रे ही प्रबोधनकालीन चित्रकलेची काही वैशिष्ट्ये .⇨ लिओनार्दोदाव्हींची, ⇨ मायकेल अँजेलो व ⇨ रॅफेएल याइटालियन चित्रकारांच्या त्रिमूर्तीने चित्रकलेत सुवर्णयुग निर्माण केले. कलाक्षेत्रात ग्रीक-रोमन वास्तववाद व सौंदर्यवृत्तीचा सर्वाधिक प्रभाव मूर्तिकलेवर आढळतो. गिबेर्ती, दोनातेलो, मायकेल अँजेलो असे मूर्तिकार प्रसिद्ध आहेत. नवी दृष्टी, काही नव्या वाद्यांचा वापर, ⇨ चर्च-संगीताचा  विकास, रोमन आणि व्हेनिशियन संप्रदायांचा उदय यांमुळे संगीतकला समृद्ध बनली. संगीतात सुसंवादित्व, तालबद्धता व प्रमाणबद्धता यांचा सुरेख मेळ साधला गेला.नृत्यकलेलाही अधिक देखणे रूप लाभले. इटली हे नृत्यकलेतील नवतेचे केंद्र बनले.[⟶ प्रबोधनकाल प्रबोधनकालीन कला].

विज्ञान क्षेत्रात जुन्या कल्पना त्याज्य ठरून चिकित्सा, बुद्धिवाद व प्रयोगशीलतेचे महत्त्व वाढले. ॲरिस्टॉटल, टॉलेमी तसेच बायबल यांच्या समन्वयावर आधारित मध्ययुगीन विश्वरचनाशास्त्र हे कोपर्निकस, केप्लर व गॅलिलीओच्या प्रबोधनकालीन खगोलविज्ञानापुढे साफ कोलमडून पडले.व् हसेलियस व विल्यम हार्वीयांनी शरीरविज्ञानाला नवी दिशा दिली. प्रबोधनकालीन वैज्ञानिक पार्श्वभूमीवर सर आयझॅक न्यूटनने (१६४२–१७२७) गणित, गतिशास्त्र व प्रकाशयांविषयी इतके मूलभूत संशोधन केले, की त्याचा काळ ‘न्यूटनचे युग’ म्हणून ओळखला जातो. रने देकार्त, टॉमस हॉब्ज व गोट फ्रीटलायप्निट्स अशा तत्त्ववेत्त्यांनी सुद्धा बुद्धिप्रामाण्याला महत्त्व देऊन मानव्यविद्यांना गणिती तर्कशास्त्राचा आधार दिला. मॅकिआव्हेलीने अनुभवावर आधारित, तर टॉम समोरने आदर्शवादी राज्यशास्त्र मांडले. सरफ्रान्सिसबेकन आधुनिक अनुभव निष्ठवैज्ञानिकतर्कशास्त्राचा प्रणेता होता.

तत्कालीन परिवर्तनात भौगोलिक संशोधनाचा वाटा मोठा होता. कॉन्स्टँटिनोपलच्या पाडावामुळे झालेली खुष्कीच्या व्यापारी मार्गांची नाकेबंदी, पौर्वात्य वैभवाचे आकर्षण व तेथील मालाला वाढती मागणी, प्रबोधनकालीन नवविचार व जिज्ञासा, नकाशे व होकायंत्रांचा परिचय, धनिक, धर्मगुरु व राज्यकर्त्यांचे सक्रिय उत्तेजन, धर्मप्रसाराची प्रेरणा अशा विविध घटकांमुळे सागरी पर्यटनांना चालना मिळाली. बार्थालो मेऊ दीयशयाने आफ्रिकेच्या दक्षिणटोकापर्यंत प्रवास केला (१४८८). कोलंबसने अमेरिका खंडाचा शोध लावला (१४९२) आणि आमेरी गोव्हेसपूचीने या संशोधनाला अधिक स्पष्टता दिली (१५०१). वास्को-द-गामाने आफ्रिकेला वळसा घालून भारताकडे जाण्याचा जलमार्ग शोधला (१४९७-९८). मॅगेलनच्या पथकाने सागरी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करून (१५१९–२२) पृथ्वी गोलाकर असल्याचे सप्रमाण सिद्ध केले. या आणि अशा भौगोलिक संशोधनाने व्यापारवृद्धी, पतपेढ्यांचा विकास व मध्यमवर्गाच्या प्रभावाला चालना मिळाली. वसाहतवाद वाढू लागला. यूरोपकडे संपत्तीचा ओघ वाहू लागला. आरंभी स्पेन-पोर्तुगालकडे नवजात प्रदेशांमधून सोन्या-चांदीचा ओघ सुरू होऊन पुढे तो उर्वरित यूरोपात झिरपत गेला. यातून व्यापाऱ्यांचे वैभव वाढले व तत्कालीन चलनव्यवस्थेत नवे ताण उत्पन्न झाले. भूमध्य व बाल्टिक समुद्र आणि त्या पट्ट्यातील व्यापारी शहरे यांचे महत्त्व कमी होऊन अटलांटिक महासागर आणि त्या पट्ट्यातील यापारी शहरांचे महत्त्व वाढू लागले. यूरोप बाहेरील जगतात मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती धर्मप्रसार घडून आला. यूरोपीय लोकांच्या ज्ञानाचे आणि भौतिक विश्वाचे क्षितिज विस्तारू लागले.

यूरोपातील धर्मसुधारणा आंदोलन हे प्रबोधनकालीन विचाराचे एक फलित होते. रोमन चर्चला मिळालेली अवाजवी सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा यांतून अवनतीची लक्षणे उद्‌भवू  लागली. चर्चचा व्यवहार भ्रष्ट होऊ लागला. धर्मसंस्थेचे कार्य असमाधानकारक असल्याची जाणीव लोकांना होऊ लागली. त्यातून धर्म व्यवहाराबाबत प्रगतविचार मांडले जाऊ लागले व रोमन कॅथलिक धर्मसंस्थेच्या एकछत्री वर्चस्वातून मुक्त होऊन नवे पंथोपपंथ पुढे आले. विविधकारणांनी दीर्घकाळ  धुमसणाऱ्या असंतोषाचा हा यूरोपव्यापी उद्रेक धर्म सुधारणा आंदोलन म्हणून ओळखला जातो. धर्मगुरूंच्या मध्यस्थीला सुधारकांचा विरोध होता. ईश्वराशी भक्तीचे नाते ही व्यक्तीची खाजगी बाब असून धार्मिक संदर्भातील सत्याविषयीचा निर्णय तिने पवित्र बायबलच्या आधारे करावा त्या साठी चर्च किंवा धर्मगुरूंच्या मध्यस्थीच्या कुबड्या नकोत सत्कृत्याचे पारितोषिक म्हणून नव्हे, तर ईश्वरी प्रेमाच्या सश्रद्ध स्वीकारानेच व्यक्ती तरून जाते आंतरिक श्रद्धा महत्त्वाची असून बाह्य कर्मकांड अनाठायी आहे आध्यात्मिक क्षेत्रात सर्व ख्रिस्ती समान आहेत इ.विचार हा धर्म सुधारणा आंदोलनाचा गाभा होता.

