बहारीन : अरबी अल् बहारीन. इराणच्या आखातातील आठ प्रमुख बेटांनी बनलेले स्वतंत्र शेखराज्य. क्षेत्रफळ ६६२ चौ. किमी. लोकसंख्या २,७७,६०० (१९७८ अंदाज). ही बेटे सौदी अरेबियाच्या पूर्वेस सु. २४  किमी.  कॉटारच्या  वायव्येस, २६ºउ.  अक्षांश  व  ५०º३०’ पू. रेखांश  यांवर  वसली  आहेत.  बहारीन  म्हणजे  दोन  सागर. मनामा  (१,१४,०३०) हे राजधानीचे शहर वहारीन बेटाच्या ईशान्य कोपऱ्यात वसले आहे. या द्विपसमूहात बहारीनशिवाय मुहॅरॅक, जिद्दा, उम सब्बान, सीत्रा, अँन् नॅबी सालिव्ह, उम नॅसान इ. प्रमुख बेटे सामाविष्ट होतात. यांपैकी मुहॅरॅक व सीत्रा ही बेटे साकवाने जोडलेली आहेत. हवार बेटे कॉटारच्या किनाऱ्याजवळ बहारीन बेटापासून आग्नेयीस सु. २० किमी. वर आहेत. या बेटांवर कोळी व खाणकाम मजूरच फक्त राहतात. बहारीनच्या किनारपट्टी १२६ किमी. असून सु. ३० बेटे निर्जन आहेत.

भूवर्णन : बहारीन द्विपसमूहातील बेटे आकाराने लहान, खडकाळ व समुद्रसपाटीपासून फार थोडी उंच आहेत. बहुतेक बेटे वालुकाश्म व चुनखडक यांची बनलेली असून त्यांची निर्मिती क्रिटेशस व तृतीयक काळांत झाली असावी. या द्विपसमूहातील सर्वांत उंच टेकडी अद् दुखान (१३५ मी.) बहारीन बेटावर असून ती वनश्रीहीन आढळते. बहारीन बेटाचा दक्षिण व पश्र्चिम भाग वालुकामय असून व्कचित काही ठिकाणी खारी जमीन आढळते. परंतु उत्तरेकडील व विशेषतः वायव्येकडील अरूंद प्रदेश सुपीक असून खजुरांच्या बागा व भाजीपाला यांसाठी तो प्रसिद्ध आहे. या भागात झरे व आर्टेशियन विहिरींद्वारा जलसिंचन केले जाते.

हवामान : बहारीनचे हवामान उष्ण व दमट असून येथे उन्हाळा व हिवाळा असे दोनच ऋतू आढळतात. पाऊस हिवाळ्यात पडतो. मे ते ऑक्टोबर या उन्हाळी महिन्यांत तपमान २९ºसे. ते ३८ºसे. पर्यंत जाते. हिवाळ्यात (डिसेंबर ते मार्च) तपमान २१ºसे. पेक्षा खाली येते. हिवाळे आल्हाददायक असतात. वायव्येकडून येणारे ‘शामल’ हे आर्द्र वारे असून दक्षिणेकडून येणारे ‘गाज’ हे उष्ण व कोरडे वारे कधीकधी रेती वाहून आणतात. पर्जन्यमान कमी असून सरासरी ४ ते १२ सेंमी, पाऊस पडतो. बेटांवर वाळवंटी प्रदेशातील विशिष्ट वनस्पतींचे सु.२०० प्रकार आढळतात. फळे, भाजीपाला तसेच चारा यांचे उत्पादन जलसिंचनाखालील लागवडयोग्य जमिनीतून घेतले जाते. वाळवंटी प्रदेशामुळे प्राणिजीवन मर्यादित आहे. सुरंग, ससे, सरडे, उंदीर तसेच जलसिंचित भागात मुंगूस इ. प्राणी आढळतात. विविध प्रकारचे पक्षीही दिसून येतात.

