ॲटलास : नकाशांच्या एकत्र बांधलेल्या संग्रहाला ‘ॲटलास’ असे म्हणतात. यात दिलेल्या सर्व नकाशांतील सांकेतिक चिन्हे, खुणा आणि वापरलेली भाषा एकाच प्रकारची असते. तांत्रिक विषयासंबंधीच्या रेखाकृती व तदानुषंगिक आकडेवारी देणाऱ्या पुस्तकांना कधी कधी ‘ॲटलास’ म्हणून जरी संबोधले जात असले, तरी नकाशासंग्रहाचे पुस्तक म्हणजे ॲटलास हे आता सर्वमान्य झाले आहे.

पृथ्वीचा गोल आपल्या खांद्यावर वाहणारा ग्रीक पुराणपुरुष ‘ॲटलास’ याची आकृती ⇨मर्केटर याने आपल्या नकाशासंग्रहावर १६ व्या शतकाच्या उत्तरार्धात प्रथम दाखविली. त्यानंतरच्या अनेक नकाशासंग्रहांवर हे रेखाचित्र दाखविलेले आहे. कालांतराने नकाशासंग्रहालाच ‘’ॲटलास‘’ हे नाव प्राप्त झाले.

आज ज्ञात असलेला सर्वांत प्राचीन ॲटलास म्हणजे ⇨टॉलेमीचा २८ पानी ॲटलास होय. त्यानंतर मध्ययुगीन काळात खर्‍या अर्थाने ॲटलास निर्माण झाले नाहीत. पुढे १५ व्या शतकात जेव्हा टॉलेमीच्याजिऑग्रॅफीया या ॲटलासची पुनरावृत्ती निघाली तेव्हा शास्त्रज्ञांचे लक्ष नकाशे तयार करण्याकडे वेधले गेले. १५७० मध्ये ⇨ऑर्तीलिअसने थिएट्रम ऑर्विस टेरारम हा ॲटलास तयार केला. तेव्हापासूनच आधुनिक पद्धतीच्या ॲटलासयुगास प्रारंभ झाला असे समजतात. १६ व्या शतकातील ॲटलासचा दुसरा उत्कृष्ट नमुना म्हणजे इटालियन नकाशाशास्त्रज्ञांनी तयार केलेला ला फ्रेरी हा ॲटलास होय. १७ वे शतक हे ॲटलास-निर्मितीच्या दृष्टीने सुवर्णकालच समजले जाते कारण या कालखंडात कोरोनेलीसारख्या इटालियन शास्त्रज्ञांचे आणि मर्केटर, ब्‍लू, हाँडियस इ. नकाशाशास्त्रज्ञांचे ॲटलास प्रसिद्ध झाले. हे सर्व ॲटलास सुंदर चर्मपत्र बांधणीचे, सुशोभित व मोठ्या आकाराचे होते. १८ व्या शतकात निर्माण झालेले फ्रेंच ॲटलास कमी सुशोभित असले, तरी मजकुराच्या दृष्टीने बरेच सरस होते. या शतकाच्या शेवटी डच ॲटलासच्या पद्धतीवरच इंग्‍लिश ॲटलास प्रसिद्ध झाले. त्यांत मजकूर मात्र बराच असे. याच काळात होमान घराण्यातील शास्त्रज्ञांनी तयार केलेले जर्मन ॲटलास, त्यांतील तपशील, चित्रे, टीपा व छोटेखानी दुय्यम नकाशे यांमुळे फार लोकप्रिय झाले. पुढील काळात नकाशाशास्त्रात बरीच प्रगती झाली. १९ व्या शतकात अनेक देशांच्या सरकारांतर्फे ॲटलास प्रसिद्ध होऊ लागले.

