वैजनाथ मंदिर व वरच्या चोकटीत ज्योतिर्लिंग, परळ वैजनाथ.परळी वैजनाथ : भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक. हे महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यामधील आंबेजोगाई तालुक्यात आहे. लोकसंख्या ३१,०७८ (१९७१). वैजनाथाचे मंदिर देवगिरीच्या यादवांचा श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले असावे. त्या मंदिराच्या अवशेषांपैकी फक्त नंदीच सुस्थितीत राहिलेला दिसतो. पुढे अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराचा जीर्णोद्वार केला (१७८३), असा उल्लेख तेथील एका संस्कृत शिलालेखात आढळतो. हरिहर, मार्कंडेय, नारायण ही तीर्थे आणि शनैश्वर, झुरळ्या गोपीनाथ यांची मंदिरे तसेच संत जगमित्र नागा यांची समाधी या गोष्टी प्रेक्षणीय आहेत. वैजनाथ मंदिरास पश्चिम सोडून इतर तीनही दिशांना प्रवेशद्वारे आहेत. मंदिराचा सभामंडप १९०४ मध्ये रामराव देशपांडे या दानशूर गृहस्थाने बांधला. सभामंडपात एक पितळी व दोन पाषाणी अशा नंदीच्या तीन मूर्ती आहेत. येथे वीरभद्राची एक भव्य पितळी प्रतिमा आहे. मंदिरात मंडपाशिवाय दोन गाभारे असून त्यांचे दरवाजे कलात्मक नक्षीने सजविलेले आहेत. मुख्य ज्योतिर्लिंगाच्या सभोवताली असलेल्या बारा लिंगांमुळे बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घडते.

परळी हे रेल्वे प्रस्थानक असून रुंदमापी व मीटरमापी असे दोन्ही लोहमार्ग येथे आहेत. शहरातील बाजारपेठ बरीच मोठी असून धान्यव्यापाराचे हे एक केंद्र समजले जाते. येथे वैद्यनाथ महाविद्यालय व ६० मेवॉ. क्षमतेचे मोठे औष्णिक वीज केंद्र आहे.

येथे पाऊस मध्यम स्वरूपाचा पडतो. पिवळी ज्वारी, भुईमूग, कापूस ही पिके प्रामुख्याने घेतली जात असून अलीकडे उसाचेही उत्पादन केले जाते.

परळीकर, नरेश