सिसिली :  भूमध्य समुद्रातील एक इतिहासप्रसिद्घ बेट व इटलीचा स्वायत्त विभाग. क्षेत्रफळ सु. २५,४६२ चौ.किमी. लोकसंख्या ५०,५१,०७५ (२०११). याचा विस्तार ३६° ३८’ उ. ते ३८° १८’ उ. अक्षांश व १२° २५’ पू. ते १५° ३९’ पू. रेखांश यांदरम्यान आहे. हे बेट इटलीच्या मुख्य भूमीवरील कॅलेब्रियापासून ३ किमी. व उत्तर आफ्रिकेतील ट्यूनिशियाच्या ईशान्येस १४५ किमी.वर आहे. याच्या पश्चिमेस व दक्षिणेस भूमध्य समुद्र, पूर्वेस आयोनियन समुद्र, उत्तरेस टिरीनियन समुद्र आहे. मेसिना सामुद्रधुनीमुळे हे इटलीच्या मुख्य भूमीपासून वेगळे झाले आहे. एगाडी, ऊस्तिका, लिपारी, पालेजीअन,पँतेलारीया या बेटांचा सिसिली विभागात समावेश होतो. पालेर्मो हे या विभागाचे मुख्यालय आहे. सिसिलीच्या साधारणपणे त्रिकोणी आकारामुळे यांस त्रिकांसीया, सिंकानीया म्हणत. या आकारामुळे केप बोएओ, फोरो पॉइंट, केप पासारो ही अनुक्रमे पश्चिम, ईशान्य व आग्नेय दिशांची मुख्य भूशिरे आहेत.

सिसिलीचा बहुतांश भाग हा डोंगराळ आहे. याची सरासरी उंची ४४० मी. असून बेटाचा सु. ६६% भाग सस.पासून ३०० मी. उंचीचा आहे. याच्या पूर्व किनाऱ्यावरील मौंट एटना हे या बेटावरील सर्वोच्च शिखर (उंची ३,३२३ मी.) असून तो जागृत ज्वालामुखी आहे. बेटावर उत्तर किनाऱ्यास समांतर अशा डोंगररांगा आहेत. यांमध्ये पूर्वेकडून पश्चिमेकडे पेलोरिटमी, नेब्रोडी किंवा कॅरोनिए, माडेनीआ या प्रमुख डोंगररांगा आहेत. त्यांची उंची काही ठिकाणी १,५०० मी. पेक्षा जास्त आहे. या रांगांच्या दक्षिणेस बेटाच्या मध्यभागी माँती एरेई पर्वत आहे. बेटाच्या आग्नेय भागात माँती ईब्ले हा पर्वत असून याची उंची ९०० मी. आहे. कातेन्या शहराच्या उत्तरेकडे पूर्व किनारी भाग तीव्र उताराचा आहे मात्र दक्षिणेकडे कातेन्या हे सुपीक मैदान आहे. या मैदानी भागात लेंतीनी सरोवर आहे. बेटाच्या दक्षिण किनारी भागात अरुंद मैदाने आहेत. तसेच पश्चिम भागात मेनफी व त्रापानी शहरांदरम्यान सखल प्रदेश आहे. सिमेनो, कंतारा, पलाटनी, सॅलेसो, अल्कॉनटरा, कॅसिबीए इ. या बेटावरील प्रमुख नद्या आहेत. सिसिली बेटाच्या सु. ४ टक्के भागात जंगल असून ते मुख्यत्वे पर्वतमय भागात आहे. जंगलात ओक, चेस्टनट, ऑलिव्ह, पाइन इ. वृक्ष आढळतात.

