कोकोनार : चिंगहाई. चीनमधील सर्वांत मोठे सरोवर. तिबेट पठाराच्या ईशान्य भागात, समुद्रसपाटीपासून ३,२०५ मी. उंचीवर, ६४ किमी. रुंद व १०६ किमी. लांब, निळ्या पाण्याचे हे सुंदर सरोवर वसले आहे. याच्या उत्तरेस नानशान पर्वतश्रेणी व दक्षिणेस कुनलुन फाट्याचे पूर्व टोक आहे. कोकोनारच्या उत्तरेकडील भागात मोगल आणि दक्षिणेकडील भागात तिबेटी टोळीवाले राहतात. या भागात १५-४० सेंमी. पाऊस असून, त्यावर होणाऱ्या गवतावर टोळीवाल्यांचे पशुपक्षी गुजराण करतात. कोकोनारला वायव्येकडून बुका आणि बुकायीन या नद्या मिळतात, तर दक्षिणेकडून अनेक छोटे प्रवाह मिळतात. सरोवराचे पाणी मचूळ असून आर्थिक दृष्ट्या सरोवरास फारसे महत्त्व नाही.

शाह, र. रू.