हारडांगर फ्योर्ड : नॉर्वेच्या नैर्ऋत्य भागात असलेला फ्योर्ड. फ्योर्ड म्हणजे हिमनदीमुळे किंवा जमीन खचून बनलेल्या दरीमध्ये, समुद्राचे पाणी शिरून निर्माण झालेला पाण्याचा लांबट चिंचोळा फाटा. लांबीच्या दृष्टीने देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या या फ्योर्डची उत्तर समुद्रातील लांबी स्ट्यूर्ड बेटापासून ईशान्येकडे हारडांगर पठारी भागापर्यंत ११३ किमी. आहे. याची रुंदी १० किमी. पर्यंत आढळते. याचा एक फाटा सॉर फ्योर्ड सु. ९२ मी. पर्यंत रूंद आहे. हारडांगर फ्योर्डची कमाल खोली ८९१ मी. आहे. या फ्योर्ड काठावर हारडांगर पर्वत असून याची उंची सु. १,८७५ मी. आहे. या फ्योर्डला अनेक धबधबे मिळतात. त्यांमध्ये व्हरिंग फॉल्स (उंची १६३ मी.) व शेगडाल (उंची १६० मी.) हे प्रसिद्ध धबधबे आहेत. या फ्योर्डचे अनेक फाटे असून त्यांमध्ये क्विन्हर्ड, सिल्ड, ग्रॅन्व्हीन, ऑर्स, ईड, ऑस हे प्रमुख आहेत.

 

हारडांगर फ्योर्ड तटीय भागात ऑडा, ईडीफ्योर्ड, रॉझेनडाल, व्हीक इ. शहरे आहेत. येथे दंतूर किनाऱ्यामुळे नैसर्गिक बंदराची निर्मिती झाली असून त्यामुळे जलवाहतुकीस चालना मिळाली आहे. बंदरामुळे आणि सभोवताली असणाऱ्या सूचिपर्णी वृक्षांमुळे किनाऱ्यावर छोट्या बोटी तसेच जहाज बांधणी व दुरुस्ती इ. उद्योगांची भरभराट झाली आहे. सामन माशांच्या शिकारीचा उद्योग, व्हायोलीन तयार करणे व भरतकाम यांसारखे कुटिरो-द्योग, फर्निचर निर्मितीचे कारखाने याच्या परिसरात आहेत. परिसरात पर्वतावरून कोसळणाऱ्या धबधब्याचा उपयोग करून विद्युत्निर्मिती करण्यात येते. याच्या किनाऱ्यावरील रॉशेनडाल येथील बॅरन लूदव्ही रॉशेनक्रन्स याने बांधलेला महाल (१६६०–६५, बॅरोनिल मॅन्शन) प्रसिद्ध आहे. येथील निसर्गसौंदर्य, धबधबे पाहण्यासाठी व येथे उत्तम हॉटेल सुविधा असल्यामुळे दरवर्षी अनेक पर्यटक यास भेट देतात.

गाडे, ना. स.