इतिहास : बहारीनमध्ये इ. स. पू. ५००० वर्षापूर्वी मानवी वस्ती होती. प्रागैतिहासिक कळातील अवशेषांवरून सुमेरिया, सिंधू संस्कृती, अर, अरबी समुद्रातील बंदरे यांच्याशी बहारीनचा व्यापारी संबंध असावा. प्राचीन इराणी, ग्रीक व रोमन भूगोलज्ञांच्या तसेच इतिहासकारांच्या वृत्तांतांतून बहारीनविषयीचे उल्लेख आढळतात. प्राचीन काळी ते एक व्यापारी बेट होते. दिलमून नावाची एक समृद्ध संस्कृती इ. स. पू. २००० ते १८०० या काळात येथे विकसित झाली. इ. स. सातव्या शतकात ते मुस्लिम अंमलाखाली आले. त्यानंतर १५२१ ते १६०२ पर्यंत ते पोर्तुगीजांकडे होते. पुढे १६०२ मध्ये इराणने त्यावर ताबा मिळविला. सौदी अरेबियातील अल् खलिफ या राजघराण्यातील अमीराने अरबांच्या मदतीने इराण्यांना तेथून हाकलून दिले (१७८३). अठराव्या शतकात ब्रिटिशांनी व्यापाराच्या दृष्टीने सोयीचा प्रदेश म्हणून तेथे प्रवेश केला आणि तेथील अमीराला सौदी अरेबियातील अरब व तुर्की लोकांविरूद्ध मदत केली. परकीय आक्रमणे आणि चाचेगिरी यांना आळा घालण्यासाठी आणि अंतर्गत सुरक्षिततेसाठी ब्रिटिशांनी अमीराला अनेक वेळी साहाय्य केले. परिणामतः ब्रिटिश व बहारीनचा अमीर यांत तह झाला (१८२०) आणि पुढे बहारीन हे ब्रिटिशांचे रक्षित राज्य झाले (१८६१). त्यामुळे अमीराच्या अनियंत्रित सत्तेला आळा बसला. विसाव्या शतकात बहारीनमध्ये अनेक लोककल्याणकारी योजना राबविण्यात आल्या. शाळा, महाविद्यालये स्थापण्यात आली व शिक्षणाचा प्रसार झाला. १९३२ मध्ये तेलाचा शोध लागला. बहारीन लोकांनी शासनात आपला सहभाग असावा, अशा मागण्या केल्या आणि राष्ट्रीय चळवळीस प्रारंभ झाला. १९५६ मध्ये दंगेधोपे होऊन देशात अशांतता निर्माण झाली. तेव्हा अमीराने लोकांना काही राजकीय हक्क दिले. एवढ्याने लोकांचे समाधान झाले नाही तेव्हा अमीराने १९७० साली १२ लोकांचे एक शासकीय मंडळ स्थापन केले. यातील बहुतेक सदस्य अमीराचे नातेवाईकच होते. १५ ऑगस्ट १९७१ रोजी अमीराने बहारीनच्या स्वातंत्र्याची घोषणा केली त्याच दिवशी ब्रिटनबरोबर त्याने मैत्रीचा करारही केला. पुढील वर्षी ब्रिटनने इराणी आखातातून आपले सैन्य मागे घेतले. थोड्याच दिवसांनी बहारीन संयुक्त राष्ट्रे व अरब लीग यांचा सदस्य झाला.

राजकीय स्थिती : या स्वतंत्र सार्वभौम राष्ट्राचा सर्वसत्ताधारी अमीरच असून तो पंतप्रधानाची व मंत्रिमंडळातील सदस्यांची नेमणूक करतो. १९७२ साली नेमलेल्या संविधान समितीने १९७३ मध्ये देशाचे संविधान प्रसिद्ध केले. त्यानुसार डिसेंबर १९७३ मध्ये सार्वत्रिक निवडणुका होऊन ३० सदस्यांची राष्ट्रीय विधानसभा अस्तित्वात आली. राजकीय पक्षांना बंदी असल्याने हे सर्व सदस्य स्वतंत्र उमेदवार म्हणूनच निवडणुकीत उतरले होते. राज्यघटनेप्रमाणे विधानसभेत मंत्रिमंडळाच्या सदस्यांचाही अंतर्भाव होतो तथापि १९७५ च्या अखेरीस पंतप्रधानाच्या सूचनेनुसार राष्ट्रीय विधानसभा बरखास्त करण्यात आली. तेव्हापासून देशाचा कारभार मंत्रिमंडळामार्फतच चालतो. डिसेंबर १९७८ मध्ये बहारीनच्या मंत्रिमंडळात १६ मंत्री होते. अमीर हा राष्ट्रप्रमुख व पंतप्रधान शासनप्रमुख आहे. देशाचे पाच ग्रामीण विभाग केलेले असून स्थानिक नगरपरिषदांतर्फे तेथील कारभार चालतो.

