किशिनेव्ह : मॉल्डेव्हिया या सोव्हिएट सोशॅलिस्ट प्रजासत्ताकाची राजधानी. लोकसंख्या ३,७४,००० (१९७१). हे नीस्तरच्या बिक उपनदीच्या तीरावर, ओडेसाच्या वायव्येला १४४ किमी. असून आसमंतात मका, गहू, तंबाखू, द्राक्षे आणि इतर फळफळावळ यांचे मोठे उत्पन्न होते. येथून फळे, तंबाखू, मद्य इ. निर्यात होतात. येथे यंत्रे, प्लॅस्टिक, रबर, अन्नप्रक्रिया इत्यादींचे कारखाने आहेत. किशिनेव्ह हे व्यापार, लोहमार्ग, कला संस्कृती इत्यादींचे महत्त्वाचे केंद्र आहे. १४३६ मध्ये वसलेले हे शहर सोळाव्या शतकात तुर्कांनी व १८१२ मध्ये रशियनांनी घेतले. १९०३ मध्ये येथे ज्यू लोकांची मोठी कत्तल झाली. १९१८ ते १९४० पर्यंत रूमानियाकडे होते तेव्हा ते बेसारेबियाची (मॉल्डेव्हियाची) राजधानी होते. रशियाने १९४४ मध्ये ते अक्षराष्ट्रांकडून पुन्हा घेतले. येथे जुने कॅथीड्रल, विद्यापीठ (१९४५), मॉल्डेव्हियन प्रजासत्ताकाची अकादमी ऑफ सायन्सेस (१९६१) आणि ऐतिहासिक व कलाविषयक संग्रहालये आहेत.

कुमठेकर, ज. ब.