ठाणे जिल्हा : महाराष्ट्राच्या कोकणपट्टीतील सर्वांत उत्तरेकडील जिल्हा. विस्तार १८° ४२’ उ. ते २०° २०’ उ. ७२° ४५’ पू. ते ७३° ४८’ पू. क्षेत्रफळ ९,५५३ चौ. किमी. (राज्याच्या क्षेत्रफळाच्या ३%). लोकसंख्या २२,८१,६६४ (१९७१) (राज्याच्या लोकसंख्येच्या ४·५ %). पश्चिमेस अरबी समुद्र, उत्तरेला गुजरात राज्य व दादरा व नगरहवेली हा केंद्रशासित प्रदेश, पूर्वेला सह्याद्रीपलीकडे नासिक, अहमदनगर व पुणे आणि दक्षिणेला कुलाबा व बृहन्मुंबई हे जिल्हे. किनाऱ्याची लांबी सु. ११३ किमी. मात्र किनाऱ्यालगत पाणी फारसे खोल नसल्यामुळे मोठ्या बोटी आत येण्याजोगी बंदरे नाहीत. लहान मच्छिमारी बोटी, लाँचेस यांना आसरा घेण्यायोग्य अनेक जागा जिल्ह्यात आहेत. ठाणे, वसई, पालघर, डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा, वाडा, भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण व उल्हासनगर हे तालुके असून जिल्ह्यात २४ नगरे व १,६२२ खेडी आहेत. आठ नगरपालिका व ८९९ ग्रामपंचायती मार्च १९७३ अखेर होत्या. ठाणे शहर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. ठाणे जिल्ह्याचा बराच भाग प्राचीन अपरांत प्रदेशात समाविष्ट होता. परशुराम आणि पांडव या भागात राहिल्याचे उल्लेख पुराणांत आहेत. पांडवकालीन शूर्पारक म्हणजेच हल्लीचे सोपारा. वज्रेश्वरीजवळच्या डोंगरास मंदाग्नी म्हणतात. तेथे परशुरामाचे मंदिर आहे. अशोकाच्या काळात येथे बौद्ध धर्माचा प्रसार झाला. सोपारा येथे मोठा स्तूप व अशोकाचा शिलालेख आहे. मौर्य, शिलाहार, बिंब इ. राजे येथे होऊन गेले. सैनिक तळास ‘स्थानक’ म्हणत त्यावरून ठाणे हे नाव पडले. यादव, बहामनी, पोर्तुगीज, गुजरातचा सुलतान, विजापूरकर, पुन्हा पोर्तुगीज, मराठे व शेवटी इंग्रज यांचा अंमल येथे होऊन १९४७ मध्ये हा भाग स्वतंत्र भारतात आला. कल्याणचा खजिना, वसईचा वेढा, साष्टीचा कबजा (ठाणे किल्ल्यातून त्रिंबकजी डेंगळे याचे पलायन) इ. मराठेशाहीतील स्फूर्तिदायक प्रसंग याच भागात घडले.

भूवर्णन : भूरचनेच्या दृष्टीने जिल्ह्याचे तीन ठळक विभाग पडतात. पूर्व भागात सह्याद्रीचा सु. १,००० मी. उंचीचा भाग व त्याचा अतितीव्र पश्चिम उतार ही स्थलवैशिष्ट्ये आढळतात. मातीचे बारीक कण उतारावरून वाहून गेल्यामुळे येथील जमीन तांबडी, रेताड आहे. तीत पाणी टिकू शकत नाही. मध्यभाग डोंगराळ असून त्याची उंची १०० ते ४०० मी. आहे. येथे जमीन तपकिरी काळसर असून त्यात पाणी अधिक टिकू शकते. किनाऱ्याजवळील भाग वालुकामिश्रीत गाळणे बनलेला असून सपाट आहे. वाळूचे प्रमाण किनाऱ्याजवळ वाढते. खार जमिनींची सुधारणा ही जिल्ह्यातील एक समस्या असून शासनाच्या साह्याने खार जमीन विकास मंडळ ती सोडवीत आहे.

