मध्ययुगीन सुंदरीचा शय्यामहाल, डिझ्नी लँड.डिझ्नी लॅंड : ही अद्‌भूत नगरी अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील ॲनाहीम येथे असून ती लॉस अँजेल्‌सच्या आग्नेयीस सु. ३५ किमी.वर आहे. १९५५ साली सुप्रसिद्ध व्यंगचित्रपट निर्माता वॉल्ट डिझ्नी याने ही नगरी उभविली. या नगरीचे क्षेत्रफळ ६४·७५ हे. (१६० एकर) असून तेथे अद्‌भुत व साहसी कथातून वर्णिलेली कल्पित स्थळे व व्यक्ती साकार करण्यात आल्या आहेत. या नगरीचे प्रमुख विभाग पुढीलप्रमाणे आहेत : ‘उद्याच्या नगरी’त भविष्यातील जगाची झलक दाखविलेली आहे. एका रुळावर चालणारी आगगाडी, अंतराळवीर, अग्निबाण, जागतिक वेळा एकदम दाखविणारे घड्याळ, अत्याधुनिक इमारती वगैरेंच्या प्रतिकृती आहेत. दुसऱ्या अद्‌भुतरम्य नगरीत परीकथा व जादूकथा यांवर आधारलेली दृश्ये आहेत. झोपी गेलेल्या राजकन्येच्या राजवाड्याची मोठी प्रतिकृती, यूरोपातील आल्प्स पर्वताच्या मॅटरहॉर्न पर्वतशिखराचा सु. ४५ मी. (१४६ फूट) उंचीचा नमुना आणि त्या शिखरावर जाणारी मुलांची आगगाडी इ. प्रमुख आकर्षणे या विभागात आहेत. ‘साहस नगरी’तील हिंस्र पशूंची वस्ती असलेल्या घनदाट जंगलातील नदीतून बोटींची सफर, समुद्रातील पाणबुडीचा प्रवास आणि यूरोपीय मुलांना आकर्षक वाटणाऱ्या पौर्वात्य जगातील प्रतिकृतीही डिझ्नीलँडमध्ये आहेत. ‘सीमाप्रांत नगरी’त पश्चिम अमेरिकेतील धाडसी घोडेस्वारांच्या आणि इंडियन वीरांच्या लढायांची दृश्ये उभी केलेली आहेत. वाळवंटातून आणि रंगीबेरंगी प्रकाशाच्या गुहांतून संचार करण्याची सोयही तेथे आहे. तसेच ‘मार्क ट्‌वेन’ या जुन्या तऱ्हेच्या बोटीतून व नुसत्या तराफ्यावरून जलप्रवास करण्याची संधीही तेथे उपलब्ध आहे. 

या नगरीत विश्रामधामे आणि निरनिराळी अठरा उपहारगृहे आहेत. येथे येण्यासाठी लॉस अँजेल्सहून व दक्षिण कॅलिफोर्नियातील इतर शहरांपासून बस, आगगाडी, विमाने इ. उपलब्ध आहेत. 

चौथाई, विनया