थिबा राजाचा जुना राजवाडा

मंडाले : ब्रह्मदेशातील याच नावाच्या विभागाचे व जिल्ह्याचे मुख्य ठिकाण, लोकसंख्या ४,१७,२६६ (१९७३). हे रंगूनच्या उत्तरेला सु. ५६४ किमी. इरावती नदीकाठी वसलेले असून देशातील एक प्रमुख धार्मिक व सांस्कृतिक केंद्र म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना येथेच कारावासात ठेवण्यात आले होते. हे देशाच्या मध्यवर्ती भागात वसलेले असल्याने रस्ते, लोहमार्ग, वायुमार्ग व इरावती नदीद्वारे जलवाहतूक यांमुळे एक प्रमुख व्यापारी दळणवळण केंद्र म्हणून विकास पावलेले आहे. देशात रंगूननंतर दुसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून हे प्रसिद्ध आहे.

मिंदॉन मिन राजाने १८५७ मध्ये हे वसविले व येथे राजधानी केली. ब्रिटिशांचा अंमल प्रस्थापित होईपर्यंत येथेच ब्रह्मी राज्याची राजधानी होती (१८६०-८५). ब्रिटिश अंमलात अपर वर्माचे मुख्यालय येथे करण्यात आले. दुसऱ्या महायुद्धकाळात शहराचा बहुतांश भाग उद्ध्वस्त झाला. महायुद्धोत्तर काळात मात्र शहराचा योजनाबद्ध विकास करण्यात आला. ब्रह्मदेशातील एक प्रमुख व्यापारी व औद्योगिक केंद्र म्हणूनही यास महत्त्व आहे. येथील सोन्या-चांदीचे कलाकाम प्रसिद्ध असल्यामुळे यास ‘सुवर्ण नगरी’ असेही संबोधिले

जाते. याशिवाय रेशीम, विणकाम, लाकडावरील व मौल्यवान हरितमण्यांचे कोरीवकाम यांसारखे पारंपरिक हस्तव्यवसाय येथे चालतात. चहा, आगपेट्या, मद्यनिर्मिती इ. उद्योग विकास पावलेले आहेत. येथील ‘झेग्यो बाजार’ कलावंत, शेतकरी, व्यापारी, पर्यटक इत्यादींचे प्रमुख आकर्षण मानला जातो. शैक्षणिक क्षेत्रातही हे शहर अग्रगण्य असून येथे एक विद्यापीठ (१९५८) आहे. याशिवाय शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालय, कृषी, तंत्रविद्या, वैद्यक इत्यादींच्या शिक्षणसंस्था तसेच ललित कला, संगीत, नाटक इत्यादींच्या सांस्कृतिक संस्था येथे आहेत.

येथे अनेक पॅगोडे व मंदिरेही आहेत. मंडाले हिल (२२७ मी.) व तेथील पॅगोडा आणि मठ, १८७० मध्ये येथे भरलेल्या पाचव्या बौद्ध परिषदेच्या स्मरणार्थ मिंदॉन राजाने उभारलेल्या बौद्ध शिकवणुकीच्या १.५ मी. उंचीच्या संगमरवरी ७२९ लेख शिला, मिंदॉन व थिबा यांचा राजवाडा, डफरिन किल्ला, ७३० पॅगॉडे, तसेच जवळील आराकान (महा म्या मुनी) पॅगोडा, अमरपुरा या १८५९ पर्यंतच्या ब्रह्मी राज्याच्या राजधानीचे अवशेष व मोठ्या घंटेमुळे प्रसिद्ध असलेला मिंगून पॅगोडा इत्यादींमुळे मंडालेस देशातील प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून महत्त्व प्राप्त झालेले आहे.

गाडे. ना. स.