यूरग्वाय नदी : दक्षिण अमेरिकेतील एक प्रमुख नदी. लांबी सु. १,६१० किमी. ब्राझीलच्या दक्षिण भागातील सेरा दू मार या डोंगररांगेत (अटलांटिक महासागरापासून सु. ५८ किमी.) पिलोटस हा या नदीचा मुख्य शीर्षप्रवाह उगम पावतो व वायव्य दिशेने वाहत जातो. पीराटूबा गावाजवळ त्याला उजवीकडून कानोअस व पेइक्से या छोट्या नद्या येऊन मिळतात व ब्राझीलमधील मर्सिलीनू रामुस शहरापासून हा संयुक्त प्रवाह यूरग्वाय या नावाने ओळखला जातो. या शहरापासून यूरग्वाय नदी पश्चिमेस वाहते. या एकूण ४०२ किमी.च्या प्रवाहानंतर ही नदी ईटापिरांग्‌ग शहराजवळ नैर्ऋत्येस वळते. पश्चिमेकडील कठिण खडकाच्या ब्राझील पठारामुळे या नदीच्या प्रवाहाची दिशा बदलते. प्रथम नैर्ऋत्येस, नंतर दक्षिणेस, व शेवटच्या टप्प्यात आग्नेयीस या क्रमाने नदी अर्धचंद्राकार वळण घेऊन अखेर ब्वेनस एअरोझ शहराच्या उत्तरेस पाराना नदीला मिळते व ला प्लाता हा त्यांचा संयुक्त प्रवाह पुढे अटलांटिक महासागराला मिळतो.

सुरुवातीचा ४०२ किमी.चा प्रवाह वगळता ही नदी प्रथम ब्राझील – अर्जेंटिना व नंतर यूरग्वाय – अर्जेंटिना यांच्या सरहद्दीवरून वाहते. सुरुवातीच्या भागात नदी सामान्यपणे कठिण ब्राझीलियन खडकाळ प्रदेशातून वाहत असल्याने तिच्या मार्गात अनेक द्रुतवाह, धबधबे तसेच अरुंद व खोल घळया निर्माण झाल्या आहेत. प्रवाहात अनेक लहानलहान बेटे निर्माण झाली असल्याने हा भाग जलवाहतुकीच्या दृष्टीने फारसा उपयुक्त नाही. यूरग्वायना शहरानंतर (यूरग्वाय सरहद्द) नदीच्या दक्षिणवाही प्रवाहात साल्टो (यूरग्वाय) शहरापर्यंत अनेक धावत्ये व धबधबे तयार झाले आहेत. हा प्रदेश साल्टो ग्रांदे या नावाने ओळखला जातो. या भागातील धबधब्यांचा वीज निर्मितीसाठी यूरग्वाय व अर्जेंटिना यांच्या परस्पर – सहकार्याने चांगल्या प्रकारे उपयोग करून घेण्यात आला आहे. या भागात सु. ३ किमी.च्या अंतरात नदी मूळ पातळीपेक्षा सु. ८ किमी. खाली येते. या भागात पात्रही खूप अरुंद (सु. ३० ते ४५७ मी.) असून खोल दऱ्यांचे आहे. साल्टो शहरापासून पुढे नदीमुखापर्यंतचे पात्र खूपच रुंद (काही ठिकाणी सु. ६ किमी.पर्यंत) असून जलवाहतुकीच्या दृष्टीनेही सोयीचे आहे. परंतु मोठ्या सागरगामी बोटी मात्र पायसांडू बंदरापर्यंतच येऊ शकतात.

यूरग्वायच्या बहुतेक उपनद्या तिला डावीकडून मिळतात. त्यांत प्रामुख्याने ईझ्वी, ईबीक्वी, क्वारेन, नेग्रो या नद्यांचा समावेश होतो. यांपैकी नेग्रो ही तिची सर्वांत मोठी उपनदी आहे. उजवीकडून आग्वापे, मीरींई या छोट्या नद्या तिला येऊन मिळतात. उजवीकडील बहुतेक सर्व मोठ्या नद्या पश्चिमेस यूरग्वाय नदीला समांतर वाहणाऱ्या पाराना या मोठ्या नदीला जाऊन मिळतात. नदीखोऱ्यात प्रामुख्याने मेंढपाळ, गुरेपालन हे व्यवसाय असल्याने यूरग्वायना शहर वगळता इतर फार मोठी शहरे नाहीत. कोंग्‌कॉरद्या, साल्टो ही बंदरे शेतमालाच्या व्यापाराची प्रमुख केंद्र म्हणून प्रसिद्ध आहेत तर पायसांडू व फ्राय व्हेंतोस ही मांस डबाबंदीकरण उद्योगासाठी प्रसिद्ध आहेत. गुरे, मांस, कातडी, लोकर इत्यादींच्या वाहतुकीसाठी या नदीचा प्रामुख्याने उपयोग होतो. ला प्लाता नदीवरील माँटेव्हिडिओ व ब्वेनस एअरीझ या मोठ्या बंदरांमुळे या नदीवर फार मोठी बंदरे विकसित झाली नाहीत. पाराना – यूरग्वाय नदीखोरे हे दक्षिण अमेरिकेत ॲमेझॉन खोऱ्याच्या खालोखाल समजले जाते.

चौंडे, मा. ल.