टाल्यिन : रशियामधील एस्टोनियन प्रजासत्ताकाची राजधानी. लोकसंख्या ३,९२,००० (१९७४). बाल्टिक समुद्रावरील फिनलंडच्या आखाताच्या दक्षिण किनाऱ्‍यावरील हे बंदर लेनिनग्राडच्या पश्चिमेस ३२० किमी. असून व्यापार व उद्योगधंदे यांचे मोठे केंद्र आहे. जहाज बांधणी, कापड, विजेच्या मोटारी, प्लॅस्टिक, काच, कागद, लाकडी सामान वगैरेंचे मोठे कारखाने येथे आहेत. वर्षातून सु. ५० दिवस बर्फामुळे या बंदरातील वाहतूक बंद असते. तांत्रिक व शिक्षक विद्यालये, कला व नाट्य शाखा, संग्रहालये इ. संस्था येथे आहेत. दोन्ही महायुद्धांत जर्मनांच्या ताब्यात असताना टाल्यिनची बरीच नासधूस झाली होती. इ. स. पूर्वीपासून याला इतिहास असून येथे अनेक सत्तांतरे झाली. १७१० मध्ये रशियाच्या पीटर द ग्रेटने हे जिंकले. १९१८ ते १९४० ते स्वतंत्र एस्टोनियाची राजधानी होते. नंतर ते राज्यच रशियाने आपल्या प्रदेशास जोडले.

लिमये, दि. ह.