वलभीपूर : वलभी. गुजरात राज्याच्या भावनगर जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे मुख्य ठिकाण प्राचीन वैभवशाली नगर व बौद्ध धर्माच्या अभ्यासाचे पूर्वीचे एक प्रमुख केंद्र. लोकसंख्या १०,८७८ (१९८१). हे शहर भावनगरच्या वायव्येस सु. ३५ किमी.वर असून अहमदाबाद-भावनगर या राज्यमार्गावर, धोला रेल्वेस्थानकापासून सु. १८किमी.वर वसलेले आहे.

या शहराच्या स्थापनेविषयीचा प्राचीन इतिहास फारसा ज्ञात नाही. पाणिनीच्या गणपाठात याचा उल्लेख आलेला आढळतो. स्कंदपुराण, कथासरित्सागर, दशकुमारचरित कनिंगहॅमच्या एन्शंट जिऑग्रफी आदी ग्रंथांत हे शहर खंबायत आखाताच्या पश्चिम किनाऱ्यावरील महत्त्वाचे बंदर होते असा उल्लेख मिळतो. मंजुश्री मुलाकल्प या बौद्ध ग्रंथात वलभीचा ॲसिरियाशी सागरमार्गे व्यापार चालत होता, असा उल्लेख आहे. स्थानिक लोक याला ‘वमिलपुर’ म्हणत असत. येथे ८४ जैन मंदिरे होती, असा ‘जर्नल ऑफ द रॉयल एशियाटिक सोसायटी’मध्ये उल्लेख मिळतो. गुप्तकाळात (इ.स. ३०० ते ५५०) हा प्रदेश (सौराष्ट्र) भटार्क या सेनापतीच्या आधिपत्याखाली होता (इ. स. ४७५). भटार्क हाच मैत्रक घराण्याचा मूळ पुरूष होय. त्यानंतर येथील राजघराणे ‘वलभी घराणे’ या दुसऱ्या नावानेही ओळखले जाऊ लागले. भटार्काने आपल्या राज्याची राजधानी म्हणून वलभीचा विकास केला. तत्पूवी या प्रदेशाची राजधानी वामनस्थळी (वंथली-जुनागढ जिल्हा) येथे होती. मेत्रकांचा बौद्ध धर्माला आश्रय होता. त्यामुळे पूर्व भारतातील नालंदा विद्यापीठाप्रमाणेच पश्चिमेस बौद्ध व जैन धर्मांच्या अभ्यासाचे केंद्र असावे, या हेतूने भिक्षूंनी वलभी येथे अनेक विहार बांधले व वलभीला पुढे विद्यापीठाचे स्वरूप प्राप्त झाले (इ. स. सातवे शतक). या भागातील इतर जंगलव्याप्त प्रदेशांच्या मानाने खंबायतच्या आखाताजवळील हे शहर, पश्चिमेकडून सौराष्ट्रात येणाऱ्या व्यापाऱ्यांना प्रवेशद्वार म्हणून अत्यंत सोयीचे होते. त्यामुळे व्यापारदृष्ट्याही या शहराला महत्त्व प्राप्त झाले होते. या प्रदेशावर भटार्कापासून सातव्या शिलादित्यापर्यंत मैत्रक घराण्यातील अनेकांनी राज्य केले (४६५ ते ७६६). पुढे अरबांनी वलभीवर स्वारी करून शहराची लूट केली व हे राज्य नष्ट केले. यानंतर येथून परागंदा झालेले मूळचे लोक वल अथवा वला या नावाने एकत्र झाले व त्यांनी या प्रदेशावर दहाव्या शतकाच्या मध्यापर्यंत राज्य केले व हा प्रदेश वल अथवा वला या नावाने ओळखला जाऊ लागला. पुढे पाटणच्या मूलराज सोळंकीने या प्रदेशावर आपली सत्ता गाजविली. १२६० मध्ये गोहेल राजपुतांनी व १२९७-९८ नंतर मुसलमानांनी या प्रदेशावर राज्य केले. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर ⇨ भावनगर संस्थानाचा संस्थापक गोहेल घराण्यातील भाऊसिंगजी याने वला व त्याच्या आसपासची दोन खेडी विसोजीला  दिली. त्याने वला संस्थानाचा विस्तार केला. त्यानंतर गंभीरसिंहजीच्या कारकीर्दीत इतर संस्थानांबरोबरच हे संस्थान सौराष्ट्रात विलीन झाले व पुढे १९४६ मध्ये वला शहराचे पुन्हा वलभीपूर असे नामकरण करण्यात आले. भावनगर शहराच्या विकासामुळे मात्र व्यापारकेंद्र म्हणून वलभीपूरचे महत्त्व कमी झाले. 

शहरात प्राचीन वस्तूंचे संग्रहालय, सार्वजनिक ग्रंथालय असून येथील बुधेश्वर व सिद्धेश्वर महादेवाची मंदिरे प्राचीन असल्याचे सांगितले जाते. शहरात विद्यालये, शासकीय विश्रामधाम, बी-बियाणे संवर्धन केंद्र आहे. 

पहा : भावनगर संस्थान मैत्रक घराणे वलभी विद्यापीठ.

चौंडे, मा. ल.