रेवण : क्विक सँड. पाण्याने संपृक्त असलेली बारीक वाळू व रेतीमिश्रित अर्धद्रव स्थितीतील दलदल. बारीक वाळूचे प्रमाण जास्त तसेच अस्थिरता व जलद हालचाल, या गुणधर्मांमुळे तिला ‘क्विक सँड’ म्हणतात. रोवणे अथवा रुतणे या अर्थाने तिला रुतण वा रुपण असेही म्हणतात. सर्वसामान्यपणे ही दलदल बारीक भुकटीसारख्या वाळूच्या प्रदेशाप्रमाणे दिसते परंतु अस्थिर व द्रवस्थितीत असल्याने धोकादायक असते.

नदीमुखप्रदेश, प्रवाहांच्या काठावरील सरोवरे, समुद्र किनारा, मोठमोठे खळगे इ. भागांत तळाला बारीक रेती व वरच्या भागात पाणी, बारीक वाळू यांचे मिश्रण साचून ही निर्माण होते. पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने पाण्यापेक्षा जड पदार्थांना उद्धरण्याची शक्तीही हीत कमी असते. हिच्यातील वाळूचे कण बारीक व गोल आकाराचे असतात. सजीव जड प्राणी हिच्यात पडल्यास बाहेर निघण्याच्या धडपडीमुळे तो जास्तच रुतून शेवटी बुडण्याची दाट शक्यता असते. अशा परिस्थितीत जास्त हालचाल न करता आडवे पडून राहणे अथवा दलदलीच्या पृष्ठभागावरून लोळत येऊन बाहेर पडण्याचा प्रयत्‍न करणे इष्ट ठरते.

या प्रदेशाचा पृष्ठभाग काही काळाने कोरडा होऊन कठीण बनतो. त्यावर रस्ते अथवा इमारती बांधल्यास तो प्रदेश अचानक खचून इमारती नष्ट होण्याची दाट शक्यता असते. १८७५ मध्ये कोलोरॅडो राज्यातील प्वेब्‍लो येथील रेवणमध्ये संपूर्ण रेल्वे बुडाल्याचे उदाहरण आहे. इंग्‍लंडमधील डील शहराजवळील ‘गुडविन सँड’ धोकादायक असून तिचे अनेक वेळा स्थलांतर होत असल्याचे दिसून येते. काही वेळा मोठमोठ्या नद्यांतून वाहतूक करणाऱ्या जहाजांनाही अशा दलदलींमुळे अपघात होतात. अशा प्रकारच्या दलदलींच्या धोक्यांविषयी काही अतिशयोक्तीची वर्णने कथा-कादंबऱ्यातूनही उदा., ब्राइड ऑफ लॅमरमूर-इंग्रज कादंबरीकर विल्यम विल्की कॉलिंझ (१८२४-८९) द मूनस्टोन-स्कॉटिश कवी आणि कादंबरीकार वॉल्टर स्कॉट (१७७१-१८३२), आलेली दिसतात. [⟶ दलदल]. 

चौंडे, मा. ल.