कार्पेथियन : मध्य व पूर्व यूरोपातील पर्वतश्रेणी. हिमयुगाच्या तृतीयकालीन घडामोडींमधील उत्थानात हिचा जन्म झाला असून, ही श्रेणी आल्प्स व बाल्कन यांमधील दुवा समजली जाते. भूशास्त्रीयदृष्ट्या ही जटिल पर्वतश्रेणी असून अद्याप तिचे पूर्ण समन्वेषण व्हावयाचे आहे. ऑस्ट्रिया-चेकोस्लोव्हाकिया सरहद्दीवरील, डॅन्यूबकाठच्या ब्रात्यिस्लाव्हा शहरापासून या श्रेणीची सुरुवात होते.

कार्पेथियन पर्वतामधील एक गिरिविहारस्थळ

सुरुवातीला उत्तरेकडे व मग आग्नेयीकडे वळून चेकोस्लोव्हाकिया, पोलंड, यूक्रेन व रुमानियात तो अर्धवर्तुळाकार पसरत जाते. यूगोस्लाव्हिया-रूमानिया यांच्या सरहद्दीवरील डॅन्यूबनिर्मित ‘आयर्नगेट’ या पाच किमी. लांबीच्या खोल घळीजवळ कार्पेथियनचा शेवट मानला जातो. येथपर्यंत ही पर्वतश्रेणी सु.१,४४० किमी. लांब असून हिची जास्तीत जास्त रुंदी २५६ किमी. आहे. मध्यभागी हिची रुंदी ६०—९६ किमी. असून चेकोस्लोव्हाकिया–पोलंड सरहद्दीवरील ‘डूकला’ खिंडीमध्ये तिची रुंदी फक्त ३२ किमी. आहे. डूकलाशिवाय याब्लनित्स, लूपकूफ इ. अनेक खिंडी या पर्वतश्रेणीमध्ये असून इतिहासात त्या महत्त्व पावल्या आहेत. कार्पेथियनच्या अनेक शाखा निरनिराळ्या नावांनी ख्यात आहेत, उदा., तात्रा, फात्रा, मात्रा, बेस्किड्‌झ, स्लोव्हॅक इत्यादी. कार्पेथियनचा मध्यभाग तात्राने व्यापला आहे. तात्रा अलपाइन, जटिल स्वरुपाची, उंच व रमणीय पर्वतमालिका असून, त्यातील २,६५५ मी. उंचीचे गेर्लाकोफ्का (पूर्वीचे स्टालिन) शिखर कार्पेथियनमध्ये सर्वोच्च आहे. याशिवाय या भागात २,४३० मी. वरील सोळा शिखरे आहेत. अनेक निसर्गरम्य सरोवरे, हिमोढ व हिमानीक्रिया झालेली अनेक स्थळे या भागात असल्याने कार्पेथियनचा एवढा भाग प्रवाशांचा विशेष आवडता बनला आहे. तात्राच्या पश्चिमेकडील भाग बेस्किड्‌झ रांगांनी व्यापला असून त्यातही पूर्व-पश्चिम विभागणी करतात. बाबिया गोरा हे १,७२३ मी. उंचीचे यामधील सर्वोच्च शिखर असून डूकला, याब्लुकॉफ व इतर काही महत्त्वाच्या खिंडी यामध्ये आहेत. ही श्रेणी बहुतांशी चेकोस्लोव्हाकिया–पोलंड सरहद्दीवर आहे. तात्राच्या पूर्वेकडील कार्पेथियनचा भाग पश्चिम भागापेक्षा कमी जटिल असून मॉल्डेव्हियन, ट्रान्सिल्व्हेनियम आल्प्स व बिहोर या तीन रांगांनी तो व्यापला आहे. फागाराश हे यांमधील २,५४५ मी. उंचीचे सर्वोच्च शिखर आहे. ट्रान्सिल्व्हेनियन आल्प्स हा रूमानियाचा कणाच समजला जातो. तात्राप्रमाणेच या भागातही लोंबते कडे, हिमगव्हर, प्रशिखा इ. हिमानीक्रिया झालेली विविध स्थळे विपुल आढळतात. कार्पेथियनच्या पूर्वेस नीस्तर–विस्तुला यांची समृद्ध नदीखोरी आहेत. तर पश्चिमेस डॅन्यूबचे समृद्ध नदीखोरे आहे. कार्पेथियनमध्ये भरपूर खनिजसंपत्ती आहे तथापि ती आर्थिक दृष्ट्या कमी महत्त्वाची आहे. कार्पेथियन परिसरात पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, कोळसा, लोहधातुक, पारा, तांबे, मॅग्नेसाइट, बॉक्साइट, पायराइट, चांदी, सोने, लवण व किंमती दगड सापडतात. अनेक ठिकाणी औषधी पाण्याचे झरे असून झाकॉपाने (पोलंड), सिनाइया (रूमानिया) ही हवा खाण्याची प्रसिद्ध ठिकाणे आहेत. कार्पेथियनमधील हवामान खंडांतर्गत – लांब थंड हिवाळे आणि उष्ण उन्हाळे – असून उन्हाळ्यात जोरदार पाऊस पडतो. पश्चिमेकडे पाऊस १४० सेंमी. पासून पूर्वेकडे ६० सेंमी. पर्यंत कमी होत जातो. जंगलव्याप्त प्रदेशात सूचिपर्णी वृक्षांची दाट अरण्ये असून लांडगा, अस्वल, लिंक्स, हरणे इ. प्राणी त्यात आढळतात. प्रामुख्याने स्लाव्ह व मग्यार या जातीच्या लोकांनी कार्पेथियन व्यापला असून, त्यांच्या जीवनात कार्पेथियनने निश्चित स्थान मिळविले आहे.

शाह, र. रू.