बोखुम : प. जर्मनीच्या नॉर्थ ऱ्हाईन-वेस्टफेलिया राज्यातील रुर या औद्योगिक दृष्ट्या प्रगत जिल्ह्यातील शहर. लोकसंख्या ४,०२,९८८ (१९७९). हे ड्युसेलडॉर्फच्या ईशान्येस ४० किमी. वर वसलेले आहे.
इ. स. नवव्या शतकापासून याचा उल्लेख आढळतो. १२९८ व १३२१ मध्ये यास सनद मिळाली. एकोणिसाव्या शतकापर्यंत कृषिव्यवसायावर अवलंबून असलेले हे एक लहानसे शहर होते. परंतु रुर खोऱ्यातील दगडी कोळशामुळे याचा झपाट्याने विकास झाला आणि जिल्ह्याचे एक प्रमुख औद्योगिक व सांस्कृतिक केंद्र म्हणून ते प्रसिद्धीस आले. दुसऱ्या महायुद्धामुळे शहराची अतोनात हानी झाली होती युद्धोत्तर काळात त्याची पुनर्रचना करण्यात आली.
लोखंडाच्या खाणीमुळे खाणकाम हा १९५० पर्यंत येथील प्रमुख व्यवसाय होता. परंतु नंतरच्या काळात मोटारनिर्मिती, रसायने, रंग, कापड, विद्युत्जनित्रे, तंबाखूचे पदार्थ, अन्नप्रक्रिया, मद्ये इ. उद्योगांच्या कारखान्यामुळे बोखुमचा आर्थिक कायापालट झाला. शैक्षणिक केंद्र म्हणूनही हे प्रसिद्ध असून येथील रुर विद्यापीठ (स्था. १९६५) उल्लेखनीय आहे. खाणकाम, भूशास्त्र आणि धातुकाम यांचे खास शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येथे येतात. येथील दुसऱ्या महायुद्धाच्या विध्वंसनातून बचावलेले इतिहासप्रसिद्ध प्रायरी चर्च (१५९९) व खाणकाम आणि भूविज्ञानविषयक संग्रहालय प्रसिद्ध आहे.