इझ्राएल : (मेदिनात इझ्राएल). पश्चिम आशियातील नवोदित ज्यू-राष्ट्र. क्षेत्रफळ २०,७०० चौ. किमी. लोकसंख्या २९,९९,००० (१९७१) २९३०’ उ. ते ३३१५’ उ. व ३४१७’ पू. ते ३५४१’ पू. याच्या सीमा उत्तरेस ७९ किमी. लेबाननशी, पूर्वेस ५३१ किमी. जॉर्डनशी व ७६ किमी. सिरियाशी, दक्षिणेस व पूर्वेस मिळून २०६ किमी. ईजिप्तशी आणि पश्चिमेस ५९ किमी. गाझा पट्टीशी भिडल्या आहेत. याशिवाय सु. ७८ किमी. भूमध्यसमुद्र-किनारपट्टी तांबड्या समुद्राच्या अकाबाच्या आखातावरील सु. ४ किमी. किनाराही या देशाच्या सत्तेखाली आहे. 

भूवर्णन : भौगोलिक दृष्ट्या देशाच्या सरहद्दी नैसर्गिक नाहीत. १९४८ साली अरब राष्ट्रांशी झालेल्या तहांन्वये त्या ठरविण्यात आल्या आहेत. स्थूलमानाने इझ्राएलचे चार प्रमुख नैसर्गिक विभाग पडतात : (१) भूमध्यसामुद्रिक किनारपट्टी : ही देशाच्या पश्चिम विभागात असून उत्तरेस चिंचोळी व दक्षिणेस रुंद होत गेलेली आहे. (२) टेकाड प्रदेश : उत्तरेस गॅलिली, मध्यभागी ज्यूडीया व सामेरिया आणि दक्षिणेस नेगेव्हमधील टेकड्यांचा प्रदेश असे याचे उपविभाग मानता येतील. (३) जॉर्डन नदीचे खोरे : या खोऱ्याचा काही भाग जॉर्डनमध्ये तर उरलेला भाग इझ्राएलमध्ये आहे. ह्या विभागात असलेल्या टेकड्यांची उंची स्थूलमानाने समुद्रसपाटीपासून ६०० मी. असून मौंट मायरॉन (जेबेल जारमाक) हे शिखर १,२०८ मी. उंचीचे आहे. (४) नेगेव्हचा वाळवंटी प्रदेश : या वाळवंटी प्रदेशात, दक्षिण ज्यूडीया विभागातील टेकड्यांत काही ठिकाणी सुप्त ज्वालामुखीही आढळतात. या विभागात तांबड्या समुद्रावरील अकाबाच्या आखातापर्यंतचा भूभाग मोडतो. 

इझ्राएलमध्ये नैसर्गिक जलाशय अगदी कमी प्रमाणात आहेत. जॉर्डन नदीच्या एकूण ३२० किमी. लांबीपैकी ११८ किमी. इझ्राएल व जॉर्डन यांच्या सरहद्दीवर आहे. याशिवाय यॉरकोन, किशॉन व यारमूक या येथील प्रमुख नद्या होत. १६५ चौ.किमी. क्षेत्रफळाचे किनेरेट सरोवर (गॅलिली समुद्र), मृतसमुद्राचा दक्षिणेकडील एक चतुर्थाश भाग व उत्तरेकडील हुला सरोवर यांवर एझ्राएलची सत्ता चालते. 

या देशाचे हवामान भूमध्यसागरी आहे. हिवाळ्यात पाऊस पडतो. व उन्हाळे कोरडे असतात. जानेवारी महिन्यातील सरासरी कमाल व किमान तपमान अनुक्रमे २०·९ से. व ४·४ से. असून ऑगस्ट महिन्यातील सरासरी कमाल व किमान तपमान अनुक्रमे ४०·२ से. व १८·४ से. असते. पर्जन्यमान उत्तरेकडे सु. १०७ सेंमी. व दक्षिणकडे ३ सेंमी. असते. 

दक्षिणोत्तर असमान पर्जन्य, उंचसखल भूभाग, वाळवंटी प्रदेशाचे सान्निध्य व समुद्रसान्निध्य या सर्व कारणामुळे इझ्राएलमधील जमीन शेतीसाठी तितकीशी उपयुक्त नाही. तिच्यात चुनखडीचे प्रमाण जास्त आहे. 

येथील नैसर्गिक वनस्पती बहुतेक नष्ट झाली आहे. तथापि शासनाने काही ठिकाणी पाईन, ओक, निलगिरी इत्यादींची लागवड केली आहे. यांशिवाय येथे बाभूळ, कारोबा, खजूर, निरनिराळ्या औषधी वनस्पती तसेच हायसिंथ, क्रोकस, ट्यूलिप इ. फुलझाडे आढळून येतात. मोसंबी, संत्री, पेरू, केळी, अननस इत्यादींच्या बागा लावलेल्या आहेत. 

