सिंदखेड राजा : बुलढाणा जिल्ह्यातील एक इतिहासप्रसिद्घ गाव. लोकसंख्या १३,९४० (२००१). ते मेहकरच्या नैर्ऋत्येस सु. ५२ किमी. आणि देऊळगाव राजाच्या आग्नेयीस सु. १४ किमी.वर वसले आहे. या लखुजी जाधव यांच्या प्रासादाचे प्रवेशद्वारगावाच्या नावाविषयी काही दंतकथा असून त्यांपैकी सिंधुरामनामक राजाने ते वसविले, म्हणून त्याचा अपभ्रंश होऊन ते सिंदखेड झाले असावे तर काहींच्या मते हे सिद्घक्षेत्र म्हणजे संतांची भूमी वा खेडे होते. सर्वसामान्यतः या गावाच्या परिसरात सिंदी वृक्षांची विपुलता आहे. त्यावरुन सिंदखेड हे नाव रुढ झाले असावे.

या गावाचा प्राचीन इतिहास ज्ञात नाही तथापि मध्यकाळात बहमनींची सत्ता यावर होती. अलाउद्दीन अहमद ( कार. १४३६– ५८) या बहमनी सुलतानाने तेथील काजीस हा परगणा जहागीर म्हणून १४५० मध्ये दिला. या घराण्याने सु. १०० वर्षे जहागीर उपभोगली. नंतर या परगण्याची सर्व सूत्रे जाधव घराण्याकडे आली. करौलीच्या राजपूत वंशाशी त्यांचे धागेदोरे असल्याचे ते मानीत, तर काहींच्या मते ते देवगिरीच्या यादव वंशाचे असून यादवचे जाधव झाले असावेत. या घराण्यातील लखुजी (लुखजी ) जाधव हे एक पराक्रमी सरदार होत. त्यांची कन्या जिजाबाई हिचे हे जन्मस्थान असून, तत्कालीन शूर सरदार शहाजीराजे त्यांचे जावई होत. छ. शिवाजींचे लखुजी हे मातुल घराण्याकडून आजोबा होत. त्यांनी १६१४ ते १६२९ दरम्यान कधी मोगल, तर कधी निजामशाही यांची अदलून बदलून चाकरी केली आणि अनेक लढाया जिंकल्या. निजामशाहीत १०,००० घोडेस्वारांच्या पलटणीचे ते सेनापती होते, तर मोगलांकडे त्यांना १५,००० घोडदळाची मनसबदारी दिली होती. मलिक अंबरच्या मृत्यूनंतर निजामशाहीत फतेखान हा त्याचा मुलगा कारभारी झाला परंतु हमीदखान या सरदाराच्या चिथावणीवरुन निजामशाहाने त्यास तुरुंगात टाकले व हमीदखानास कारभारी केले. त्यामुळे इतर सरदारांना धास्ती वाटू लागली. त्यांपैकी लखुजी एक होते. त्यांनी मोगलांकडे जाण्याचा बेत आखला. ही बातमी निजामशाहास कळताच त्याने मुजरा करण्यासाठी त्यांस दौलताबादच्या किल्ल्यातील दरबारात बोलविले आणि अचानक झालेल्या हल्ल्यात लखुजी व त्यांचे राघव, यशवंत व अचलोजी हे तीन मुलगे ठार झाले (१५ जुलै १६२९). तेव्हा शहाजीराजांनी निजामशाही तर सोडलीच, पण त्याचा सूड घेतला. लखुजींच्या खुनाच्या वेळी त्यांची पत्नी गिरजाई, भाऊ जगदेवराव आणि एक मुलगा बहादुरजी छावणीत होते. ते तत्काळ सिंदखेडला गेले. नंतर जाधवराव मंडळींनी मोगलांकडे मनसबदाऱ्या पत्करल्या. दक्षिण हिंदुस्थानात हैदराबाद येथील निजामाकडे सत्ता गेल्यानंतर (१७२४) जाधवरावांची जहागीर निजामशाहाच्या अंमलाखाली आली. ती पुढे शिंद्यांनी जिंकून सु. ६० वर्षे त्यावर आधिपत्य गाजविले. पुढे १८०३ मध्ये निजामाने त्याचे स्वामित्व पुन्हा मिळवून जाधव घराण्यातील वंशजास त्याचे हक्क दिले तथापि मोहन सिंग, सदलाम खान, गाझी खान आदींनी शहरात लूटमार केली. इंग्रजांनी ती थांबविली मात्र जाधवांच्या सैन्यातील अरब शिपायांनी बंड करुन (१८५१) जहागिरीची सूत्रे आपल्या हाती घेतली. इंग्रजांनी हैदराबादच्या निजामास मांडलिक केल्यानंतर इथे त्यांचा अंमल प्रस्थापित झाला. लखुजी जाधव व त्यांचे वंशज यांच्या काळात बांधलेल्या वास्तूंचे–विशेषतः राजप्रासाद, किल्ला, तलाव, स्मारके यांचे – अवशेष अद्यापि अवशिष्ट आहेत.

या अवशेषांपैकी जाधव कुटुंबियांनी सु. १६५० मध्ये अर्धवट बांधलेल्या काळ्या दगडातील चौरस किल्ल्याच्या भिंती व चार बाजूंचे भव्य वर्तुळाकार बुरुज अद्यापि अवशिष्ट आहेत. याशिवाय शहरातील नैर्ऋत्य भागातील हेमाडपंती नीलकंठेश्वर मंदिर सुस्थितीत असून, त्यावर एक पुसट शिलालेख आहे. पश्चिमेस दोन तलाव असून, त्यांपैकी एक मोती तलाव सुस्थितीत आहे. लखुजींचा राजप्रासाद, रंगमहाल या वास्तू दुर्लक्षिल्यामुळे त्यांची पडझड झाली आहे मात्र लखुजींचे स्मारक व समाधिस्थान प्रेक्षणीय असून, त्याच्या प्रवेशद्वारावर हत्तीवर स्वार झालेल्या दोन सिंहाच्या मूर्ती आकर्षक आहेत. प्रवेशद्वाराच्या उजवीकडे एक शिलालेख आहे. तो भग्न स्थितीत असून उर्वरित मजकुरात जाधव घराण्याची वंशावळ आहे. या स्मारकाच्या बाजूला एक छोटे रामेश्वराचे लखुजींनी बांधलेले मंदिर आहे. याशिवाय जगदेवरावांनी बांधलेला एक मोठा तलाव आहे.

पशुपालन व शेती हे येथील लोकांचे प्रमुख उद्योग असून, घोंगड्या बनविण्याचाही येथे मोठ्या प्रमाणावर व्यवसाय चालतो.

सोसे, आतिश सुरेश