ग्वांगसे : चीनचा दक्षिणेकडील एक प्रांत. क्षेत्रफळ २,४०,१०० चौ.किमी. लोकसंख्या २,४०,००,००० (१९७० अंदाज). याच्या दक्षिणेस ग्वांगटुंग, पूर्वेस ग्वांगटुंग व हूनान, उत्तरेस हूनान व ग्वेजो आणि पश्चिमेस युनान व उत्तर व्हिएटनाम आहेत. कर्कवृत्त याच्या मध्यातून जाते. राजधानी नान्निंग, ग्वेलिन आणि वूजो ही मोठी शहरे आहेत. सी व तिच्या उपनद्या वाहतुकीस उपयोगी आहेत. त्यांना रस्ते आणि लोहमार्ग यांची जोड आहे. हवामान समशीतोष्ण असून आर्द्र भागात भाताची दोन पिके व एक जिराईत पीक, कमी पावसाच्या भागात मका, रताळी इ. शिवाय बडीशेप, दालचिनी, लिंबू व इतर फळे ही रोखीची पिके होतात. डोंगराळ भागात टणक लाकडाचे वृक्ष आणि बांबूची बने असून कापराची व तुंगची झाडे विपुल आहेत. अँटिमनी व मँगॅनीज ही येथील प्रमुख खनिजे होत.

प्राचीन काळी हान या चिनी जमातीचा लोंढा हूनान, ग्वांगटुंग इ. भागांतून आल्यामुळे मूळच्या जमातींना पश्चिमेकडील डोंगराळ भागात आश्रय घ्यावा लागला. तथापि या जमातींचा अल्पसंख्य गट प्रबळ असल्यामुळे १९५८ च्या प्रांतपुनर्रचनेच्या वेळी ग्वांगसे च्वांग स्वायत्त विभाग अस्तित्वात आला आहे.

ओक, द. ह.