बीन्या देल मार : दक्षिण अमेरिकेच्या चिली प्रजासत्ताकातील पर्यटकांचे अत्यंत लोकप्रिय विश्रामस्थळ. लोकसंख्या ३,६३,१०० (१९७८). हे व्हॅलपारेझोच्या उत्तरेस ६ किमी. पॅसिफिक महासागराच्या किनारी वसलेले आहे. सागरकिनाऱ्यावरील आकर्षक व सर्व सुखसोयींनी परिपूर्ण शहर अशी त्याची ख्याती आहे. हे लोहमार्ग व रस्त्यांनी व्हॅलपारेझो व सॅंटिआगो यांच्याशी जोडलेले आहे. शहराचे आल्हाददायक हवामान, रमणीय उद्याने, विस्तीर्ण पुळणी, भव्य उपहारगृहे, चित्रपटगृहे, कॅसिनो, क्रीडा मैदाने इत्यादींमुळे पर्यटकांची येथे गर्दी असते.

हे एक औद्योगिक केंद्रही आहे. येथे साखर, तेलशुद्धीकरण, रसायने, अल्कोहॉल, मद्ये, कापड, अन्नप्रक्रिया इ. उद्योग विकसित झालेले असून आसमंतातील शेतमालाची ही एक प्रमुख बाजारपेठ आहे. येथे नौसैनिकी तळ आहे. येथील ’सरो कॅस्टिलो’ हे चिलीच्या राष्ट्राध्यक्षांचे उन्हाळ्यातील निवासस्थान प्रसिद्ध आहे.

शहाणे, मो. ज्ञा.