नॅन्सी: ईशान्य फ्रान्समधील मार्त-ए-मोझेल प्रांताची राजधानी. लोकसंख्या १,०७,९०२ (१९७५). हे पॅरिसच्या पूर्वेस सु. ३०२ किमी. मार्त नदीच्या डाव्या काठावर वसले असून मार्त–ऱ्हाईन कालव्यावरील औद्योगिक शहर आहे. पूर्वीच्या लॉरेन प्रांताचे शासकीय, आर्थिक व शैक्षणिक केंद्र म्हणून हे ख्यातनाम आहे. अकराव्या शतकात हे लहान शहर होते. येथे किल्ला असल्यामुळे यास जास्त महत्त्व आले होते. लॉरेनच्या ड्यूकने या शहरास तटबंदी करून आपल्या प्रांताची राजधानी केली. सोळाव्या शतकात याची फार भरभराट झाली आणि तिसऱ्या चार्ल्‌सने येथे नवीन शहर वसविले. अठराव्या शतकाच्या अखेरीस हे फ्रान्सच्या अंमलाखाली आले, तेव्हा हे नगररचनेचा आदर्श मानले गेले. फ्रँको-प्रशियन युद्धाच्या वेळी (१८७०–७१) हे निर्वासितांचे मुख्य आश्रयस्थान होते. पहिल्या महायुद्धात नॅन्सीचे नुकसान झाले, पण दुसऱ्या महायुद्धात जास्त झळ पोहोचली नाही. हे प्रशासन, दळणवळण व आर्थिक उलाढालींचे केंद्र असल्यामुळे याचा फार विकास झाला आहे. फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी बंद केलेल्या जुन्या विद्यापीठाचे पुनरुज्जीवन १९ व्या शतकात केले आहे. हे लोह-पोलाद, यंत्रे, कापड, मद्ये, काचसामान, पादत्राणे व तंबाखूचे उद्योग यांसाठी प्रसिद्ध आहे, प्लेस स्टॅनिस्लास, इटालियन शैलीचे कॅथीड्रल, सँ एपायर गॉथिक चर्च, कॉर्डेलियर चर्च (१५ वे शतक), नगरभवन, विद्यापीठ या येथील प्रेक्षणीय वास्तू आहेत.

ओक, द. ह. कांबळे, य. रा.