कोल्हा, तरस, रानडुक्कर, हरिण, रानमांजर, मुंगूस इ. प्राणी येथे असून निरनिराळ्या सु. ४० जातींचे पक्षी येथे आढळतात. अधूनमधून टोळधाडी येतात. 

इतिहास : बायबलच्या जुन्या करारात वर्णन केल्याप्रमाणे ख्रिस्ताआधी दोन हजार वर्षापूर्वी झालेल्या अब्राहम याने ðज्यू संस्कृतीचा पाया घातला. 

अब्राहमचा नातू जोसेफ याने बारा ज्यू टोळ्या एकत्र आणून ज्यू राष्ट्राची निर्मिती केली. त्याच्या वंशजांनी ज्यूडा व इझ्राएल अशी दोन राज्ये भरभराटीस आणली. सॉल, डेव्हिड व सॉलोमन हे महत्त्वाचे राजे होऊन गेले. इ. स. ७० मध्ये रोमनांनी ही राज्ये नष्ट केली व त्यांना पॅलेस्टाइन नाव देऊन आपल्या साम्राज्याचा प्रांत बनविले. यानंतर धार्मिक छळामुळे कित्येक ज्यू देशांतर करून गेले. रोमानांनंतरचा येथील इतिहास अरब, ख्रिस्ती, क्रूसेडर, मोंगल, तुर्क व ब्रिटिश ह्यांच्या सत्तांचा होय. ज्यू लोक जगभर पसरले तरी त्यांची एकात्मता मात्र कायम होती. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जगातील ज्यू लोकांच्या प्रतिनिधींनी ‘झाय्‌निझम्’ची स्थापना केली. ज्यूंसाठी पॅलेस्टाइन हे स्वतंत्र राज्य असावे हे झाय्‌निझम्‌चे उद्दिष्ट होते. १८८२ मध्ये रशियातून आलेल्या ज्यू लोकांची पहिली वसाहत पॅलेस्टाइनमध्ये झाली. पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस ब्रिटिशानी पॅलेस्टाइन जिंकले व युद्धानंतर त्यांच्याकडे ते महादिष्ट प्रदेश म्हणून राहिले. ब्रिटिश राज्यकर्त्यानी १९१७ सालच्या बाल्फोर जाहीरनाम्यानुसार ज्यूंच्या स्वतंत्र राज्यकल्पनेस दुजोरा दिला. स्थानिक अरब जमीनदारांकडून जमिनी विकत घेऊन ज्यू लोकांनी तेथे आणखी वसाहती केल्या. परंतु जमिनीचे मालकी हक्क ज्यू भांडवलदारांकडे गेल्यामुळे ज्यू आणि अरब लोकांत तेथे तंटे सुरू झाले, म्हणून दुसरे महायुद्ध सुरू झाल्याचा फायदा घेऊन ब्रिटिशांनी ज्यू लोकांच्या स्थलांतराला बंदी घातली. तरीसुद्धा जागतिक दडपणामुळे त्यांनी अखेर ज्यूराज्यनिर्मितीला मान्यता दिली. २९ नोव्हेंबर १९४७ रोजी संयुक्त राष्ट्रांनी पॅलेस्टाइनची फाळणी करून ज्यू लोकांसाठी स्वतंत्र राष्ट्र व जेरूसलेम शहरास आंतरराष्ट्रीय दर्जा असावा असा ठराव केला. त्यानुसार १४ मे १९४८ रोजी आजच्या इझ्राएलची स्थापना झाली. डेव्हिड बेन-गुरिअन हे राज्याचे पहिले पंतप्रधान व कायीम व्हाइट्‌समान हे पहिले अध्यक्ष म्हणून निवडले गेले. १९४९ मध्ये इझ्राएल संयुक्त राष्ट्रांचा सदस्य बनला. अरब लोकांना फाळणी मान्य न झाल्यामुळे थोड्याच अवधीत अरब राष्ट्रांनी संयुक्तरीत्या इझ्राएलवर चाल केली. तथापि या चिमुकल्या राष्ट्राने त्या संयुक्त फौजांना हरविले. संयुक्त राष्ट्रांनी दोघांच्या सीमावादांकरिता प्रथम बर्नार्ड व नंतर राल्फ बुंच यांची मध्यस्थ म्हणून नेमणूक केली होती. तथापि अरब व इझ्राएलमधील कुरबुरी चालूच राहिल्या. नोव्हेंबर १९५६ मधील सिनाईच्या चढाईत झालेला इझ्राएलचा विजय व इझ्रायली शस्त्रबलाचा वाढता धोका लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रांनी इझ्राएल व इतर अरब राष्ट्रे यांमधील सरहद्दी ठरवून दिल्या व गाझापट्टीत आपले सैन्य ठेवले. १९५९ मध्ये इझ्राएलच्या बोटी ईजिप्तने सुएझमार्ग नेण्यास बंदी केल्याने थोडे तंग वातावरण झाले होते जॉर्डन, सिरिया यांच्याशी सरहद्दींवरून अधूनमधून तंटेबखेडे होत. जून १९६७ मध्ये या कुरबुरीचे मोठ्या युद्धात रूपांतर झाले. सहा दिवसांच्या युद्धात इझ्राएलने संपूर्ण जेरूसलेम शहर, गाझापट्टी, सिनाई द्वीपकल्प, जॉर्डन नदीचा पश्चिम तीर व सिरियाच्या सीमेवरील काही प्रदेशाचा ताबा मिळवून अरबांचा पराभव केला. संयुक्त राष्ट्रांनी मध्यस्थी करून युद्धबंदी केली. ऑक्टोबर १९७३ मध्ये अरबांशी झालेल्या सशस्त्र संघर्षानंतर परिस्थिती पुन्हा गंभीर झाली. अरब राष्ट्रांनी तेलाचा शस्त्र म्हणून प्रथमच वापर केला व जागतिक दडपणामुळे परिस्थिती थोडी निवळली. तथापि आजही इझ्राएल व अरब यांचे संबंध स्फोटकच आहेत. 


