राधानगरी : महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ४,५५८ (१९८१). हे गाव कोल्हापूरच्या नैऋत्येस ४८ किमी. अंतरावर वसलेले आहे. राधानगरी हे मध्यम पाटबंधारे प्रकल्पातील धरण बांधण्यात आले असून (१९५४), त्यामुळेच या गावाला महत्त्व प्राप्त झालेले आहे. कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी पूर्वी येथे एक छोटेसे धरण बांधले होते. त्याच्याजवळच हल्लीचे धरण बांधण्यात आले आहे. २·०४ कोटी रु. खर्चून बांधलेल्या या धरणाची लांबी १,१४३ मी., उंची ४२·६९ मी., पाण्याखालील क्षेत्र ११० चौ. किमी., जलसंचय क्षमता २,३९२·८ ल. घ. मी. व धरणाची माथ्यावरची रुंदी ५·५८ मी. आहे. जलसाठा नदी – उगमाकडे १६ किमी. पर्यंत पसरलेला दिसतो. धरणाची जलसिंचन क्षमता २६,५६० हे. असूनही प्रत्यक्षात १७,८०० हे. क्षेत्रच ओलिताखाली होते (१९८०). धरणामुळे तयार झालेल्या जलाशयास ‘लक्ष्मी तलाव’ म्हणतात. पाणलोट क्षेत्रात भरपूर पर्जन्यवृष्टी (२०० ते २५० सेंमी) होत असल्याने धरणात पाण्याचा पुरेसा साठा होऊ शकतो. धरणाच्या पाण्याचा ऊसपिकासाठी उपसा जलसिंचनपद्धतीने मोठ्या प्रमाणावर उपयोग करून घेतला जातो. धरणाच्या पायथ्याशी ४·८ मेवॉ. क्षमतेचे जलविद्युतनिर्मिती केंद्र उभारण्यात आलेले असून, त्यातील वीज कोल्हापूर, सांगली व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील अनेक गावांना पुरविली जाते.जलाशयात मत्स्योत्पादनाविषयीचे प्रयोग केले जात असून राधानगरी येथे त्याचे एक कार्यालय आहे.

राधानगरीच्या परिसरातील दाजीपूर भागातील जंगल ‘गवा अभयारण्य’ म्हणून घोषित केलेले असून, जंगली प्राणी नैसर्गिक अवस्थेत पाहण्यासाठी तेथे एक टेहळणी बुरूजही तयार करण्यात आला आहे. राधानगरी धरण, गवा अभयारण्य व हिरव्यागार वनश्रीने वेढलेला रमणीय परिसर इत्यादींमुळे पर्यटन केंद्र म्हणून राधानगरीला महत्त्व प्राप्त झालेले आहे.

चौधरी, वसंत