संरक्षण : बहारीनच्या भूसेनेत एक इन्फंट्री बटालियन व एक चिलखती रणगाडा दल असून भूदलात एकूण २,३०० सैनिक होते (१९७९). १९७८ च्या अर्थसंकल्पामध्ये संरक्षणासाठी १,६७,००,००० बहारीन दीनार खर्चाची तरतूद करण्यात आली होती.

न्यायव्यवस्था : देशातील ब्रिटिशप्रणीत न्यायव्यवस्थेच्या ऐवजी नवी न्यायव्यस्था अंमलात येत आहे. देशाच्या विधिविषयक गरजांचा सखोल अभ्यासही होऊ लागला आहे. विविध प्रकारच्या संविधा, अध्यादेश आणि नियम यांच्या रूपाने बहारीनचा स्वतंत्र फौजदारी कायदा तयार होत आहे. सर्वांना समान कायदा व न्याय हे तत्त्व स्वीकारण्यात आले आहे.


आर्थिक स्थिती : पहिल्यापासून देशाची अर्थव्यवस्था मुख्यतः व्यापारावर अवलंबून होती. शेती, चटया विणणे, मोती गोळा करणे, छो-ट्या नावा बनविणे आणि मच्छिमारी इ. परंपरागत व्यवसाय अजूनही टिकून आहेत. विशेषतः १९३४ पासून तेलाच्या शोधानंतर बहारीनचा आ-र्थिक विकास झपाट्याने होऊ लागला. शेतीसाठी देशातील फक्त १० टक्के जमीन (६० चौ. किमी.) उपयोगात येते. खजूर व अल्फाल्फा गवत हीच प्रमुख पिके होत. मोती शोधणे, मृत्पात्री, विणकाम, पांढऱ्या माकडांची शिकार यांसारखे लहानमोठे उद्योग अजूनही आढळतात. तेलउत्पादनात २४ लक्ष टनांपर्यंत वाढ झाली आहे. हे तेलसाठे १९९० पर्यंत पुरतील, असा तज्ञांचा अंदाज आहे. बहारीनचा प्रमुख तेलशुद्धीकरण सीत्रा बेटावर आहे. देशातील तसेच सौदी अरेबियातून नळांद्वारे येणाऱ्या अशुद्ध खनिज तेलाचे येथे शुद्धीकरण होते. शासनाने इतर व्यवसायांनाही प्रोत्साहन देऊन अर्थव्यवस्थेचा विकास करण्यावर भर दिला आहे. त्यांत अँल्युमिनियम, बांधकामाचे सामान, प्लॅस्टिक, जहाजबांधणी व विविध पेयांचे उत्पादन यांचा समावेश होतो. पशुपालन व कुक्कुटपालन हेही व्यवसाय थोड्या फार प्रमाणात चालतात. मच्छीमारीमध्ये कोळंबीचे प्रमाण अधिक असते. देशातून मुख्यत्वे खनिज तेल व कोळंबी यांची निर्यात तर अन्नधान्ये, अँल्युमिनियम धातुक, यंत्रसामग्री, घरगुती उपकरणे इ. मालाची आयात करण्यात येते. एकूण उत्पन्नापैकी सु. ७०% उत्पन्न हे तेलनिर्यातीमुळे मिळते. मनामा हे खुले बंदर असून ते मोठे औद्योगिक केंद्र आहे.

 