राजकीय स्थिती : इझ्राएल हे सार्वभौम लोकसत्ताक राज्य आहे परंतु या देशाचे संविधान लिहिलेले नाही. देशातील राज्यव्यवस्था १९५० च्या कायद्याप्रमाणे, सरकारी धोरणानुसार चालत असून क्रमाक्रमाने काही मूलभूत कायदे अंमलात आणून कालांतराने ते देशाच्या संविधानात समाविष्ट करावयाचे आहेत. १९५८, १९६० व १९६४ साली असे काही कायदे मंजूरही झाले  आहेत. इझ्रायली लोकसभेला नेसेट म्हणतात. १८ वर्षावरील इझ्रायली नागरिक मतदानास पात्र असून लोकसभेच्या सभासदत्वासाठी २१ वर्षावरील व्यक्ती (देशातील न्यायाधीश, मुलकी व लष्करी अधिकारी, राजकीय दूतावासांतील, तसेच राजकीय आश्रय घेतलेल्या व्यक्ती सोडून) निवडणूक लढवू शकते. ही निवडणूक दर चार वर्षांनी, गुप्त मतदान व प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने होते. या सभेचे १२० सदस्य (पैकी ४ सरकारनियुक्त) असून तेच राष्ट्राध्यक्षाची निवड करतात. राष्ट्राध्यक्षाची मुदत पाच वर्षांकरिता असून तो सामान्यत: पुन्हा एकदाच निवडणुकीस पात्र असतो. राष्ट्राध्यक्ष न्यायाधीश, पंतप्रधान व सरकारी अर्थखात्याचे सल्लागार यांची नेमणूक करतो. जानेवारी १९४९ च्या निवडणुकीत मजूर पक्षातील मापाइ गटाला नेसेटमध्ये १२० पैकी ४६ व मापाम गटाला १९ जागा मिळून डेव्हिड बेन-गुरिअनने  मंत्रिमंडळ बनविले. नोव्हेंबर १९५२ मध्ये व्हाइट्‌समान मृत्यू पावला व यिट्झाक बेन झ्वी अध्यक्ष झाला. त्याची १९५७ व १९६२ मध्ये पुन: अध्यक्षपदी निवड झाली. १९५१ मध्ये दुसरी नेसेट निवडली गेली व पुन: बेन-गुरिअनचे मंत्रिमंडळ अधिकारावर आले. १९५३ मध्ये बेन-गुरिअन काही काळ निवृत्त झाला व मोशे शारेट पंतप्रधान झाला. जुलै १९५५ मध्ये तिसरी सार्वत्रिक निवडणूक झाली व मध्यंतरी संरक्षणमंत्री म्हणून आलेला बेन-गुरिअन पुन: मुख्य प्रधान झाला. नोव्हेंबर १९५९ व ऑगस्ट १९६१च्या निवडणुकांतही मापाइ गटाचेच वर्चस्व राहून बेन-गुरिअनचे संयुक्त मंत्रिमंडळ अधिकारावर राहिले. एप्रिल १९६३ मध्ये बेन झ्वी मृत्यू पावला व झाल्मन शाझार अध्यक्ष झाला. तो १९६९ मध्ये पुन: निवडून आला. १९६३ मध्ये बेन-गुरिअनने राजीनामा दिल्यावर अर्थमंत्री लीव्ही एशकॉल पंतप्रधान झाला. नोव्हेंबर १९६५ च्या निवडणुकीनंतरही त्याचेच सरकार अधिकारपदावर राहिले. बेन-गुरिअन यावेळी रफी या छोट्या गटाचा नेता होता. १९६८ मध्ये मजूरपक्षातील तीन गटांची एकी होऊन इझ्राएल मजूरपक्षाला ५९ जागा मिळाल्या. २६ फेब्रुवारी १९६९ ला एशकॉल मरण पावला. नंतर एप्रिल १९६९ मध्ये श्रीमती गोल्डा मेअर यांनी मंत्रिमंडळ बनविले. एप्रिल १९७३ मध्ये ईफ्रेइम काट्चाल्‌‌स्की अध्यक्ष झाला. १९७४ मध्ये गोल्डा मेअर यांनी राजीनामा दिला व यिट्झाक राबिन याचे मंत्रिमंडळ अस्तित्वात आले. 