या आंदोलनाचा जनक ⇨ मार्टिन ल्यूथर (१४८३–१५४६) असला, तरी चर्चला विरोध करणाऱ्या शक्ती त्याच्या पूर्वीच कार्यरत होत्या. इंग्लंडमधील ⇨ जॉन विक्लिफपर्यंत (१३२०–१३८४) ही परंपरा जाऊन पोहोचते. सुधारकी विचार मांडून बायबलचे इंग्रजी भाषांतर करणारा विक्लिफ हा धर्मसुधारणेचा शुक्रतारा मानला जातो. बोहीमियातील त्याचा अनुयायी यान हूस याला पाखंडीपणाच्या आरोपाखाली जिवंत जाळण्यात आले. ⇨ इरॅस्मस या चिकित्सक डच विचारवंतांने इनप्रेज ऑफ फॉली या ग्रंथाद्वारे दांभिक धर्मगुरूंवर उपरोधिक टीका केली. या पार्श्वभूमीवर सोळाव्या शतकात धर्मसुधारणा घडून आली. पापमुक्तीची पत्रके विकण्याच्या चर्चच्या भ्रष्टकृतीला जर्मनीत मार्टिन ल्यूथरने ९५ मुद्दे मांडून जाहीर विरोध केला (१५१७). धर्मबहिष्कृत करण्याच्या पोपच्या फर्मानाची त्याने होळी केली. जर्मनीतल्या सुधारणा आंदोलनाला राजकीय रंग ही येत गेले. प्रॉटेस्टंट हा ल्यूथरवादी पंथ उदयाला आला. कालांतराने हुल्ड्राइख त्स्व्हिंग्ली, ⇨ जॉनकॅल्व्हिन (१५०९–६४), जॉन नॉक्स अशा सुधारकांनी ही धर्म सुधारणेत मोलाची कामगिरी बजावली. इंग्लंडमधील ट्यूडर राज्यकर्त्यांनी प्रॉटेस्टंट सुधारणावादाचा पुरस्कार केला. प्रॉटेस्टंट चळवळीचा मूळधर्म संस्थेवरही परिणाम घडून आला. धर्मसंस्थेच्या मूलभूत विचारसरणीशी इमान राखून व धर्मसंस्थेची घडी न विसकटता काही श्रद्धाळू कॅथलिकपंथीयांनी सुधारणांना चालना दिली. याला प्रतिधर्म सुधारणा आंदोलन म्हणतात. विशेषतः इग्नेशियसला योलाची सोसायटी ऑफ जीझस आणि तिच्या जेझुइट अनुयायांनी भरीव कार्य केले.

धर्मसुधारणेची चळवळ मूलतः धार्मिक असली, तरी तिने यूरोपचे राजकीय, सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक जीवन ढवळून काढले. या चळवळीने स्वयंनिर्णय, व्यक्तिस्वातंत्र्य व समतेच्या तत्त्वांचा धार्मिक संदर्भात पुरस्कार केला असला, तरी त्यांचा अन्य क्षेत्रातही प्रसार झाला. धर्मसंस्थेच्या वर्चस्वाचा संकोच अर्थव्यवस्थेला नवा आकार देणाऱ्या घटकांच्या विस्ताराला पूरक ठरला. प्रॉटेस्टंट व्यक्तिवादी व नैतिकविचार प्रणालीने भांडवलशाही अर्थरचनेला प्रोत्साहन लाभले.[⟶ धर्मसुधारणा आंदोलन].

प्रबोधन युगात मूलभूत आर्थिक बदलही घडून आले. व्यापारवृद्धी, पतपेढ्यांचा विकास, अधिक कार्यक्षम चलनव्यवस्था, मध्ययुगीन व्यापारी श्रेणी-संस्थांचा ऱ्हास, बहुव्यापी व्यापारी संघटनांचा उदय, नवे उद्योगधंदे, भांडवलशाही, निर्यातीला अनुकूल वाणिज्य तत्त्वज्ञान अशा घटकां मधून आर्थिक जीवनाची घडी बदलू लागली. थोडक्यात भौगोलिक शोध, धर्मसुधारणा यांच्या सहव्यापारी क्रांती ही या कालखंडात घडून आली.

आधुनिक युग : लोकशाही, राष्ट्रवाद, यंत्रप्रधानता, वैज्ञानिक संस्कृती, भांडवलशाही, साम्राज्यवाद, समाजवाद, साम्यवाद, आंतरराष्ट्रवाद अशा विविध घटकांच्या प्रभावातून आधुनिक युग अवतरले. या घटकांच्या विकासात यूरोपचा वाटा मोलाचा आहे. प्रबोधनकाळात आधुनिकतेची पूर्वचिन्हे दिसली, तरी मध्ययुगीन तणही बरेच शिल्लक होते. लोकशाहीच्या विकासाला पुरेशी अनुकूलता निर्माण झालेली नव्हती. नवविचारांना व प्रगतीला चालना देणाऱ्या अनेक प्रबोधनकर्त्यांनी अनियंत्रित राजेशाहीची स्तुतिस्तोत्रे गायिली आणि एकीकडे धार्मिक बंडखोरी करणाऱ्या मार्टिन ल्यूथरने दुसरीकडे शेतकऱ्यांच्या बंडखोरीला विरोध केला. या गोष्टी मोठ्या सूचक आहेत पण हळूहळू हे चित्रही पालटू लागले. लोकशाही व उदारमतवादाला पूरक असे प्रागतिक विचारप्रतिपादन सुरू झाले. ⇨ जॉन लॉकसारखा ब्रिटिश तत्त्वज्ञ (१६३२-१७०४) अशा विचारांचा महान प्रवक्ता ठरला. त्याने अठराव्या शतकातील विचारवंतांना प्रभावित केले. सतराव्या शतकापासून इंग्लंडमध्ये लोकशाहीच्या विकासाला वेग आला. १६४९ आणि १६८८ मध्ये जुलमी स्ट्यूअर्ट राज्यकर्त्यांविरुद्ध यशस्वी उठाव झाले. राजसत्तेवरील अंकुश म्हणून लोकप्रतिनिधींच्या पार्लमेंटचे महत्त्व वाढू लागले. या पार्श्वभूमीवर ⇨ अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध, ⇨फ्रेंच राज्यक्रांती आणि ⇨ औद्योगिक क्रांती यांनी आधुनिक जगाला जन्म दिला.

यूरोपीय वसाहतवादाला पहिला मोठा हादरा दिला, तो अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावरील १३ ब्रिटिश वसाहतींनी. वसाहतींना एकीकडे कन्याराष्ट्र असे संबोधून दुसरीकडे मात्र त्यांना सावत्र कन्येसारखी वागणूक देणाऱ्या इंग्लंडविरुद्ध अमेरिकन वसाहतींनी युद्ध पुकारले (१७७५-७६) आणि पिकलेली फळे झाडापासून अलग होतात, तशा या वसाहती ब्रिटिश साम्राज्यापासून स्वतंत्र झाल्या (१७८१). या परिवर्तनाला लोकशाहीच्या व्यापक तत्त्वज्ञानाची बैठक होती. अमेरिकन स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यात ती प्रतिबिंबित झाली आहे. या युद्धात अमेरिकनांना मदत करणाऱ्या फ्रान्सला लवकरच क्रांतीच्या लाटेने व्यापून टाकले. अमेरिकेतील फ्रेंच वीर क्रांतिप्रेरित अंतःकरणासह स्वदेशी परतले. एका ज्योतीने दुसरी ज्योत प्रज्वलित व्हावी, तशी अमेरिकन क्रांतीपाठोपाठ फ्रेंच राज्यक्रांती घडून आली.

