गिरनार : गुजरात राज्यातील व त्याच्या सौराष्ट्र विभागातील सर्वांत उंच डोंगर (१,११७ मी.). हा सौराष्ट्राच्या ट्रॅप खडकाच्या मध्यवर्ती पठाराच्या नैर्ऋत्य भागात असून भादरची उपनदी ओजत हिच्या शिररक्षणामुळे तो दक्षिणेकडील गीर डोंगररांगेपासून अलग झाला आहे. त्याचा घुमटाकृती मध्यभाग डायोराइट व माँझोनाइट यांचा बनलेला आहे. यांच्या अनेक शिखरांपैकी अंबामाता, गोरखनाथ, नेमिनाथ, गुरुदत्तात्रेय व कालिका ही विशेष प्रसिद्ध आहेत. गोरखनाथ सर्वांत उंच आहे. गिरनारवर गोमुखी, हनुमानधारा व कमंडलू ही पवित्र कुंडे असून पायथ्याजवळच्या दामोदर कुंडात हाडे विरघळतात, या समजुतीने काही लोक त्यात मृतास्थी विसर्जन करतात.

गिरनार हे शाक्त, दत्त व जैन पंथीयांचे फार पवित्र क्षेत्र आहे. अंबामाता शिखरावरील अंबेचे देवालय एक महत्त्वाचे शक्तिपीठ मानले जाते. नवपरिणीत दांपत्यास देवीच्या पायांवर घालण्यासाठी येथे आणण्याची प्रथा आहे. गोरखशिखर ही गोरखनाथाची आणि गुरुशिखऱ ही दत्तात्रेयाची तपोभूमी म्हणून दाखविली जाते. जैनांचा बाविसावा तीर्थंकर नेमिनाथ याचे निर्वाण गिरनारवर झाले. नेमिनाथ शिखरावर त्याचे भव्य व संपन्न देवालय आहे. पालिताण्याजवळील शत्रुंजयाची यात्रा गिरनार चढून गेल्याशिवाय पुरी होत नाही, या समजामुळे गिरनारच्या यात्रेकरूत जैन बहुसंख्य असतात. कालिका शिखरावर अघोरी पंथीयांचा अड्डा असे. भैरवजप खडक हे गिरनारवरील एक नजरेत भरणारे वैशिष्ट्य आहे. पुनर्जन्म चांगला मिळावा म्हणून त्यावरून खालच्या खोल दरीत उडी टाकून कित्येक लोक देहत्याग करीत. आता याला कायद्याने बंदी आहे.

गिरनारची प्राचीन नावे उर्ज्जयंत, रैवतक, प्रभास, वस्त्रापथ क्षेत्र अशी आहेत. सुभद्राहरण येथेच झाले. श्रीकृष्णकालीन रैवतक महायात्रा येथे हल्ली कार्तिक शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत भरते.

अशोकाच्या पूर्वीचेही गिरनारचे उल्लेख सापडतात. जैनांचा पहिला तीर्थंकर ऋषभदेव यानेही त्याचा उल्लेख केला आहे. येथे इ.स.पू.सु. २५० मधील अशोककालीन शिलालेख आहे. इ.स. १५० च्या शिलालेखात रुद्रदामन राजाने दख्खनच्या राजाचा पराभव केल्याचा आणि सुदर्शन तळे दुरुस्त केल्याचा उल्लेख आहे. चंद्रगुप्त मौर्याने बांधलेल्या तळ्याची पुन्हा दुरुस्ती स्कंदगुप्तकालात झाल्याचा उल्लेख ४५५ च्या शिलालेखात आहे. ‘रा’ खेंगार व चुडासमा राजपुतांच्या प्रासादांचे भग्नावशेष गिरनारवर आहेत.

जुनागढपासून आठ किमी.वरील गिरनारला जाण्यास वाहने व वर चढून जाण्यास डोल्या मिळतात. 

कुमठेकर, ज. ब.

गुरूदत्तात्रेय शिखरगिरनार पर्वतदत्तात्रेय मंदिरगोरखनाथ मंदिरगिरनार येथील शिलालेखाचा एक भागगिरनारवरील जैन मंदिरजुम्मा मशीद महावतएका जैन मंदिरातील शिल्पांकन