‘बहारीन फिशिंग कंपनी’ आणि ‘बहारीन पेट्रोलियम कंपनी’ यांमार्फत अनुक्रमे मासेमारी व खनिज तेलउत्पादन या उद्योगांत वाढ होत आहे. मे १९७० मध्ये बहारीन ‘ओएपेक’ (ऑर्गनायझेशन ऑफ अरब पेट्रोलियम एक्स्पोर्टिंग कंट्रीज) चा सदस्य झाला. देशातील खनिज तेलउत्पादन प्रतिदिनी २,६१,००० (१९७७) बॅरल होते. दळणवळणाच्या सुविधा विकसित करून व्यापाराच्या सोयी वाढविण्यात येत आहेत. देशात अनेक ब्रिटिश, अमेरिकन व्यापारी संस्था आहेत. डिसेंबर १९७७ मध्ये प्रतिवर्षी १ लाख २० हजार टन वार्षिक उत्पादन असलेला अँल्युमिनियम शुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्यात आला. त्याच वर्षी देशात सुकी गोदी आणि जहाजदुरूस्तीचा कारखाना कार्यान्वित झाला. ऑक्टोबर १९७५ पासून बहारीनने किनारा पार (ऑफ शोअर) बँक कार्यालये सुरू केली असून त्यांमार्फत सरकारी व मोठ्या वित्तीय संस्थांच्या ठेवी स्वीकारणे व कर्ज देणे हे व्यवहार चालतात. देशात ‘बहारीन मॉनेटरी एजन्सी’ ही मध्यवर्ती बँक असून बँक ऑफ बहारीन, राष्ट्रीय बहारीन बँक यांसारख्या अनेक व्यापारी बँका कार्य करतात.

वाहतूक व संदेशवहन : बहारीन बेटावर वाहतुकीसाठी रस्त्यांचे जाळे असून इतर महत्त्वाच्या शहरांशी ते साकवांनी जोडलेले आहे त्यामुळे बस व टॅक्सी वाहतूक सर्वत्र आढळते. बहारीन व सौदी अरेबिया यांदरम्यान २५ किमी. लांबीचा पूल बांधण्याची योजना राबविली जात आहे. मनामापासून तीन किमी. वरील मुहॅरॅक येथे बहारीनचा आंतरराष्ट्रीय विमानतळ असून तेथून जगातील महत्त्वाच्या विमानकंपन्यांद्वारे जगभर हवाई वाहतूक केली जाते. बहारीनमधून बोटींची नियमित वाहतूक आखाती बंदरांशी तसेच पूर्वेकडील बंदरांशी चालते. सामान्य प्रकारचा माल मीना सलमान बंदरातून आयात केला जातो तर खनिज तेलउत्पादने सीत्रा बंदरातून निर्यात होतात.

बहारीनमध्ये १९७९ मध्ये ३३,२७६ दूरध्वनी होते त्यांमध्ये तेलकंपन्यांचे १,९५९ दूरध्वनी समाविष्ट नाहीत. १९७३ पासून देशात नभोवाणी व रंगीत दूरचित्रवाणी केंद्र सुरू करण्यात आले. देशात १९७६ मध्ये ८५,००० रेडिओ संच व ३०,००० दूरचित्रवाणी संच होते.

बहारीन दीनार हे देशाचे अधिकृत चलन असून १ बहारीन दीनारचे १,००० फिल होतात. देशात १०, ५, १, १/२ व १/४ दीनार तसेच १०० फिल यांच्या नोटा आणि १००, ५०, २५, ५ फिलची नाणी प्रचारात आहेत. १ स्टर्लिंग पौंड = ८०९.९० फिल व १ अमेरिकी डॉलर     = ३८५.८५ फिल असा विनिमय दर होता (१९७८).

लोक व समाजजीवन : बहारीनची बहुतांश वस्ती मुख्यत्वे  शहरी  भागात  असून  उत्तरेकडील  बेटांत  ग्रामीण  समाज विशेष आढळतो. एकूण लोकसंख्येत ९० % अरब असून उर्वरित लोकसंख्येत इराणी, भारतीय, पाकिस्तानी यांचा समावेश होतो. इस्लाम हाच राष्ट्रीय धर्म असून शिया व सुन्नी पंथांचे जवळजवळ सारखेच लोक आढळतात. अमीर, त्याचे नातेवाईक आणि काही श्रीमंत घराणी ही सुन्नी पंथाची आहेत. एकूण लोकसंख्येपैकी निम्म्याहून अधिक लोकसंख्या मनामा व मुहॅरॅक या दोन शहरांत आढळते. पेहरावात यूरोपीय ठसा आहे. बहारीनींचा आहार खजूर, मासे, फळे दूध व भात असा आहे.