वैतरणा व उल्हास या जिल्ह्यातील दोन मुख्य नद्या. वैतरणा नासिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वरजवळ सह्याद्रीत उगम पावते व विरारच्या उत्तरेला. अरबी सुमुद्राला मिळते. सूर्या ( डावीकडून) व तानसा (उजवीकडून) या तिच्या मुख्य उपनद्या. उल्हासचा उगम जिल्ह्याबाहेर बोर घाटाच्या डोंगरात असून तिचा मधला व खालचा भाग या जिल्ह्यात आहे. ठाण्याजवळ साष्टी बेटामुळे या नदीचे दोन फाटे होतात. एक दक्षिणेकडे ( ठाणे खाडी) व दुसरा पश्चिमेकडे (वसई खाडी) जाऊन अरबी समुद्राला मिळतो. उजवीकडून येणाऱ्या काळू व भातसा ( भातसई) व मुरबाडी या तिच्या मुख्य उपनद्या. वैतरणा मुखापासून सु. २५ किमी. आतपर्यंत व उल्हास सु. ४० किमी. आतपर्यंत जलवाहतुकीस उपयोगी पडते. वायव्येकडे वरोळी नदी आहे.

वतारणा व तानसा या नद्यांच्या वरच्या भागात धरणे बांधून प्रचंड जलाशय निर्माण केले असून त्यांचा उपयोग बृहन्मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी होतो. भातसा प्रकल्पाचे काम अजून (१९७६) पूर्ण झालेले नाही. विहार व तुळसी हे तलावही मोठे आहेत.

ठाणे जिल्ह्याचे हवामान उष्ण-दमाट असून आर्द्रता अंतर्गत भागात कमी आढळते. हवेची विषमता अंतर्गत भागात भासते. सर्वसाधारण वार्षिक तपमान २३° ते ३१° से.च्या दरम्यान आढळते. पर्जन्यमान २०० ते ४०० सेंमी.च्या दरम्यान आढळते. ते उत्तरेकडे कमी होत जाते परंतु पूर्वेकडे उंचीबरोबर वाढत जाते.

जिल्ह्याचा सु. ३९% भाग जंगलाखाली असून महाराष्ट्रातील प्रमाणाच्या दृष्टीने (१७·५%) हे प्रमाण बरेच जास्त आहे. मोखाडा, जव्हार, वाडा, शहापूर, वसई व डहाणू हे तालुके अधिक जंगलमय आहेत. जंगलात साग, ऐन, शिसव, बिव्बा, खैर, सावर यांसारखे पानझडी वृक्ष आढळतात. किनाऱ्यानजीक वाळूच्या टेकड्या स्थिर करण्यासाठी सुरू व निलगिरी यांची लागवड केलेली आढळते. जंगलांतून इमारती लाकूड, जळण, बांबू, गवत, चंदन, टेंभुर्णीची, आपट्याची व बेलाची पाने, डिंक, हिरडा, शिकेकाई, ताडी, मेण, मध इत्यादींचे उत्पन्न मिळते.

जंगलभागात वाढणाऱ्या खुरट्या झुडूपात वाघ, चित्ता, तरस, कोल्हा, ससा, रानडुकरे इ. प्राणी आढळतात. यांशिवाय अनेक प्रकारचे कीटक व पक्षी या भागात आढळून येतात. तानसा तलाव प्रदेशात वन्य प्राण्यांसाठी अभयारण्य आहे.

