चांपानेर : गुजरात राज्यातील पंचमहाल जिल्ह्याच्या हालोल तालुक्यातील एक ऐतिहासिक स्थळ. लोकसंख्या १,०३३ (१९६१). १४८४ ते १५३५ पर्यंत गुजरात राज्याची राजधानी असलेले हे स्थळ चांपानेर रोड-पानि मिनेस या छोट्या रेल्वेवरील हालोल स्थानकाच्या ६ किमी. पूर्वेस, बोडेली-गोध्रा रस्त्यावर बडोद्यापासून ५१ किमी. आणि गोध्रापासून ४३ किमी. अंतरावर, पावागढ डोंगराच्या पायथ्याशी आहे. अनहिलवाड नृपती वनराज चावडा (७४६ – ८०६) याच्या कारकीर्दीत हे वसविले असावे. पावापुरी व चंपापुरी या सदृश गुजरातेतील जैन तीर्थक्षेत्रे म्हणून अनहिलवाडच्या प्रधानांनी चांपानेरची वाढ केली असावी कारण अकराव्या शतकात जैनांचे प्राबल्य येथे होते. जीरावाला पार्श्वनाथ, बावन जिनालय आदी जैन वास्तुशिल्पांची निर्मिती याच काळातील आहे. गुजरातेतून माळव्यास जाणाऱ्या रस्त्यावरील मोक्याचे ठिकाण म्हणून यास जास्त महत्त्व आहे. अल्लाउद्दीन खिल‌्जीने चांपानेर आणि अनहिलवाडचे राज्य नष्ट केले (१२९७), तेव्हा राजपुतान्याहून पळालेल्या चौहान राजवंशीयांनी चांपानेरला राज्य स्थापले. १४८४ मध्ये गुजरातचा सुलतान महमूद बेगडा याने चांपानेर जिंकले अहमदाबादाहून आपली राजधानी येथे आणली व शहराला महमूदाबाद चांपानेर नाव दिले. याच्या कारकिर्दीत चांपानेर खूप भरभराटले. येथील तीक्ष्ण धारेच्या तलवारी व तलम, रंगीत रेशमी कापड यांचा भारत व परदेशातही नावलौकिक झाला. व्यापारी आणि कारागीर यांनी शहर गजबजलेले असे. आखीव बांधकाम, बागा, तलाव, भव्योदात्त व कलापूर्ण मशिदी, राजवाडे असलेल्या चांपानेरची वर्णने पोर्तुगीज प्रवाशांनी लिहिली आहेत. १५३५ मध्ये हुमायूनने चांपानेर नष्ट केले. गुजरातची राजधानी पुन्हा अहमदाबादला गेली. माळव्याचा रस्ता बदलला आणि चांपानेर जंगलात गडप झाले.

शाह, र. रू.