बाराव्या शतकातील प्रसिद्ध कॅथीड्रल, बॉन.

बॉन : पश्चिम जर्मनीची (जर्मन प्रजासत्ताक संघराज्य) राजधानी आणि देशातील महत्त्वाचे शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र. लोकसंख्या २,८५,१३८ (१९७८). हे शहर नॉर्थ-ऱ्हाईन वेस्टफेलिया प्रांतात कोलोनच्या दक्षिणेस सु. २६ किमी.वर ऱ्हाईन नदीच्या डाव्या तीरावर निसर्गरम्य परिसरात वसले आहे. लोहमार्ग, लांब अंतराच्या बससेवा आणि हवाई वाहतूक यांचे हे एक आंतरराष्ट्रीय केंद्र आहे.

नैसर्गिक दृष्ट्या सुरक्षित स्थळ म्हणून ख्रिस्तपूर्व काळात रोमनांनी येथे प्रथम लष्करी वसाहत स्थापन केली ती ‘कॅस्ट्रा बॉनेसिया’ म्हणून ओळखली जाई. इ. स. ७० मध्ये काही टोळ्यांनी हे नगर उद्ध्वस्त केले. इ. स. तिसऱ्या शतकात मूळ रोमन जागेवर ख्रिस्ती मठ स्थापन झाला. तो ‘व्हिला बासिलिका’ या नावाने पुढे वाढला. इ. स. ३५९ मध्ये जूलियन या रोमन राजानेच येथे पुनर्वसाहत केली. ८८९ मध्ये नॉर्मनांनी पुन्हा एकदा या शहराचा बीमोड केला. १२३८ ते १७९४ या कालखंडात हे कोलोनच्या सरदारांचे व धर्मगुरूंचे केंद्र म्हणून ओळखले जाई. याच काळात रोमन राजे फ्रेडरिक द हँडसम आणि चौथा चार्ल्स यांचे राज्यारोहण समारंभ येथेच अनुक्रमे १३१४ आणि १३४६ मध्ये पार पडले. सोळाव्या ते अठराव्या शतकांपर्यंत पुन्हा एकदा हे शहर अनेक टोळ्यांची संग्रामभूमी बनले होते. फ्रेंच क्रांतिकारी फौजांनी १७९४ मध्ये याचा ताबा घेतला आणि याचे महत्त्व कमी झाले. व्हिएन्ना काँग्रेसच्या करारानुसार ते प्रशियाला बहाल करण्यात आले. दुसऱ्या महायुद्धात बाँबवर्षावाने या शहराची बरीच हानी झाली. १९४८-४९ मध्ये दोस्त राष्ट्रांच्या प्रतिनिधींची बैठक या शहरात होऊन जर्मन प्रजासत्ताक संघराज्याची घटना येथेच निश्चित करण्यात आली आणि १९४९ पासून प. जर्मनीची अधिकृत राजधानी म्हणून बॉन ओळखले जाऊ लागले. १९६९ मध्ये जवळपासच्या सु. १५ छोट्यामोठ्या गावांचा समावेश बॉनमध्ये करण्यात येऊन महानगरपालिका अस्तित्वात आली.

राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान, संसदभवन, सु. ९० परराष्ट्रीय वकिलाती, आंतरराष्ट्रीय संघटनांची कार्यालये, राजकीय पक्षांची मुख्यालये, विविध वृत्तपत्रांची कार्यालये यांमुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडींचे यूरोपातील हे मोठे केंद्र बनले आहे. सुप्रसिद्ध संगीतकार आणि पियानोवादक लूटव्हिख फान बेथोव्हन याचे हे जन्मग्राम. त्याचे घर हे राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय (स्था. १८८९) म्हणून ओळखले जाते. नव्याने बांधण्यात आलेल्या ‘बेथोव्हन भवना’त दर दोन वर्षांनी आंतरराष्ट्रीय बेथोव्हन संगीत महोत्सव साजरा केला जातो. शहरातील ऐतिहासिक वास्तूंत नगर भवन (स्था. १७३७), पॉपल्सडॉर्फ प्रासाद व वनस्पतिउद्यान (१७१५-३०), रोमन वास्तुशैलीतील कॅथीड्रल (अकरावे ते बारावे शतक) आणि बॉन विद्यापीठ (१७८६) ह्या वास्तू प्रेक्षणीय आहेत. ह्या धनिकांच्या शहरात सुखद स्वास्थ्याचे व सौंदर्याचे अभिजात वातावरण अबाधित राखण्यासाठी तेथे मोठ्या उद्योगांची उभारणी करण्यात आली नाही. साहजिकच येथील औद्योगिक विकास मर्यादित राहिला. सेवाउद्योगांचे मात्र येथे प्राबल्य आहे. प्रयोगशालेय उपकरणे, स्विचगिअर, ऑर्गन इ. येथील प्रमुख निर्मितीउद्योग होत.

कापडी, सुलभा