आर्थिक स्थिती : शेती हा जिल्ह्यातील प्रमुख व्यवसाय असून शेतकरी व शेतमजूर यांचे एकूण कामगारवर्गाच्या ५३·७५% आहे. डोंगराळ भूरचनेमुळे लागवडीखालील क्षेत्राचे प्रमाण एकूण क्षेत्राच्या ३२·५% इतकेच आहे. पूर्वेकडील डोंगराळ भागात ते याहीपेक्षा कमी आहे. डहाणू, पालघर, वसई या तालुक्यांत विहिरींमार्फत जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध असल्याने तेथे एकाहून अनेक पिके घेतली जातात. सिंचनक्षेत्र लागवडीखालील क्षेत्राच्या फक्त १·५% आहे. सूर्या योजनेचे काम चालू असून भातसा योजनेचाही लाभ सिंचनासाठी होणार आहे. सर्वसाधारणपणे पावसाळ्यात बहुतेक भागांत भाताचे पिक व इतर हंगामात मुंबईच्या बाजारपेठेत मागणी असणारी नगदी पिके काढली जातात. कडधान्ये व भाजीपाला यांचेही उत्पन्न होते. वाढत्या अंतराबरोबर पिक बदलत जाते. मुंबईजवळील वसई तालुक्यात केळी, फुले, पालेभाज्या, विड्याची पाने अशा अधिक नाशवंत वस्तूंचे पिक आढळते, तर पालघरसारख्या अधिक अंतरावर असणाऱ्या तालुक्यात वांगी, दुधभोपळा, मिरची, गवार यांसारख्या अधिक टिकाऊ गोष्टींची लागवड आढळते. डहाणू तालुक्याचे अंतर त्याहूनही जास्त असल्यामुळे तेथे मुख्य भर चिकू, पेरू, आंबे, अननस, पपई यांसारख्या फळांवर आढळतो. गवत हे देखील एक नगदी पीकच आहे. गवत आगगाडीने मुंबईला जाते. एकंदरीत किनाऱ्यालगतच्या भागातील शेतकरी सुखवस्तू दिसतो. मात्र किनाऱ्यापासून दूर गेल्यास केवळ निर्वाह शेतीवर विसंबून राहणारा आदिवासी अतिशय गरीब असल्याचे जाणवते. या भागात भाताखालील क्षेत्रे कमी होऊन त्याऐवजी नागली, वरी यांसारखी पिके करतात.

जिल्ह्यात १९७२ मध्ये ५,१६,१९७ गाईबैल १,२५,१५७ म्हशी १,२०६ मेंढ्या १,३९,८८३ शेळ्या व ८,३६,८५८ कोंबड्या-बदके होती. जनावरांचे दवाखाने वगैरे सोई आहेत. दापचरी येथे आधुनिक दुग्धप्रकल्प व पैदास केंद्र स्थापण्यात येत आहे. 


मुंबईसारख्या प्रचंड व हमखास बाजारपेठेमुळे मच्छीमार धंदा भरभराटीला आला आहे. किनाऱ्यावरील डहाणू, सातपाटी, अर्नाळा, उत्तन यांसारखी अनेक लहान बंदरे मच्छीमार बोटींना आसरा देतात. बोटींचे यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणात झाले असून बऱ्याच ठिकाणी शीतगृहे, कर्ज, वाहतूक इ. सोई सहकारी सोसायट्यांमार्फत केल्या जातात. आता ट्रॉलर बोटींच्या साहाय्याने खोल समुद्रातही मासेमारी केली जाते. सखल भागात मीठ तयार करण्याचा व्यवसाय चालतो. यांशिवाय तांबड्या मातीपासून विटा, कौले व मडकी तयार करण्याचा व्यवसाय वसई तालुक्यात प्रामुख्याने आढळतो. मुंबईलगतच्या तालुक्यात बांधकामाचे दगड काढण्याचे काम चालते, तर घोडबंदर व मुंब्रा-दिवा या खाडीकाठच्या भागात रेती काढण्याचे काम चालते. जंगलातील इमारती लाकूड तोडणे व वाहणे हादेखील महत्त्वाचा व्यवसाय सहकारी सोसायट्यांमार्फत चालतो. भाताच्या पेंढ्यांपासून काचसामानासाठी लागणारी वेष्टने तयार होतात.