ॲटलासचे सामान्यत: दोन प्रकार आढळतात. पहिल्या प्रकारात केवळ जगाच्या अनेकविध नकाशांचा अंतर्भाव केलेला असतो, तर दुसऱ्या प्रकारात प्रादेशिक नकाशांचे प्रमाण जास्त असते. दोन्ही प्रकारच्या ॲटलासमध्ये गावांची व शहरांची स्थाने, प्रदेशांचे प्राकृतिक स्वरूप, राजकीय व शासकीय विभाग दाखविलेले असतात. त्याशिवाय इतरही माहिती (उदा., सरहद्दी, हवामान, आर्थिक विकास, नैसर्गिक संपत्ती, लोकसंख्या इ.) नकाशात दिलेली असते. प्रदेशांच्या महत्त्वाप्रमाणे, त्यांच्या नकाशांचे प्रमाण जरी कमीजास्त ठेवले गेले, तरी सामान्यतः एका विशिष्ट प्रमाणावरच नकाशे काढण्याची प्रवृत्ती त्यात दिसून येते. नकाशात अनेक प्रकारच्या गोष्टी निरनिराळ्या रंगांनी किंवा एकाच रंगाच्या अनेक छटांनी किंवा रेखनपद्धतींनी दाखविण्यात येतात. नकाशात दाखविण्याच्या माहितीला योग्य, असे नकाशा-प्रक्षेपणही आता वापरले जाते.

आधुनिक काळात सर्वांत जास्त उपयोगात असणारे व ज्यात सु. दोन ते पाच लक्ष नावांच्या नोंदी आहेत अशा ॲटलासांमध्ये आंद्रेचा आल्जीमीनार हँड ॲटलास, स्टीलरचा हँड ॲटलास, इटालीय प्रवास-संघटनेचा आंतरराष्ट्रीय ॲटलास, पाच खंडांत प्रकाशित झालेला लंडन टाइम्सचा जागतिक ॲटलास इ. ॲटलासांचा समावेश होतो. आधुनिक ॲटलासचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे भौगोलिक स्थानांची त्यांच्या नावांच्या उच्चारांसहित दिलेली सूची. त्याबरोबरच त्यांच्या अक्षांश-रेखांशांचाही उल्लेख केलेला असतो. तथापि अलीकडे प्रसिद्ध झालेल्या बर्‍याच चांगल्या ॲटलासांमध्येही अक्षांश-रेखांश न देता, ते ठिकाण नकाशासंग्रहात कोणत्या पानावर व कोणत्या चौकटीत सापडेल ते दिलेले असते. त्याबरोबरच ते गाव आहे, की बेट, की नदी इ. माहिती देऊन ते कोणत्या देशात आहे, तेही देतात. काही ॲटलासांमध्ये सूर्यमाला, पृथ्वीचा जन्म, ग्रहणे, भरतीओहटी, पृथ्वीवरील निसर्गसंपत्तीचे विविध मानवी उपयोग, भाषा, मानववंश, विविध उत्पादने इ. अनेकविध माहिती नकाशे व आकृती यांच्या साहाय्याने दिलेली असते. वारंवार होणारी राजकीय परिवर्तने आणि बदलती जागतिक परिस्थिती, स्थलनामांचे रूढ आणि तद्देशीय उच्चार यांमुळे ॲटलासमधील काही नकाशे लवकरच जुने ठरतात त्यांत वारंवार बदल करणे आवश्यक होते. यूरोपातील उत्तम प्रकारच्या ॲटलासच्या तुलनेने अमेरिकन ॲटलास जरी थोडे निकृष्ट वाटले, तरी त्यांच्या सुधारलेल्या आवृत्ती वारंवार निघत असल्याने व त्यांत पुष्कळच स्थाने दाखविली जात असल्याने ते जास्त उपयोगी ठरतात.

या शतकात पस्तीसपेक्षा अधिक देशांतून राष्ट्रीय ॲटलास प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांत त्या त्या देशाच्या भौगोलिक, आर्थिक, भाषिक इ. परिस्थितिनिदर्शक अनेक नकाशे दिलेले असून त्यांना आधारभूत अशी आकडेवार माहितीही दिलेली असते.

भारतातील प्रमुख ॲटलासांमध्ये भारताचा राष्ट्रीय ॲटलास, हवामानाचा ॲटलास, कृषी ॲटलास, म्हैसूरचा ॲटलास इ. ॲटलासांचा समावेश होतो.

पहा : नकाशा मानचित्रकला.

वाघ, दि. मु.