स्थानिक राज्यकारभाराच्या सोयीसाठी इझ्राएलची २९ नगरपालिका (पैकी २ अरब), ११८ स्थानिक स्वराज्यसंस्था (पैकी ४७ अरब व ड्रूझिझ) आणि ६९५ खेड्यांची ४८ प्रादेशिक मंडळे (पैकी एक अरब) यांमध्ये विभागणी केलेली आहे. न्यायदानासाठी मुलकी व लष्करी न्यायालये निरनिराळी आहेत. जिल्हा न्यायालये ही अपील न्यायालये असून त्यांना धार्मिक बाबी सोडून इतर कज्जे चालविण्याची मुभा आहे. धार्मिक स्वरूपाच्या खटल्यांकरिता प्रत्येक जमातीसाठी स्वतंत्र न्यायमंडळ आहे. जेरूसलेममध्ये सर्वोच्च न्यायालय आहे. देशात फाशीची शिक्षा १९५४ पासून बंद करण्यात आली असली, तरी युद्धगुन्हेगार व नाझी संघटनेशी संबंध असणाऱ्यांना फाशी दिली जाते. १९६२ मध्ये आइकमान या नाझी अधिकाऱ्याला महायुद्धात त्याने केलेल्या ज्यूंच्या कत्तलीसाठी फाशी दिले गेले. 

देशातील लष्करात ६१,५०० सैनिक असून त्यांपैकी १२,००० स्त्रिया आहेत. सु. २,००,००० राखीव सैनिक आहेत. नाविक दलात दोन पाणबुड्या, एक गस्तनौका, नऊ पाणतीरबोटी, बारा क्षेपणास्त्र बोटी इ. असून नौदलात १९७३ मध्ये २०० अधिकारी व २,००० सैनिक होते. विमानदलात ४२५ वर निरनिराळ्या जातींची विमाने आहेत. १८ ते २६ वर्षे वयाच्या अविवाहित स्त्रियांस वीस महिन्यांची व या वयाच्या पुरुषांस छत्तीस महिन्यांची लष्करी चाकरी सक्तीची असून फक्त स्त्रियांना केवळ धार्मिक कारणासाठी लष्करी चाकरीतून सूट मिळू शकते. देशाच्या राखीव लष्करदलात स्त्री-पुरुषांना अनुक्रमे वयाच्या ३४ व ५५ वर्षापर्यंत नोकरी करावी लागते. देशाची सेनादले संरक्षणांबरोबरच निर्वासितांमध्ये साक्षरताप्रसार, प्रौढ शिक्षण व सरहद्दीवरील खेड्यांतून शेतीसुधारणा ह्या जबाबदाऱ्या पार पाडतात. इतरही अनेक नियमांनुसार स्त्रीपुरुषांस सक्तीने वा स्वेच्छेन लष्कर, शेतीसुधारणा, वसाहत केंद्रे, इतर संस्था यांत कामे  करावी लागतात.

आर्थिक स्थिती : स्वराज्यप्राप्तीनंतर इझ्राएलची लोकसंख्या वाढत असली, तरी देशाच्या उत्पादनात प्रतिवर्षी सरासरी ११ टक्के वाढ होत आहे. १९४८ मध्ये इझ्राएलची आर्थिक स्थिती बिकट होती परंतु स्वातंत्र्यानंतर योजना, बाहेरील मदत व अपार कष्ट यांमुळे इझ्रायली लोकांनी आपले राष्ट्र बलवान केले आहे. १९६१ मध्ये इझ्राएलने अयनांबरात यान पाठवून अवकाशशास्त्रात महत्त्वाचे स्थान मिळविले आहे. तसेच अणूबाँब निर्मितीपर्यंतही प्रगती केली आहे.  