सिसिलीचे हवामान सौम्य उष्णकटिबंधीय, भूमध्यसागरी प्रकारचे आहे. मध्य इटली किंवा पो खोऱ्यातील उन्हाळ्यात असलेल्या तपमानापेक्षा सिसिली बेटावरील तपमान कमी असते. हिवाळ्यातील तपमानही जास्त थंड नसते. पूर्व किनाऱ्यावरील ताओरमीना या थंड हवेच्या ठिकाणी हिवाळ्यातील तपमान १३ से. असते. उन्हाळ्यात बेटावरील तपमान २७ से. असते मात्र कधीकधी आफ्रिकेमधून वाहत येणाऱ्या सिरोको वाऱ्यांमुळे येथील हवामानावर परिणाम होतो. हे वारे कोरडे, उष्ण व धुलीकणयुक्त असतात. या वाऱ्यांमुळे येथील तपमान ३८ से. पर्यंत वाढते. वाऱ्यामुळे तपमानातील होणारा बदल मानवी जीवनास त्रासदायक ठरतो. पावसाचे प्रमाण कमी आहे. वार्षिक पाऊस मैदानी भागात ४० ते ६० सेंमी. व पर्वतमय भागात १२० ते १४० सेंमी. पडतो.

सिसिलीतील प्रमुख शहरे रस्ते व लोहमार्गांनी जोडलेली आहेत. तसेच इटलीच्या मुख्य भागाशी हे बेट लोहमार्गाने (ट्रेनफेरी) जोडलेले आहे. पालेर्मो, मेसीना, कातेन्या, सिराक्यूस, मारसाला, त्रापानी ही प्रमुख बंदरे आहेत.

प्रागैतिहासिक काळात येथे मानवी वस्ती असल्याचे पुरावे उपलब्ध झाले असून इ. स. पू. अकराव्या शतकात येथे एल्मी, सिकन्स (सिकानी) लोक राहत होते, असे ऐतिहासिक नोंदींवरुन दिसून येते. सिकन्स लोकांना सिसेल्स (सिकुली) लोकांनी येथून हुसकावून लावले. सिसेल्स लोकांच्या नावावरुनच या बेटाला सिसिली हा नाव पडले असावे. फिनिशियनांच्या आगमनापूर्वी सिसिली हा मायसीनी संस्कृतीचा भाग होता. इ. स. पू. ७२४ मध्ये ग्रीकांनी येथे वसाहत केली. त्यांनी मेसीना, सिराक्यूस, जेला ही शहरे वसविली परंतु फिनिशियनांनी ग्रीकांना बेटाच्या पश्चिम भागात हाकलले. ग्रीकांच्या काळात सिसिलीची सांस्कृतिक भरभराट झाली व सिराक्यूस हे प्रमुख शहर बनले. नैर्ऋत्य भागात इ. स. पू. ६९१ मध्ये जेला शहर वसविण्यात आले परंतु फिनिशियनांनी ग्रीकांना परत बेटाच्या पश्चिम भागात हुसकावून लावले. ग्रीकांनी त्यानंतरच्या काळात अन्यत्र वसाहती स्थापन करण्याचा प्रयत्न केला परंतु कार्थेजियनांनी त्यांना रोखले. राजकीयदृष्ट्या अथेन्सचा ऱ्हास झाल्यानंतर ग्रीकांचा सिसिलीवरील अंमल नष्ट झाला.

कार्थेजियनांनी पालेर्मोची हानी करुन सिसिली बेटाचा कबजा घेतला. सिसिलीतील मेसीना व सिराक्यूस या नगरराज्यांतील वादातून पहिले प्यूनिक युद्घ झाले. यामध्ये रोमने कार्थेजियनांना हाकलून सिसिलीचा पूर्ण ताबा घेतला. रोमन साम्राज्याच्या अस्तानंतर (४७६) ऑस्ट्रोगॉथांनी सिसिलीवर अंमल प्रस्थापित केला. त्यानंतर सहाव्या शतकात सिसिली बायझंटिन साम्राज्याच्या अंमलाखाली आले. शार्लमेनचा पराभव करुन (८४३) अरबांनी सिसिली पादाक्रांत केले. अरब साम्राज्यात सिसिलीतील पालेर्मो हे सांस्कृतिक केंद्र म्हणून प्रसिद्घीस आले. नॉर्मनांनी इ. स. १०७२ मध्ये पालेर्मो जिंकले. त्यानंतर पवित्र रोमन सम्राटाचा मुलगा होहेनस्टाफेन फ्रेड्रिक हा सिसिलीचा राजा झाला (११९८). इ. स. १२२० मध्ये पोपने त्यास पवित्र रोमन साम्राज्याचा सम्राट बनविले.

