पाँडिचेरी : द. भारतातील केंद्रशासित प्रदेश. पूर्वीच्या फ्रेंच वसाहतींचे पाँडिचेरीशिवाय कारिकल, यनम् व माहे हे भाग यात समाविष्ट आहेत. १ नोव्हेंबर १९५४ रोजी त्या वसाहती भारतात समाविष्ट करण्यात आल्या. एकूण क्षेत्रफळ ४८० चौ.किमी.पैकी पाँडिचेरी २९० चौ.किमी., कारिकल १६० चौ.किमी., यनम् २० चौ.किमी. व माहे १० चौ.किमी. एकूण लोकसंख्या ४,७१,७०७ (१९७१). पैकी पाँडिचेरी ३,४०,२४० कारिकल १,००,०४२ यनम् ८,२९१ माहे २३,१३४ असून या प्रदेशाची राजधानी पाँडिचेरी आहे. राजधानीची लोकसंख्या ९०,६३७ (१९७१) होती. या प्रदेशातील पहिले तीन विभाग भारताच्या पूर्व किनारपट्टीवर तमिळनाडू व आंध्र प्रदेश राज्यांत असून, माहे हा केरळ राज्यात पश्चिम किनाऱ्यावर आहे. पाँडिचेरी तमिळनाडू राज्याच्या दक्षिण अर्काट जिल्ह्यात कोरोमंडल किनाऱ्यावर, मद्रासच्या दक्षिणेस १५० किमी., तर कारिकल याच राज्याच्या तंजावर जिल्ह्यात, पाँडिचेरीच्या दक्षिणेस १५० किमी.वर आहे. यनम् आंध्र प्रदेश राज्याच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यात आणि माहे केरळ राज्याच्या कननोर जिल्ह्यात कालिकतच्या उत्तरेस सु. ६० किमी.वर आहे.

भूवर्णन : हा केंद्रशासित प्रदेश वेगवेगळ्या ठिकाणी विभागला गेल्याने त्यात प्राकृतिक भिन्नता मोठ्या प्रमाणात आढळते. पाँडिचेरी हा भाग सुपीक किनारी प्रदेशात वसला असून त्याच्या अंतर्भागात ‘रेड हिल्स’ हे पूर्व डोंगर आहेत. यांशिवाय या प्रदेशातून जिंजी (३० किमी. लांब), पंबयार (११.५ किमी.), गुडुवायार (१३.५ किमी.), मलतार (२५.५ किमी.) व पोन्नाइय्यार (१४ किमी.) इ. नद्या वाहतात. यांपैकी बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या जिंजी व पोन्नाइय्यार नद्या महत्त्वाच्या असून पोन्नाइय्यार नदी पाँडिचेरीच्या दक्षिण सरहद्दीवरून वाहते. कारिकल हा भाग तंज्ञावरच्या मैदानी प्रदेशात आणि कावेरीच्या त्रिभुज प्रदेशात असून नंदलार (लांबी सु. १५ किमी.) ही नदी भागाच्या उत्तर सीमेवरून वाहत जाऊन तमिळनाडू राज्यात बंगालच्या उपसागरात मिळते. याशिवाय नत्तार (१२.६ किमी.), वंजियार (१२ किमी.), नूलार (१४ किमी.), अरसलार (११.७ किमी.), थिरुमलई अरसनार (१०.६ किमी.), प्रावदयनार (५.६ किमी.) इ. नद्या आहेत. यांपैकी वंजियार, नूलार व अरसलार या नद्या कारिकल गावाजवळ एकत्र येऊन त्यांचा संयुक्त प्रवाह बंगालच्या उपसागरास मिळतो. यनम् हा भाग गोदावरी नदीच्या मुखाकडील मैदानी प्रदेशात असून गोदावरीचा ‘गौतमी गोदावरी’ हा फाटा याच्या दक्षिण भागातून सु. ८ किमी. वाहत जाऊन बंगालच्या उपसागरास मिळतो. याशिवाय कॉरिंगा हा सु. १५.२५ मी. रुंदीचा व ४ किमी. लांबीचा प्रवाह यनममधून वाहतो. माहे पश्चिम किनारपट्टीत डोंगराळ प्रदेशात वसलेला असून या भागात माहे ही ११४ मी. रुंद व १ किमी. लांबीची नदी आहे.

