पिटकेअर्न : द. पॅसिफिक महासागरातील ब्रिटिश वसाहतीचे बेट. ते ताहितीच्या आग्नेयीस २,१७० किमी. असून पनामा आणि न्युझीलंड यांपासून समान अंतरावर आहे. पिटकेअर्न वसाहतीत ओएनो, हेंडरसन व ड्युसी या निर्जन बेटांचाही समावेश होतो. लोकसंख्या ७४ (१९७६). पिटकेअर्न बेटाचे स्थान २५४’ द. व १३०६’ प.यांदरम्यान असून या ज्वालामुखीजन्य बेटाचे क्षेत्रफळ पाच चौ. किमी. आहे. हे बेटे प्रवाळभित्तिविरहीत आहे. आणि हेच त्याचे वेगळेपण होय. बेटाच्या किनार्‍यावर सर्वत्र उंच कडे आहेत. मात्र दर्‍याखोर्‍यांतील जमीन सुपीक आहे. याची कमाल उंची ३०० मी. असून येथील हवामान उपोष्ण कटिबंधीय आहे.

फिलिप कार्टरेट या ब्रिटिश कप्तानाच्या नेतृत्वाखालील स्वॉलो या बोटीवरील रॉबर्ट पिटकेअर्न याने हे बेट प्रथम पाहिले (१७६७), म्हणून त्याचेच नाव या बेटास देण्यात आले. १७९० मध्ये ताहितीवरून वेस्ट इंडीजकडे निघालेल्या ‘बाउंटी’ या जहाजावरील फ्‍लेचर क्रिस्‌चन या बंडखोरांच्या नेत्याने येथे प्रथम वसाहत केली. या पहिल्या वसाहतीत त्या जहाजावरील केवळ २७ स्त्री-पुरुष होते. १८०८ मध्ये सील माशांच्या शिकारीसाठी या भागात आलेल्या अमेरिकन लोकांना या वसाहतीची पहिल्यांदा माहिती झाली. १८३१ व १८५६ मध्ये लोकसंख्येच्या वाढीमुळे येथील काही लोक ताहिती व नॉरफॉक या बेटांवर गेले.

बेटाच्या उत्तर किनारी अडम्सटाउन हे मुख्य शहर आहे. पनामा व न्युझीलंड यांच्याशी वाहतूक करणार्‍या जहाजांद्वारे या बेटाशी संपर्क ठेवला जातो. येथे हस्तकला, मासेमारी, पोस्टाच्या तिकिटांची विक्री इ. उद्योग चालतात. येथे न्यूझीलंडचे चलन चालते. १९७० पासून न्यूझीलंडमधील ब्रिटिशांच्या उच्चायुक्तामार्फत येथील कारभार पाहिला जातो.  

डिसूझा, आ. रे.