देशातील ९०% जमिनीचे राष्ट्रीयीकरण झालेले असून नाममात्र भाड्याने जमीन लोकांना कसण्यास दिली जाते. इझ्रायली कृषिपद्धतीची दोन महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे ‘मोशाव’ व ‘किबुत्स’ होत. मोशाव पद्धतीमध्ये शेतकऱ्यांना सारखी जमीन देऊन त्यांचे गाव बनविलेले असते. किबुत्स हा सामुदायिक शेतीप्रकार असून येथे तो यशस्वी झाला आहे. १९६९ मध्ये देशात ४२० मोशाव व २३५ किबुत्स होते. १९४८-४९ मध्ये एकूण लागवडीखालील जमीन २,०२,३४३ हे. होती. १९६७-६८ मध्ये ती ४०,४६,८६० हे. (त्यापैकी ५% ओलीत) झाली. पिकाखालील जमिनीपैकी २०% जमिनीत फळे, ७% जमिनीच भुईमुग, बटाटे, पालेभाज्या व ६६% जमिनीत इतर पिके होतात. इझ्राएलमध्ये बार्ली, गहू, ज्वारी, डाळी, सूर्यफूल, तीळ, तंबाखू, टरबुजे, हिरवा चारा, कापूस, बीट, मोसंबी, संत्रे, ऑलिव्ह, केळी, द्राक्षे, सफरचंद इ. पिके होतात. इझ्रायली संत्री, मोसंबी वगैरे फळे जगप्रसिद्ध असून त्यांची मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. स्वातंत्र्यानंतर इझ्राएलने आपली जंगलसंपत्ती वाढविण्यासाठी योजना अंमलात आणल्या आहेत. १९६९ च्या आकडेवारीनुसार इझ्राएलला लागणाऱ्या वस्तूंपैकी ९९% अंडी, ९८·५% भाजीपाला, ९४·२% दूधदुभते, ९०% फळे, ८३% बटाटे, ७७% मांस, ७६% मासळी, २७·८% धान्य व २३·२% खाण्याचे तेल इझ्राएल स्वत: निर्माण करते. १९६६ मध्ये देशात २,०९,००० गुरे, १९७० मध्ये ३,३३,००० शेळ्या मेंढ्या, २६,००० ओझ्याची जनावरे व ७०,००,००० कोंबड्या होत्या. इझ्रायली गाईची गणना जगातील उत्कृष्ट गाईमध्ये होत असून प्रत्येक गाय प्रतिवर्षी सरासरी ५,७६० लि. दूध देते. 

देशातील खनिजसंपत्तीमध्ये मृत समुद्रातील क्षार-पोटॅश, ब्रोमीन, मीठ, फॉस्फेट यांचा अंतर्भाव होतो. १९७०-७१ मध्ये पोटॅशचे उत्पादन ९,०९,३०० टन व १९६८-६९ मध्ये फॉस्फेटचे दहा लक्ष टन झाले. ईलॅथ शहराजवळ तिम्ना येथे तांब्याचे साठे सापडले असून १९६८-६९ मध्ये १०,२५० टन उत्पादन झाले होते. गाझा पट्टी जवळील हेलेत्झ येथे खनिज तेलाचा व मृत समुद्राजवळ रोश जोहार येथे नैसर्गिक वायूचा साठा सापडला आहे. १९७१ मध्ये ८३,००० टन तेलाचे व १९७० मध्ये १,२३,००० टन तेलाइतक्या वायूचे उत्पादन झाले. ४६,००० टन मॅग्नेशियम व ८०,००० टन हायड्रोक्लोरिक ॲसिड उत्पादन करण्याचा कारखाना अरोड विभागात उभारला जात आहे. 


देशातील सर्व वीज औष्णिक असून नैसर्गिक इंधनाचे साठे अपुरे असल्यामुळे विद्युत्‌निर्मितीसाठी  पवनशक्ती, सूर्यशक्ती व अणूशक्ती वापरात आणली जात आहे. १९६८-६९ मध्ये सु. ४७० कोटी किवॉ. तास वीज निर्माण झाली त्यापैकी ३४% उद्योगधंद्यांसाठी व २४% पाटबंधाऱ्यांसाठी वापरली गेली. १९७०-७१ मध्ये सु. ६७७ कोटी किवॉ. तास वीज वापरली गेली. 

इझ्राएलमधील विविध उद्योगधंद्यांचा उगम निर्वासितांच्या दैनंदिन गरजांमधून झाला असल्यामुळे येथे औषधे, सौंदर्यप्रसाधने, लोखंडी वस्तू, कातडी वस्तू, कागद, टायर काचसामान, प्लॅस्टिक, तंबाखू , हलकी यंत्रे, विद्युत् उपकरणे, प्रशीतकांची जुळणी हे उद्योग झपाट्याने वाढले. तसेच फळांवर प्रक्रिया करणारे कारखाने, रसायने, कापड गिरण्या यांचीही वाढ झपाट्याने झाली. हिऱ्यांना पैलू पाडणे हा ज्यूंचा पिढीजात धंदा. त्यामुळे या उद्योगात इझ्राएलचा बेल्जियम खालोखाल क्रमांक लागतो. अलीकडे मच्छीमारी हाही येथील महत्त्वाचा धंदा झाला आहे. 

इझ्राएलमधील हिस्टाद्रुत ही कामगारसंघटना प्रबळ असून १९६७ मध्ये तिचे १० लक्ष सदस्य होते त्यांपैकी ४०,००० अरब होते. कामगार कल्याणाशिवाय ही संघटना शेती, उद्योग, शिक्षण, आरोग्य, सामाजिक विमा, प्रकाशन व इतर सांस्कृतिक कार्यांतही भाग घेते. १९६७ साली देशातील कामगारांपैकी १२·६% शेती, २४·६% उद्योग, ७·६% बांधकाम, १३·५% व्यापार, २४·१% शासकीय सेवा ७·३% वाहतूक या कामांत होते. १९७० मध्ये नोंदलेल्या बेकारांची रोजची सरासरी २,२११ होती. 