हवामानाच्या दृष्टीने या प्रदेशात फारशी वैशिष्ट्ये आढळत नाहीत. या प्रत्येक विभागाच्या शेजारील राज्यातील हवामान आणि त्या त्या विभागाचे हवामान जवळजवळ सारखेच आढळते. पाँडिचेरीचे सरासरी तपमान २१० ते २६० से.पर्यंत आढळते, तर पर्जन्यमान ११० सेंमी.पर्यंत असते. पूर्व किनाऱ्यावर एप्रिल-मे व नोव्हेंबरमध्ये होणारी वादळे या भागाचे बरेच नुकसान करतात. कारिकलचे तपमान मात्र थोडे जास्त आढळते. तेथील पर्जन्यमान ३०० सेंमी. आहे. हे सर्वच विभाग दाट शेती प्रदेशात असल्याने येथे नैसर्गिक वनसंपत्ती फारशी आढळत नाही. फक्त पाँडिचेरीमध्ये थोड्या प्रमाणात ताडवृक्ष आढळतात.

इतिहास : पाँडिचेरी नगरीला दीर्घकालीन इतिहास आहे. या नगरीच्या क्षेत्रात प्राचीन ‘वेदपुरी’ वसलेली असावी. अगस्त्य ऋषीचा तिच्याशी संबंध असावा, असे मानले जाते. ‘पुल्चेरी’ व ‘पुडुचेरी’ अशी हिची पारंपरिक नावे होत. पुडुचेरी (नवे गाव) या तमिळ नावाचा पाँडिचेरी हा फ्रेंच अपभ्रंश असावा. पेरिप्लस ऑफ द एरीथ्रीअन सी ह्या पुस्तकात उल्लेखिलेल्या कोरोमंडल किनाऱ्यावरील व्यापारी केंद्र ‘पोडुके’ म्हणजे ‘अरिकामेडू’ हे येथून जवळच (दक्षिणेस सु. साडेतीन किमी.) असल्याचा पुरावा मिळतो. अरिकामेडू हे इसवी सनाच्या सुरुवातीस मोठे व्यापारी केंद्र असल्याने पाँडिचेरीचा परिसर त्या काळात प्रसिद्ध असावा. इतिहासकाळात पल्लव (इ.स. ५०० ते ९००), चोल (१०००-१२५०), पांड्य (१२५०-१३३०), मदुराईचे मुसलमान (१३३० – ९५), विजयानगर (पंधरावे शतक) व जिंजीचे नायक घराणे (सोळावे शतक) इत्यादींचा अंमल या प्रदेशावर होता. यूरोपियनांच्या आगमनापूर्वी या प्रदेशाची सत्ता बिजापूरच्या आदिलशाहाकडे होती. सतराव्या शतकाच्या प्रारंभास डच लोकांनी पाँडिचेरीला पहिली बखार घातली पण ती लवकरच बंद पडली. विजापूरचा सुभेदार शेरखान लोदी याने हे ठाणे फ्रेंचांना देऊ केले. १६७४ साली फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीने पाँडिचेरी आपल्या ताब्यात घेतले परंतु येथे कायम स्वरूपाची वसाहत १६८३ मध्ये फ्रान्स्वा मारतँ याने स्थापन केली. फ्रेंचांनी या छोट्या गावाचे व्यापारी केंद्रात रूपांतर केले. शिवाजीच्या सुभेदाराने कर्नाटकच्या मोहिमेत पाँडिचेरी तात्पुरती जिंकली पण फ्रेंच व्यापाराचा परवाना चालू ठेवला. मराठे सरदार पैशासाठी फ्रेंचांना त्रास देत डचांशीही त्यांची स्पर्धा