कायफंग : चीनच्या होनान प्रांतातील शहर. लोकसंख्या सु. ३,३०,००० (१९७० अंदाज). हे प्रसिद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक व व्यापारी शहर पीकिंगपासून सु. ५९० किमी. दक्षिणेकडे आहे. ख्रि. पू. तिसर्‍या शतकात वसलेल्या कायफंगला चिनी इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. दहाव्या व बाराव्या शतकांत कायफंगला राजधानीचा दर्जा मिळाला होता. शहराच्या उत्तरेस जवळच असलेल्या पीत नदीच्या पुरामुळे अनेकदा नुकसान झाल्यामुळे राजधानी येथून हलविण्यात आली असावी. मध्ययुगात तेथे ज्यू लोकांची बरीच वस्ती होती. आजही कायफंग दळणवळणाचे महत्त्वाचे केंद्र आहे. येथे रेशमी विणकाम, धान्य व फळबाजार असून जवळच सोडा व मीठ मिळते. येथे विद्यापीठ, सन-यत्‌-सेन उद्यान, जुने पॅगोडा व सिनेगॉग इ. प्रेक्षणीय आहेत.

ओक, द.ह.