बनेश्वर:महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यातील (ता. भोर) निसर्गरम्य सहलस्थान. हे पुण्याच्या दक्षिणेस पुणे-सातारा महामार्गवरील नसरापूराच्या उत्तरेला सु. १.५ किमी. अंतरावर शिवगंगा ओढ्या काठी दाट वनात वसले आहे. येथील शिवमंदिराभोवतालचे केतकीचे बन व जांभूळ-करंज यांसारख्या वृक्षांची दाट वनश्री, यांमुळे यास बनेश्वर असे नाव पडले असावे.

शिवमंदिर, बनेश्वर

   बनेश्वर मंदिर प्रथम कोणी व केव्हा बांधले हे ज्ञात नाही तथापि पहिल्या बाजीराव पेशव्याच्या काळात त्याचा जीर्णोद्धार झाला. जवळच त्याच्या वाड्याचे अवशेष पाहावयास सापडतात.बंदिस्त आवारात हे दगडी मंदिर बांधले असून येथे चार जलकुंडे आहेत. येथील पाणी कधीही आटत नाही, हे त्याचे आगळे वैशिष्टय आहे. उत्तरेकडील कुंडाच्या पश्चिमेस नंदीची मेघडंबरी असून तिच्यासमोर पूर्वाभिमुख मंदिर आहे. मंदिराचे तोरण, सभामंडप, गाभारा असे तीन भाग पडतात. सभामंडपास खांब नसून तो चारही बाजूंच्या भिंतीवर आधारलेल्या घुमटाने आच्छादलेला आहे. सभामंडपातून गाभाऱ्यात पायऱ्या उतरून गेल्यावर शिवलिंग लागते. या शिवलिंगाखालील पोकळीत शिलास्तंभावर पाच शिवलिंगे कोरली असून तीच मूळची शिवलिंगे आहेत, असे समजले जाते. ती नेहमीच पाण्यात असतात.

   या फरसबंदी मंदिराच्या गाभाऱ्याचे बाह्यांग तारकाकृती असून चौथऱ्याभोवती चक्रव्यूहाकार रचना करून त्यातून पाणी खेळविले आहे. गोमुखातून येणारे पाणी व पिंडीखाली वाहणारे पाणी कोठून येते, हे अद्यापि समजू शकलेले नाही.

   जलकुंडांत रंगीत मासे सोडलेले असून त्यांच्या पोषणार्थ सरकारी अनुदानही मिळते. मंदिरात इंग्रजीत ‘इ. स. १६८९’ अशी अक्षरे कोरलेली भव्य पितळी घंटा असून मराठ्यांनी ती पोर्तुगीजांकडून मिळविल्याचे समजते. ब्रिटिश काळात या मंदिराची देखभाल भोर संस्थानामार्फत होत असे. देवस्थानाची जी जमीन महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाकडे आहे, तेथे शासनातर्फे राष्ट्रीय उद्यान तयार केलेले आहे.

अनपट, रा. ल.