केवळ राजकीय भ्रष्टाचार अथवा धार्मिक अवनती नव्हे, तर सामाजिक-आर्थिक-सांस्कृतिक क्षेत्रांतील विषमताप्रधान व शोषक सरंजामी चौकटही फ्रेंच राज्यक्रांतीला (१७८९-९९) कारणीभूत ठरली. अर्थात असंतोषाच्या कोठारावर माँतेस्क्यू, व्हॉल्तेअर, रूसो यांसारख्यांच्या क्रांतिकारक विचारांची ठिणगी पडल्यामुळे क्रांतीचा भडका उडाला. या क्रांतीचे दोन ठळक टप्पे दिसतात : एक, १७८९ ते ९२ या काळात मर्यादित राजेशाही प्रस्थापित करण्याचे प्रामुख्याने सनदशीर प्रयत्न आढळतात. दोन, त्यानंतरच्या काळात क्रांतीने जहाल वळण घेतले, विशेषतः दहशतीच्या शासनाचा रक्तरंजित कालखंड म्हणजे भावनाविवश समूहाच्या आततायीपणाचा आविष्कार होता. फ्रेंच राज्यक्रांतीच्या विराट मंथनातून स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्त्वत्रयीचे नवनीत निर्माण झाले. अनियंत्रित राजेशाही व सरंजामशाहीचे फ्रान्समधून उच्चाटन झालेच पण उर्वरित यूरोपातही या प्रक्रियेला गती मिळाली. धर्मसंस्थेच्या अनाठायी वर्चस्वाला आळा बसला. लोकशाही आणि राष्ट्रवादाचे युग सुरू झाले. या क्रांतीचा सामाजिक आशयही महत्त्वाचा आहे. सामान्य माणसाच्या भाकरीचा मूलभूत प्रश्न क्रांतीच्या मुळाशी होता. फ्रान्स व फ्रेंच वसाहतींतील गुलामगिरी नष्ट होऊन अन्यत्रही त्या प्रक्रियेला चालना मिळाली. या क्रांतीने समतेचा जो संदेश दिला, त्यातून पुढे मानवतावादाला व समाजवादाला प्रेरणा मिळाली.

फ्रेंच राज्यक्रांतीच्या प्रेरणा उदात्त असल्या, तरी प्रयोग मात्र अराजक माजविणारा ठरला. या पार्श्वभूमीवर ⇨नेपोलियन बोनापार्ट  या प्रभावी नेत्याचा उदय झाला. १७९९ ते १८१५ या त्याच्या वर्चस्व काळात केवळ फ्रान्सच्या नव्हे, तर यूरोपच्या इतिहासावर त्याचा ठसा उमटला. तो असामान्य सेनानी आणि कुशल प्रशासक होता. नेपोलियनची आक्रमकता यूरोपीय शांततेला बाधक ठरली. विविध सुधारणा आणि वैभवशाली रसिकता या गोष्टींमुळे मध्ययुगीन प्रबुद्ध राजेशाहीच्या परंपरेशी नेपोलियनचे नाते जुळते, तर लोकशाहीचा बुरखा पांघरून दडपशाहीचा वरवंटा फिरवण्याची त्याची नीती आणि विध्वंसक महत्त्वाकांक्षा विसाव्या शतकातील फॅसिस्ट हुकूमशहांशी त्याचे नाते जोडते. फ्रेंच राज्यक्रांतीचे अपत्य म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या नेपोलियनने क्रांतीची काही स्वप्ने साकार केली तर काही तत्त्वे पायदळी तुडवली. उत्कृष्ट कायदेसंहिता ही त्याची टिकाऊ कामगिरी. राष्ट्रवादाच्या व क्रांतितत्त्वांच्या फ्रान्सबाहेरील प्रसारात नेपोलियनचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष वाटा होता. संघटित यूरोपीय राष्ट्रांनी केलेला त्याचा पराभव हा एका व्यापक अर्थाने फ्रेंच राज्यक्रांतीचा विजय होता.

अमेरिकन आणि फ्रेंच क्रांत्या घडून आल्या, त्या सुमारास यूरोपात औद्योगिक क्रांतीची प्रक्रियाही चालू होती. तिचा अधिक विचार या नोंदीत पुढे केला आहे. राजकारण आणि समाजजीवन तर्कविवेकाच्या मुशीतून तावूनसुलाखून घेण्याच्या प्रयत्नातून फ्रेंच राज्यक्रांती, तर निसर्गशक्तींना अशीच पद्धत लागू करण्याच्या आणि त्यातून सुखाचा शोध घेण्याच्या प्रयत्नातून औद्योगिक क्रांती उद्भवली. आत्मबळ टिकवण्यासाठी ज्याप्रमाणे फ्रेंच राज्यक्रांतीची सत्त्वशक्ती आत्मसात करण्यावाचून अन्य यूरोपीय राष्ट्रांना गत्यंतर उरले नाही, त्याचप्रमाणे इंग्लंडच्या औद्योगिक अनुकरणालाही ती राष्ट्रे उद्युक्त झाली. या दोन परिवर्तनांची धग साऱ्या एकोणिसाव्या शतकाला व्यापून राहिली.

फ्रेंच राज्यक्रांतीतून उदयाला आलेली तत्त्वे आणि औद्योगिक क्रांतीतून उद्भवलेले विविधांगी घटक यांच्या आंतरक्रियांमधून १८१५ ते १९१४ या काळातील इतिहास घडत गेला. नेपोलियनच्या पराभवानंतर ⇨ व्हिएन्ना परिषदेने (१८१५) नेपोलियनमुळे गमावलेली पदे वा भूभाग संबंधितांना परत देण्याचे धोरण स्वीकारले. अर्थात प्रादेशिक पुनर्रचनेत बड्या राष्ट्रांना झुकते माप मिळाले. फ्रान्समध्ये बुर्‌बाँ घराण्याची राजेशाही पुन्हा प्रस्थापित करण्यात आली. फ्रेंच राज्यक्रांतीपासून सु. एक शतकभर फ्रान्समध्ये लोकशाही आणि राजेशाही यांचा लपंडाव चालू होता. व्हिएन्ना परिषदेने इंग्लंड, प्रशिया, ऑस्ट्रिया आणि रशिया यांचा यूरोपीय चतुःसंघ (कन्सर्ट ऑफ यूरोप) स्थापन केला. युद्धाऐवजी सामोपचाराने संघर्ष मिटवण्याची त्यामागील कल्पना चांगली असली, तरी प्रत्यक्षात हा संघ भरीव यश मिळवू शकला नाही. १८४८ पर्यंत यूरोपीय राजकारणात ऑस्ट्रियाचा परंपरानिष्ठ पंतप्रधान ⇨मेटरनिख याचा प्रभाव राहिला. व्हिएन्ना परिषद आणि चतुःसंघ यांच्याद्वारे यूरोपीय राज्यकर्त्यांनी घड्याळाचे काटे उलटे फिरवण्याचा उद्योग आरंभला. त्यात त्यांना काही प्रमाणात यश मिळाले, तरी परिवर्तनाचा प्रवाह कायमचा रोखणे अशक्य होते. १८३० आणि १८४८ मध्ये यूरोपात विविध ठिकाणी झालेल्या राष्ट्रवादी उठावांनी त्याची प्रचीती आली. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत यूरोपात मध्यमवर्गीय उदारमतवादी गटांनी राज्यशासनात वाटा मिळवण्यासाठी प्रयत्न केलेले दिसतात. प्रामुख्याने इंग्लंड-फ्रान्ससह उत्तर यूरोपीय प्रदेशांत त्यांना काही प्रमाणात यश, तर जर्मनी-ऑस्ट्रिया-इटली या पट्ट्यात तुलनेने अपयश आलेले दिसते. अपयशातून आलेल्या वैफल्याला पुढे समाजवादी चळवळीची जोड मिळून यूरोपीय राजकारणातील गुंतागुंत वाढत गेली. साधारणपणे १८५० ते १८७० या काळात उदारमतवाद्यांनी परंपरावाद्यांशी जुळतेमिळते घेऊन राष्ट्रवादी उद्दिष्टांसाठी लढा दिला. इटली आणि जर्मनीतील एकीकरण्याच्या चळवळींमध्ये याचे प्रत्यंतर येते.

