होबार्ट : ऑस्ट्रेलियाच्या टास्मानिया राज्याची राजधानी व प्रमुखबंदर. लोकसंख्या २,१७,९७३ (२०१३ अंदाज). पुष्कळदा बर्फा-च्छादित होबार्ट बंदराचे दृश्य असलेल्या व १,२७० मी. उंचीच्या मौंट वेलिंग्टनच्या पायथ्याशी, डरवेंट नदीमुख खाडीच्या पश्चिम किनारी वसलेले आहे. टास्मानियाचे हे प्रमुख दळणवळण केंद्र आहे. होबार्ट हे भरती-ओहोटीचा परिणाम होत नसलेले खोल पाण्याचे बंदर असून हे रेल्वे व रस्त्यांनी इतर शहरांशी जोडले आहे. 

 

ब्रिटिश समन्वेषक जॉर्ज बास याने १७९८ मध्ये डरवेंट नदीखाडीचे समन्वेषण केले होते. तद्नंतर १८०३ मध्ये फ्रेंचांच्या येथील घुसखोरीस प्रतिबंध करण्याच्या हेतूने न्यू साउथ वेल्सचा गव्हर्नर पी. जी. किंग याने आपले सैन्य येथे पाठविले व ब्रिटिशांची वसाहत स्थापण्यास सुरुवात केली. १८०४ मध्ये याच ठिकाणी होबार्ट वसवण्यात आले. १८४२ मध्ये यास शहराचा दर्जा मिळाला व १८५२ मध्ये येथे नगरपालिका स्थापन झाली. प्रचंड वणव्यामुळे १९६७ मध्ये शहराची मोठ्या प्रमाणात हानी झालेली होती. १८८१ मध्ये येथील ब्रिटिश वसाहतीचा सचिव रॉबर्ट होबार्ट याच्या नावावरून या शहराचे होबार्ट असे नामकरण करण्यात आले. 

 

होबार्ट व्यापार व उद्योगधंदे यासाठी प्रसिद्ध असून येथे जस्त, फळ- प्रक्रिया, मांस डबाबंदीकरण, अन्नप्रक्रिया, मिठाई, अवजारे, फर्निचर, कापड, रसायने, सिमेंट, काच, कागद, कातडी वस्तू इ. निर्मिती उद्योग विकसित झाले आहेत. येथून लोकर, फळे व भाजीपाला, जाम, केळी, मांस इ. पदार्थांची निर्यात व वाहने, यंत्रसामग्री, ग्राहकोपयोगी वस्तू यांची आयात करण्यात येते. 

 

येथे टास्मानिया विद्यापीठ आहे (१८९०). पर्यटनाच्या दृष्टीने यास महत्त्व असून येथील रोमन कॅथलिक व अँग्लिकन कॅथीड्रल, राज्य संसदभवन (१८३४), देशातील सर्वांत जुने रॉयल थीएटर (१८३६), ज्यू सिनॅगॉग (१८४३–४५), प्रसिद्ध ‘व्हॅन डीमेन्स लॅड फोक म्यूझियम’, समुद्रकिनाऱ्यावरची विश्रामगृहे, जुगारगृहे इ. पर्यटकांची आकर्षणे आहेत. 

 

पवार, डी. एच्.