महाकोसल : भारतातील एक प्राचीन जनपद. अनेक पुराणग्रंथ व शिलालेख यांवरून ते कोसल, कोसलक, सकल-कोशल, दक्षिण कोशल इ. अनेक नावांनी ओळखले जात असे. महाकोसलच्या स्थलनिश्चितीविषयी व विस्ताराविषयी अभ्यासकांत मतभेद आढळतात.

(१) उत्तरेकडे अमरकंटक येथील नर्मदेच्या उगामापासून, दक्षिणेकडे महानदी, पश्चिमेकडे वैनगंगा आणि पूर्वेकडे हर्दा आणि जोंक या नद्यांनी वेढलेला प्रदेश महाकोसल म्हणून ओळखला जात असे. कलचुरी वंशाचे येथे राज्य होते.

(२) ब्रह्मांड आणि मार्केंडेय पुराणांच्या आधारावरून विंध्य पर्वताच्या पूर्व आणि आग्नेय उतारांवरील ब्राह्मणी आणि महानदी या नद्यांच्या जलसंचय प्रदेशातील एक जनपद.

(३) कनिंगहॅम याच्या मते महानदी आणि गोदावरी नद्यांच्या वरच्या खोऱ्यातील आधुनिक गोंडवनाचा प्रदेश हाच महाकोसल होय. दलपतशाहच्या शूर राणीचे दर्गावतीचे या प्रदेशावर अधिपत्य होते.

(४) मध्य प्रदेश आणि ओरिसा राज्यांतील बिलासपूर, रायपूर व संबळपूरच्या काही प्रदेश महाकोसल म्हणून संबोधण्यात येत असे. येथे सोमवंशी क्षत्रिय घराण्याचे आधिपत्य होते.

(५) फर्ग्युसन यांच्या मते आधुनिक छत्तीसगढाचा प्रदेश हा महाकोसल देश असून, आधुनिक तुमान (बालासपूर जिल्हा) ही त्याची राजधानी होती. कलचुरी व हैहय वंशांची येथे सत्ता होती. रत्नपूर (मणिपूर) ही त्यांची त्याकाळी राजधानी होती. त्यांनी अनेक शिवालये व मठ बांधले.

ह्यूएनत्संगच्या प्रवासवर्णनावरून सातवाहन राजांनी महायान पंथातील माध्यमिक संप्रदायचा प्रणेता नागार्जुन याच्या प्रीत्यर्थ येथे स्तूप व बौद्ध मठ बांधले होते.

पंडित, भाग्यश्री