 

देशात शिक्षण व आरोग्यसेवा मोफत आहे. अरबी ही बहारीनची शासकीय भाषा असून औद्योगिक वर्तुळात इंग्रजीचा वापर चालतो. अरबी वर्तमानपत्रे व साप्ताहिके संख्येने मोठी असून इंग्रजी नियतकालिके कमी आहेत. तेलउद्योगाने बहारीनच्या सामाजिक जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. तरूणांना नोकरीची हमी मिळाली असून घरे, आरोग्यसेवा व शैक्षणिक सवलती दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे जीवनमान उच्च दर्जाचे असून मध्यम वर्गाचा, विशेषतः डॉक्टर, वकील, शिक्षक, अभियंते यांचा, प्रभाव वाढत आहे. स्त्रीजागृतिनिदर्शक ‘नहह फतत अल्-बहारीन’ (स्त्रीमुक्ती आंदोलन) संस्था, तसेच मातांना अपत्यसंगोपनाचे शिक्षण देणाऱ्या ‘री अया अल् तफल वा’, ‘अल् उमुमा’ सारख्या संस्था निर्माण झाल्या आहेत.


शिक्षण : बहारीनमध्ये साक्षरतेचे प्रमाण वाढत आहे. इराणी आखातातील हा सर्वांत जास्त साक्षरता असलेला देश आहे. देशात १९७६-७७ मध्ये १,८०५ प्राथमिक शाळांत ४२,५९० विद्यार्थी ११२ शासकीय विद्यालयांत २,८२६ शिक्षक व ६१,२०१ विद्यार्थी होते. चार वाणिज्य विद्यालये व दोन तांत्रिक विद्यालये आहेत. पुरूष व स्त्रिया यांच्यासाठी प्रत्येकी एक शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालय आहे. १९७६ पर्यंत सु. १,००० बहारीनी विद्यार्थी परदेशीय विद्यापीठांतून पदवीधर झाले. १९६८ मध्ये गल्फ तांत्रिक महाविद्यालय बहारीनमध्ये सुरू करण्यात आले.

समाजकल्याण व आरोग्य : देशात शासनातर्फे मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे. विविध शाखांतील खाजगी दवाखानेही आहेत. ऑक्टोबर १९७६ पासून सामाजिक सुरक्षा कायदा अंमलात आला. त्यानुसार निवृत्तिवेतन, औद्योगिक क्षेत्रातील अपघातांची नुकसानभरपाई, आजारपण, बेकारी, प्रसूती व कौटुंबिक भत्ते इत्यादींची तचरतूद करण्यात आली आहे. देशात १९ शासकीय रूग्णालये व आरोग्य केंद्रे असून त्यांत ९२६ खाटांची सोय होती (१९७८). यांशिवाय अमेरिकन मिशनचे व तेल कंपन्यांची स्वतंत्र रूग्णालये आहेत.

देशात बहिरी ससाण्यांकरवी पारधीचे पारंपरिक खेळ, घोडे, उंट, कुरंग यांच्या शर्यती इ. लोकप्रिय आहेत.

महत्त्वाची स्थळे : मनामा हे राजधानीचे ठिकाण शासकीय व औद्योगिक दृष्टया महत्त्वाचे आहे. मीना सलमान हे खुले बंदर व औद्योगिक केंद्र आहे. अँवॅली हे तेलशुद्धीकरण कारखान्यासाठी प्रसिद्ध आहे. मेदिनेत हे नवे शहर उल्लेखनीय आहे. रास अबू जरजूर हे मध्य पूर्वेतील प्रमुख उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे. सीत्रा बेटाच्या किनाऱ्यावर ५ किमी, लांबीचा धक्का असून येथूनच देशातील तेलाची निर्यात होते.

 

बहरीन प्राचीन कालापासून आंतरराष्ट्रीय व्यापाराचे केंद्र असल्याने तेथे अनेक पुरावशेषही आढळतात. त्यामुळे प्राचीन दिलमून या व्यापारी संस्कृतीच्या स्वरूपावर प्रकाश पडतो. 

संदर्भ :    1. Belgrave, J. H. D. Welcome to Bahrain, Manama, 1975. 

             2. Fereydum Adamiyat, Bahrain Islands, 1955.

             3. Hakima,A. M. Abu, History of Eastern Arabia, 1750 – 1800 : The Rise and Development of Bahrain and Kuwalt1965.                

             4. Ru-Maihi, M. G. Bahrain : Social and Political Change since The First World War, New York, 1976.

 

देशपांडे, सु. र.


बहारीन बुरुंडी