मुबारक किल्ला, पतियाळा

पतियाळा : पंजाब राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे व तालुक्याचे मुख्य ठिकाण आणि पूर्वीच्या पतियाळा संस्थानाची राजधानी. लोकसंख्या उपनगरांसह १,५१,०४१ (१९७१). हे दिल्लीच्या उत्तर वायव्येस सु. २१० किमी. व अंबाल्याच्या पश्चिमेस ५५ किमी. सरहिंद कालव्याच्या शाखेवर वसले असून, वायव्य लोहमार्गाच्या राजपुरा-भतिंडा फाट्यावरील प्रमुख स्थानक आहे. अलसिंग राजाने १७६३ मध्ये येथे दगडी किल्ला बांधला व तेव्हापासून हे पतियाळा संस्थानाच्या राजधानीचे ठिकाण होते. १९०४ पासून येथे नगरपालिका आहे. हे राज्यातील प्रमुख औद्योगिक, व्यापारी व शैक्षणिक केंद्र असून १९६२ मध्ये येथे स्थापन झालेल्या पंजाबी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एकूण ४४ महाविद्यालयांपैकी तेरा महाविद्यालये येथेच आहेत.   इतरही अनेक शैक्षणिक संस्था असून स्त्रीशिक्षणाची उत्तम सोय येथे उपलब्ध आहे. विजेची उपकरणे, पादत्राणे, सुती, रेशमी व हातमागावरील कापड, धातुसामान, रसायने, वनस्पती तेल, दारू गाळणे, विलासवस्तुनिर्मिती इ. उद्योगधंदे व धान्य, कापूस, कापड, लोखंडी सामान यांचा व्यापार येथे चालतो. शहराच्या मध्यमागी जुना राजवाडा व सभोवती भव्य इमारती आहेत. बरादरी बाग, मोती बाग, गुलाबी बाग, राजिंदर व्हिक्टोरिया डायमंड जूबिली हे ग्रंथालय, वस्तुसंग्रहालय, महाकाली मंदिर व राजेश्वरी मंदिर, किंग एडवर्डचे स्मारक, मुबारक किल्ला इ. प्रेक्षणीय आहेत. शहरात अनेक चांगल्या रुग्णालयांची सोय असून क्लिनिकल रिसर्च लॅबोरेटरी हे श्वानदंश-प्रतिबंधक लसनिर्मितीचे केंद्र आहे. पोलो व क्रिकेट ह्यांची सुंदर मैदाने आणि प्रेक्षागारांची सोयही येथे  आहे.  १९६१ मध्ये पतियाळा येथे स्थापन झालेल्या राष्ट्रीय क्रीडा संस्थेचे २३ जानेवारी १९७३ रोजी ‘नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्था’ असे नामकरण करण्यात आले. या संस्थेने भारतात अनेक केंद्रे चालविली असून, त्यांद्वारे विविध खेळांचे प्रशिक्षण, शिष्यवृत्त्या व खेळांचे साहित्य पुरविले जाते. या संस्थेचे स्वतंत्र वस्तुसंग्रहालय व  ग्रंथालय असून, ॲथ्‌लेटिक एशिया व खेळ संख्याशास्त्रावरील एशिया इंटरनॅशनल ही दोन नियतकालिके ही संस्था प्रसिद्ध करते. पहिली अखिल भारतीय ग्रामीण क्रीडास्पर्धा १८ ते २१ मार्च १९७१ मध्ये पतियाळा येथेच भरविली होती.

पवार, चं. ता.