ल हाव्र्ह : उत्तर फ्रान्समधील मार्सेनंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे बंदर व औद्योगिक शहर. लोकसंख्या २,००,४११ (१९८२ जनगणना). हे सॅन-मॅरिटाइम प्रांतात, ओट-नॉर्मंडी विभागात इंग्लिश खाडीच्या किनाऱ्यावर, सेन नदीमुखाच्या उजव्या तीरावर वसले आहे. ते रस्त्याने पॅरिसच्या पश्चिम-वायव्येस २१६ किमी. आणि रूआनच्या पश्चिमेस ८५ किमी. अंतरावर आहे.

सोळाव्या शतकापर्यंत (१५१७) एक मच्छीमार गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणी पहिल्या फ्रान्सिस राजाने (कार. १५१५-४७) बंदर उभारले आणि त्याचे नाव ‘हाब्र्ह दी ग्रेस’ (हेव्हन ऑफ ग्रेस-कृपेचे आश्रयस्थान-कृपाबंदर) असे ठेवले. कार्डिनल दे रीशल्य (१५८५-१६४२) आणि चौदावा लूई (कार. १६४३-१७१५) यांच्या काळात या बंदराचा व शहराचा विकास करण्यात येऊन याला गढी वा किल्लेवजा भिंत बांधण्यात आली. सोळाव्या लूईच्या काळात (कार. १७७४-९२) मोठमोठी जहाजे त्याच्या बंदरधक्क्याला लागू शकतील, अशा तऱ्हेने त्याचा विकास करण्यात आला. तिसऱ्या नेपोलियनच्या काळात (१८५२-७०) ल हाव्रहची आणखी वाढ होत गेली. दुसऱ्या महायुद्धात अँटवर्प व ऑस्टेंड हे तळ शत्रुपक्षाच्या हाती पडल्यानंतर बेल्जियन सरकारने काही काळ ल हाव्र्हमध्ये आपले प्रशासकीय कार्यालय स्थापन केले होते. दुसऱ्या महायुद्धात या शहरातील सु. ७५ टक्के इमारती जर्मनांनी प्रचंड बाँबवर्षाव करून उद्ध्वस्त केल्या. या शहरावर जर्मनांनी १७० वेळा बाँबहल्ले केल्याची नोंद आहे. तथापि १९४४ नंतर बंदराची पुनर्बांधणी तसेच शहरातील इमारतींची पुनर्रचना जलद करण्यात आली.

मुख्यत्वेकरून पॅरिस व त्याचा परिसर यांची सागरी वाहतूकसेवा या बंदरामार्फत केली जाते. सेन नदीचा जलमार्ग, रेल्वे, द्रुतगतिमोटारमार्ग व तेलनळ या माध्यमांद्वारा पॅरिसला हे बंदर उपयोगी पडू शकते. सु. २,५०,००० टन वजनाचे टँकर बंदराच्या धक्क्याला लागू शकतील, अशा तऱ्हेने बंदराची खोली वाढविण्यात आली आहे. बंदरगोद्या पूर्वेकडील बाजूने वाढविण्यात आल्यामुळे मोठी पेटी जहाजे (कंटेनर शिप) व मोटारवाहक अन्य मोठी जहाजे यांसाठी हे बंदर अतिशय उपयुक्त ठरले आहे.

ल हाव्र्हच्या बंदरक्षेत्रात तेलशुद्धीकरण, रसायने, खते, अलोह धातू, अन्नप्रक्रिया, लाकूडकापणी गिरण्या, जहाजबांधणी, वीजनिर्मिती हे उद्योग विकसित झाले आहेत. यांशिवाय यंत्रे व यांत्रिक अवजारे, मोटारगाड्या टायर, सिमेंट इत्यादींचे निर्मितिउद्योगही येथे आहेत. दोरखंड तयार करणे, इमारती लाकूड उत्पादन यांसारख्या जुन्या, पारंपरिक उद्योगांच्या विकासाकडेही लक्ष देण्यात येत आहे. बंदराशी निगडित अशा आणखी काही उद्योगांचा विकास करण्याच्या दृष्टीने सेन नदीमुखाच्या बाजूने सु. २४ किमी. क्षेत्राचा मोठा औद्योगिक पट्टा तयार करण्यात आला आहे. इंधनतेल, कापूस, कॉफी, गंधक, लाकूड, रबर या वस्तू बंदरातून आयात केल्या जातात, तर कृषिउत्पादने व तेल यांची निर्यात केली जाते.

शहराच्या मध्यभागी असलेली ‘प्लेस दे होटेल दे व्हिले’ही वास्तू सबंध यूरोपातील विशाल वास्तूंपैकी एक म्हणून मानली जाते. सोळाव्या-सतराव्या शतकातील नोत्रदाम चर्च हे जुन्या वास्तूंपैकी एक असून, दुसऱ्या महायुद्धात त्याचे बरेच नुकसान झाले होते. १९७०-७५ या काळात त्याचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. सेंट जोसेफ चर्च म्हणजे प्रबलित काँक्रीटची एक लक्षणीय वास्तू आहे. १९६१ मध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या संग्रहालयामध्ये जुन्या संग्रहालयातील (१९४४ मध्ये बाँबवृष्टीत जवळजवळ नष्ट झाले होते) बहुतेक वस्तूंचे संवर्धन करण्यात आले आहे. याच संग्रहालयात प्रख्यात फ्रेंच निसर्गचित्रकार अझेअन बृंदँ (१८२४-९८), तसेच याच शहरी जन्मलेला विसाव्या शतकातील फ्रेंच चित्रकार व अभिकल्पक राऊल द्यूफी (१८७७-१९५३) यांच्या उत्कृष्ट कलाकृतींचे जतन करण्यात आले आहे.

पंडित, भाग्यश्री