गृध्रकूट : प्राचीन मगध राजधानी गिरिव्रज (पर्वतांनी वेढलेले) किंवा राजगृह याच्या सभोवतीच्या पाच टेकड्यांपैकी एक. राजगृह हे गिरिदी, वसुमती, बृहद्रथपूर इ. अनेक नावांनी प्राचीन साहित्यात प्रसिद्ध आहे. हेच सध्याचे राजगिर. महाभारतकाळात ही जरासंधाची, तर इ. स. पू. सु. सहाव्या शतकात ही बिंबीसाराची राजधानी होती. गृध्रकूट पर्वत म्हणजे मोंघीर जिल्ह्यातील जमुई उपविभागातील सध्याची गिधौर टेकडी, असेही काहींचे मत आहे. राजगिरपासून सु. १० किमी. पूर्वेस आणि गयेपासून ५८ किमी. उत्तरेस पंचना नदीकाठी हे स्थान आहे, असे काही विद्वानांचे मत आहे. पाच टेकड्यांपैकी या टेकडीचा आकार पूर्वी गिधाडासारखा दिसे म्हणूनच त्याला गृध्रकूट हे नाव पडले असावे. हल्ली याला शैलगिरी असेही म्हणतात.

गृध्रकूट हे स्थान गौतम बुद्धाला अतिशय प्रिय होते. पावसाळ्यात तो राजगृही येई, तेव्हा त्याचा मुक्काम गृध्रकूटावरील गुहेतच असे. यूआन च्वांगने या गुहेचा उल्लेख ‘इंदसिला गुहा’ असा केला आहे, गौतम बुद्धाने येथे अनेक धर्मप्रवचने केल्याचा आणि पहिली बौद्ध धर्म परिषद येथे भरल्याचाही उल्लेख आढळतो. तीर्थंकर महावीर हाही येथे येऊन गेल्याचा उल्लेख सापडतो. अधिक मासात येथे हिंदूंची मोठी यात्रा भरते. त्यामुळे बौद्ध, जैन व हिंदू धर्मीयांचे हे एक तीर्थक्षेत्रच आहे. येथे काही गरम पाण्याचे झरे व कुंडे आहेत. येथील एका गुहेत बुद्धाच्या सात व मैत्रेयाची एक अशा आठ मूर्ती सापडल्या असून, सध्या त्या नालंदा वस्तुसंग्रहालयात ठेवलेल्या आहेत. दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकातील बौद्ध शिल्पांत गृध्रकूटावरील गुहांचे चित्र खोदलेले आढळते. सध्या येथे दोन गुहा आणि काही बौद्ध मंदिरेही सापडली आहेत. 

कांबळे, य. रा.