जजिआंग : चीनच्या आग्नेय भागातील प्रांत. क्षेत्रफळ सु.१,०३,२०० चौ. किमी. लोकसंख्या सु. ३,१०,००,००० (१९७१). राजधानी हांगजो. याच्या दक्षिणेस फूक्येन, नैर्ऋत्येस जिआंगसी, पश्चिमेस, वायव्येस व उत्तरेस जिआंगसू आणि पूर्वेस चिनी समुद्र असून चूशान द्वीपसमूहाचा व इतर अनेक बेटांचा समावेश यामध्ये होतो. जजिआंगचा किनारा दंतुर असला, तरी पिछाडीचा प्रदेश डोंगराळ असल्यामुळे निंगपो, वेनजो अशी थोडीच बंदरे या प्रांताला लाभली आहेत. ज्येनडांग अथवा फुचुन, वू, युंग व लिंग ह्या प्रांतातील प्रमुख नद्या असून प्रांतात इतरही लहान लहान नद्या पुष्कळ आहेत. जजिआंग हा सुपीक प्रांत आहे. विशेषतः उत्तर भागातील यांगत्सीचा त्रिभुज प्रदेश खूपच सुपीक आहे. तांदूळ, गहू, वाटाणा, कापूस, तंबाखू, ज्यूट इत्यादींचे पीक प्रांतात होते व सर्वत्र असलेल्या तुतीच्या लागवडीमुळे रेशीम पुष्कळ मिळते. डोंगराच्या उतरणीवर चहा (विशेषतः लुंगचिंग हा विख्यात हिरवा चहा), टणक लाकडाचे वृक्ष व बांबू यांची बरीच लागवड होते. जजिआंग मासळी, मीठ आणि अन्य सागरसंपत्तीच्या बाबतीतही समृद्ध आहे. कोळसा, तुरटी, फ्लुओराइट इ. खनिजेही थोडीफार येथे सापडतात. विविध कुटिरोद्योग व लहान लहान कारखाने प्रांतभर विखुरले असून रेशमी, सुती व तागाचे कापड, सिगारेट, चिनी मातीची भांडी, बांबूच्या लगद्याचा उत्कृष्ट हातकागद इत्यादींचे उत्पादन होते. फुचुन नदीच्या वरच्या भागावरील आयोजित जलविद्युत् प्रकल्प पूर्ण झाल्यावर ५,८०,००० किवॉ. वीज उपलब्ध होऊन या प्रदेशाच्या औद्योगिक विकासास गती येईल.

प्रांतातील नद्या जलवाहतुकीस योग्य असल्याने व शांघाय-हांगजो-नानचांग लोहमार्गही प्रांतातून जात असल्याने दळणवळणाच्या सोयी समाधानकारक आहेत.

प्राचीन काळी जजिआंगचा वू राज्यातील हा प्रांत इ. स. पू. तिसऱ्या शतकापासून चीनच्या अंमलाखाली आहे. बाराव्या-तेराव्या शतकांत सुंग वंशाच्या अंमलात प्रांताची बरीच भरभराट झाली व मिंग वंशाच्या कारकीर्दीत जजिआंग नाव रूढ झाले. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात येथे मांचू राजवट होती. ताइपिंग बंडाळीच्या काळात जजिआंग बराच उद्‍ध्वस्त झाला.१९४९ मध्ये कम्युनिस्ट अंमल येथे चालू झाला.

ओक, द. ह.