जर्मनी व इटली हे दोन्ही प्रदेश छोट्या छोट्या संस्थानांमध्ये विखुरलेले आणि ऑस्ट्रियाच्या वर्चस्वाने ग्रासलेले होते. प्रशासकीय सोयीसाठी नेपोलियनने त्याच्या वर्चस्व काळात केलेली एकीकरणे व्हिएन्ना परिषदेने पुन्हा विदीर्ण करून टाकली. परंतु दोन्ही प्रदेशांत राष्ट्रवादी शक्तींचा कृतिशील आशावाद टिकून राहिला. १८५२ मध्ये काम्मीलो काव्हूर हा इटलीतील पीडमाँट संस्थानाचा, तर १८६२ मध्ये ऑटो फोन बिस्मार्क हा जर्मन एकीकरणाचे नेतृत्व करू पाहणाऱ्या प्रशियाचा पंतप्रधान झाला. हे दोघे अनुक्रमे इटालियन व जर्मन एकीकरणांचे शिल्पकार ठरले. बिस्मार्कला प्रशियन राजा पहिला विल्यम याने सतत पाठिंबा दिला. इटलीमध्ये जोसेफ मॅझिनी हा प्रखर राष्ट्रवादी तत्त्वज्ञ आणि जूझेप्पे गॅरिबाल्डी हा उमदा योद्धा, तसेच पीडमाँटचा राजा दुसरा व्हिक्टर इमॅन्यूएलने एकीकरणात महत्त्वाचा वाटा उचलला. मॅझिनी, काव्हूर व गॅरिबाल्डी यांच्या रूपाने अनुक्रमे भावना, बुद्धी व पराक्रमाचा जो त्रिवेणी संगम झाला, तो इटालियन एकीकरणाला उपकारक ठरला. काव्हूर व बिस्मार्कच्या व्यवहारकुशल राजनीतीतून अनुक्रमे इटली व जर्मनी या राष्ट्रांची एकीकरणांची स्वप्ने साकार झाली (१८७१). तत्कालीन राष्ट्रवादाचा हा फार मोठा विजय ठरला. मात्र यानंतर राष्ट्रवादाला जे आक्रमक वळण लागले, त्यात इतर घातक घटकांची भर पडून पहिल्या जागतिक महायुद्धाकडे वाटचाल सुरू झाली.

वरील राजकीय बदल यूरोपात घडत असताना, औद्योगिक क्रांतीच्या अनुषंगाने होत असलेल्या विविधांगी बदलांचा प्रवाहसुद्धा तत्कालीन इतिहासात महत्त्वाचा ठरला. औद्योगिक क्रांती हे काही एका देशात अल्पावधीत घडून आलेले स्थित्यंतर नव्हे. तिचे मूलभूत, दूरगामी आणि सर्वस्पर्शी परिणाम लक्षात घेऊन तिला क्रांती म्हटले जाते. औद्योगिक क्रांती हे मूलतः उत्पादनपद्धतीत झालेले आमूलाग्र परिवर्तन होते. मध्ययुगीन गृहोद्योग व ग्रामोद्योगांची जागा शहरी कारखानदारी पद्धतीने घेतली. साध्या अवजारांऐवजी प्रगत यंत्रांचा आणि बाष्पशक्तीचा व विद्युत्‌शक्तीचा वापर सुरू झाला. मध्ययुगीन गृहोद्योगांत छोट्या प्रमाणावर उत्पादन होत असे. त्याऐवजी आता कारखान्यांमधून प्रचंड प्रमाणावर उत्पादन सुरू झाले. दळणवळण व संदेशवहनाच्या साधनांमध्येही प्रगती झाली. त्यांतून आगगाड्या, आगबोटी व आधूनिक टपालपद्धतीचे युग सुरु झाले. शेतीचे यांत्रिकीकरण घडून आले. मध्ययुगीन कृषिप्रधान समाजाचे औद्योगिक समाजात रूपांतर होऊ लागले. शहरीकरणाला चालना मिळाली. यूरोपातील विचारविश्वाला व संस्थाजीवनाला नवी दिशा मिळू लागली. या सर्व परिवर्तनाला साकल्याने औद्योगिक क्रांती म्हणतात. १७५० ते १८५० हा साधारणपणे तिचा पहिला टप्पा मानला जातो. इंग्लंडमध्ये सुरू होऊन पुढे अन्य यूरोपीय देशांमध्ये व अमेरिकेत तिचा प्रसार झाला. १८५० नंतरच्या टप्प्यात यूरोप-अमेरिकेबाहेरही औद्योगिक क्रांतीचे लोण पसरू लागले आणि आजतागायत ती चालूच आहे. या दृष्टीने ती जागतिक क्रांती म्हटली पाहिजे.

औद्योगिक क्रांतीने भांडवलशाहीला आणि नव्या वर्गरचनेला जन्म दिला. समाजव्यवहाराच्या सर्व अंगांवर भांडवलशाहीचा प्रभाव वाढू लागला. त्याला पूरक असे अनिर्बंध अर्थरचनेचे व खुल्या व्यापाराचे तत्त्वज्ञान पुढे आले. भांडवलनिर्मिती, कच्च्या मालाचा मुबलक पुरवठा, पक्का माल खपवण्यासाठी हुकमी बाजारपेठांची उपलब्धता आणि कालांतराने अतिरिक्त भांडवलाची गुंतवणूक या औद्योगिक क्रांतीने निर्माण केलेल्या गरजा भागवण्यासाठी, तसेच यूरोपातील अतिरिक्त लोकसंख्या वसाहतींकडे वळवण्यासाठी पाश्चात्त्य राष्ट्रांनी साम्राज्यविस्तारावर लक्ष केंद्रित केले. या आधुनिक ⇨साम्राज्यवादाला आर्थिक साम्राज्यवाद म्हणतात. कारण त्याच्या प्रेरणा मूलतः आर्थिक होत्या. या प्रेरणांना राष्ट्रवादी व धार्मिक आकांक्षांची जोड होती. आशिया-आफ्रिकेतील माणसांना सुसंस्कृत बनवणे हे पाश्चात्त्य गोऱ्या माणसावर येऊन पडलेले पवित्र ओझे आहे, अशी कल्पना मांडली गेली. ही कल्पना म्हणजे स्वार्थी आर्थिक हेतूंना तात्त्विक मुलामा देऊन त्यांचे उदात्तीकरण करण्याचा प्रकार होता.