चालू होती. राजाराम जिंजीला आल्यावर पाँडिचेरी मराठे व मोगल यांच्या कैचीत सापडली. ती फ्रेंचांना फ्रान्स-हॉलंड तहानंतरच परत मिळाली (१६९७). मारतँ याने तटबंदी, शिबंदी व करवसुलीचे अधिकार मिळविले व त्याच्या कर्तबगारीने फ्रेंच वसाहत वाढीला लागली. तदनंतरचे कर्तबगार फ्रेंच गव्हर्नर लन्वार व द्यूमा यांच्या कारकीर्दीत अनुक्रमे माहे (१७२५), कारिकल (१७३९) ही ठाणी फ्रेंचांच्या ताब्यात आली. पाँडिचेरीवर चालून आलेल्या रघूजी भोसलेला द्यूमाने मुत्सद्दीपणे तोंड दिले व निजामाकडून सवलती मिळविल्या. १७४२ मध्ये गव्हर्नर जनरल म्हणून आलेल्या द्यूप्लेक्सच्या काळात फ्रेंच सत्तेचा परमोत्कर्ष झाला. त्याने इंग्लंड-फ्रान्समधील युद्धांचा आणि अर्काटची नबाबी व दख्खनही सुभेदारी यांसाठी चाललेल्या कलहांचा फायदा घेऊन, कवायती फौजांचा उपयोग करून नवा प्रदेश जिंकला. त्यांपैकी कारिकलजवळची गावे आणि १७५० मध्ये मिळविलेले यनम् (१७०६ पूर्वी हे गाव अस्तित्वात नव्हते) एवढीच काय ती शिल्लक राहिली. फ्रेंच सरकारला द्यूप्लेक्सचे धोरण न पटून त्याला परत बोलावले गेले. सप्तवार्षिक युद्ध सुरू होताच फ्रेंच यांच्यात वांदीवाश येथे लढाई होऊन फ्रेंचांचा पराभव झाला व क्लाइव्हने पाँडीचेरी आणि तर फ्रेंच वसाहती जिंकल्या. परंतु १७६३ च्या पॅरिस येथील तहान्वये त्या फ्रेंचांना परत मिळाल्या. यानंतर फ्रेंच सत्तेला उतरती कळा लागली ती कायमची. १७७८-८५ आणि १७९३-१८१६ या काळात फ्रान्स युद्धमान असल्याने इंग्रजांनी या वसाहती आपल्या ताब्यात ठेवल्या होत्या परंतु १८१६ – १७ मधील तहानुसार चंद्रनगरसकट या वसाहती फ्रेंचांना पुन्हा मिळाल्या व त्यानंतर त्यांनी इंग्रजांचे सार्वभौमत्व मान्य कले. पुढील दीडशे वर्षांत छापखाने, दवाखाने, शाहा, डाक-तारखाते, रस्ते, बगीचे, रेल्वे, सार्वजनिक बांधकामे, हवामानखाते अशा अनेक सुधारणांमुळे पाँडिचेरीचे आधुनिकीकरण झाले. १७०४ मध्ये पाँडिचेरीत कृष्णवर्णीय व श्वेतवर्णीय यांची वस्ती दुभंगणारा कालवा झाला, ते भाग सांधले गेले नाहीत. पहिल्या महायुद्धात फ्रेंचांच्या पूर्वेतील सत्तेला सुरुंग लाभला विशेषतः भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर फ्रेंचविरोधी भावना प्रबळ झाली आणि १ नोव्हेंबर १९५४ मध्ये या वसाहतीचे शासन भारताकडे सुपूर्द करण्यात आले व २८ मे १९५६ रोजी सामिलीकरण करार झाला.


