लाव्हॉव्ह : जर्मन-लेंबेर्ख. यूरोपीय रशियाच्या युक्रेन प्रजासत्ताकातील याच नावाच्या विभागाची राजधानी. कार्पेथियन पर्वताच्या उत्तरेकडील पायथ्याशी, बग व नीस्तर नद्यांच्या जलविभाजकावर लाव्हॉव्ह वसलेले आहे. लोकसंख्या ७,६७,००० (१९८७). गॅलिशियाच्या प्रिन्स दन्यील रमानव्हिच याने १२५६ मध्ये या शहराची स्थापना करून आपल्या ल्येफ या मुलाचे नाव त्यास दिले. युक्रेनमधील सर्वांत जुन्या शहरांपैकी हे एक आहे. पूर्वीच्या ऑस्ट्रो-हंगेरियन साम्राज्यातील गॅलिशिया विभागातील हे एक प्रसिद्ध ठिकाण होते. पुढे हा विभाग पोलंड व सोव्हिएट युनियनमध्ये विभागला गेला. १३४० मध्ये ते पोलिशांनी काबीज केले. १७७२ मधील फाळणीत ते ऑस्ट्रियाला देण्यात आले, तर १९१९ मध्ये पुन्हा हे पोलंडने घेतले. त्यानंतर हे पोलिश भाषेत लाव्हूफ म्हणून ओळखले जात होते. १९३९ मध्ये रशियन सैन्याने ते बळकावले. परंतु पोलंडने मात्र हे शहर १९४५ मध्ये औपचारिक रीत्या रशियाला दिले. दुसऱ्या महायुद्धात शहराचे अतोनात नुकसान झाले. १८४८ पासून युक्रेनियन राष्ट्रीय चळवळीचे हे प्रमुख केंद्र होते.

युक्रेनमधील हे एक महत्त्वाचे औद्योगिक, व्यापारी, सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र आहे. पूर्व-पश्चिम व दक्षिणोत्तर जाणाऱ्या व्यापारी मार्गांच्या छेदनबिंदूवर अगदी मोक्याच्या जागी वसविल्यामुळेच लाव्हॉव्हच्या औद्योगिक विकासास विशेष अनुकूलता लाभली. लाव्हॉव्हला नऊ लोहमार्ग व अनेक महामार्ग येऊन मिळतात. धातुकाम, वाहतूक साधने, सायकली, बसगाड्या, मोटारी, विविध अभियांत्रिकी उद्योग, खनिजतेल शुद्धीकरण, खाद्यपदार्थ निर्मिती, वस्त्रोद्योग, उपभोग्य वस्तुनिर्मिती, कृषी अवजारे, काच, रेडिओ व दूरचित्रवाणी संच, इतर इलेक्ट्रॉनिकी साहित्य, रसायने, बांधकामाचे साहित्य, रंग, औषधनिर्मिती इ. उद्योगधंदे शहरात फार मोठ्या सख्येने आढळतात. विद्यापीठ (स्थापना १६६१), तंत्रनिकेतन (१८४४), बॅले, रशियन व युक्रेनियन नाट्यगृहे, गायनविषयक संस्था, युक्रेनियन विज्ञान अकादमीच्या अनेक संशोधन संस्था, संगीत व कलाविद्यालय (१९०४), कला संग्रहालये, वस्तुसंग्रहालये इ. अनेक शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था शहरात आहेत. तेराव्या ते अठराव्या शतकांत उभारलेल्या वास्तुशिल्पांचे अनेक उत्कृष्ट नमुने शहरात पहावयास मिळतात. त्यांपैकी रोमन कॅथलिक, आर्मेनियन कॅथलिक, ग्रीक कॅथलिक, डोमिनिकन व जेझुइट इ. चर्च, नगरभवन, आर्चबिशपचा राजवाडा, कलावीथी इ. विशेष उल्लेखनीय आहेत. शहरात अनेक सुंदर बगीचेही आहेत.

 चौधरी, वसंत