फ्रेड्रिक याच्या मृत्यूनंतर (१२५०) सिसिलीच्या विकासास खीळ बसली. फ्रान्सचा राजा नववा लूई याचा भाऊ ॲग्रो चार्ल्स हा येथील राजा झाला. दरम्यान १२६६ मध्ये दुसरा फ्रेड्रिक याचा मुलगा मॅनफ्रेड याचा युद्घात मृत्यू झाल्यानंतर पहिला चार्ल्स याने सिसिलीचा ताबा घेतला. फ्रेंचांच्या शासनाबद्दल सिसिलीत समाधान नव्हते. त्यांनी सिसिलीची राजधानी नेपल्सला हलविली. इ. स. १३०२ मध्ये ॲग्नेशियनांना सिसिली पुन्हा मिळविण्यात यश आले. पंधराव्या शतकाचा बराच काळ वगळता सिसिली व नेपल्स ही १५०४ पर्यंत दोन स्वतंत्र राज्ये होती. त्यानंतर सु. दोनशे वर्षे इटली यूरोपियनांची रणभूमी झाली.

अठराव्या शतकांत फ्रान्सच्या बूर्बीँ घराण्याची सत्ता सिसिलीवर प्रस्थापित झाली. पहिल्या नेपोलियनची अल्पकाळ सत्ता वगळता इटलीत एकीकरणाचे वारे वाहू लागले आणि स्वातंत्र्यासाठी चळवळी झाल्या. त्यांचा सेनानी जूझेप्पे गॅरिबॉल्डी याने १८६० मध्ये १,००० स्वयंसेवकांच्या मदतीने फ्रेंच सैन्याचा पराभव केला व सिसिली जिंकले. १८६१ मध्ये इटली स्वतंत्र देश जाहीर झाल्यानंतर सिसिली त्यामध्ये सामील झाले.


 दुसऱ्या महायुद्घात मित्रराष्ट्रांनी सिसिलीचा ताबा घेतला. नव्या संविधानानुसार सिसिली हे इटलीचा स्वतंत्र सार्वभौम प्रांत झाले आहे (डिसेंबर, १९४७).

सिसिलीमध्ये लोकसंख्येचे प्रमाण शहरी भागात जास्त आहे. पालेर्मो, मेसीना, सिराक्यूस, कातेन्या या शहरांची लोकसंख्या १,००,००० पेक्षा जास्त आहे. पालेर्मो, कातेन्या, मेसीना येथे विद्यापीठे आहेत. फुटबॉल हा येथील लोकांचा आवडता खेळ आहे. जत्रांतून बोलक्या बाहुल्यांचा खेळ (पपेट शो) हे आकर्षण असते. आरोग्यसुविधा पुरविणे ही पूर्णतः प्रादेशिक प्रशासनाची जबाबदारी आहे.

इटलीच्या साहित्य व कलाक्षेत्रात सिसिलीचे योगदान महत्त्वाचे आहे. तेराव्या शतकात सम्राट दुसरा फ्रेड्रिक याच्या कारकीर्दीत इटलीच्या काव्यनिर्मितीत सिसिलीचा महत्त्वाचा भाग आहे. बायझंटिन-नॉर्मन कलेत येथील भव्य भित्तिचित्रांचा अंतर्भाव आहे. ललित कलेसाठी पालेर्मोतील ऑपेरा हाउस व कातेन्यातील बेलिली थिएटर प्रसिद्घ आहेत. साहित्यक्षेत्रात विसाव्या शतकातील येथील कादंबरीकार जोव्हान्नी व्हेर्गा, नाटककार लूईजी पीरांदेल्लो यांचे योगदान महत्त्वाचे आहे. १९५९ मध्ये सिसिलीचा कवी साल्व्हातोरे क्वाझीमोदो हा साहित्याच्या नोबेल पारितोषिकाचा मानकरी ठरला आहे.

