ओमाहा : अमेरिकेतील नेब्रॅस्का राज्यातील सर्वांत मोठे शहर. लोकसंख्या, उपनगरांसह ३,४७,३२८ (१९७०). हे मिसूरी नदीच्या तीरावर, शिकागोच्या पश्चिमेस ६८४ किमी असून दळणवळणाचे, उद्योगधंद्यांचे व जलवाहतुकीचे मोठे केंद्र आहे. तेलशुद्धी, शिसेशुद्धी, मांस डबाबंद करणे, कृषिअवजारे, यंत्रे, पेये, दुधापासूनचे  पदार्थ वगैरे उत्पादने व उद्योग येथे असून धान्याची मोठमोठी गुदामे आहेत. येथे हवाईदलाचा ऑफट विमानतळ, उद्याने, प्रार्थनामंदिरे तसेच ओमाहा व क्रूक हे भुईकिल्ले आहेत. ‘बॉइज टाउन’ ही निराश्रित मुलांसाठी स्वावलंबनाने चालविलेली संस्था, क्रेटन विश्वविद्यालय, नेब्रॅस्का विद्यापीठाचे भिषग महाविद्यालय व परिचारिका विद्यालय, ओमाहा नगरपालिकेचे विद्यापीठ, डचेस्ने महाविद्यालय, सेंट मेरी महाविद्यालय, ग्रेस बायबल संस्था, बहिऱ्यांकरिता राज्य सरकारचे विद्यालय वगैरे अनेक शैक्षणिक संस्था आहेत.

लिमये, दि. ह.