ओटावा : कॅनडाची राजधानी. लोकसंख्या उपनगरांसह ३,०२,३४१ (१९७१). हे आँटॅरिओ प्रांताच्या कार्लटन परगण्यात, ओटावा नदीच्या दक्षिण काठावर, माँट्रिऑलच्या पश्चिमेस १६० किमी. व टोराँटोच्या ईशान्येस ३९७ किमी. आहे. गॅटीनो, ओटावा व रिडो ह्या नद्यांच्या संगमाजवळ १० ते ६० मी. उंचीच्या टेकड्यांवर ओटावा विस्तारलेले असल्याने भोवतालच्या हिव्यागार दऱ्याखोऱ्यांचे सौंदर्य येथून पहावयास मिळते. रिडो कालवा शहराच्या साधारण मध्यावरून वाहतो. कालव्याच्या काठाकाठाने वृक्षराजींनी नटलेले रस्ते असून एकंदर शहराची रचना आखीव आहे. शहरातील तीस टक्क्यांवर लोक फ्रेंच भाषिक आहेत.

ओटावा : एक विहंगम दृश्य

अठराशे साली फिलमेन राइटबरोबर पंचवीस कुटुंबे येथे स्थाईक झाल्यापासून शहराच्या वाढीस सुरुवात झाली. १८२७ मध्ये कर्नल जॉन बाय ह्या रिडो कालवा खणणाऱ्या स्थापत्यशास्त्रज्ञाच्या वेळी याला बायटाऊन नाव व शहराचा दर्जा मिळाला. बायटाऊनचे पुढे ‘ओटावा’ झाले. १८५८ साली व्हिक्टोरिया राणीने कॅनडाच्या संयुक्त प्रांताची राजधानी म्हणून ओटावाची निवड केली व १८६७ मध्ये शहराला राष्ट्रीय राजधानीचा मान मिळाल्यापासून ओटावाचे वैभव सतत वाढत गेले.

येथील संसद भवन, रिडो हॉल हे राज्यपालाचे निवासस्थान, राष्ट्रीय दफ्तरखाना, युद्धस्मारकभवन, लॉरिअर हाऊस हे इतिहासविषयक संग्रहालय यांची कॅनडातील प्रेक्षणीय वास्तूंत गणना होते. यांशिवाय गॅटीनो पार्कसारखी भव्य उपवने, राष्ट्रीय कला संग्रहालय व वेधशाळा, राष्ट्रीय शेती प्रयोगशाळा, अँग्‍लिकन व कॅथलिक कॅथीड्रल, मे महिन्यातील ट्यूलिप पुष्पोत्सव, सेंट्रल कॅनडा प्रदर्शने व सरोवरांच्या परिसरातील नाट्य, नृत्य, संगीत यांची रेलचेल असलेला ग्रीष्मोत्सव यांसाठी प्रवाशांची येथे नेहमी वर्दळ असते.

लाकूड कापण्याचा फार जुना धंदा येथे आजही महत्त्वाचा आहे. याशिवाय कागद, फर्निचर, शास्त्रीय उपकरणे, घड्याळे, खाद्य पदार्थ यांचे कारखाने येथे असून मुद्रण व प्रकाशन हाही येथील महत्त्वाचा व्यवसाय आहे. ओटावा नदीवरील क्लॉडिअर धबधब्यामुळे स्वस्त जलविद्युत् उपलब्ध झाल्याने येथील उद्योगधंद्यांची झपाट्याने वाढ झाली. ओटावा विद्यापीठ व अनेक महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था येथे असल्याने ओटावाला कॅनडाची शैक्षणिक राजधानीही म्हणतात.

ओक, द. ह.