राज्यव्यवस्था : पाँडिचेरीचा प्रदेश भारतात समाविष्ट केल्यानंतर त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा चौदाव्या घटनादुरुस्तीनुसार १६ ऑगस्ट १९६२ पासून देण्यात आला. राष्ट्रपतींनी नेमलेला नायब राज्यपाल हा शासनप्रमुख असून तो विधानसभेला जबाबदार असलेला मुख्यमंत्री आणि त्याचे मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्याने कारभार पाहतो. विधानसभेचे ३० सभासद असतात. लोकसभेवर एक प्रतिनिधी निवडून दिला जातो. या प्रदेशात अखिल भारतीय अण्णादुरै द्रविड, मुन्नेत्र कळघम, जनता पक्ष, द्रविड मुन्नेत्र, कळघम, काँग्रेस, काँग्रेस (इंदिरा), कम्युनिस्ट, मार्क्सवादी कम्युनिस्ट यांसारखे प्रमुख राजकीय पक्ष असून, २६ सप्टेंबर १९७८ पर्यंत विधानसभेतील त्यांचे बलाबल पुढीलप्रमाणे होते : अ.भा.अ.द्र.मु. क. -१४ जनता पक्ष-७, द्र.मु.क.-३, दोन्ही काँग्रेस व दोन्ही कम्युनिस्ट पक्ष यांचे प्रत्येकी १ आणि अपक्ष-२. १२ नोव्हेंबर १९७८ रोजी मुख्यमंत्री एस्. रामस्वामी (अ.भा.अ.द्र.मु.क.) यांचे मंत्रिमंडळ बरखास्त करण्यात येऊन या प्रदेशात राष्ट्रपती राजवट सुरू झाली. प्रशासनाच्या सोयीसाठी पाँडिचेरी या केंद्रशासित प्रदेशाची पाँडिचेरी, कारिकल, यनम् आणि माहे या चार जिल्ह्यांत विभागणी केली आहे. १९७४ पर्यंत या प्रदेशात एकूण ४ नगरपालिका व ११ ‘कम्यून’ पंचायती होत्या. प्रदेशातील एकूण खेड्यांची संख्या ३८८ आहे. पाँडिचेरीची न्यायव्यवस्था मद्रास येथील उच्च न्यायालय पाहते.

आर्थिक स्थिती : शेती हा प्रमुख व्यवसाय असून त्यामध्ये सु. ४५% लोक गुंतलेले आहेत. १९७२-७३ मध्ये ५२,००० हे. जमीन लागवडीखाली होती. पैकी ८३% जमिनीस विहिरी, नलिकाकूप इत्यादींद्वारा जलसिंचनाचा फायदा मिळतो. भात हे येथील प्रमुख पीक असून ज्वारी, बाजरी, रागी ही पिके अल्प प्रमाणात घेतली जातात. १९७४ – ७५ मध्ये ३४.५ हजार हे. क्षेत्र अन्नधान्याच्या पिकांखाली असून उत्पादन ८९.६ हजार टन होते.

प्रमुख पिकांखालील क्षेत्र व उत्पादन (१९७४ – ७५)

पीक

क्षेत्र

(हजार हेक्टर)

उत्पादन

(हजार टन)

भात

२६.८

८०.२

बाजरी

०.९

१.७

रागी

२.५

५.६

कडधान्ये

४.३

२.४

ऊस

१.९

२०५.५

कापूस

१.९

०.९४

भुईमूग

४.२

१०.५

या प्रदेशातील १,५२,६४६ पशूंपैकी ८९,६०२ गुरे १२,११० म्हशी ४१,७३१ शेळ्या आणि ७,०५६ मेंढ्या होत्या (१९७२).

पाँडिचेरी, कारिकल, माहे व यनम् या विभागांस त्यांच्या शेजारील राज्यांतून वीजपुरवठा होतो. १९७४ पर्यंत ३३३ गावांचे विद्युतीकरण झाले होते.