आशिया आणि आफ्रिकेतील साम्राज्यविस्तारासाठी १८७० ते १९१४ या कालखंडात यूरोपीय राष्ट्रांची तीव्र स्पर्धा सुरू झाली. या काळातील यूरोपचा इतिहास यूरोपात न घडता आशिया-आफ्रिकेत घडला, असे काही वेळा म्हटले जाते. या दोन खंडांमधील दुर्बळ राष्ट्रांवर यूरोपीय राष्ट्रांनी वर्चस्व निर्माण केले. काही ठिकाणी राजकीय अंमल प्रस्थापित केला, तर काही ठिकाणी आर्थिक वर्चस्वाची वर्तुळे आखून घेतली. साम्राज्यातील दुर्बळ राष्ट्रांचे सातत्याने आर्थिक शोषण सुरू झाले. यूरोपची औद्योगिक संपन्नता मुख्यतः या शोषणावर आधारलेली होती. ‘भांडवलशाहीची सर्वोच्च पायरी’ असे लेनिनने साम्राज्यवादाचे समर्पक वर्णन केले आहे. साम्राज्यस्पर्धेतून यूरोपमध्ये जी गटबाजी सुरू झाली, त्यामुळे महायुद्धाच्या दिशेने वाटचाल होऊ लागली.

औद्योगिक क्रांतीमुळे भांडवलदारांवर अवलंबून असणारा भूमिहीन, यंत्रहीन व दरिद्री कामगारवर्ग निर्माण झाला. प्रारंभी या कामगारवर्गाची स्थिती अतिशय दयनीय होती. घड्याळाचे काटे आणि कारखान्याचे भोंगे यांच्या तालावर कामगारांचे जीवन रखडत होते. दारिद्र्य, बेकारी, अस्थिरता, शोषण आणि दैन्य यांच्या दुष्टचक्रात अडकलेल्या कामगारांना संघटना-स्वातंत्र्य नव्हते. पण काळाच्या ओघात कामगारवर्गात जागृती झाली. कामगार संघटनांचा उदय होऊ लागला. इंग्लंड आणि त्यामागोमाग अन्य देशांमध्ये कामगार हितासाठी कायदे करण्यात आले. अर्थात कामगाराच्या जीवनातील सर्वंकष परिवर्तनासाठी नुसते कायदे पुरेसे नाहीत, तर समाजाची पुनर्रचना करायला हवी या विचारातून ⇨समाजवादाचे तत्त्वज्ञान उदयाला आले. कामगारांच्या अभ्युदयाला कामगार-संघटना हा बचावात्मक, तर समाजवाद हा आक्रमक मार्ग होता. भांडवलशाहीतून निर्माण होणाऱ्या विषमता, शोषण, अन्याय यांसारख्या गोष्टी टाळायच्या असतील, तर उत्पादनसाधने समाजाच्या सामूहिक मालकीची असली पाहिजेत, हा समाजवादी तत्त्वज्ञानाचा गाभा होता. त्याच्या अनुषंगाने समाजवादी विचारवंतांनी खाजगी मालकीतून होणाऱ्या नफ्याच्या असमान वाटपाला विरोध, सहकाराचे तत्त्व, राष्ट्रीयीकरण, न्याय, मानवता अशा गोष्टींचा पुरस्कार केला. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात उदयाला आलेला आरंभीचा समाजवाद स्वप्नाळू किंवा यूटोपियन समाजवाद म्हणून ओळखला जातो. परंतु पुढे ⇨कार्ल मार्क्स (१८१८-८३) या युगप्रवर्तक तत्त्वज्ञाने त्याला अधिक व्यवहारवादी व जहाल वळण दिले. मार्क्सचा समाजवाद शास्त्रीय असल्याचे मार्क्सवादी मानतात. तो साम्यवाद म्हणून ओळखला जातो. इतिहासाची विरोधविकासवादी भौतिक मांडणी, अतिरिक्त श्रममूल्याचा सिद्धांत, वर्गसंघर्षाची अनिवार्यता, कामगारवर्गाच्या हुकूमशाहीची कल्पना, शोषणपूरक धर्मसंस्थेला विरोध, जागतिक संदर्भात क्रांतीचा विचार आणि अंतिम उद्दिष्ट म्हणून वर्गविरहित राज्यविरहित शोषणहीन अशा आदर्शवादी समाजाची कल्पना ही ⇨मार्क्सवादाची मुख्य वैशिष्ट्ये होती. मार्क्सने जरी १८६४ मध्ये कामगारांची आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन केली, तरी पहिली साम्यवादी क्रांती होण्यासाठी १९१७ साल उजाडावे लागले.

इ. स. १८३० व १८४८ चे उठाव, इंग्लंडमधील चार्टिस्ट चळवळ (१८४८) आणि फ्रान्समधील पॅरिस कम्यून (१८७१), इंग्लंडमधील संसदीय सुधारणा व मजूर पक्षाचा उदय या सर्व घडामोडींमध्ये कामगारवर्गाचा वाटा होता. फ्रेंच राज्यक्रांतीने दिलेला समतेचा संदेश काळानुसार जहाल वळणे घेत गेला आणि अखेर त्याची परिणती पहिल्या साम्यवादी क्रांतीत झाली. काही इतिहासकार १७८९ ते १७९९ ही फ्रेंच राज्यक्रांतीची मर्यादा मानत नाहीत. ती वास्तविक एक अखंड क्रांती असून १७८९ नंतर १७९३, १८३०, १८४८ व १८७१ मध्ये तिचे उद्रेक झाले आणि १९१७ मध्ये ती रशियात जाऊन पोहोचली अशी साखळीप्रक्रिया मांडणारा एक दृष्टिकोण आहे.

एकोणिसाव्या शतकातील विचारविश्वात व्यक्तिवाद, उदारमतवाद, उपयुक्ततावाद, निसर्गवाद, आदर्शवाद, अराज्यवाद अशा विचारप्रणालींचे स्थानही मोठे आहे. जर्मन आदर्शवाद, मार्क्सवादी समाजवाद आणि डार्विनचा क्रमविकासवाद या एरवी काही बाबतींत परस्परविरोधी विचारपंथांचे एका संदर्भात मतैक्य होते ते म्हणजे उत्क्रांति तत्त्व ही जगाच्या आकलनाची गुरुकिल्ली आहे. निसर्गाप्रमाणेच मानवी जीवनाला लागू पडतील असे सनातन वैश्विक नियम शोधण्याचे प्रयत्न एकोणिसाव्या शतकात झाले. तसेच मानवी अप्रबुद्धतेवर भर देणारे विचारही पुढे आले.

