डेथ व्हॅली : अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण खचदरी. १८४९ मध्ये सोन्याच्या शोधार्थ गेलेल्यांपैकी काहीजण येथे मृत्यू पावल्याने हे नाव पडले. सु. चार कोटी वर्षांपूर्वी ही दरी निर्माण झाली असून खचण्याची क्रिया अद्याप चालूच आहे. पॅनामिंट आणि ॲमार्गोसा पर्वतश्रेणींदरम्यानच्या २२५ किमी. लांबीच्या व ८ ते २४ किमी. रुंदीच्या या दरीचा तळ समुद्रसपाटीपेक्षा ८६ मी. खोल आहे. अमेरिकेतील कमाल तपमान ४९° से. व किमान पाऊस ४·२२ सेंमी. येथे आढळतो. २,००० वर्षांपूर्वीच्या सरोवराचे पाणी आटून सॉल्ट पॅन हा क्षारथरयुक्त प्रदेश झाला आहे. गोड्या पाण्याच्या झऱ्यांच्या आश्रयाने काही पॅनामिंट इंडियन राहतात. तेथे थोडा खजूर होतो. पिकल बीड. क्रिओसोट, वाळवंटी हॉली कॅक्टस इ. वनस्पती कांगारू, उंदीर, अँटिलोप खार इ. बिळवासी व त्यांवर जगणारे कायोट, किटफॉक्स इ. प्राणी मोठ्या शिंगांच्या मेंढ्या, विविध पक्षी व काही मासे ही येथील नैसर्गिक जीवसृष्टी आहे. नोव्हेंबर ते मे येथील हवा सुखकारक असते. येथील विषम परिस्थिती, सॉल्ट पॅनमधील डेव्हिल्स गॉल्फ कोर्स हा क्षारांच्या छोट्या बांधांचा व सुळक्याचा प्रदेश, २४ किमी. वरील ३,३६९ मी. उंचीचे टेलिस्कोप पीक, उबेहेबे ज्वालामुखी विवर, चित्रविचित्र खडक, उत्खातभूमी, बॅडवॉटर खोल प्रदेश इ. आकर्षणांमुळे वर्षभर येणारे प्रवासी व शास्त्रज्ञ यांसाठी विमानतळ, महामार्ग, निवास इ. सोयी केलेल्या आहेत.

तडकलेले सरोवर, डेथ व्हॅली, कॅलिफोर्निया.

लिमये, दि. ह.