पाँडिचेरी व इतर विभाग हे समुद्रकिनारीच असल्याने मासेमारी हा तेथील महत्त्वाचा व्यवसाय बनला असून १९७५ – ७६ साली सागरी मासेमारीपासून १८.९२ हजार टन, तर अंतर्गत भागातून ०.५२ हजार टन माशांचे उत्पादन झाले. या प्रदेशात अवजड उद्योग फारसे विकसित झालेले नाहीत. १९७६ मध्ये ७४६ लघु-उद्योगांची नोंद झालेली आहे. त्यांमध्ये रसायने, अन्नपदार्थ प्रक्रिया, कातडी वस्तू, साखर, विद्युत् साहित्य, प्लॅस्टिके इ. लघु-उद्योगांचा समावेश होतो. या प्रदेशात पाच कापडगिरण्या असून त्यांपैकी तीन पाँडिचेरीत, एक कारिकल व एक माहे येथे आहे. त्यांमध्ये ९,०८८ मजूर होते (१९७६). ६,६३,७६,३८९ मी. कापड व १,१३,४३,५२१ किग्रॅ. सूत उत्पादन झाले. पाँडिचेरी येथील थट्टानचावडी औद्योगिक वसाहत आणि मानापेट व कोट्टूचेरी (कारिकल) येथील ग्रामीण औद्योगिक वसाहती उल्लेखनीय आहेत. या केंद्रशासित प्रदेशता १९७६ मध्ये एकूण १८,७०० कामगार व नोंदलेल्या ६८ औद्योगिक संघटना होत्या. पाँडिचेरी औद्योगिक विकास महामंडळ आणि तमिळनाडू औद्योगिक विकास महामंडळ या संस्थांमार्फत औद्योगिक विकासासाठी प्रयत्न केले जात आहेत.

या प्रदेशातील एकूण ३४६ किमी. लांबीच्या रस्त्यांपैकी डांबरी ३१३ किमी. व सिमेंटने ७.५ किमी. आहेत. २७ किमी. लांबीचे लोहमार्ग असून त्यांवर सात स्थानके आहेत. १९७५ साली स्वयंचलित व इतर वाहनांची संख्या सु. ७,१५५ होती. 


लोक व समाजजीवन : १९७१ च्या जनगणनेनुसार या प्रदेशाची एकूण लोकसंख्या ४,७१,७०७ असून लोकसंख्येची घनता दर चौ. किमी.स ९८३ आहे. येथील स्त्री-पुरुष प्रमाण ९९६ :१००० असे आहे. याच वर्षीच्या आकडेवारीनुसार धार्मिक दृष्ट्या लोकसंख्येची विभागणी पुढीलप्रमाणे होती : हिंदू – ४,००.७९३ मुस्लिम-२९,१४३ ख्रिस्ती-४१,२९६ जैन-२७३ व बाकीचे इतर धर्मीय होते.

या केंद्रशासित प्रदेशात तमिळ, फ्रेंच मलयाळम्, तेलुगू, इंग्रजी या भाषा रूढ आहेत. येथून १९७६ मध्ये एक पाक्षिक, ६ साप्ताहिक, ४३ अन्य नियतकालिके प्रसिद्ध होत होती. येथील साक्षरतेचे सर्वसाधारण प्रमाण ४६.०२% आहे. तथापि माहे विभागात साक्षरता सर्वाधिक म्हणजे ६७.३९% आहे. १९७६ मध्ये या प्रदेशात ५१ पूर्व-प्राथमिक शाळांमध्ये २,३३६ विद्यार्थी व ७२ शिक्षक २८८ पूर्व-माध्यमिक शाळांमध्ये ३२,९३४ विद्यार्थी व १,१०२ शिक्षक ६५ माध्यमिक शाळांमध्ये ४१,१५२ विद्यार्थी व १,५२१ शिक्षक होते. येथे ९ महाविद्यालये असून त्यांपैकी एक रेन (फ्रान्स) विद्यापीठाशी, चार मद्रास विद्यापीठाशी आणि दोन आंध्र विद्यापीठाशी संलग्न आहेत. सर्व महाविद्यालयांत मिळून एकूण ४,७४३ विद्यार्थी व ५४३ प्राध्यापक होते (१९७६). एक वैद्यकीय महाविद्यालय असून त्यात ५८३ विद्यार्थी व १५७ प्राध्यापक व एका विधी महाविद्यालयात १८५ विद्यार्थी व ६ प्राध्यापक होते. यांशिवाय तांत्रिक शिक्षणाच्या, शिक्षक प्रशिक्षणाच्या तसेच अंध, बहिरे व मुके यांच्या शाळाही आहेत. येथे ९ रुग्णालये, २१ दवाखाने, १२ प्राथमिक आरोग्य केद्रे, क्षयरोग व कुष्ठरोग निवारणकेंद्रे इत्यादींची आरोग्यसेवा उपलब्ध असून रुग्णालयातील खाटांची संख्या १,३६६ होती (१९७६).