शेती हा येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे. येथे गहू, बार्ली, मका, ऊस, कापूस, लिंबूवर्गीय फळे, बदाम, द्राक्षे इ. पिके घेतली जातात. लिंबूवर्गीय फळांच्या उत्पादनात सिसिलीचा इटलीत प्रथम क्रमांक आहे. हवामानातील बदल व पावसाचे कमी प्रमाण यांमुळे शेतीचे दर एकरी उत्पादन कमी आहे. समुद्रकिनारी भागातील मासेमारीमध्ये ट्यूना व सार्डीन या माशांचे प्रमाण जास्त असते. सिसिलीमध्ये माफियांचे (गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक) वास्तव्य असल्यामुळे इटलीच्या मुख्य भूमीपेक्षा येथील लोकजीवन वेगळे आहे. मध्ययुगापासून अस्तित्वात असलेल्या येथील माफियांनी गुन्हेगारी वर्तन ठेवलेले आहे. गुंडगिरी, दहशत इ. मार्गांनी ते आपला कार्यभाग साधतात. मादक पदार्थांचा चोरटा व्यापार करणे हे त्यांचे उद्दिष्ट असते. त्रापानी हे शहर या व्यवसायाची राजधानी समजली जाते. पालेर्मो शहर माफियांच्या कृतींनी त्रस्त झाले होते. १९५६ मध्ये येथील अन्नपदार्थांचा व्यापार ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या विविध गटांमध्ये दंगे झाले होते.

दुसऱ्या महायुद्घापूर्वी येथील औद्योगिकीकरणात प्रामुख्याने खाणकाम व अन्नप्रक्रिया यांचा समावेश होता. दुसऱ्या महायुद्घानंतर, विशेषतः १९५७ नंतर, येथील औद्योगिकीकरणात चांगला बदल झालेला आहे. इटलीतील महत्त्वाच्या खनिज खाणी सिसिली बेटावर आहेत. येथे जिप्सम, खनिज तेल, नैसर्गिक वायू इ. खनिजे आढळतात. रागूझा व जेलाच्या जवळ समुद्रात खनिज तेलसाठे आहेत. गूस्त येथे पहिला खनिज तेल शुद्घीकरण कारखाना उभारण्यात आला आहे. हे ठिकाण रागूझा खनिज तेल क्षेत्राशी नळाने जोडण्यात आले आहे. बेटावर नैसर्गिक वायू, गंधक यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. येथे खनिज तेल शुद्घीकरण व तदानुषंगिक उद्योग, सिमेंट, खते, अन्नप्रक्रिया, मीठ, मद्य तयार करणे, कापड उद्योग, जहाजबांधणी इ. प्रमुख उद्योग आहेत. खनिज तेल व नैसर्गिक वायूच्या साठ्यांच्या शोधामुळे सिसिलीच्या औद्योगिक व आर्थिक बाबींवर चांगला परिणाम झाला आहे.

पालेर्मोतील अरब नॉर्मनांनी बांधलेले राजवाडे, चर्च, कॅथीड्रल आग्रिजेंतो येथील डॉरिकचे स्मारक सिराक्यूसचे ग्रीक थिएटर, मंदिरे, पुतळे सेंगेस्टामधील ग्रीक मंदिरे ताओरमीना या थंड हवेच्या ठिकाणाचे निसर्गसौंदर्य, रोमन थिएटर पिएझा आर्मेनिया येथील भव्य राजवाडा इ. पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत.

डिसूझा, आ. रे. गाडे, ना. स.