चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण. लोकसंख्या २०,८९६ (१९७१). हे मुंबईच्या आग्नेयीस सु. १७५ किमी. असून समुद्रापासून गोवळकोटपर्यंत नौकासुलभ असलेल्या वाशिष्ठी नदीच्या दक्षिण तीरावर समुद्रापासून ४० किमी. आत वसलेले आहे. चिपळूण वरून मुंबई-गोवा व पुणे-रत्नागिरी मार्ग जातात. श्रीपरशुराम क्षेत्र येथून जवळच आहे. कुंभार्ली घाटाच्या वाटेने आग्नेयीस सु. ९६ किमी. कराड हे सर्वांत जवळचे लोहमार्गस्थानक आहे. घाटाच्या पायथ्याजवळ असल्यामुळे चिपळूण ही एक मोठी बाजारपेठ झालेली आहे. कोयना जलविद्युत् प्रकल्पामुळे चिपळूणचे महत्त्व अधिकच वाढले आहे आणि दिवा-दासगाव कोकण लोहमार्गामुळे याचा अधिक विकास होण्याची शक्यता आहे. भातशेती मार्गदर्शक गटाचे हे प्रमुख केंद्र असून, येथे जनावरांचा चांगला दवाखाना आहे. येथे माध्यमिक शाळा, महाविद्यालय इ. शैक्षणिक सोयी झाल्या आहेत.       

कांबळे, य. रा.