सुप्रसिद्ध तत्त्वचिंतक रोगी अरविंद घोष यांच्यामुळे पाँडिचेरीला महत्त्व प्राप्त झाले. १९१० पासूनच अरविंदांचे पाँडिचेरी येथे वास्तव्य होते. त्यांचे निधनही तेथेच झाले (१९५०).

महत्त्वाची स्थळे : पाँडिचेरी (लोकसंख्या ९०,६३७-१९७१) हे राजधानीचे ठिकाण असून त्याची रचना फ्रेंच नगरांच्या धर्तीवर केलेली दिसून येते. हे बंदर असले, तरी मोठ्या सागरगामी बोटींना ते उपयुक्त नाही. समुद्रात दूरवर उभ्या असणाऱ्या बोटींपर्यंत पडावातूनच वाहतूक करावी लागते. शहरात योगी अरविंदांचा प्रसिद्ध आश्रम असून तो आंतरराष्ट्रीय शिक्षणकेंद्र बनला आहे. या आश्रमात विविध देशांतून साधक येतात. हा आश्रम म्हणजे एक छोटे नगर असून त्यात जीवनाश्यक वस्तू बनविण्याचे उद्योचग आहेत. याशिवाय शहरातील उच्च न्यायालयाची इमारत, शासकीय भवन, द्यूप्लेक्सचा पुतळा इ. उल्लेखनीय आहेत. पाँडिचेरीच्या उत्तरेस ८ किमी.वर ऑरोव्हिल नगरवसाहतीचा १५ वर्षे मुदतीचा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. या वसाहतीचे क्षेत्र २० चौ.किमी. असून ५०,००० लोकांच्या निवासाची त्यात सोय करण्यात येणार आहे. श्री. अरविंद सोसायटीमार्फत आणि भारत सरकार व यूनेस्को यांच्या मंजुरीनुसार हा प्रकल्प कार्यवाहीत आला. त्याची पायाभरणी २८ फ्रेब्रुवारी १९२८ रोजी झाली. या वेळी संगमरवरी कमलशिल्पात १२९ देशांतील माती ठेवण्यात आली. ऑरोव्हिल नगरवसाहतीचा अभिकल्प फ्रेंच वास्तुशास्त्रज्ञांनी तयार केला असून वेगवेगळ्या देशांतील स्त्री-पुरुष या प्रकल्पात विनामूल्य काम करीत आहेत. त्यांच्या भोजन-निवासाची सोय श्री अरविंद सोसायटीमार्फत होते. पाँडिचेरीशिवाय या विभागात विलियानूर येथील विजयानगरकालीन मंदिर त्याचप्रमाणे बाहौर, तिरुभुवन, मुदलियारपेट (४२,९३३), उल्गराई, अरिकामेडू इ. प्राचीन नगरांच्या परिसरातील पुरावशेष उल्लेखनीय आहेत. कारिकल (२६,०८०) हे बंदर व रेल्वेस्थानक असून येथून भात, तेलबिया, नारळ इत्यादींची निर्यात होते. यनम् (८,२९१) हे बंदर १७५० मध्ये व्यापारी ठाणे म्हणून वसविण्यात आले. याच्या परिसरात तांदूळ, आंबे इत्यादींचे उत्पन्न घेतले जाते. माहे (८,९७२) हे मलबारच्या किनाऱ्यावरील बंदर असून नारळीच्या बागांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. या शहराच्या परिसरातील जमीन अत्यंत सुपीक असून हवामान आरोग्यवर्धक आहे. (चित्रपत्र ७).

चित्रपत्र ७

गाडे, ना.स. चौंडे मा.ल. डिसूझा, आ.रे.