आधुनिक युगाच्या प्रारंभीच्या यूरोपीय संस्कृतीची एकतानता एकोणिसाव्या व विसाव्या शतकाच्या संगमावर विसकटू लागली. जीवनाच्या संकीर्णतेने कलासाहित्यादी सांस्कृतिक विश्व ढवळून निघाले. न्यूटनच्या चिरेबंद विज्ञानाचा पायाही डगमगू लागला. सिग्मंड फ्रॉइड व ॲल्बर्ट आइन्स्टाइनसारख्या श्रेष्ठ बुद्धिवंतांनी निसर्ग व समाजविज्ञानाला नव्या कक्षा प्राप्त करून दिल्या.

महायुद्ध आणि शीतयुद्धाचे युग : इटली व जर्मनीच्या उदयामुळे यूरोपीय सत्तासंतुलन बदलू लागले. जर्मन एकीकरण साध्य करण्यापूर्वी प्रशियाने फ्रान्सचा दारुण पराभव केला होता. (१८७१). मोठी युद्धखंडणी आणि त्याहीपेक्षा अल्सेस-लॉरेन हे समृद्ध प्रांत द्यावे लागल्याने फ्रान्स सूडाने पेटला, फ्रान्स व जर्मनीच्या वैराची ही कथा अगदी दुसऱ्या महायुद्धापर्यंत धगधगताना दिसते. फ्रान्सला एकाकी पाडण्याच्या तत्त्वावर बिस्मार्कने आपले परराष्ट्रीय धोरण बेतले. संभाव्य युद्धातील जर्मनीच्या संरक्षणासाठी त्याने गुप्त मैत्रीकरारांचे जाळे विणण्यास सुरुवात केली आणि ऑस्ट्रिया व इटलीशी भक्कम मैत्रीकरार केला (१८८२). मात्र इंग्लंड वा रशियाला त्याने दुखावले नाही आणि फ्रान्सशी कुरापत काढली नाही. पण १८८८ मध्ये दुसरा विल्यम हा जर्मनीचा कैसर (सम्राट) झाल्यावर बिस्मार्कचा राजकीय अस्त झाला. एकाच वेळी पाच चेंडू हवेत खेळवत ठेवण्याची यूरोपीय राजकारणातली कसरत बिस्मार्कने ज्या सफाईने केली होती, तिच्या अभावामुळे नव्या जर्मन राज्यकर्त्यांनी इंग्लंड व रशियाशी वैर ओढवून घेतले. एकाकी फ्रान्सला मित्र मिळाले. जर्मनीची औद्योगिक व लष्करी वाढ या राष्ट्रांना डाचू लागली. आपल्या कलहांना मूठमाती देऊन इंग्लंड, फ्रान्स व रशिया करारबद्ध झाले (१९०७). अशा रीतीने यूरोपीय राजकारणात दोन परस्परविरोधी गट निर्माण झाले. अतिरेकी राष्ट्रवाद, साम्राज्यस्पर्धा, शस्त्रास्त्रस्पर्धा, विषारी प्रचार अशा गोष्टींनी ही गटबाजी शिगेला पोहोचली. यूरोपातील बडी राष्ट्रे संरक्षणात्मक करारांनी इतकी बांधली गेली, की कोणत्याही दोन राष्ट्रांमध्ये युद्ध पेटले तर पिळदार सरातील फटाक्यांप्रमाणे परस्परविरोधी बाजूंची राष्ट्रे त्यात ओढली जाणार होती. ऑस्ट्रियन राजपुत्राच्या खुनाने ठिणगी पडली अन्‌ जग महायुद्धाच्या खाईत लोटले गेले.

जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी, तुर्कस्तान व बल्गेरिया या मध्यवर्ती सत्तांचा इंग्लंड, फ्रान्स, इटली, जपान वगैरे दोस्तराष्ट्रांनी अमेरिकेच्या साहाय्याने ⇨पहिल्या महायुद्धात (१९१४-१९१८) पराभव केला. दोस्तगटातील रशियाने साम्यवादी क्रांतीनंतर युद्धातून अंग काढून घेतले होते. तोपर्यंतच्या जागतिक इतिहासातले भूमी, सागर आणि आकाश या तिहींना व्यापणारे आणि सर्वांत संहारक असे हे युद्ध ठरले. राष्ट्रांची सारी मानवी आणि भौतिक साधनसंपत्ती युद्धाकडे वळवण्याचा प्रकार प्रथमच घडला. जित आणि जेते दोघांनाही प्रचंड हानी सोसावी लागली. जर्मनी, ऑस्ट्रिया-हंगेरी, तुर्कस्तान आणि रशियाची साम्राज्ये लयाला गेली आणि अनेक नवे देश उदयाला आले. महायुद्धाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून ⇨राष्ट्रसंघ ही आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्यात आली. परंतु युद्धोत्तर शांतता फार काळ टिकली नाही. शांतता तहांद्वारे पराभूतांना सूडाची आणि अपमानास्पद वागणूक देण्यात आली. त्यामुळे भावी शांततेचा पायाच भुसभुशीत बनला. युद्धोत्तर आर्थिक समस्यांनी बहुसंख्य राष्ट्रे गांजून गेली आणि १९२९ मध्ये सुरू झालेल्या आर्थिक महामंदीने तर जागतिक पातळीवर आर्थिक आणीबाणीची परिसीमा गाठली. या सर्व धामधुमीत युद्धाला कायमची तिलांजली देण्याचे आणि लोकशाहीसाठी जग सुरक्षित बनवण्याचे दोस्त राष्ट्रांचे स्वप्न विरून गेले.

पहिले महायुद्ध चालू असताना रशियामध्ये पहिली साम्यवादी क्रांती घडून आली (१९१७). क्रांतिपूर्व फ्रान्सशी जवळचे नाते सांगणारी राजकीय व सामाजिक परिस्थिती, नवोदित कामगार वर्गाच्या असंतोषाची तिला मिळालेली जोड आणि महायुद्धकालीन सर्वांगीण हानी यांमुळे मुख्यतः रशियात क्रांती घडून आली. भूमी, भाकरी आणि शांतता देण्याचे आश्वासन ⇨लेनिन या बोल्शेव्हिक क्रांतिनेत्याने जनतेला दिले. शुद्ध साम्यवाद राबवण्यात अडचणी येऊ  लागताच त्याने दोन पावले पुढे जाण्यासाठी एक पाऊल मागे सरकण्याचे नवे आर्थिक धोरण स्वीकारले. या धोरणाला जहाल साम्यवादी वळण लावण्यापूर्वीच लेनिनचा मृत्यू झाला (१९२४). यानंतर ⇨स्टालिनच्या नेतृत्वाखाली (१९२६-५३) रशियाने प्रचंड प्रगती साधली. पंचवार्षिक योजनांची अभिनव कल्पना स्टालिनने यशस्वीपणे राबवली. त्यामुळे औद्योगिकीकरण, कृषिक्षेत्रातील स्वावलंबन आणि लष्करी सामर्थ्यप्राप्ती असा तिहेरी लाभ झाला. रशिया जागतिक महासत्ता बनली मात्र स्टालिनच्या या भरीव कार्याला क्रूर दडपशाहीची काळी किनार होती. रशियन राज्यक्रांतीच्या प्रभावामुळे जगात साम्यवादाचा प्रसार होऊ लागला, तत्कालीन साम्राज्यवादावर आघात झाला, आर्थिक नियोजनाचे युग सुरू झाले आणि केवळ साम्यवादी नव्हे, तर भांडवलशाही राष्ट्रांमध्येसुद्धा कामगारांच्या परिस्थितीत स्वागतार्ह परिवर्तन घडू लागले.