इझ्राएलमध्ये आयात केलेल्या मालांत प्रामुख्याने विमाने, जहाजे, खनिज तेल, वंगण, लोखंड व पोलाद, औषधे, रसायने, अनघड हिरे, धान्य इत्यादींचा भरणा असून १९६७ मध्ये २६% अमेरिकेकडून, १९% ब्रिटनकडून, ८% पश्चिम जर्मनीकडून व ५% नेदर्लंड्सकडून आयात झाली. निर्यात मालांमध्ये फळे, फळांचे रस व मुरंबे, पैलु पाडलेले हिरे, कापड, मद्ये, मिठाई, रसायने, अंडी, पोटॅश, सिमेंट, मोटारी, टायर व विद्युत् उपकरणे यांचा समावेश असून १९६७ मध्ये त्यांतील १६% अमेरिकेला, १३% ब्रिटनला, ११% पश्चिम जर्मनीला, ७% बेल्जियमला, ६% नेदर्लंड्‌सला व ५% स्वित्झर्लंडला निर्यात झाला. निर्यातीपैकी ३२% हिरे, १८% फळे व १०% कापड होते. १९७० मध्ये नुसत्या लिंबू जातीच्या फळांची निर्यात ८·३ कोटी अमेरिकी डॉलर्सची झाली. १९७० मध्ये ८०% आयात अमेरिका, ब्रिटन व ‘ईईसी’कडून झाली आणि निर्यातीपैकी २५%’ईईसी’ कडे, १२% ब्रिटनकडे, २२% अमेरिकेकडे, १३% आफ्रिकेकडे व ५% आशियाकडे झाली. 

बँक ऑफ इझ्राएलची स्थापना १९५४ मध्ये  झाली. १९६९ मध्ये चार इतर बँका व २८ व्यापारी बँका देशात कार्य करीत होत्या. लोकसंख्येत निर्वासितांची भर पडत गेल्यामुळे तसेच उत्पन्नाच्या १/२ रक्कम संरक्षणावर खर्च होत असल्याने इझ्रायली अंदाजपत्रक आजतागायत तुटीचे आहे व ही तूट भरून काढण्यासाठी पश्चिम जर्मनीकडून युद्धाची भरपाई, परराष्ट्रांतील ज्यूंकडून मदत, अमेरिकेचे अनुदान व सरकारी कर्ज यांचा अवलंब केला गेला आहे. परदेशी कंपन्यांवरील कर कमी व त्यांच्या चलनात नफा घेण्याची सवलत यांमुळे परदेशी भांडवल येऊन उद्योग वाढले आहेत. 

इझ्रायली पौंड हे चलन असून त्याची १०० ॲगुरातमध्ये विभागणी केली आहे. १९६९ मध्ये इझ्रायली १०० पौंडांची किंमत ११ पौंड १८ शि. २ / पे. स्टर्लिंग व २८·६० अमेरिकन डॉलर इतकी होती. 

देशात १९७१ मध्ये ९,२८० किमी. लांबीचे रस्ते होते. १९७० मध्ये देशात ३,२०० बसगाड्या व १,३६,००० खासगी मोटारवाहने होती. लोहमार्ग सरकारी मालकीचे असून त्यांची लांबी १९६९ मध्ये ९४९ किमी. होती. इझ्राएलच्या व्यापारी जहाजांच्या काफिल्यात १९७१ साली ११९ जहाजे होती. हैफा, तेल आवीव्ह, ॲशदॉद व ईलॅथ ही येथील महत्त्वाची बंदरे होत. जेरूसलेमच्या वायव्येस सु. ३७ किमी. लोड (लिडा) येथे महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. परदेशी विमानकंपन्यांशिवाय इझ्रायली एल्आल ही विमानकंपनी परदेशांशी वाहतूक करते. तिने १९७० मध्ये साडेपाच लक्ष प्रवाशांची वाहतूक केली. 

देशात १९७२ मध्ये ५२५ टपाल व तारकचेऱ्या असून ३६ फिरत्या टपालकचेऱ्या, ३,७०,००० दूरध्वनियंत्रे व ६,००,००० रेडिओ व ५,००,००० दूरचित्रवाणीयंत्रे होती. जेरूसलेम येथील केंद्रातून ११ भाषांत कार्यक्रम प्रसारित होतात. देशात २६ दैनिके असून त्यांपैकी १७ हिब्रू व बाकीची अरबी, इंग्लिश, फ्रेंच वगैरे भाषांतून प्रसिद्ध होतात. दर शंभर माणसांगणिक २१ दैनिके खपतात. याशिवाय येथे ४०४ नियतकालिके (पैकी ३०० हिब्रू) प्रसिद्ध होतात. यहुदी वर्ष सुत ३५४ दिवसांचे असते. यहुदी वर्ष ५७३१ हे १ ऑक्टो. ७० ते १९ सप्टें. ७१ पर्यंत व ५७३२ हे २० सप्टें. ७१ ते ८ सप्टें. ७२ पर्यंत होते. 

