गवती टोप्यांचा व चटयांचा रस्त्यावरील बाजार, म्हापसा.

म्हापसा : भारताच्या गोवा, दमण, दीव या केंद्रशासित प्रदेशांपैकी गोव्याच्या बारदेश तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या २६,००६ (१९८१). पणजीच्या उत्तरेस १३ किमी. अंतरावर, मुंबई-त्रिचूर राष्ट्रीय महामार्गावर (क्र. १७) आणि सस. पासून ४४ मी. उंचीवर ‘म्हापसा’ वसलेले आहे. महाराष्ट्रातून गोव्याकडे जाताना म्हापसा हेच पहिले महत्त्वाचे ठिकाण लागते. पठारासारख्या भागाच्या पायथ्याशी, माथ्यावर व उतारांवर म्हापसा वसलेले आहे. पायथ्याशी असलेल्या नगराच्या जुन्या भागात रेषाकृती वसाहत आढळते. नगराचा नवीन विस्तार टेकडीच्या पायथ्याबरोबरच टेकडीवरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगतच्या खोलगट भागात झालेला आढळतो. पठारावरच काही शैक्षणिक संस्थांची नव्याने स्थापना करण्यात आलेली आहे. म्हापसाच्या पूर्वेकडून याच नावाची मांडवीची छोटीशी उपनदी वाहते. म्हापसा नावाची व्युत्पत्ती येथील व्यापारी परंपरेशी जोडली जाते. ‘मापसा’ (माप व सा = वस्तूंच्या मोजणीचे किंवा विक्रीचे केंद्र) यावरून म्हापसा हे नाव पडले असावे, अशी दंतकथा आहे. फार पtर्वीपासून म्हापसा हे गोव्यातील महत्त्वाचे आर्थिक, व्यापारी व वाहतूक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. साबण, मातीची भांडी, कौले, लाकडी सामान, हातमागावरील कापड इ. उत्पादने येथे होतात. बसस्थानकाजवळच दर शुक्रवारी बाजार भरतो. दक्षिणेस ४५ किमी. अंतरावरील मडगाव हे जवळचे लोहमार्गस्थानक आहे. शहरात नगरपालिका आहे. येथे एक आरोग्य केंद्र, क्षयरोग निवारण केंद्र, असिलो रुग्णालय, अनेक खाजगी दवाखाने व शुश्रूषालये, चार प्राथमिक, ११ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालये, मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेले सेंट झेविअर महाविद्यालय, चित्रपटगृहे, नाट्य व श्रोतृगृहे, सार्वजनिक ग्रंथालये (प्रत्येकी दोन) खेळांचे क्लब, हॉटेले, निवासगृहे इ. सुविधा उपलब्ध आहेत. येथील अवर लेडी ऑफ मिरॅकल्स चर्च (१५९४) उल्लेखनीय आहे. बोदगेश्वर मंदिर हे लोकांचे प्रमुख श्रद्धास्थान असून दरवर्षी डिसेंबर–जानेवारीत येथे मोठी यात्रा भरते.

चौधरी, वसंत

Close Menu
Skip to content