जूबा : सोमाली प्रजासत्ताकाची प्रमुख नदी. लांबी गानालेसह सु. १,५०० किमी. इथिओपियात उगम पावून सीमेवरील डोलो येथे गानाले, दावा आणि वेब एकत्र होऊन जूबा नावाने पुढे जातात. जूबा ८७९ किमी. वाहत जाऊन किसमायूच्या उत्तरेस १६ किमी. हिंदी महासागराला मिळते. उगमाकडील जून ते सप्टेंबर आणि खालच्या भागातील इतर महिन्यांतील मधून मधून पडणाऱ्या पावसामुळे जूबा बारमहा वाहते. बार्देराच्याही वर ३२ किमी. पर्यंत सपाट तळाच्या नौका जातात. जूबाचे खोरे रुक्ष आहे, यामुळे जूबाच्या तटप्रदेशातच फक्त वनस्पती आहेत, मुखाजवळ जमीन चिकणमातीची व खनिजयुक्त आहे. तेथे अरण्ये आहेत. अरण्यांत वन्यपशू व नदीत सुसरी भरपूर आहेत. मुखापासून ४५० किमी. आतपर्यंत फक्त १·५ किमी. रुंदीच्या पट्ट्यातच कापूस, भुईमूग, सिसल, तीळ, डुरा, मका, तांदूळ ही पिके होतात. या पट्ट्याबाहेर लोक उंट, गुरेढोरे वगैरेंचे कळप घेऊन भटकत राहतात. जूबाच्या काठी डोलो, लूग फेरांडी, बार्देरा, जेलिब, जमामा ही मुख्य गावे आहेत. ती लमाणमार्गांनी जोडलेली आहेत.

यार्दी, ह. व्यं. कुमठेकर, ज. ब.