लोक व समाजजीवन : इझ्राएलमध्ये १९४८ साली सु. ७·२ लक्ष लोक होते स्थलांतर करून आलेल्या ज्यूंमुळे ही संख्या १९६० मध्ये २० लक्षांवर गेली. हल्लीच्या लोकसंख्येपैकी सु. ४४% ज्यू इझ्राएलमध्येच जन्मलेले असून बाकीचे प्रामुख्याने आफ्रिकेतून व आशियातून आलेले आहेत. एकूण लोकसंख्येपैकी २५,६०,००० लोक ज्यू जमातीचे असले, तरी ते निरनिराळ्या देशांतून स्थलांतर करून आल्यामुळे संस्कृतिसंकराची उदाहरणे येथे दिसून येतात. यांची मातृभाषा हिब्रू व धर्म ज्यूडा आहे. परंतु त्यातही केअराइट्‌स व समॅरिटन असे दोन पंथ व यूरोपातून आलेले सेफार्डी आणि आशियाआफ्रिकेतून आलेले ॲश्केनाझी असे दोन गट आहेत. यांशिवाय ड्रूझिझ ३६,०००, अरब व इतर इस्लामी ३,२६,०००, ख्रिस्ती ७६,००० इ. लोकही येथील रहिवासी असून त्यांतही निरनिराळे पंथ दिसून येतात. देशात सर्वांना धार्मिक स्वातंत्र्य असून राज्यातील धर्मविषयक मंत्रिमंडळ देशातील सर्व प्रकारच्या धार्मिक संस्थांना मदत व संरक्षण देते. देशात सु. ४,००० सिनॅगॉग, १०० मशिदी व १६० चर्च आहेत. बहाई पंथाचे मुख्य कार्यालय हैफामध्ये आहे. १९६७च्या युद्धानंतर ८९,३५९ चौ.किमी. क्षेत्रातील सु. १० लक्ष लोक इझ्रायली अमलाखाली आहेत. 

निर्वासितांच्या पुनर्वसनाचे, नोकऱ्यांचे व शिक्षणाचे प्रश्न आजही इझ्राएलपुढे आहेत. अर्थातच घरांचा तुटवडा, कुशल कारागिरांचा अभाव, मजुरांची टंचाई, घरबांधणीच्या सामानाचे अपुरे प्रमाण, वाढती लोकसंख्या आणि चलनाची चणचण हे प्रश्न इझ्रायली सरकारपुढे नित्याचेच होऊन बसले आहेत. १९५७ पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारी बांधकाम व पुनर्वसन खात्याने निर्वासितांसाठी अनुक्रमे १,८०,००० व ५०,००० घरे बांधली पण तीही अपुरी  पडली. यहुदी स्त्री-पुरुषांचे आरोग्य उत्तम असून त्यांचे सरासरी आयुष्यमान अनुक्रमे ७०·५ व ७६·६ वर्षे आहे. जन्म व मृत्यू यांचे प्रमाण अनुक्रमे दरहजारी २३·४ व ७·२ आहे (१९६९). अ-यहुदी लोकांचे हे प्रमाण हजारी अनुक्रमे ४६·४ व ५·९ आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशोदेशीचे लोक स्थलांतर करून आल्यामुळे हिवताप व इतर साथीच्या रोगांचा झपाट्याने प्रसार झाला परंतु नागरिकांच्या व सरकारी पातळीवरील अविरत प्रयत्नांमुळे त्यांचे समूळ उच्चाटनही झाले. देशात हिस्टाद्रुत या संघटनेमार्फत लोककल्याणार्थ बरेच प्रयत्न करण्यात आले. सार्वजनिक आरोग्याखेरीज अंध व अपंगांच्या प्रकृतीची विशेषरीत्या देखभाल करण्यात येते व त्यांच्या शिक्षणाचीही सोय केली जाते. युद्धात अपंग अगर जखमी झालेल्यांना विशेष स्वरूपाचा भत्ता देण्यात येतो. १९५४ मध्ये केलेल्या कायद्यानुसार वृद्धापकालाचा भत्ता व अपघात विमा हे सक्तीचे आहेत. १९७१ मध्ये १५८ रुग्णालये व २२, ८६६ खाटांची इझ्राएलमध्ये सोय होती.  


सरकारी कामकाज हिब्रू व अरबी भाषांत होते. तथापि इंग्रजीचा प्रभावही मोठा आहे. इझ्रायली, प्रामुख्याने हिब्रू, साहित्याची परंपरा वरीच जुनी आहे [→ हिब्रू भाषा-साहित्य]. ज्यू लोक इतिहासकालात जगभर पसरल्यामुळे विविध भाषांमध्ये ज्यू कवी, लेखक, शास्त्रज्ञ व कलाकार ह्यांनी लेखन केले आहे. इझ्राएलच्या स्थापनेनंतर येथील हिब्रू साहित्यात भरच पडत असून दरवर्षी सु. दोन हजारांवर पुस्तके प्रकाशित होतात. देशात लहान मोठी एकूण हजारावर ग्रंथालये असून जेरूसलेम येथील ज्यूईश नॅशनल अँड युनिव्हर्सिटी लायब्ररीमध्ये सु. १५ लाख ग्रंथ आहेत. याखेरीज जाफा येथे ८०,००० अरबी हस्तलिखितांचा संग्रह आहे. 