महायुद्धोत्तर विषम पुनर्रचना आणि विविध यूरोपीय राष्ट्रांची आर्थिक घसरण या गोष्टींनी हुकूमशाहीला वाट मोकळी करून दिली. रशियात साम्यवादी हुकूमशाही स्थिरावली. १९२२ मध्ये मुसोलिनी इटलीचा, तर १९३३ मध्ये हिटलर जर्मनीचा सत्ताधीश बनला. त्यांचे अनुक्रमे फॅसिस्ट आणि नाझी तत्त्वज्ञान प्रामुख्याने नकारात्मक आणि आक्रमक स्वरूपाचे होते. लोकशाही, उदारमतवाद, शांततावाद, साम्यवाद, दोस्त राष्ट्रे, व्हर्सायचा तह अशा विविध गोष्टींना विरोध करणारे आणि व्यक्तीपेक्षा राज्याला व नेत्याला अवाजवी महत्त्व देणारे सर्वंकषवादी विचार दोघांनी मांडले. आपल्या विचारांना मुसोलिनीने प्राचीन रोमन परंपरेच्या अभिमानाची, तर हिटलरने वंशश्रेष्ठत्वाची भावनात्मक जोड दिली. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या अनेक गोष्टींचा हीन आविष्कार दोघांच्याही राजवटीत दिसून येतो. त्यांच्या आक्रमक राष्ट्रवादी व साम्राज्यवादी धोरणांमुळे ⇨दुसरे महायुद्ध ओढवले आणि त्यामध्ये दोघांच्याही हुकूमशाहीची आहुती पडली (१९४५). तुर्कस्तानचा ⇨केमाल पाशा (कार. १९२३-१९३८) हा मात्र लोकहितदक्ष हुकूमशहा होता. आधुनिक मूल्यांवर आधारित सुधारणावादाचा विधायक कार्यक्रम राबवून त्याने यूरोपचा रुग्णाईत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुर्कस्तानला प्रबळ बनविले.

पहिल्या महायुद्धानंतर अमेरिका पुन्हा अलिप्ततेच्या कोशात गुरफटली. इंग्लंड-फ्रान्स राष्ट्रसंघाच्या नेतृत्वाची धुरा समर्थपणे सांभाळू शकले नाहीत. राष्ट्रसंघ ही निव्वळ प्रभावहीन वादविवाद सभा बनली. साम्राज्यविस्तारामुळे इंग्लंड-फ्रान्स, तर मूळच्याच भूविस्तारामुळे रशिया-अमेरिका हे संपन्न देश होते. पण जर्मनी, इटली व जपानची या बाबतीत दुर्दशा झाली होती. ही विषमता भरून काढण्याची आकांक्षा आणि विविध कारणांमुळे धुमसणारे वैफल्य यांतून आक्रमक बनलेल्या जर्मनी, इटली व जपान यांचे त्रिकूट एकत्र आले (१९३७). पहिल्या महायुद्धाला कारणीभूत ठरलेली सर्व कुलक्षणे तशीच चालू राहिली. या सर्वांची परिणती दुसऱ्या महायुद्धात (१९३९-४५) झाली. १९४१ मध्ये इंग्लंड-फ्रान्सच्या गटाच्या बाजूने रशिया, अमेरिकासुद्धा युद्धात उतरले. जर्मनी-इटली-जपानचा गट पराभूत झाला. पहिल्या महायुद्धापेक्षा दुसरे महायुद्ध खऱ्या अर्थाने जागतिक स्वरूपाचे आणि अधिक विध्वंसक ठरले. या युद्धातला अणुबाँबचा वापर आणि युद्धानंतर सुरू झालेली अण्वस्त्रांची स्पर्धा यामुळे भयग्रस्त अस्थिरतेच्या छायेखाली जग वावरू लागले.

लेखक : दीक्षित, राजा

युद्धकाळात दोस्त राष्ट्रांनी साधलेली एकी युद्धसमाप्तीनंतर फार काळ टिकली नाही. यूरोपच्या भूमीवर युद्ध लढले गेले होते. त्यामुळे झालेल्या विनाशातून निर्माण झालेले दुर्भिक्ष, बेकारी, अंदाधुदी यांचा फायदा उठवून साम्यवादाचा पश्चिम यूरोपमध्ये प्रसार करण्याचे आक्रमक धोरण रशिया रेटू पहात आहे, असा अमेरिका आणि इंग्लंड यांना संशय होता. उलट ह्या भांडवलशाही आणि साम्राज्यवादी राष्ट्रांचे धोरण सर्व साम्यवादी राजवटींशी शत्रुत्वाचे असणार ही रशियाची खात्री होती. परिणामी यूरोप राजकीय दृष्ट्या पश्चिम यूरोप आणि पूर्व यूरोप अशा दोन भागांत दुभंगला आणि त्यांच्यात पोलादी पडदा उभा झाला.

युद्धसमाप्तीनंतर नवी घडी बसविणाऱ्या तहनाम्याला सर्वांची संमती मिळविणे किती दुर्घट असते, ह्याचा अनुभव पहिल्या महायुद्धानंतर आला होता. तेव्हा पॅरिस परिषदेसारखी शांतता परिषद दुसऱ्या महायुद्धानंतर भरविण्यात आली नाही. पण फेब्रुवारी १९४५ मध्ये क्रिमियातील याल्टा येथे रूझवेल्ट, चर्चिल आणि स्टालिन यांची बैठक होऊन युद्धोत्तर कालात जर्मनीवर ठेवायचे नियंत्रण संयुक्त राष्ट्रे ही संघटना स्थापून आणि पूर्व यूरोपीय देशांत प्रस्थापित करावयाची राजकीय व्यवस्था ह्या प्रश्नांविषयी एकमताने निर्णय घेण्यात आले. ह्या निर्णयांप्रमाणे जर्मनीच्या पूर्वभागातील काही प्रदेश पोलंड आणि रशिया यांना देण्यात आले. पॉट्सडॅम येथे भरलेल्या परिषदेत (जुलै-ऑगस्ट, १९४५) स्टालिन, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रूमन आणि ब्रिटिश पंतप्रधान ॲटली यांनी याल्टा निर्णयाचा आशय स्पष्ट केला. त्यानुसार ओडर-नायसे नद्यांच्या पूर्वेकडील जर्मन प्रदेश, पूर्व प्रशियाचा दक्षिण विभाग आणि डँझिग शहर पोलंडला मिळाले. पूर्व प्रशियाचा उरलेला भाग रशियाला मिळाला. जर्मनीचे चार भागांत विभाजन करण्यात येऊन त्यांतील एकेका भागात अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स आणि रशिया यांचे प्रशासन सुरू करण्यात आले. बर्लिन रशियन विभागात असल्यामुळे बर्लिनचेही असेच चार प्रशासकीय विभाग पाडण्यात आले. पण १९४९ पर्यंत अमेरिका, इंग्लंड व फ्रान्स यांनी आपल्या तीन विभागांचे एकत्रीकरण करून तेथे स्वायत्त प. जर्मन सरकारची स्थापना केली. उलट रशियाच्या आधिपत्याखालील पूर्व जर्मनीमध्ये वेगळी राज्यघटना अंमलात आणली गेली. जर्मनीचे पश्चिम जर्मनी आणि पूर्व जर्मनी असे विभाजन कायम झाले.

