पद्मा नदी: बांगला देशातून वाहणाऱ्या गंगा आणि ब्रह्मपुत्रा (जमुना) यांचा, मेघना नदीला मिळेपर्यंतचा आग्नेयवाही संयुक्त प्रवाह. लांबी सु. १२० किमी. प. बंगाल राज्याच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जंगीपूरच्या ईशान्येस सु. आठ किमी. वर, गंगा नदी भागीरथीहुगळी व पद्मा-मेघना अशी द्विशाखी होते. पैकी प.बंगाल राज्यातूनच दक्षिणेस वाहत जाऊन बंगालच्या उपसागरास मिळणारी शाखा प्रथम भागीरथी व पुढे हुगळी या नावांनी ओळखली जाते तर दुसरी प्रमुख शाखा बांगला देश व भारत (प. बंगाल राज्य) यांच्या आंतरराष्ट्रीय सरहद्दीवरून आग्नेयीस सु. १४५ किमी. वाहते. पुढे बांगला देशातील ग्वालंदोजवळ तिला उत्तरेकडून वाहत येणारी जमुना (ब्रह्मपुत्रा) मिळाल्यानंतर पुढील संयुक्त प्रवाह पद्मा या नावाने ओळखला जातो. पद्माला पुढे चांदपूरजवळ उत्तरेकडून येणारी मेघना (ब्रह्मपुत्रेचा फाटा व इतर उपनाद्या) मिळाल्यानंतर पुढे ती मेघना नदी या नावाने ओळखली जाते व अनेक मुखांनी बंगालच्या उपसागरास मिळते. पद्मा नदीचा संपूर्ण प्रवाह वाहतुकीस सोयीस्कर आहे. वारंवार येणाऱ्या पुरांमुळे नदीखोऱ्यात निर्माण झालेल्या गाळाच्या सुपीक जमिनीतून ताग हे प्रमुख पीक घेतले जाते. पद्मा नदीवर गंगा-कोबाडक प्रकल्प उभारून कुश्तिया, जेसोर व खुलना या जिल्ह्यांतील सु. ८,००,००० हे. जमिनीला पाणी पुरवठा करण्याची योजना आहे.
सावंत, प्र. रा.