५ ते १४ वर्षे वयाच्या सर्व बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण असून धार्मिक शिक्षणासाठी स्वतंत्र शाळा आहेत. बहुतेक शाळा संमिश्र स्वरूपाच्या असून त्यांत ८ वर्षेपर्यंत प्राथमिक शिक्षण व ४ वर्षेपर्यंत पुढील माध्यमिक शिक्षण दिले जाते. देशात अरबांसाठी स्वतंत्र शाळा आहेत. १९७०-७१ मध्ये ज्यू प्राथमिक शाळा ५,७१९, शिक्षक ४३,३७०, विद्यार्थी ७,३६,२४३ माध्यमिक शाळा ५२३, शिक्षक १३,१९०, विद्यार्थी १,३१,७०६ शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालये ३८, शिक्षक १,१११ व विद्यार्थी ५,०९१ होते. अरबी प्राथमिक शाळा ३३४, शिक्षक ४,४१४, विद्यार्थी १,१६,७३३ माध्यमिक शाळा ६६, शिक्षक ६०६, विद्यार्थी ८,३७४ व एक शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालय (३४ शिक्षक व ३५८ विद्यार्थ्यांचे) होते. १९२५ मध्ये स्थापन झालेल्या जेरूसलेम येथील हिब्रू विद्यापीठात १,५०० शिक्षक व १५,००० विद्यार्थी हैफा येथील विद्यापीठात १९७१ मध्ये १,०००हून अधिक शिक्षक व २१,३२५ विद्यार्थी, तेल आवीव्ह विद्यापीठात १,५०० शिक्षक व ८,५०० विद्यार्थी १९७१ मध्ये होते. व्हाइट्‌समान सायन्स इन्स्टिट्यूटमध्ये १९७१ मध्ये १,१०० तज्ञ काम करीत होते. बार इल्लान विद्यापीठ हे प्रामुख्याने धार्मिक विद्यापीठ असून त्यात १९६९ मध्ये ६३० शिक्षक व ५,००० विद्यार्थी होते. याशिवाय इझ्राएल अकादमी सर्व क्षेत्रांत मौलिक कार्य करते. इझ्राएलमध्ये ३६ विविध वस्तुसंग्रहालये असून बायबलकालीन अवशेषांचे येथे चांगले जतन झाले आहे. इझ्राएल राष्ट्रीय संग्रहालय १९६५ मध्ये स्थापन होऊन त्यात कला, पुराणवस्तू व मृत समुद्रात सापडलेल्या अवशेषांची खास दालने आहेत. संगीत कलेला उत्तेजन देण्यासाठी तेल आवीव्ह व जेरूसलेम येथे संगीत महाविद्यालये असून ती विद्यापीठांशी संलग्न आहेत. इझ्राएलमध्ये १९७१ मध्ये २७० चित्रपटगृहे असून त्यांत १,८५,००० प्रेक्षकांची सोय होती. येथे फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल व जलतरण हे विशेष लोकप्रिय खेळ असून त्यांसाठी क्रीडांगणे व तलावाच्या सोयीही उपलब्ध आहेत. खेळाडूंचा सर्वांगीण विकास होण्यासाठी १९६१ मध्ये क्रीडा शरीरसंवर्धन मंडळ स्थापले जाऊन त्याच्याशी देशातील सहा विख्यात क्रीडासंस्था संलग्न झालेल्या आहेत. 

अतिशय अल्पकाळात बलवान राष्ट्र बनविल्यामुळे इझ्राएल हे प्रवाशांचे आकर्षण ठरले आहे. ⇨ जेरूसलेम हे राजधानीचे शहर असून ⇨ तेल आवीव्ह-जाफा, ⇨ हैफा ही प्रमुख व तेल आवीव्ह जवळील रामातगान (लो. १,०९,४००–१९६९), होलॉन (८०,१००), पेटा तीक्वा (७६,७००), मातान्या (७६,७००) ही इतर महत्त्वाची शहरे आहेत. येशू ख्रिस्ताचे जन्मस्थान ⇨ नॅझारेथ (२५,०००) तसेच बीरशीबा (७२,०००), साफद (९,५००), एकर (१८,०००), ईलॅथ ही शहरे व इतर कित्येक बायबलकालीन महत्त्वाच्या वास्तू इझ्राएलमध्ये असल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. (चित्रपत्र ३८).

संदर्भ : पालकर, ना. ह. इझ्राएल छळाकडून वळाकडे, पुणे, १९६६. 

परांजपे, श. द.


इझ्राएल