यामागाटा : जपानमधील यामागाटा प्रांताच्या राजधानीचे शहर. हे उत्तर-मध्य होन्शू बेटावर सेंडाईच्या पश्चिमेस रेल्वेने सु. ६२ किमी. व टोकिओच्या उत्तर ईशान्येस सु. २९० किमी. अंतरावर मोगामी नदीकाठी वसले आहे. लोकसंख्या २,३६,९८४ (१९८०).

प्रथम ‘मोगामी’ या नावाने ओळखले जाणारे हे गाव १३५६ पासून महत्त्वाचे गढीवजा गाव बनले आणि तोकुगावा काळात (१६०३ – १८६७) ते अनेक लष्करी अधिकाऱ्यांचे निवासी गाव म्हणून ओळखले जाऊ लागले. १८८१ मध्ये शहराचा दर्जा प्राप्त. समृद्ध शेतमालाच्या प्रांतात वसलेले हे शहर विविध राजमार्गांवरील प्रस्थानक व वाहतूक केंद्र म्हणून आणि कुसुंब (करडई), मेण व कच्चे रेशीम यांचे वितरणकेंद्र म्हणून उत्तरोत्तर विकसित होत गेले.

यामागाटाची अर्थव्यवस्था शेती व निर्मितीउद्योग अशा दोहोंवर आधारित आहे. येथे तांदूळ, फळे, कच्चे रेशीम, अलुबुखार, मुरंबे, पेपरमिंट, कँडी इ. वस्तूंचे प्रामुख्याने उत्पादन होते. पारंपारिक गृहोद्योगांतून लोखंडी किटल्या, जपानी छत्र्या, बुद्धवेदी, पॉलोनिया काष्ठाची कपाटे, पेट्या वगैरेंचे उत्पादन करण्यात येते. दुसऱ्या महायुद्धोत्तर काळात शहरात विकसित झालेल्या आधुनिक उद्योगांमध्ये शिवणयंत्रे, वीजउत्पादने, धातुउत्पादने इत्यादींची निर्मिती करणाऱ्या उद्योगांचा समावेश होतो. यामागाटा शहर हे व्यापार, वाहतूक यांचे केंद्र, तर पर्यटनदृष्ट्या आरोग्यस्थान व क्रीडाकेंद्र आहे. यामागाटाजवळील मौंट झाओझान पर्वतामधील अनेक स्कीमैदाने तसेच गरम पाण्याच्या (उष्णोदकाच्या) झऱ्यांच्या विपुलतेमुळे येथे अनेक आरोग्यस्थाने उभारण्यात आली आहेत. शहराजवळील होशूयामानामक उभ्या चढणीच्या डोंगरपायथ्याशी बौद्ध धर्माच्या तेंडाई उपपंथाचे रिशाकुजीनामक एक देऊळ आहे. एनिन ह्या बौद्ध भिक्षूने या मंदिराची ८६० मध्ये स्थापना केली असे मानतात. सोळाव्या शतकारंभकाळात मंदिराची स्थानिक युद्धांमुळे प्रचंड हानी झाली तथापि १५४३ च्या सुमारास एन्‌काईनामक एका साधूने या मंदिराचे पुनरुज्जीवन केले. मंदिराच्या प्रमुख सभागृहात हेइआनकालीन काष्ठबुद्धमूर्ती असून मंदिराच्या प्रांगणातच अनेक शिंतोपंथीय मंदिरे उभारलेली आढळतात. चेरी फळांच्या मोसमात हे मंदिर, तसेच प्रतिवर्षी ऑगस्टमध्ये भरणारा हानागासा उत्सव या गोष्टी पर्यटकांची मोठी आकर्षणे ठरली आहेत. शहरात यामागाटा विद्यापीठ व इतर शिक्षणसंस्था आहेत.

गद्रे, वि. रा.