इटली, बल्गेरिया, हंगेरी, रूमानिया आणि फिनलंड यांच्याशी जुलै-सप्टेंबर १९४७ मध्ये शांततेचे तह झाले. त्यांच्या काही प्रदेशांचे वेगवेगळ्या राष्ट्रांत फेरवाटप करण्यात आले आणि त्यांनी लोकशाही राजवटी स्थापन कराव्या, फॅसिझमला थारा देऊ नये अशा काही अटी त्यांच्यावर लादण्यात आल्या. ऑस्ट्रियाशी तह होऊन त्याची स्वायत्तता त्याला परत मिळायला १९५५ साल उजाडावे लागले.

सर्वसाधारणपणे १९५० ते १९६० ही वर्षे यूरोपला आर्थिक दृष्ट्या भरभराटीची गेली. पण ह्या संपन्नतेतून काही बिकट सामाजिक प्रश्नही निर्माण झाले. समाजातील आर्थिक विषमता वाढली आणि ह्यामुळे सामाजिक असंतोष बळावला. १९६५ ते १९६८ ह्या वर्षांत विद्यार्थी व कामगार यांनी सुरू केलेल्या आंदोलनांमुळे अस्थिरता आणि अनिश्चितता यांनी यूरोप ग्रासला गेला. आर्थिक उत्पादनाला धक्का लागू न देता आर्थिक भरभराटीत समाजाच्या सर्व वर्गाला कसे सहभागी करावे हा पश्चिम यूरोपपुढील प्रश्न आहे तर कम्युनिस्ट राजवटींच्या स्थैर्याला धोका लागू न देता नागरिकांच्या स्वातंत्र्यावरील नियंत्रणे कशी कमी करावीत, हा पूर्व यूरोपपुढील प्रश्न आहे.

युद्धसमाप्तीपासून पश्चिम यूरोपवरील संभाव्य सोव्हिएट आक्रमणाचा प्रतिकार करण्याच्या दृष्टीने अमेरिका पावले टाकीत होती. मार्शल योजनेद्वारे अमेरिकेने प. यूरोपातील राष्ट्रांना भरघोस आर्थिक मदत केली. ह्या देशाचे ह्यामुळे आर्थिक पुनरुत्थान सुकर झाले. यूरोपीय देशांनीही एकात्म यूरोपची बांधणी करण्याचा कार्यक्रम मनापासून स्वीकारला. यूरोपीय-आर्थिक-सहकार्य संघटना, यूरोपीय कोळसा व पोलाद संघटना, यूरोपीय आण्विक ऊर्जा संघटना आणि यूरोपीय आर्थिक संघटना (समाईक बाजारपेठा) इ. संघटनांनी यूरोप अधिकाधिक एकात्म होऊ लागला आणि त्याची आर्थिक भरभराटही झाली. १९४९ मध्ये नाटो-संघटना-स्थापना करण्यात आली आणि यूरोपीय राष्ट्रे व अमेरिका यांनी पश्चिम यूरोपच्या संरक्षणाची सामायिक हमी घेतली. सोव्हिएट रशिया व त्याची अंकित राष्ट्रे यांनी ह्याच स्वरूपाचा वॉर्सा करार करून नाटोला प्रत्युत्तर दिले. यूरोपच्या दृष्टीने दुसऱ्या महायुद्धानंतरची महत्त्वाची घटना म्हणजे साम्राज्य धारण करणाऱ्या सर्व यूरोपीय देशांना आपापल्या वसाहतींना स्वातंत्र्य देणे भाग पडले. १९४७ मध्ये ब्रिटिशांनी भारतीय उपखंडाची फाळणी करून भारत आणि पाकिस्तान ह्या दोन राष्ट्रांचे स्वातंत्र्य मान्य केले. यानंतर आग्नेय आशियातील इंडोनेशिया, मलेशिया, व्हिएतनाम, तसेच आफ्रिकेतील वासाहतिक दर्जा असलेले देश हळूहळू स्वतंत्र झाले. यूरोपचे आशिया व आफ्रिका या खंडांवरील राजकीय अधिपत्य जवळजवळ तीन शतकांनी संपुष्टात आले. तरीदेखील आंतरराष्ट्रीय राजकारणातील यूरोपचे स्थान नगण्य नाही. कारण यूरोपची चैतन्यशक्ती आजही जागृत आहे. तथापि काळ्या लोकांवर व पर्यायाने जगावर ओझे लादण्याची किंवा त्यांचे ओझे वाहण्याची गोऱ्या माणसाची उठाठेव तिसरे जग आता खपवून घेणार नाही, हे वास्तव पचवूनच यूरोपला भविष्याकडे वाटचाल करावी लागेल. (चित्रपत्रे ५, ६).

लेखक : रेगे, मे. पुं.

 संदर्भ :

 • Boardman, J.; Griffin, J.; Murry, O. Ed.The Oxford History of The Clissical World,Oxford,1986.
 • Bowle, Johhn, The Unity of European History:A Political and Cultural Survey,Oxford,1971.
 • Bums, E. M., Western Civilizations:Their History and Their Culture, London,1941.
 • Fisher, H. A. L. Ed. A History of Europe, 3 Vols.,Toronto, 1938-42.
 • Gottman, Jean, A Geography of Europe, Halt,1962.
 • Hayes, C. J., Contemporary Europe since 1970. New York, 1972.
 • Hazen, C. D., Modern Europe upto 1945, Delhi, 1968.
 • Hoffman, G. W., A Geography of Europe, London, 1961.
 • Hoffman, G. W. Ed. Geography of Europe: Including Asiotic U.S.S.R., Wiley, 1977.
 • Lipson, E., Europe in the XIX th and XX th Centuries 1815-1939, London, 1963.
 • Malmstrom, Vincent H., Geography of Europe: A Regional Analysis, Ontario, 1971.
 • Mayne, Richard, The Community of Europe, Norton, 1963.
 • Mayne, Richard, The Europeans: Who are We? London,1972.
 • Parker, R. A. C., Europe 1919-45, London, 1969.
 • Pounds, N. J. G., A Historical Geography of Europe 1500-1840, Cambridge, 1980.
 • Pryce, Roy, The Politics of The European Community, Totowa,N.J.1974.
 • Robertson, A. H., European Institution:Co-operation, Integration, Unification, London,1973.
 • Thomson, David, The New Cambridge Modern History, 12 Vols., Cambridge,1957-70.
 • Thomson, David, Europe Since Napoleon, London, 1957.
 • Wills, F. Roy, France, Germany and The New Europe: 1945-67, Stanford, 1968.
 • Zurcher, Arnold J., The Struggle to Unite Europe: 1940-58, New York, 1958.

 

यूरोप (प्राकृतिक)

 

यूरोप (राजकीय)