मुंबईलगतच्या व वाहतुकीची उत्तम सोय उपलब्ध असलेल्या भागांत अनेक उद्योगधंदे निघाले आहेत. त्यांत रासायनिक, अभियांत्रिकी व कापडगिरण्या जास्त आहेत. अंबरनाथचा दारूगोळ्याचा व लुब्रिझॉल (इंडिया) हे मध्यवर्ती सरकारचे कारखाने या जिल्ह्यात आहेत. सुत व कापड, यंत्रे, काचसामान, वाहने, कातडी वस्तू, रबरी वस्तू, अन्नपदार्थ, कागद, लाकडाच्या वस्तू, साखर, तंबाखू, डबाबंदी, वाहतूकसामग्री, वीजसामग्री, बिस्किटे, लोखंड आणि पोलाद धातुकाम, सेंद्रिय रसायने, रेयॉन, आगपेट्या इ. विविध कारखाने आणि अनेक परदेशी कंपन्यांच्या भारतीय शाखा येथे आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने या जिल्ह्यात वागळे इस्टेट वगैरे दहाबारा औद्योगिक वसाहती स्थापिल्या असून कारखान्यांसाठी व इतर उपयोगांसाठी कोयना-खोपोली येथून जलविद्युत्, मध्य रेल्वेची औष्णिक विद्युत् व तारापूरची आण्विक विद्युत् मिळते.

वाहतुकीच्या दृष्टीने जिल्ह्याचा वरचा क्रमांक लागतो. १८५३ मध्ये मुंबई–ठाणे हा पहिला लोहमार्ग झाला. पश्चिम व मध्य रेल्वेचे २१२ किमी. दुहेरी लोहमार्ग किनाऱ्याने सुरतकडे व कल्याणवरून नासिककडे व पुण्याकडे जातात. मुंबई–आग्रा व मुंबई–अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गांची लांबी जिल्ह्यात २३२·२६ किमी. आहे. ठाणे–हैद्राबाद–विजयवाडा हा राष्ट्रीय महामार्ग, मुंबई–पुणे–बंगलोर हे महामार्गही या जिल्ह्यातून जातात. यांशिवाय राज्यपातळीवरील पक्क्या सडकांची लांबी ४११·०९ किमी. असून इतर प्रकारच्या रस्त्यांची लांबीही बरीच आहे. १९७२-७३ मध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा एकूण ६८३ बसगाड्या ३३९ मार्गांवरून ३७,८५५ किमी. रस्त्यांवरून धावत होत्या. संदेशवहनाचे काम २५५ टपाल कचेऱ्या, ५८ तार कचेऱ्या व ९,८१५ दुरध्वनियंत्रे करतात. रेडिओचा प्रसार पुष्कळ झाला असून दूरचित्रवाणीचा वेगाने प्रसार होत आहे. ग्रामीण भागांत शासनातर्फे रेडिओ पुरविण्यात आले आहेत.

लोक व समाजजीवन : १९६१–७१ या दशकात जिल्ह्याची लोकसंख्या ३८ टक्क्यांनी वाढली. अशा भयंकर वाढीचे मुख्य कारण बाहेरून येऊन मुंबई शेजारील तालुक्यांत स्थायिक झालेले लोक हेच होय. याच कारणामुळे स्त्रियांचे प्रमाण १,००० पुरुषांना ८९४ असे घटलेले आढळते. नागरी लोकवस्तीचे प्रमाण ३६·२३% असून साक्षरतेचे प्रमाण पुरुषांत ५०·३४%, तर स्त्रियांमध्ये २९·८०% आढळते.

जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येपैकी २५·४०% लोक आदिवासी असून वारली ही मुख्य जमात आढळते. त्याशिवाय कातकरी, ठाकूर, धोडिआ, दुबळा, ढोर, कोळी, महादेव कोळी इ. जमाती आहेत. त्यांची लोकवस्ती डोंगराळ व जंगलभागात असून त्यांचे जीवन अतिशय जिकीरीचे आहे. त्यांना जमिनीच्या अतिशय लहान व निकृष्ट तुकड्यात केलेले धान्योत्पादन जेमतेम ३-४ महिने पुरते. इतर दिवसांत दुसरा व्यवसाय शोधण्यासाठी भटकावे लागते, नाही तर जंगलातील कंदमुळे, पाला यांवर गुजराण करावी लागते. आता त्यांच्यात शिक्षण, आरोग्य, सहकारी संस्था इत्यादींची वाढ होऊन त्यांचे जीवनमान सुधारत आहे.

१९७२ मध्ये जिल्ह्यात सार्वजनिक किंवा सार्वजनिक मदतीवरील ५ रुग्णालये, ४९ दवाखाने, २१ सुतिकागृहे, १८ प्राथमिक आरोग्यकेंद्रे १८१ डॉक्टर, ३८१ परिचारिका, २,६९६ रुग्णखाटा असून या वर्षी रुग्णालयातून १,०९,०३१ रुग्णांवर उपचार केले गेले. त्यात स्त्रियांची संख्या जास्त होती. बाह्य रुग्णविभागात १५,१०,३३५ लोकांवर उपचार केले. त्यांत मुलांची संख्या जास्त होती. १९६९ ते १९७२ या काळात जिल्ह्यात सर्वांत जास्त मृत्यू श्वसनेंद्रियांच्या रोगांनी आणि त्याखालोखाल क्षय, अपघात, आव, हगवण तसेच न्यूमोनिया, कर्करोग, हिवताप वगैरेंमुळे झाले. १९७२-७३ मध्ये २३,५४२ संतती प्रतिबंधक शस्त्रक्रिया करण्यात आल्या त्यांपैकी ३,६९२ स्त्रियांच्या होत्या. ठाणे येथे प्रसिद्ध मनोरुग्णालय आहे.

जिल्ह्यात १९७१ च्या जनगणनेप्रमाणे सु. १९,६७,२०० हिंदू १,४४,००० मुस्लिम ८८,५०० ख्रिस्ती ५७,३०० बौद्ध १७,६०० जैन ४,६०० शीख व २,५०० इतर धर्मीय होते. अनुसूचित जाती व जमातींचे लोक ६,१५,७०० होते. ते डहाणू, पालघर, जव्हार, मोखाडा, शहापूर, तलासरी, वाडा या तालुक्यांत विशेष करून होते.

१९७१–७२ मध्ये २,१८१ प्राथमिक शिक्षण संस्थांतून २,७३,५३५ विद्यार्थी व ७,८७७ शिक्षक १९४ माध्यमिक शिक्षणसंस्थांतून ८८,६३२ विद्यार्थी व ३,१४४ शिक्षक ८ उच्च शिक्षणसंस्थांतून ६,३४४ विद्यार्थी व २१६ शिक्षक होते. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणास शासकीय साहाय्य मिळते.

महत्त्वाची स्थळे : जिल्ह्यात जव्हार व सुर्यामाळ (मोखाडा तालुका) ही गिरिनिवास स्थाने असून ठाणे, वसई व अर्नाळा, तारापूर येथील किल्ले वज्रेश्वरी, गणेशपुरी आणि इतर ठिकाणचे उष्णोदकाचे झरे तानसा, विहार इ. तलाव टिटवाळा, निर्मळ, महालक्ष्मी, शहद, हाजीमलंग इ. देवस्थाने ही प्रवाशांची व भाविकांची आकर्षणे आहेत.

फडके, वि. शं.


ठाणे

गरम पाण्याचे झरे, वज्रेश्वरीठाणे जिल्ह्यातील वारली लोकभात शेतीचे दृश्यभातसा प्रकल्पाची उभारणीअंबरनाथ येथील शिवमंदिरनिसर्गसुंदर विहार तलाव‘व्हिम्‌को’ आगपेट्यांचा कारखाना, अंबरनाथ.बौद्ध स्तूप, सोपाराठाणे-खाडीवरील पूल