मेत्तूर : तमिळनाडू राज्याच्या सेलम जिल्ह्यातील एक बहूद्देशीय प्रकल्प व याच नावाचे औद्योगिक नगर. लोकसंख्या ४६,०१४ (१९८१). मेत्तूर हे सेलमच्या वायव्येस ४२ किमी. अंतरावर कावेरी नदीकाठावर वसलेले असून प्रारंभी हे रोगट हवामानाचे एक छोटेसे खेडेगाव होते. त्याच्या जवळच कावेरी नदीवर बांधण्यात आलेल्या मेत्तूर धरणाच्या योगे पाणी व जलविद्युत् उपलब्ध होऊन एक औद्योगिक केंद्र व पर्यटन स्थळ म्हणून या खेड्याचा विकास झाला आहे.

मेत्तूर धरणकावेरी नदीखोरे व त्रिभुज प्रदेशातील शेतीचा विकास, पावसाळ्यातील नदीपुराचे नियंत्रण व उन्हाळ्यात पाणीपुरवठा ही उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टीने प्रथम १८३४ मध्ये सर आर्थर कॉटन या प्रसिद्ध स्थापत्य अभियंत्याने कावेरी नदीखोऱ्याची प्राथमिक पाहणी करून कावेरी नदीवर धरण बांधण्याची योजना तयार केली. ‘कावेरी-प्रॉजेक्ट’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या योजनेत मेत्तूरच्या वरच्या बाजूस पालामली व सीतामलई टेकड्यांदरम्यानच्या दरीत बांध घालण्याची योजना होती. या धरणामुळे सु. २२६·५ कोटी घ. मी. एवढा पाण्याचा साठा होणार होता परंतु या योजनेला शेजारील संस्थानाकडून विरोध झाला. त्यानंतर १९१० मध्ये कर्नल एलिस यांनी २२६·५ कोटी घ. मी. जलधारणक्षमतेच्या सु. १,३१,३५८ हे. क्षेत्राला पाणीपुरवठा करू शकणाऱ्या आणि ३·८५ कोटी रू. खर्चाच्या प्रकल्पाची योजना तयार केली. यासंबंधी शेजारील म्हैसूर संस्थानाशी पाणीवाटप व इतर बाबींची चर्चा करण्यात आली. त्यानंतर १९२५ मध्ये धरणाची जागा निश्चित करण्यासाठी कावेरी नदीखोऱ्याचे सखोल सर्वेक्षण करण्यात आले आणि भवानी, नेरिंजितपेट, नवापेट, कावेरीपुरम् व संपल्ली अशा धरणाच्या पाच संकल्पित ठिकाणांपैकी जुलै १९२५ मध्ये संपल्ली येथे धरणाच्या कामास सुरुवात झाली. १९२८ मध्ये प्रकल्पाचा संकल्पित खर्च ७·३७ कोटी रुपायांपर्यत वाढविण्या आला व धरणाची जागा या मूळ जागेपासून उत्तरेस १·५ किमी. वर हलविण्यात आली. तसेच येथे जलविद्युत्‌निर्मितीही करण्याचे ठरविण्यात आले. या नवीन योजनेमुळे जलसिंचनाखाली येणाऱ्या क्षेत्रातही वाढ होणार होती. त्याप्रमाणे धरणाचे बांधकाम सुरू होऊन २१ ऑगस्ट १९३४ रोजी ते पूर्ण करण्यात आले. या धरणाची लांबी १,८०७ मी., उंची ५४ मी. असून धरणातील पाण्याची कमाल पातळी ३६·५७ मी. राहू शकते. धरणाच्या जलाशयाखालील क्षेत्र १५५ चौ. किमी. असून त्यात सु. २६४·६ कोटी घ. मी. एवढा पाण्याचा साठा होऊ शकतो. धरणापासून वर ५३ किमी. पर्यंत म्हणजेच २१ मी. उंचीच्या होगेनकल धबधब्यापर्यंत पाण्याचा फुगवटा गेलेला आहे. या धरणापासून काढलेल्या कालव्यांनी सु. ५,१८,००० हे. क्षेत्र ओलिताखाली आणण्यात आले आहे. येथे २०० मेवॉ. क्षमतेचे जलविद्युत्‌निर्मिती केंद्र उभारण्यात आलेले आहे.

मेत्तूर धरणामुळे उपलब्ध झालेले पुरेसे पाणी व विद्युत्‌शक्ती यांमुळे मेत्तूर येथे वेगवेगळे कारखाने सुरू होऊन ते एक प्रमुख औद्योगिक केंद्र बनले. जस्तविलेपन, पितळी पत्रे तयार करणे, ॲल्युमिनियम, कागद, रसायने, सिमेंट, खते, कापड, साखर इ. वेगवेगळे उद्योगधंदे येथे स्थापन झालेले आहेत. रसायनउद्योगामधून कॉस्टिक सोडा, क्लोरीन वायू, द्रवरूप क्लोरीन, विरंजक चूर्ण, हायड्रोक्लोरिक अम्ल, साबण इ. उत्पादने घेतली जातात. जिल्ह्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यालय मेत्तूर येथे आहे. जवळच १·५ किमी. अंतरावर मेत्तूर लोहमार्गास्थानक आहे. शासनाने तीन वर्षे मुदतीसाठी नेमलेल्या मेत्तूर वसाहत समितीद्वारे येथील कारभार पाहिला जातो. मेत्तूरच्या परिसरात असलेल्या हिरव्यागार टेकड्या, मेत्तूर धरण व त्यामुळे निर्माण झालेला विस्तीर्ण स्टॅन्ली जलाशय, जलविद्युत्‌निर्मिती केंद्र, उद्याने, वेगवेगळे कारखाने इत्यादीमुळे मेत्तूर व त्याचा परिसर निसर्गसुंदर बनला असून पर्यटनाच्या दृष्टीने त्याला महत्त्व प्राप्त झालेले आहे.

चौधरी, वसंत